Categories

Most Viewed

13 नोव्हेंबर 1927 भाषण

अस्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी.

अमरावती येथील इंद्रभुवन थिएटरात व-हाड प्रांतिक अस्पृश्य परिषदेचे, दुसरे अधिवेशन दिनांक 13 व 14 नोव्हेंबर 1927 ला आयोजित करण्यात आले होते.

दिनांक 13 नोव्हेंबर 1927 रोजी सभेचे नियोजित अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बडनेरा मुक्कामी श्री. गवई, एम. एल. सी. यांनी स्वागत केल्यावर अध्यक्ष व इतर मंडळी बरोबर दुपारी 1.30 वाजता अमरावती मुक्कामी पोहचली. स्टेशनवर स्वागतार्थ स्पृश्यास्पृश्यांचा बराच मोठा समुदाय जमला होता. सभेच्या कामास बरोबर 3.30 वाजता सुरुवात झाली. प्रथमतः अस्पृश्य वर्गापैकी काही मुलांनी गोड व मंजूळ आवाजात स्वागतपर पदे म्हणून दाखविली. डॉ. पंजाबराव देशमुख ह्यांनी लवकरच होणार असलेल्या श्रीअंबादेवी मंदीराच्या सत्याग्रहाच्या दृष्टीने आजच्या सभेचे महत्त्व प्रतिनिधींना समजावून सांगितले. नंतर डॉ. आंबेडकर ह्यांची ओळख करून देऊन त्यांना त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती केली. त्यास मोर्शीचे सुप्रसिद्ध ब्राह्मणेतर पुढारी नानासाहेब अमृतकर ह्यांनी दुजोरा दिला. सत्याग्रह कमेटीचे चिटणीस श्री. नाईक व अध्यक्ष श्री. गवई. एम्. एल. सी. ह्यांनी अनुमोदन दिल्यावर डॉ. आंबेडकर हे टाळ्यांच्या प्रचंड गजरात स्थानापन्न झाले. त्यांनी सुरवातीला आजच्या सभेचे अध्यक्षस्थान आपल्याला दिल्याबद्दल स्वागत मंडळाचे व प्रतिनिधींचे आभार मानून आपले भाषण केले.

ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले.
न जानपदिकं दुखमेकः शोचितुमर्हति ।
अशोचन्प्रति कुर्वीत यदि पश्येदुपक्रमम् ॥

“जे दुःख सार्वजनिक आहे त्याचा शोक करीत बसणे योग्य नाही. त्यासाठी रडत न बसता त्याच्या प्रतिकारार्थ आपणाला इलाज सुचेल तर तो ज्ञानी पुरुषाने करावा”.

अपहाय निजं कर्म कृष्ण कृष्णेति वादिनः ।
ते हरेद्वेषिणः पापाः धर्मार्थ जन्म यद्धरेः ॥

“आपले कर्म सोडून केवळ ‘हरि हरि’ म्हणत बसणारे लोक हरीचे द्वेष्टे व पापी होत कारण, हरीचा जन्म तरी धर्मरक्षणार्थच आहे”.

अस्पृश्य व स्पृश्य हे एकाच धर्माचे लोक आहेत. ही गोष्ट उभयपक्षी मान्य आहे. स्पृश्य लोक अस्पृश्यांना तुम्ही हिंदू नाहीत असे केव्हाच म्हणत नाहीत. उलट 1910 सालच्या खानेसुमारीच्या वेळी जेव्हा काही मुसलमान लोकांच्या कारवाईमुळे अस्पृश्यांची गणना हिंदूत करू नये, अशी एक टूम निघाली. तेव्हा स्पृश्यांपैकी सुधारकांनीच नव्हे तर सनातनीयांनीसुद्धा अस्पृश्य हे हिंदू आहेत असे एकाच अट्टाहासाने सांगितले. त्याचप्रमाणे अस्पृश्यांनीही आपणास अहिंदूत न गणता हिंदुतच गणावे अशी कबुली दिली. आपण एकधर्मीय आहोत. ही भावना उभयपक्षात पुरातन कालापासून चालत आलेली आहे. हे जरी खरे आहे तरी अस्पृश्यांच्या दृष्टिकोनात आज मोठाच फरक पडलेला दृष्टीस पडतो. आपण जर हिंदुधर्मीय आहोत तर इतर हिंदुधर्मीयांना जे हक्क आहेत ते हक्क आपणास का असू नयेत ? ज्या पाणवठ्यावर ते पाणी भरतात त्यावर आपणास का भरता येऊ नये ? ज्या देवळात जाऊन ते पूजा करितात त्या देवळात आपणास का जाता येऊ नये ? अशा प्रकारचे समानतेचे प्रश्न ते पुढे करीत आहेत. त्या प्रश्नांनुरूप जे हक्क त्यांना प्राप्त झाले पाहिजेत ते प्राप्त करून घेण्याचा आग्रह धरण्यास ते प्रवृत्त झाले आहेत. कोणीही मनुष्य जुने सोडून नव्याच्या मागे लागला तर जे आपण करतो ते योग्य आहे किंवा अयोग्य आहे, याविषयींचा संशय त्याच्या मनात उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. जुने हे परंपरेने पुनीत झालेले असते व म्हणून सर्वांना त्याच्या सत्यतेबद्दल खात्री वाटते. नव्याला परंपरा नसते आणि म्हणून ते दिसावयास कितीही गोंडस असले तरी त्याचे अनुकरण करण्यास लोक कचरतात. समान हक्काचा आग्रह धरणाऱ्या अस्पृश्यांचीही या नवीन धोरणाच्या बाबतीत अशाच प्रकारची मनःस्थिती असणे अगदी साहजिक आहे. यापूर्वी आपण कधी देवळात गेलो नाही! कधी पाणवठ्यावर गेलो नाही! तसे करण्याचा आपण आग्रह धरावा असे लोक म्हणतात. परंतु आपला हा आग्रह सत्याग्रह होईल काय अशी जर शंका अस्पृश्यांच्या मनात उद्भवली तर ती मनुष्य स्वभावास धरूनच होईल. कारण कोणत्याही कार्यात यश प्राप्ती होईल किंवा नाही हे जितके साधनसामग्रीच्या प्रमाणावर अवलंबून आहे तितकेच ते कार्याच्या नैतिक स्वरूपावरही अवलंबून आहे. कार्याच्या मुळाशी जर सत्य असेल तर त्यात यशप्राप्ती होण्यास चिंता करण्याचे विशेष कारण उरत नाही. कारण अखेर सत्याचा नेहमीच जय होतो. तेच कार्याच्या मुळाशी असत्य असेल तर त्यातील यशप्राप्ती कठीण जाते. यास्तव आपल्या कार्याचे नैतिक स्वरूप काय आहे याची दरेक अस्पृश्याने पूर्ण ओळख करून घेतली पाहिजे. ती ओळख व्हावी म्हणून देवळात जाण्याचा अस्पृश्यांचा आग्रह सत्याग्रह आहे किंवा दुराग्रह आहे याचा विचार करणे आवश्यक आहे.

