राष्ट्राच्या लष्करी संरक्षणासाठी हैद्राबाद ही भारताची उपराजधानी असणे आवश्यक.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सौ. माईसाहेब आंबेडकर यांच्यासमवेत हैद्राबाद येथील बेगमपेठ विमानतळावर तारीख 14 नोव्हेंबर 1954 रोजी दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी आगमन झाले. त्यांच्या स्वागताप्रित्यर्थ सिकंदराबाद शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष श्री. यादगीरवार, मराठवाडा शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे सहचिटणीस श्री. व्ही. एल. सुरवसे, बीड जिल्हा शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष श्री. व्ही जे. आरक, औरंगाबाद जिल्हा शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे सहचिटणीस श्री. ए. एम. साळवे. औरंगाबाद कॉलेजचे रजिस्ट्रार श्री. बी. एच. वराळे, हैद्राबाद राज्याचे अर्थमंत्री श्री. विनायकराव विद्यालंकार इत्यादी सद्गृहस्थ हजर होते.
प्रारंभी शेड्युल्ड कास्ट ट्रस्ट फंड होस्टेलच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी व कै. व्यंकटराव होस्टेलच्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब व सौ. माईसाहेब यांना पुष्पहार अर्पण केले. उपस्थित जनसमुदायाने “डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय. आंबेडकर झिंदाबाद “शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा विजय असो” आदि घोषणा करून वातावरण दुमदुमून सोडले. नंतर त्यांना परसियस हॉटेलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर त्यांनी मराठवाडा साहित्य परिषद व मराठी ग्रंथसंग्रहालय या संस्थांना भेट दिली. त्यांचा या दोन संस्थांच्या प्रमुखांकडून सत्कार करण्यात आला व सुमारे दीड तास त्यांनी विविध विषयांवर औपचारिक चर्चा केली.
भाषावार प्रांतरचनेवर बोलताना ते म्हणाले,
भारतातील सर्व भाषिक प्रांतात अत्यंत दुर्दैवी प्रांत जर कोणता असेल तर तो महाराष्ट्र होय. महाराष्ट्र इतरांकडून संपूर्णपणे नागवला गेला. सर्वांनी महाराष्ट्रीयांचे यथेच्छ दमन केले. महाराष्ट्रावर गुजराती-मारवाड्यांचे अबाधित वर्चस्व आहे. तर इकडे हैद्राबादेतील मराठवाड्यावर तेलगू लोकांचे आहे. वऱ्हाड तर हिन्दी भाषिकांना आपली वसाहतच वाटत आली आहे. याला कारण महाराष्ट्रीयांचे दुबळेपण त्यांच्यात काहीच प्राण उरलेले नाही. दिल्ली जिंकायच्या केवळ बाताच ते उठल्या सुटल्या मारीत असतात. 50/60 रुपयांच्या कारकुनीखेरीज त्यांना इतर काहीच करता येत नाही.. परंपरा पुष्कळ चांगली आहे. पण केवळ दिव्य भूतकाळ असून काय उपयोगाचा ? आमचे तथाकथित पुढारी गप्पा तर खूप मर्दुमकीच्या मारतात. पण एक जणही महाराष्ट्राच्या उत्कर्षाकरिता त्याग करावयास तयार नाही. प्रत्येकाला वाटते, जवाहरलालजी काय म्हणतील? अमुक काय करतील ? या भीतीनेच सर्व पछाडलेले आहेत. ही काय लोकशाही ? याला का विवेक म्हणायचा ? आज ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांना लोकशाहीवृत्तीचा स्पर्शही झालेला नाही. त्यांना वाटेल तसे ते करतात व करतील, त्यांना वाटेल तर संयुक्त महाराष्ट्र होईल.
सर्व दृष्टीने मुंबई शहर हे महाराष्ट्राचेच आहे. मुंबईवर आज गुजराती, पारशी व मारवाडी इत्यादी महाराष्ट्रीयेतरांचे वर्चस्व आहे. पण असे वर्चस्व देशातील सर्वच मोठ्या शहरांवर आहे. मद्रास, कलकत्ता वगैरे सर्वच मोठ्या शहराची कमी अधिक प्रमाणात अशी स्थिती आहे. मद्रासमध्ये आंध्रच्या हाती 30 टक्क्याहून अधिक व्यापार आहे. इतरांच्या मानाने लोकसंख्याही आंध्राची अधिक आहे. पण इतके असूनही भौगोलिक दृष्टीने मद्रास, आंध्रला मिळालेले नाही. कलकत्त्याचेही उदाहरण बघण्यासारखे आहे. कलकत्त्यावर बंगाल लोकांखेरीज, आसामी, उरीया वगैरे परप्रांतीय लोकांचाच व्यापारी व आर्थिक दृष्टीने ताबा आहे. बंगाली बाबू तेथे निव्वळ कारकुनी व मोलमजूरी करतात, असे असताही कलकत्ता बंगालचाच आहे. मग मुंबई हीच महाराष्ट्राची नाही, असे म्हणणे आंधळेपणाचे व अन्यायाचे आहे.
