अपुरे विद्यार्जन उपयोगाचे नाही.
हैद्राबादच्या मुक्कामात दिनांक 14 नोव्हेंबर 1954 रोजी संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल्ड कास्ट ट्रस्ट फंड तर्फे संचालित होस्टेलला भेट दिली. या प्रसंगी होस्टेल लतापल्लवांनी सुशोभित करण्यात आले होते. होस्टेलचे चालक श्री शेरसिंग यांनी थोडक्यात होस्टेलचा अहवाल सादर केला.
त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांच्या प्रचंड मेळाव्यापुढे भाषण केले. ते म्हणाले,
ज्या लोकांनी ही बोर्डींग काढली आहेत, त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्याचबरोबर हैद्राबाद सरकारचेही आभार मानणे जरूर आहे. लोक आपणास नावे ठेवतील अशाप्रकारचे वर्तन विद्यार्थ्यांनी ठेवू नये. त्यांना मिळालेल्या या संधीचा वेळीच योग्य फायदा करून घेतला पाहिजे. माझ्या वेळची परिस्थिती फारच कठीण होती. आमची दहा बाय दहाची एक खोली होती. तीत सामान, कुटुंबातील दहा माणसे, एक बकरी व दोन पैशाच्या तेलाची एक चिमणी इतका परिवार होता. अशा परिस्थितीत मला अभ्यास करावा लागला आहे. मी फार अभ्यास केला असल्यामुळे लोक मला भितात. दुसऱ्यांनी वर्षभर प्रयत्न करूनही जे काम होत नाही ते मी दोन मिनिटात करतो (टाळ्या). याचे कारण मी फारच शिकलो आहे. तसेच तुम्हीही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अपुरे विद्यार्जन करून काही उपयोगाचे नाही. परीक्षा कोणीही पास होतो. नुसत्या परीक्षा पास होऊन पदव्या मिळविण्यात काही अर्थ नाही. विद्यार्थ्यांनी रचनात्मक कार्य करून दाखविले पाहिजे, दगड फोडीचे काम करण्यात व कारकून बनण्यात काहीच फरक नाही.
या देशात ब्राह्मण समाजाची अशी समजूत होती की, विद्या फक्त आम्हीच प्राप्त करू शकतो. परंतु हे साफ खोटे आहे. कोणाएका युरोपियनाने म्हटले आहे. की जगात सहा विद्वान आहेत. त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक होत (टाळ्या). विद्या ही एक तरवार आहे. या तलवारीने कोणी कोणाची मान कापतो तर शीलवान मनुष्य तरवारीने कुणाचे रक्षण करतो. त्यासाठी धर्मशील बनले पाहिजे. रोज सकाळ-संध्याकाळ सामुदायिक वंदना करून बौद्धतत्त्वाची उपासना केली पाहिजे. दर आठवड्याला वादविवादात्मक विषय ठेऊन कोणाला तरी बोलावून त्यावर व्याख्याने करविली पाहिजेत. तुम्हाला जगात कसे राहावे हे शिकविले जात आहे. तेव्हा सुटीत घरी गेल्यावर आरोग्य व स्वच्छता याविषयी आई-वडीलांना माहिती सांगून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सध्या तुमच्या बोर्डिंगला जी आर्थिक मदत मिळत आहे ती तळ्यातील पाण्याप्रमाणे आहे. ती केव्हाना केव्हा आटणार हे निश्चित. यासाठी सरकारने कायम स्वरुपाच्या मदतीची सोय केली पाहिजे.