सत्याग्रहाच्या बाबतीतील पहिली गोष्ट म्हटली म्हणजे सत्य कोणते व असत्य कोणते हे ठरविणे ही होय. कारण सत्य म्हणजे काय हेच जर निश्चितपणे ठरविता आले नाही, तर सत्याग्रहाची इमारत केव्हाही डळमळीतच राहणार. आपला आग्रह सत्याग्रह आहे की नाही या विषयी जर सत्याग्रही माणसाची खात्री नसेल तर त्याच्या हातून सत्याग्रह पार कसा पडणार? कारण सत्याग्रहातील यशप्राप्ती नेहमीच सत्याग्रही माणसाच्या आत्मबलावर अवलंबून असणार. हे आत्मबल त्याच्या ठायी प्रगट होण्यास आपण जे करीत आहोत ते सत्य आहे अशी भावना ठाम झाली पाहिजे. ती भावना जर संशयात्मक असली तर त्याच्या ठायी सत्याग्रहास अवश्य असलेले आत्मबल मुळीच प्रगट होणार नाही. म्हणजे काय याची खूण सत्याग्रही माणसास पटणे अवश्य आहे. म्हणून सत्य थोडक्यात सांगावयाचे म्हणजे ज्या कार्यापासून लोकसंग्रह होत आहे ते सत्कार्य आहे. त्यासाठी केलेला आग्रह त्यास सत्याग्रह म्हणावे. आमच्या मते आता लोकसंग्रहाच्या बाबतीत मतभेद होणे शक्य आहे. एकाला जे लोकसंग्रहाचे कार्य वाटते, तेच दुसऱ्याला लोकविग्रहाचे कार्य आहे असे वाटेल. तरीपण एक गोष्ट मान्य करावी लागेल की, कर्त्याची बुद्धि जर शुद्ध नसेल म्हणजे स्वार्थमूलक हेतूने जर तो कार्य करण्यास प्रवृत्त होत असेल तरच लोकविग्रहाच्या कामाकडे त्याचा कल होईल. तेच कर्त्याच्या मनात जर समभाव जागृत असेल तर त्याच्या हातून लोकविग्रहाचे काम मुळी होणारच नाही. कारण स्वार्थाचा ओढा नसल्यामुळे त्याची वासना लोकसंग्रहाकडेच असणार म्हणून या दोन तत्त्वाचा आधार घेऊन जेथे समभाव आहे तेथे लोकसंग्रह आहे व जेथे लोकसंग्रह आहे तेथे सत्कार्य आहे. अशा कार्याविषयीचा जो आग्रह तो सत्याग्रह होय, अशी आम्ही सत्याग्रहाची व्याख्या करतो.

ही विचारसरणी आमची नव्हे. आम्ही ती गीतेवरून घेतली आहे. सत्याग्रहाच्या बाबतीत आम्ही गीतेचा आधार घेतो याचे काही जणांना आश्चर्य वाटेल. कारण सत्याग्रह हा काही गीतेचा विषय नाही अशी साधारणपणे लोकांची समजूत आहे. पण आमच्या मते ती समजूत अगदी चुकीची आहे. सत्याग्रह हाच गीतेचा मुख्य प्रतिपाद्य विषय आहे व गीता का उपदेशण्यात आली हे नीटपणे ध्यानात घेतले असता आमच्या म्हणण्याची सत्यता सहज पटण्यासारखी आहे. गीतेत अर्जुनाने कोणता प्रश्न केला व त्यास श्रीकृष्णाने काय उत्तर दिले त्याकडे जर कोणी लक्ष पुरविले तर असे दिसून येईल की, अर्जुन रथाखाली बसल्यानंतर, “बसू नकोस, तुझे राज्याधिकार ज्यांनी घेतले त्याच्याशी युद्ध करण्याचा आग्रह धर” असे जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा त्यास म्हणाला तेव्हा, “सांग. तुझा आग्रह सत्याग्रह कसा? असा अर्जुनाने प्रश्न केला व त्या एकच एक प्रश्नास गीता है भगवंताने दिलेले उत्तर आहे. अर्थात या गीता ग्रंथात सत्याग्रहाशिवाय दुसरा मुख्य प्रतिपाद्य विषय असणे शक्य नाही. अस्पृश्य लोक स्पृश्यांच्या समान हक्क मागण्याचा जो आग्रह धरतात तो आग्रह सत्याग्रह आहे किंवा नाही, हे ठरविण्याकरिता जो आम्ही गीतेचा आधार दिला आहे, तो गीता ही सत्याग्रहावर एक मीमांसा आहे, म्हणून तर दिला आहेच. परंतु या कामी गीतेचा आधार देण्याचे दुसरेही एक कारण आहे. ते हे की, हा धर्मग्रंथ उभय पक्षांना स्पृश्यांना तसाच अस्पृश्यांना मान्य आहे. अन्य कोणत्याही ग्रंथाचा आधार जर आम्ही दिला असता तर निमित्तास टेकलेले स्पृश्य लोक यांनी तुमचा आधार आम्हास मान्य नाही असे म्हणावयास मागे पुढे पाहिले नसते. अस्पृश्यांनी आरंभिलेला सत्याग्रह जर गीतेच्या कसोटीस उतरला तर त्यास विरोध करण्यास स्पृश्य लोकांस मुळी तोंडच उरणार नाही. कारण तसे करणे म्हणजे पर्यायाने गीता अमान्य केल्यासारखेच होणार आहे.