मुंबई महाराष्ट्राला मिळेल त्यांना निराळे वाटले तर ते चक्क करून दाखवतील व तुम्हाला म्हणतील, तुम्ही कोण आम्हाला विचारणार ? तुम्हाला काय करायचे ते करून घ्या.. त्यांचे खरेही आहे. कारण त्यांना माहीत आहे की कारकुनांची ही जात आपले काय करणार आहे ? शिवाय आजची लोकशाही आणि दर पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुका त्यांच्या पाठीशी आहेतच. आमच्या या लोकशाहीत निवडणुकीची तिकिटे चक्क विकत मिळतात. जो जास्त पैसे देईल, लांड्यालबाड्या करील तो निवडून येईल आणि पाच वर्षे मजा करील. ज्यांच्याजवळ भरपूर पैसा नाही त्यांनी स्वस्थ बसावे आणि घडेल त्याला लोकशाही म्हणून आशिर्वाद द्यावा.
राष्ट्राचे लष्करी संरक्षण आणि सत्तेच्या यंत्रणेत समान वाटा यादृष्टीने दक्षिणेत भारताची उपराजधानी असणे अवश्य आहे. माझे फार दिवसांचे मत आहे की हैद्राबाद, सिकंदराबाद व बोलाराम हा सर्व भाग मध्यवर्ती सरकारने ताब्यात घेतला पाहिजे व तेथे उपराजधानी कायम केली पाहिजे. दिल्लीला बसून सरकार राज्य हाकू म्हणते तेव्हा मला त्याच्या लष्करी निपुणतेचे हसू येते. आमचे राष्ट्र लष्करी बनवावयाचे असेल तर दक्षिण भारतात उपराजधानी ठेवणे संरक्षणाच्या दृष्टीने किमान गरजेसाठी अवश्य आहे. आज मध्यवर्ती सरकारात उत्तर भारतीयांचे वर्चस्व आहे. अध्यक्ष व पंतप्रधानांची दोन प्रांतातील बड्या व्यक्तीत आळीपाळीने अदलाबदल होत राहाणार आहे. दक्षिण सामान्य लोक सध्या सुद्धा नोकऱ्याकरिता दिल्लीला जाणे शक्य नाही व यंत्रणेत त्यांना वाटा मिळणेही त्यामुळे दुरापास्त आहे. भारतीय सर्व एक है जरी खरे असले तरी व्यवहारात ही भावना निरर्थक आहे. राजकारणात हे औदार्य अंगलट येते व भोळ्याभाबड्यांचा घात होतो. यासाठी हैद्राबादेत उपराजधानी आली तर दक्षिण भारतीयांना सरकारी यंत्रणेत स्थान मिळेल. सत्तेत इकडील लोकांनाही भाग घेता येईल. आमच्या डोक्यात हा व्यवहार येत नाही.
‘लिटरेचर’ या इंग्रजी शब्दाचे साहित्य हे चूक भाषांतर आहे. साहित्य स्वयंपाकाचे असते. हजामतीचे असते. त्या अर्थाने साहित्य या शब्दाची येथे समर्पकता पटणारी नाही. ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत, तुकारामाची गाथा वगैरे आपण वाचतो. ज्ञानेश्वर मोठा विद्वान होता. पण माझी एक शंका आहे. सर्व ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वरांनी वेदान्त विषयावर भाष्य केले, ब्रह्म हे सत्य आहे व ते सर्वव्यापी आहे, असे ज्ञानेश्वर म्हणाले. पण ज्ञानेश्वरीच्या शेवटी त्यांनी चातुर्वर्ण्याचे हिरीरीने समर्थन केले, ज्ञानेश्वर व त्याच्या इतर भावंडांना ब्राह्मणांनी जातीबहिष्कृत केले होते. त्यांना पुन्हा जातीत जावयाचे होते. यामुळेच त्यांनी रूढ चातुर्वर्ण्याच्या कल्पना उचलून धरल्या व समाजदंडापुढे कच खाल्ली. ब्रह्म जर सर्वव्यापी आहे तर ज्ञानेश्वर असे म्हणू शकले असते की, तुम्ही मला बहिष्कृत केले तर मी महारवाड्यात राहील. त्यांच्यातही ब्रह्म आहे. पण असे म्हणण्याऐवजी त्यांनी रेड्यामुखी वेद बोलविले. हा रेडा तेव्हापासून मात्र मुका झाला आहे.
