तारीख 14 नोव्हेंबर 1927 सकाळीच सात वाजता अमरावती येथील अस्पृश्य विद्यार्थी वर्गाकडून डॉ. आंबेडकर ह्यांना मानपत्र व पानसुपारीचा समारंभ करण्यात येऊन डॉ. आंबेडकर व इतर पाहुणे मंडळीसह सर्व विद्यार्थी वर्गाचा एक फोटो घेण्यात आला. मुलांच्या मानपत्रास उत्तर देताना डॉ. साहेबांनी मुलांनी आपले शील कसे बनवावे ह्याचा अगदी थोडक्यात उपदेश करून, ह्या मुलांनी आपल्या कुळाला लागलेला “अस्पृश्यते” चा डाग धुवून काढण्यास कशी मदत करावी हे विषद करून सांगितले. नंतर सर्व मंडळी परिषदेस बरोबर आठ वाजता हजर झाल्यावर परिषदेस सुरवात झाली. सुरुवातीलाच मुंबईहून श्री. बाळाराम आंबेडकर ह्यांच्या निधनाची बातमी तारेने येऊन धडकली.
ही दुःखकारक बातमी ऐकून सर्वांनाच फार वाईट वाटले तरी पण अशा परिस्थितीतही डॉ. आंबेडकरांनी परिषदेचे काम मोठ्या धैर्याने व नेटाने पुढे चालवून आपले खरे लोकनायकत्व प्रगट केले. सभेचे काम एक वाजेपर्यंत चालून त्यात खालील ठराव पसार करण्यात आले.
ठराव 1 ला : आपल्या सभेचे सन्माननीय अध्यक्ष डॉ. आंबेडकर ह्यांचे वडील बंधू श्री. बाळारामजी हे एकाएकी वारल्याची दुःखकारक वार्ता आताच आलेली ऐकून ह्या सभेस अत्यंत दुःख होत आहे व कै. बाळारामजी आंबेडकर ह्यांच्या शोचनीय निधनामुळे ही सभा दहा मिनिटे आपले काम बंद ठेवित आहे.
ठराव 2 रा. : (अ) येथील वयोवृद्ध व सन्माननीय पुढारी ना गणेश श्रीकृष्ण खापर्डे, कौन्सिल ऑफ स्टेटचे सभासद व श्री. अंबादेवी देवस्थान कमेटीचे अध्यक्ष यांचे जे पत्र सत्याग्रह कमेटीचे अध्यक्ष श्री. गवई. एम. एल. सी. यांनी सभेपुढे माडले आहे. ह्याचा विचार करून ही सभा सत्याग्रह कमेटीस अशी सूचना करते की, ना. खापर्डे यांनी तडजोड करण्याची जी इच्छा दर्शविली आहे व तिच्या सफलतेसाठी वेळ द्यावा अशी जी मागणी केली आहे. त्या पत्राचा विचार करून आणि ना खापर्डे याबाबतीत शक्य ती खटपट करणार आहेत असा विश्वास ठेवून या कामी त्यांना मुदत देण्यासाठी 15 तारखेस होणाऱ्या सत्याग्रहाची तारीख पुढे ढकलण्यास हरकत नाही.
(ब) तथापि सत्याग्रहाची तारीख 15 नोव्हेंबरपासून तीन महिन्याच्या पुढे कोणत्याही सबबीवर हा सत्याग्रह लांबणीवर टाकण्यात येऊ नये,
(क) या सभेचे सत्याग्रह कमेटीस असे सांगणे आहे की, त्यांनी अस्पृश्यांचा देवळात अंतिम सीमेपर्यंत जाण्याचा पूर्णपणे जो हक्क आहे, त्याला बाध येईल अशी कोणतीही अट या तडजोडीच्या बाबतीत मान्य करू नये.
(ड) ह्या सभेचे सत्याग्रह कमेटीस असे सांगणे आहे की, पुढे करावा लागणारा सत्याग्रह शक्यतो पर्यंत सामुदायिक पद्धतीने करण्यात यावा.
वरील सर्व ठरावांवर बऱ्याच वक्त्यांची अनुकूल, प्रतिकूल भाषणे होऊन वरील सर्व ठराव प्रचंड बहुमताने पसार करण्यात आल्यावर शेवटी श्री. गवई, नाईक व अमृतकर ह्यांनी योग्य शब्दात अध्यक्षांचे व पाहुणे मंडळीचे आभार मानल्यावर सभेचे कार्य डॉ. आंबेडकर व शाहू छत्रपती ह्यांच्या जयजयकारात संपले.
दुपारी महाराष्ट्र केसरीचे संपादक श्री. चव्हाण व श्री. के. बी. देशमुख ह्यांच्या येथे डॉ. आंबेडकर व पाहुणे मंडळीस ‘टी पार्टी’ देण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमरावतीच्या परिषदेत असताना त्यांना त्यांचे ज्येष्ठ बंधू बाळाराम यांचे रविवार दिनांक 12 नोव्हेंबर 1927 रोजी दुपारी 12 वाजता एकाएकी हृदयक्रिया बंद पडून निधन झाल्याचे कळले. त्यामुळे ते अंत्ययात्रेस हजर राहू शकले नाहीत. त्यांच्या गैरहजेरीत जे अस्पृश्य बंधू प्रेत यात्रेस हजर होते त्यांच्याप्रती ऋणनिर्देश करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘बहिष्कृत भारत’ दिनांक 25 नोव्हेंबर 1927 च्या अंकात म्हणतात,
“माझ्या वडील बंधूच्या मरण समयी मी मुंबईत नव्हतो, अंबादेवीच्या सत्याग्रहासाठी जी अमरावती येथे तारीख 13 नोव्हेंबर रोजी माझ्या अध्यक्षतेखाली परिषद भरण्याचे ठरले होते त्या परिषदेला मी गेलो होतो. माझ्या गैरहजेरीत ज्या तीन चार हजार अस्पृश्य बंधुनी प्रेतयात्रेस हजर राहून असल्या दुःखप्रसंगी आपली सहानुभूती दर्शविली त्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे.”
भीमराव आंबेडकर.