आता हा अस्पृश्यांचा सत्याग्रह गीतेच्या कसोटीस उतरतो की काय हे पाहू प्रथमतः आपण आरंभिलेले कार्य हे लोकसंग्रहाचे कार्य आहे काय ? अस्पृश्यता जाऊन आपण स्पृश्य व्हावे एवढ्या पुरतीच या चळवळीची व्याप्ती आहे असे काही लोक मानतात. परंतु तसे मानणे चुकीचे आहे. अस्पृश्यतेमुळे अस्पृश्यांचेच नुकसान झाले आहे असे नसून त्यांच्या बरोबर स्पृश्यांचे तसेच देशाचेही अपरिमित नुकसान झालेले आहे. अस्पृश्यतेच्या कलंकाने अस्पृश्यच कलंकीत झालेले आहेत असे नव्हे तर स्पृश्यही कलंकीत झाले आहेत. ज्यास कमी मानण्यात येते. त्यात त्यांचा अवमान होतोच पण जे कमी मानतात त्यांचीही नीती खालावलेली होते. अस्पृश्य लोक अस्पृश्यतेच्या गर्तेतून निघून त्यांचे आत्मस्वातंत्र्य त्यास प्राप्त झाले तर ते केवळ आपली उन्नती करतीलच, इतकेच नव्हे तर ते आपल्या पराक्रमाने, बुद्धीने, उद्योगाने देशाच्या भरभराटीस कारणीभूत होतील. अशा दृष्टीने पाहिले तर अस्पृश्यता निवारणाची चळवळ ही केवळ पतितोद्धाराची चळवळ नसून खऱ्या लोकसंग्रहाची चळवळ आहे. अस्पृश्यांना स्वार्थाकडे नजर ठेवून फक्त आपलाच उद्धार करून घ्यावयाचा झाल्यास सत्याग्रहासारखे खडतर असिधाराव्रत पत्करण्याचे काहीच कारण नाही. कारण, ज्या माणुसकीसाठी व ज्या समतेच्या वागवणुकीसाठी ते आज धडपड करीत आहेत ती माणुसकी प्राप्त होण्यासाठी त्यांनी जर धर्मांतर केले तर त्यांची कार्यसिद्धी सहज होण्यासारखी आहे. अस्पृश्यता निवारणाच्या कामी ज्या शक्तीचा त्यांना व्यय करावा लागत आहे, तीच शक्ती त्यांना आपल्या शैक्षणिक व आर्थिक उपयोगाला लावता येईल. हिंदू धर्मीय लोकांच्या आचारात एक मोठी गंमत आहे. ती ही की, जोपर्यंत एखादा माणूस हिंदू समाजाचा घटक असतो तोपर्यंतच हिंदू धर्माने घालून दिलेल्या श्रेयानिः श्रेयाचे, पापपुण्याचे व स्पर्शास्पर्शाचे यमनियम त्याला लागू पडतात, परंतु त्याच माणसाने जर हिंदू धर्माचा लागाबांधा तोडला व निराळ्या धर्माचा समाजाचा घटक झाला तर त्याला हिंदू धर्माने घालून दिलेले श्रेयानिःश्रेयाचे पापपुण्याचे व स्पर्शास्पर्शाचे यमनियम लागू पडत नाहीत. मानव धर्माने घालून दिलेल्या श्रेयानिः श्रेयाच्या, पापपुण्याच्या व स्पर्शास्पर्शाच्या त्याला यम नियमाप्रमाणे वागविण्यात येते. अस्पृश्यांचा जसा स्पृश्य लोक विटाळ मानतात तसा कुत्र्यामांजरांचा अगर मुसलमानांचा का मानीत नाहीत या प्रश्नाचे उत्तर यातच आहे. अस्पृश्यांना हिंदू धर्माशी लागाबांधा असल्यामुळे त्यांना हिंदू धर्माच्या यम नियमाप्रमाणे वागविले जाते. कुत्र्यामांजरांचा तसाच मुसलमानांचा हिंदू धर्माशी लागाबाधा नसल्याकारणाने त्यांना मानव धर्माच्या यमनियमाप्रमाणे वागविण्यात येते. ही खुबी अस्पृश्यांना माहीत नाही असे नाही. त्यांना पूर्णपणे माहीत आहे की, एखादा अस्पृश्य हिंदू धर्मात राहिला असता त्यास स्पृश्य हिंदुकडून कमी लेखण्यात येते. परंतु तोच ख्रिस्ती किंवा मुसलमान झाला तर त्यास तेच हिंदू लोक असे आपल्यासमान वागवितात. तथापि, अस्पृश्यता निवारणाचा हा साधा सोपा उपाय न करता परधर्मात जाऊन हिंदुधर्मास क्षय लागू देण्याऐवजी त्यातच राहून आपल्यात असेल तितकी शक्ति खर्च करून आपली माणुसकी मिळवावी, असा जो त्यांनी निश्चय केला आहे. त्यावरून त्यांनी आरंभिलेले कार्य स्वतःच्या उद्घारापुरते नसून हिंदू धर्माच्या उद्धाराकरिता आहे हेच खरे आहे. तसेच जे अस्पृश्य लोक ही चळवळ करीत आहेत त्यांच्या ठायी समभाव नाही, असेही कोणास म्हणता यावयाचे नाही. कारण अस्पृश्यांची मागणी विशेष हक्कासाठी नसून ती समान हक्कासाठी आहे. हिंदुमात्राचे जे हक्क आहेत ते फक्त आम्हालाच असावेत इतरांना असू नयेत, अशी काही अस्पृश्याची मागणी नाही. स्पृश्यांना जे हक्क आहेत. तसेच हक्क आपल्यालाही असावेत अशी त्यांची समतेची मागणी आहे. यास्तव गीतेत सांगितलेल्या कसोटीला लावून पाहिली असता अस्पृश्यांचा आग्रह हा सत्याग्रह आहे असेच म्हणावे लागेल.

