Categories

Most Viewed

14 नोव्हेंबर 1937 भाषण

आपले अस्तित्व स्वतंत्रपणे राखल्याशिवाय दुःखांना तोंड फोडता येणार नाही.

आदि-द्रविड (मद्रास भागातील बहिष्कृत) समाजाची बरीचशी वस्ती मुंबईमध्ये धारावी (सायन) भागात आहे. बहुतेक लोक त्या भागात कातडे कमावण्याचे जे कारखाने आहेत त्यात मजूर म्हणून काम करीत असतात. या समाजातील काही तरुणांनी आदि-द्रविड युवक संघ या नावाची एक संस्था चालविली आहे. या संस्थेची सर्वसाधारण सभा रविवार तारीख 14 नोव्हेंबर 1937 रोजी माटुंगा येथील बपू हॉलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. सभेस श्री. कमलाकांत चित्रे. श्री. शांताराम उपशाम व डी. व्ही. प्रधान वगैरे निमंत्रित पाहुणे म्हणून हजर होते. सभेचे आरमी आदि-द्रविड समाजाकडून डॉ. बाबासाहेबांस मानपत्र अर्पण करण्यात आले व नंतर संस्थेची मामुली कामे उरकण्यात आली.

डॉ. साहेबांनी मानपत्राच्या उत्तरादाखल भाषण केले. ते म्हणाले,

प्रिय भगिनींनो व बंधुनो,
आपण जो माझा मानपत्र देऊन गौरव केला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. तुम्ही सर्व मंडळी मद्रास प्रांतातून मुंबई येथे कामकाजाकरिता आला आहात. आपापल्या गावात तुम्ही जात येत असता. तेव्हा तुमचा आणि तुमच्या प्रांतातील इतर लोकांचा ज्या ज्या वेळेस संबंध येईल त्या त्या वेळेस तुम्ही त्यांना एक गोष्ट पटवून द्यायला हवी. सध्या जी नवीन राजघटना अंमलात आली आहे तीत अस्पृश्य वर्गास जे राजकीय हक्क प्राप्त झाले आहेत ते अभूतपूर्व असे आहेत. अद्यापपावेतो आपल्या वर्गाच्या बाबतीत अशी गोष्ट घडली नव्हती. हे जे हक्क प्राप्त झाले आहेत त्यांचा उपयोग जर अस्पृश्य वर्गाच्या हिताकरिता पूर्णपणे झाला नाही तर ते मिळून न मिळून सारखेच. इतर कोणत्याही प्रांतापेक्षा मद्रास प्रांतातील बहिष्कृत वर्गाला अधिक जागा मिळाल्या आहेत. तसेच इतर कोणत्याही प्रांतापेक्षा तुमच्या प्रांतातील अस्पृश्य वर्गाची दुःखे अधिक आहेत अशा परिस्थितीत तुम्हाला मिळालेल्या राजकीय हक्कांचा उपयोग तुम्ही योग्यरीतीने केला आहे का, असा प्रश्न केल्यास मोठ्या कष्टाने असे म्हणावे लागते की, तुम्ही याबाबतीत आपल्या कर्तव्याला जागला नाहीत. 30 जागांपैकी काही अगदी थोड्या प्रतिनिधीशिवाय सर्वजण आज काँग्रेसमध्ये विरून गेले आहेत. त्याचा परिणाम असा झाला आहे की, त्या प्रांतातील अस्पृश्य वर्गाच्या गा-हाण्यांना त्यामुळे गौणत्व आलेले आहे. तुम्हाला अस्पृश्य म्हणून लेखणारे व तुमच्यावर जुलूम करणारे कोण तर हिंदू. त्याच हिंदू लोकांनी आज सर्व कॉंग्रेस व्यापलेली आहे. आता त्यांच्याशीच जर अस्पृश्य वर्ग एक झाला तर तुमची गाऱ्हाणी दूर कशी होणार? काँग्रेसमध्ये सामील झालेल्या अस्पृश्य वर्गाच्या प्रतिनिधींना अधिकारारूढ झालेल्या काँग्रेस मंत्रीमंडळाला पक्षाच्या शिस्तीप्रमाणे कोणत्याही गा-हाण्याबद्दल कायदेमंडळात प्रश्न विचारता येणे शक्य नाही. त्यांच्याविषयी आकांडतांडव करून मंत्रीमंडळास ती गाऱ्हाणी दूर करण्यास भाग पाडणे तर दूरच राहिले. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा की, तुमच्यावर जुलूम करणारे हिंदू म्हणजे काँग्रेस यांचेवर जर तुमचा एवढा विश्वास आहे तर तुम्हाला तुमचे भिन्न अस्तित्व मानण्याचे कारण काय ? उद्या तुम्हाला असा कोणीही प्रश्न विचारील की तुम्हाला खास राजकीय हक्काची आवश्यकता तरी कोठे राहिली ? तेव्हा अस्पृश्य वर्गाचे जर कोठे हित होत असेल तर काँग्रेसमध्ये विरून जाण्यामध्ये नाही तर आपले अस्तित्व आज स्वतंत्रपणे जाहीर करून त्यांच्या अनेकविध दुःखांना वेळोवेळी तोंड फोडणे या नीतीमध्येच आहे. त्याशिवाय अस्पृश्य वर्ग जाचातून मुक्त होणार नाही व त्याची उन्नती होणार नाही. नंतर परत एक वेळ आदि-द्रविड समाजाचे आभार मानून डॉक्टर साहेबांनी आपले भाषण संपविले. यानंतर मद्रासकडील अस्पृश्यांचे एक पुढारी श्री. दि. ब. श्रीनिवासन यांचे भाषण झाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password