इंग्लंडच्या लोकशाहीमागे शेकडो वर्षांची परंपरा आहे. तेथील सर्वसामान्य समाजातील सर्व अपप्रवृत्ती नष्ट झाल्यावर तेथे प्रौढ मतदानाचा हक्क मिळाला. आमच्या येथे लोकांचे अज्ञान हेच प्रौढ मतदानाच्या अधिकाराचे अधिष्ठाण झालेले आहे. लोकांना व त्यांच्या प्रतिनिधींना कसलेच ज्ञान नाही. यामुळे या पोकळ लोकशाहीच्या चौकटीचा लबाड़, संधीसाधू व हितसंबंधी लोक फायदा घेतात. पदवीधर होण्यासाठी मॅट्रिकच्यानंतर चार वर्षे अभ्यास करावा लागतो. क्रमाक्रमाने पदवीधर बनतो. पण लोकसभेचे, विधिमंडळाचे सभासद होण्यास अगर मंत्री बनण्यास आमच्या लोकशाहीत क्रम नाही. कसे तरी करून कोणी तरी निवडून यायचे, हजार भानगडी करून एका रात्रीतून मंत्रीपदापर्यंत पोचायचे, अशी विचित्र दशा आहे आमच्या राजकारणाची. अशारितीने निवडून येणाऱ्याच्या हातून लोकशाही परंपरा कशी निर्माण होणार आहे. येणाऱ्या 20 वर्षापर्यंत समाजाची शैक्षणिक, बौद्धिक व वैचारिक पातळी एकसूत्रीपणे वाढविली पाहिजे. लोकांना समजावून सांगून त्यांना पटवून देण्याची पद्धती (Persuasive method) अधिक वापरली पाहिजे. ही हुकूमशाही वाटेल, पण ती अवश्य आहे. ( श्रोत्यांपैकी एकाने रशियातील हुकूमशाही 40 वर्षापासून अबाधित राहिलेली असून तिची मिठी अधिकाधिक घट्ट होत असल्याचे सांगितले. तशाच रीतीने हुकूमशाही भारतातही कायम स्वरूप धारण करणार नाही का ? असे विचारले असता ) बाबासाहेब म्हणाले, धोका तर निश्चित आहे. पण धोका नाही कोठे ? आमची लोकशाही धोक्यापासून मुक्त आहे काय ? रशियात आजही हुकूमशाही ठेवणे मला अयोग्य वाटते. या प्रदीर्घ काळाचा खरे म्हटले तर रशियाने खरीखुरी लोकशाही व व्यक्तिस्वातंत्र्य प्रस्थापित करण्याकरिता उपयोग करून घ्यावयास हवा होता. परंतु तसे तेथे झालेले नाही. हुकूमशाहीतील हा धोका मला मान्य आहे पण लोकशाहीसाठी लागणारी अनुकूल जागृती व परंपराच आमच्या येथे आहे कोठे ? अंधश्रद्धा, रूढीप्रियता वगैरे दोषांमुळे आमचा समाज दृष्टिहीन बनला आहे.
कुंभमेळ्यात नागव्या साधूंच्या पायाखाली हजारो नागरिक तुडवून मेले. ही घटना काय दर्शविते ? मी मंत्री असतो आणि अधिकार माझ्या स्वाधीन असते तर मी या साधूना सेना पाठवून हाकून लावले असते. अवश्य असते तर गोळीबारही केला असता. गिरिकंदरात राहाणाऱ्या या साधुना लोकात यावयाचे असेल तर त्यांनी वस्त्रे लेवून नीट रीतीने आले पाहिजे. पण आमच्या राज्यकर्त्यांनी या प्रसंगी काय केले? लोकांच्या धार्मिक अधश्रद्धांचा लोकप्रियतेसाठी त्यांनी त्यांचा चक्क वापर केला.