अस्पृश्यांचे कार्य हे राष्ट्रकार्य आहे असे कबूल करूनही अस्पृश्यास देवळात प्रवेश करण्याचा मुळी अधिकारच नाही असे म्हणणारे काही समाजकंटक आढळतात. त्यापैकी काही जणांचा युक्तिवाद दिसावयाला इतका मोहक दिसतो की, तो वाचून आपली बाजू लंगडी आहे की काय असा भ्रम उत्पन्न होतो. या विरोधी लोकांचे असे म्हणणे आहे की, स्पृश्यांच्या देवळात गेल्यानेच उपासना घडते म्हणून जर अस्पृश्य लोक देवळात जाण्याचा प्रयत्न करीत असतील तर ते खरे नाही. कारण नमाज पढणे हे एकच जसे मुसलमानी धर्मपालनाचे लक्षण आहे. तसे स्पृश्यांच्या देवळातील देवांचे दर्शन घेणे एवढेच काय ते हिंदुधर्मपालनाचे लक्षण आहे असे नव्हे, साकाराचे प्रत्यक्ष पूजन, निराकाराचे ध्यान आणि परमेश्वराचा नुसता नामोच्चार असे उपासनेचे विविध मार्ग हिंदू धर्मात सांगितलेले आहेत. या उपासनेपैकी कोणतीही उपासना अस्पृश्यांनी करू नये असे आम्ही काही म्हणत नाही. त्यापैकी कोणतीही एक केली तरी हिंदुत्वाला ती पुरेशी आहे. उपासनेचे उपास्याचे नानाविध प्रकार जोपर्यंत हिंदू समाजात रूढ आहेत तोपर्यंत स्पृश्यांच्या देवळात गेल्यानेच उपासना घडते ह्या अस्पृश्यांच्या म्हणण्यात काही अर्थ नाही असे त्यांना वाटते. या आक्षेपकास आमचे उत्तर असे आहे की, हिंदू समाजात उपासनेचे नानाविध प्रकार आहेत. त्यापैकी कोणत्याही एका प्रकारची उपासना केली तरी हिंदुधर्मपरिपालन घडते. असे जरी मान्य केले तरी ज्या कोणास साकाराचे प्रत्यक्ष पूजन करावेसे वाटत असेल त्याला तशा प्रकारची मोकळीक का असू नये ? हा उपासनेचा मार्ग एकास खुला तर तो दुसऱ्यास बंद का असावा ? आणि ज्या अस्पृश्यांना तो बंद आहे त्यांनी तो खुला करून घेण्याचा आग्रह धरला तर तो वाजवी होणार नाही काय ? उपासनेचे नानाविध प्रकार जेथे असतील तेथे दर एक व्यक्तीला स्वतःसाठी उपासनेचा योग्य प्रकार कोणता हे ठरविण्याचा हक्क असलाच पाहिजे. अस्पृश्य लोक जे भांडत आहेत ते या हक्कासाठी भांडत आहेत. त्यांची बाजू लंगडी आहे असे म्हणणे शुद्ध लपंडाव आहे.

या विरोधी लोकांचा दुसरा असा कोटीक्रम आहे की, स्पृश्य लोक आपल्या देवळात येऊन अस्पृश्यांना देवदर्शन घेऊ देत नसले तरी देव ज्याचा त्यास स्थापण्यास स्वातंत्र्य आहेच. ज्या अस्पृश्यास साकाराचे प्रत्यक्ष पूजन हा उपासनेचा मार्ग पसंत असेल त्यांनी निराळा देव स्थापन करावा. स्पृश्य हिंदू समाजाने हे स्वातंत्र्य त्यांना दिले आहे. केवळ उपासनेसाठी अस्पृश्यांना स्पृश्यांच्या देवावर हक्क सांगण्याचे काही कारण नाही. हा कोटीक्रम जे पढतमूर्ख लढवितात त्यांना आमचा असा सवाल आहे की. रेल्वे अधिकाऱ्यांनी जर गोऱ्या लोकांसाठी निराळे व काळ्या लोकांसाठी निराळे आगगाडीचे डबे राखून ठेवले तर ती व्यवस्था तुम्हाला का मान्य नाही व त्याविरूद्ध तुम्ही तक्रार का करता ? रेल्वे अधिकाऱ्यांनी जरी गोऱ्या लोकांकरिता निराळा डब्बा राखून ठेवला असला तरी इतर डब्यातून प्रवास करण्याची तुम्हास मोकळीक आहे. तुम्हाला प्रवासच करावयाचा आहे. त्यासाठी निराळ्या डब्यात बसून जाण्याचे स्वातंत्र्य तुम्हास दिले असता गो-या लोकांसाठी राखून ठेवलेल्या डब्यावर तुम्ही हक्क काय म्हणून सांगावा ? याला उत्तर एकच व ते हे की, हा प्रश्न नुसता प्रवासापुरता नसून समानतेचाही आहे. वरील कोटीक्रमास अस्पृश्यांचे उत्तरही त्याच अर्थाचे आहे. अस्पृश्य लोक देवळात शिरण्याचा जो आग्रह करीत आहेत ते केवळ साकाराचे प्रत्यक्ष पूजन करता यावे म्हणून नव्हे. अस्पृश्य लोकांना देवळात प्रवेश करून जी गोष्ट सिद्ध करून द्यावयाची आहे ती ही की, त्यांच्या प्रवेशाने देवालय भ्रष्ट होत नाही किंवा देवळातील मूर्तीला स्पर्श केला असता तिचे पावित्र्य कमी होत नाही. ते सिद्ध करण्यास निराळ्या देवतेची स्थापना करून कार्यभाग होत नाही. तर ज्या देवाच्या ठायी पावित्र्य कल्पून स्पृश्य लोक ज्याची उपासना करतात त्याच देवाची उपासना करण्याचा आग्रह अस्पृश्यांनी धरणे प्राप्त आहे. त्याशिवाय अस्पृश्यांचा हेतू तडीस जात नाही. फक्त पाप्यांच्या स्पर्शानेच देवाचे पावित्र्य ढळू शकते, आमच्या स्पर्शाने ते ढळणार नाही. कारण आम्ही पापी नाहीत, असे अस्पृश्यांचे म्हणणे आहे. यावरुन देवाच्या उपासकात कोणी पवित्र कोणी अपवित्र असा भेद नाही हे त्यांच्या चळवळीचे तत्त्व आहे हे उघड होत आहे. म्हणूनच ते स्पृश्यांनी प्रस्थापित केलेल्या मूर्तीची उपासना करण्याचा आग्रह करीत आहेत. हा त्यांचा आग्रह सत्याग्रह नाही असे कोण म्हणेल?

अस्पृश्यांच्या सत्याग्रहाविरुद्ध वर नमूद केलेले आक्षेप काढूनच हे स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी काही व्यावहारिक आक्षेपही रचले आहेत. या मुद्यावर त्यांचे म्हणणे असे आहे की, स्पृश्यांनी आपली मंदीरे अस्पृश्यांना खुली करून दिली पाहिजेत हे संघटनवाल्यांचे म्हणणे निराळे आणि अस्पृश्यांनी स्पृश्यांना तुम्ही आपली मंदीरे आम्हास खुली करून द्या नाही तर सत्याग्रह करून त्यावर हक्क सांगतो हे म्हणणे निराळे. कारण स्पृश्यास्पृश्यभेद हा अनंतकाळापासून चुकीने पडला. असो, अगर योग्य न्यायाने पडलेला असो, पण तो पडल्यावरच जर आम्ही स्पृश्यांनी देवस्थाने उभारली आणि चालविली तर त्यावर अस्पृश्यांनी हक्क काय म्हणून सांगावा व तसा ते सांगू लागले तर ते न्याय्य होईल काय? अस्पृश्यांच्या सत्याग्रहाचा प्रश्न निव्वळ स्पृश्यास्पृश्य या विचाराचाच नाही तर न्यायान्यायाचाही आहे. या विचारसरणीवर या विरोधी लोकांची इतकी भिस्त आहे की, त्यांच्या मते अमरावती येथील अंबादेवीच्या पंचांनी अस्पृश्यांचा अर्ज केराच्या टोपलीत फेकला असला तरी वहिवाट व कायदा हा निरंतरचा त्यांच्या बाजूला होता, कारण सर्वतोपरी समाजातील इतर सर्व बाबतीतील अस्पृश्यता गेली तरी एक जरी पंच वहिवाट नाही, असे म्हणणारा असला तरी कायद्याच्या जोरावर व न्यायाच्या हक्काने तो अस्पृश्यास मनाई करू शकेल. हा आक्षेप देखील अगदी नादानपणाचा आहे. स्पृश्यांनी देवळे बांधली आणि चालविली ही गोष्ट अस्पृश्यांसही कबूल करणे प्राप्त आहे. तेवढ्यावरून स्पृश्यांना तुम्ही आपली मंदीरे आम्हास खुली करून द्या असे म्हणण्याचा हक्क अस्पृश्यांस पोचत नाही हे कोणीही कबूल करणार नाही. कारण ही देवळे जरी स्पृश्यांनी बांधली असली तरी ती हिंदू धर्माची असून हिंदुधर्मियांकरिता बांधलेली आहेत. हा दाय एकाने कोणी केला असला तरी तो सर्व हिंदूंच्या उपयोगाकरीता केलेला आहे. अर्थात जो हिंदू आहे त्या दरेकाला या देवळात जाऊन उपासना करण्याचा अधिकार प्राप्त होतोच. तसेच हिंदुत्त्व ही जितकी स्पृश्यांची मत्ता आहे तितकीच अस्पृश्यांचीही आहे. या हिंदुत्त्वाची प्राणप्रतिष्ठा जितकी वशिष्ठासारख्या ब्राह्मणांनी, कृष्णासारख्या क्षत्रियांनी, हर्षासारख्या वैश्यांनी व तुकारामासारख्या शूद्रांनी केली तितकीच वाल्मिकी, चोखामेळा व रोहिदास इत्यादी अस्पृश्यांनीही केलेली आहे. या हिंदुत्वाचे रक्षण करण्यासही हजारो अस्पृश्यांनी आपली माणुसकी खर्ची घातलेली आहे. व्याधगीतेतील अस्पृश्यद्रष्ट्यापासून तो खर्चाच्या लढाईतील सिदनाक महारापर्यंत. ज्या अस्पृश्यांनी हिंदुत्त्वाच्या संरक्षणार्थ आपले शीर हातावर घेतले त्यांची संख्या लहानसहान होणार नाही. ज्या हिंदुत्त्वाची रास स्पृश्य व अस्पृश्य या उभयतांनी मुठमुठ टाकून वाढविली आणि तीवर घाला आला असता जिवाची पर्वा न करता तिचे रक्षण केले. त्या हिंदुत्त्वाच्या नावाखाली उभारलेली मंदिरे जितकी स्पृश्यांची तितकीच अस्पृश्यांचीही आहेत. त्यावर जितका स्पृश्यांचा तितकाच अस्पृश्यांचा वारसा आहे. एक अधिकारी व दुसरा उपरी असे कधीच म्हणता यावयाचे नाही. अस्पृश्य लोक उपरी नाहीत ते हिंदू आहेत. हिंदू धर्म त्यांचा आहे व ते हिंदू धर्माचे आहेत. एवढ्यावरूनच हिंदुच्या मंदिरावर अस्पृश्यांचा वारसा आहे ही गोष्ट सर्वास कबूल करणे प्राप्त आहे. वारसा मान्य केला, मग जुन्या वहिवाटीचा प्रश्नच शिल्लक राहात नाही. कारण कायद्याच्या दृष्टीने पाहता सार्वजनिक बाबतीतील व्यक्तिमात्रांचा हक्क कोणास काही सनद देऊन निर्मित करावयाचा नसतो, तो दरेकाच्या अंगी कायमचा वसत असतो. त्याची वहिवाट नसली किंवा त्याच्या वहिवाटीत जरी खंड पडला असला तरी तेवढ्यावरून तो हिरावला जात नाही. एखादा मनुष्य पूर्वी एकाद्या रस्त्यावरून गेला नाही म्हणून त्यास पुढे त्या रस्त्यावरून जाता येणार नाही हे म्हणणे जितके मूर्खपणाचे होणार आहे तितकेच तो एखाद्या सार्वजनिक पाणवठ्यावर अथवा देवालयात पूर्वी कधी गेला नाही म्हणून त्यास आता जाता येणार नाही हे म्हणणे मूर्खपणाचे होणार आहे. तेव्हा हे न्यायाचे पारडे आपल्याकडे फिरत नाही व आपला जो आग्रह आहे तो सत्याग्रह आहे, याबद्दल कोणाही अस्पृश्याने आपल्या मनात कोणत्याही प्रकारची शंका बाळगण्याचे काही कारण नाही. इतकेच नव्हे तर हिंदू धर्माला उर्जीत अवस्थेस आणून त्यास सा-या मानवाचा धर्म व्हावा म्हणून त्यास मानव धर्माचे रूप देण्यासाठी अवतरलेले आपण देवदूत आहोत असेही त्यांनी मानण्यास काही हरकत नाही.

येथवर अस्पृश्यांचा समान हक्क मिळविण्याचा जो आग्रह आहे. तो सत्याग्रह आहे किंवा नाही, याची चर्चा केली आहे. आता हा सत्याग्रह अस्पृश्य लोकांनी पार कसा पाडावयाचा याचा विचार करू. प्रथमतः सत्याग्रहाची रीत कशी असावी हे निश्चित झाले पाहिजे. महात्मा गांधी हे आधुनिक काळातील सत्याग्रहाच्या चळवळीचे पुरस्कर्ते आहेत. आणि सत्याग्रहाची रीत म्हणजे म. गांधींनी घालून दिलेली रीत याशिवाय दुसरी रीत असू शकणार नाही, असा समज सर्वत्र पसरलेला दिसतो. म. गांधींच्या सत्याग्रहाची जी रीत आहे तीत त्यांनी हिंसेला वाव ठेवलेला नाही. इतकेच नव्हे तर, जेथे हिंसा आहे तेथे सत्याग्रह नाही असे त्यांचे मत आहे. हे म. गांधींचे म्हणणे तर्कशुद्ध आहे ह्याबद्दल एक मत होणे शक्य नाही असे आम्हास वाटते. अमूक एका माणसाचा आग्रह सत्याग्रह आहे किंवा दुराग्रह आहे हे त्या आग्रहाच्या सिद्धिसाठी योजिलेल्या साधनांवर अवलंबून नसते. ते सर्वस्वी ज्या त्या कार्याच्या नैतिक स्वरूपावर अवलंबून असते. ते कार्य जर सत्कार्य असेल तर त्या बाबतीत धरलेल्या आग्रहास सत्याग्रह म्हटलेच पाहिजे. आणि तेच जर असत्य असेल तर त्या बाबतीत त्याने धरलेल्या आग्रहास दुराग्रह म्हणावे लागेल. हिंसा, अहिंसा ही केवळ आग्रहाच्या सिद्धिची साधने आहेत. जसे कर्माच्या किंवा कर्त्याच्या अनुरोधाने क्रियापदाचे रूप बदलते तसे काही साधनाच्या अनुरोधाने आग्रहाचे नैतिक स्वरूप बदलत नाही. कारण एखाद्या दुराग्रहीने आपला आग्रह पार पाडण्यास अहिंसेचा मार्ग पत्करला म्हणून त्याच्या दुराग्रहाला सत्याग्रह म्हणता यावयाचे नाही किंवा एखाद्या सत्याग्रहीने सत्याग्रहाच्या सिद्धिसाठी हिंसा केली एवढ्यावरून त्याच्या सत्याग्रहाला दुराग्रह म्हणता येणार नाही. तसे जर झाले तर गीतेत श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनास सत्याग्रहाच्या सिद्धिसाठी जो हिंसेचा मार्ग पत्करण्यास भाग पाडले त्यास काय म्हणावे? तो पापात्मा होता काय ? तसे म्हणण्यास कोणी हिंदू तयार होईल असे वाटत नाही व इतर कोणी तसे म्हणण्यास तयार झाला तरी त्याचे म्हणणे सर्वांनाच पटेल, असे म्हणता यावयाचे नाही. कारण अहिंसा परमो धर्म असे जरी सांगण्यात येते तरी सर्वच ठिकाणी अहिंसा धर्म पाळणे शक्य नाही. डोळ्यांनी न दिसले तरी तर्काने ज्याचे अस्तित्व समजते असे सूक्ष्म जंतू या जगात इतके भरले आहेत की, आपण आपल्या डोळ्यांच्या पापण्या हालविल्या तर तेवढ्यानेच या जिवाचे हातपाय तुटून पडतील. हवेत, पाण्यात फळांच्या वगैरे सर्व ठिकाणी जे शेकडो अत्यल्प रूपजीव घरलेले आहेत त्यांची हत्या कशी बंद होणार? डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी जे शास्त्रीय शोध लावले आहेत त्यावरून असे सिद्ध होते की, वनस्पतीला देखील जीव आहे. मग या वनस्पतीचा संहार करणारे ब्राह्मण तसेच नाकाला फडकी बांधून हिंडणारे जैन तीर्थकर यांनी अहिंसेचा टेंभा मिरविण्यात काय हशील आहे? तसेच सर्वच ठिकाणी अहिंसेने कार्यभाग होईल असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही. समजा की आपला जीव घेण्यास किंवा आपल्या पत्नीवर अगर आपल्या कन्येवर बलात्कार करण्यास अथवा आपल्या घरास आग लावण्यास, अगर आपली सर्व दौलत व स्थिरस्थावर हरण करण्यास एखादा दुष्ट मनुष्य हातात शस्त्र घेऊन सज्ज झाला व जवळ दुसरा कोणीही त्राता नाही, तर आपण काय करावे? असल्या दुष्ट मनुष्याची आपण अहिंसा परमो धर्मः म्हणून डोळे मिटून उपेक्षा करावी किंवा तो सामोपचाराने ऐकत नसल्यास त्यास यथाशक्ती शासन करावे? या दोहोंपैकी शेवटचाच मार्ग कोणीही झाला तरी तो पत्करल्याशिवाय राहणार नाही व त्याचे करणे अशास्त्र आहे. असे कोणीही म्हणणार नाही, कारण अशा वेळी हत्येचे पाप हत्त्या करणारास लागत नसून जो दुष्ट मरतो तो आपल्या अधर्मानेच मारिला जातो असे शास्त्रकर्ते म्हणतात. प्राचीन शासनकर्त्यांनीच नव्हे तर अर्वाचिन फौजदारी कायद्यानेही आत्मसंरक्षणासाठी हिंसा करण्याचा हक्क काही मर्यादा ठेवून कबूल केला आहे. हिंसा करणे हे जरी अयोग्य असले तथापि आत्मसंरक्षणाचे कार्य त्याशिवाय साधत नसल्यास हिंसा करणे रास्त आहे असे समजतात. भृणहत्त्या म्हणजे कोवळ्या पोराची हत्या अति गर्ह्य मानली आहे. परंतु तेच पोर आडवे आले म्हणजे त्यास कापून काढावयास कोणी हरकत घेत नाही. हाच तर्कवाद सत्याग्रहाच्या सिद्धिस लागू करणे प्राप्त आहे. सत्याग्रही माणसास हिंसा करावी लागली तर त्यास ती क्षम्य आहे असे कारणपरत्वे म्हणावे लागेल. गांधींचा अहिंसात्मक सत्याग्रहाचा मार्ग अशा दृष्टीने पाहिले तर अव्यवहारिक ठरतोच. पण तो अहिंसात्मक आहे असे म्हणणे हा देखील निव्वळ भ्रम आहे. हिंसा म्हणजे हत्त्या करणे असा जर हिंसेचा संकुचित अर्थ केला तरच हिंसा आणि अहिंसा यांच्यात काही भेद करता येईल. परंतु हिंसा म्हणजे नुसता जीव घेणेच नव्हे तर दुसऱ्या प्राण्याचे मन किंवा शरीर यास इजा करणे याचाही त्यात समावेश होतो. अर्थात्, अहिंसा म्हणजे कोणाही सचेतन प्राण्यास न दुखविणे होय. असा जर हिंसा या शब्दाचा व्यापक अर्थ घेतला तर म. गांधींची अहिंसा ही एक प्रकारची हिंसाच आहे. असे म्हणावे लागते. कारण त्यांच्या सत्याग्रहाची जी रीत आहे त्यामुळे इतर प्राण्यांच्या शरीरावर जरी आघात होत नसला तरी त्यांचे मन दुखविले जाते याबद्दल काही शंका नाही. गांधीच्या सत्याग्रही माणसाने मनुष्यवध जरी केला नाही तरी तो आपल्या आग्रहामुळे प्रतिपक्षाच्या मनाची शांतता भंग करतोच. असे असता आपल्या सत्याग्रहात हिंसा मुळीच होत नाही, असे जे म. गांधींचे म्हणणे आहे ते अपुरे आहे, असे म्हणणे प्राप्त होते. खरे म्हटले असता शक्य असेल तोवर अहिंसा व जरूर पडेल तर हिंसा, असे धोरण सत्याग्रही माणसांनी ठेवणे हे सिद्धिच्या दृष्टीने रास्त आहे. इतकेच नव्हे तर नीतीच्या दृष्टीनेही ते प्रशस्त आहे. गांधींनी अहिंसेवर जो इतका भर दिला आहे तो केवळ गांधी हे अहिंसावादी आहेत म्हणून नव्हे. भर देण्याचे त्यांचे कारण अगदी निराळे आहे. म. गांधी आपल्या सत्याग्रहाच्या मीमांसेत सत्य म्हणजे काय ? व ते कसे ठरविता येईल ? याबद्दल आपणास काही निश्चयात्मक अशी एकादी कसोटी उभी करता येत नाही असे म्हणतात. ज्याला आपण सत्याग्रह म्हणू त्यालाच लोक दुराग्रह म्हणू शकतील असे त्यांना वाटते. हे त्यांचे मत त्यांनी हंटर कमिटीसमोर जी कैफियत लिहून दिली आहे तिच्यात स्पष्टपणे नमूद केले आहे. जेथे सत्याबद्दल प्रामाणिकपणे मतभेद असू शकेल, तेथे हिंसा करणे रास्त होणार नाही असे त्यांचे मत आहे. एवढ्याच कारणामुळे त्यांनी आपल्या सत्याग्रहाच्या साधनातून हिंसेला फाटा दिला आहे. यावरून उघड होत आहे की, जर कार्याच्या सत्यतेबद्दल द्विधा मत नाही अशी जर कोणी त्यांची खात्री करून दिली तर त्याप्रित्यर्थ आरंभिलेल्या सत्याग्रहाच्या सिद्धिसाठी हिंसा करावी लागली तर गांधी त्यास मोडा घालणार नाहीत. हे जे विवेचन केले आहे ते एवढ्याच करिता की हिंसा ही सत्याग्रहाच्या नैतिक स्वरूपास बाधक नाही. यापेक्षा या मुद्याची जास्त चर्चा करण्याचे प्रयोजन नाही. कारण सत्याग्रह पार पाडण्यास हिंसा करण्यास तात्त्विक दृष्ट्या हरकत नसली तरी आजच्या परिस्थितीत तसे करण्याची कोणास सवड नाही. या देशातील सारी प्रजा निःशस्त्र असल्यामुळे सत्याग्रहाच्या सिद्धिसाठी अहिंसेचा एकच मार्ग काय तो खुला आहे. सत्याग्रहास सिद्ध झालेल्या अस्पृश्यांनी याच एका उपायावर सारी भिस्त ठेवून चालणे प्राप्त आहे. शिवाय तो उपाय अस्पृश्यांचा प्रश्न सोडविण्यास अपुरा आहे असे मानण्यास अजून तरी काही अनुभवाची साक्ष घेता येण्यासारखी नाही. कारण अस्पृश्यता निवारणार्थ सत्याग्रहाची मोहीम नुकतीच सुरू होत आहे. तेव्हा जो सत्याग्रह करावयाचा तो अहिंसात्मक रीतीचा असणार, याशिवाय त्यात दुसरे काहीच नाही असे सर्वानीच पक्केपणी ध्यानात ठेवले पाहिजे.

आता हा सत्याग्रह कोणा विरूद्ध करावयाचा ? याची चर्चा करणे प्राप्त आहे. अस्पृश्यांची जी समान हक्कांची मागणी आहे ती स्पृश्य लोकांकडे आहे. कारण जर त्यांचे न्याय हक्क देण्यास कोणी विरोध करीत असतील तर ते स्पृश्य लोकच होत. अर्थात, जो सत्याग्रह करावयाचा तो स्पृश्य लोकांविरूद्धच करावयाचा असे अस्पृश्य लोकांना वाटणे शक्य आहे. परंतु तो समज सर्वस्वी खरा नाही. समजा, उद्या अस्पृश्य लोक एखाद्या सार्वजनिक तळ्यावर अथवा एखाद्या सार्वजनिक देवालयात आपले हक्क बजाविण्याचा आग्रह धरून गेले व स्पृश्य लोक त्यांना प्रतिकार करण्याचा हेतू धरून आडवे झाले, तर पुढे काय होणार हा प्रश्न विचारात घेतल्याशिवाय सत्याग्रह कोणाविरूद्ध करावयाचा आहे याचा पूर्णपणे समज होणे शक्य नाही. सत्याग्रहास प्रवृत्त झाले आणि अपेक्षिल्याप्रमाणे जर स्पृश्य लोक आडवे आले आणि अस्पृश्य लोक त्यांच्या अपकृत्यामुळे शांततेचा भंग होण्याचा जर रंग दिसून आला तर शांतता राखण्यासाठी सरकारला या लढ्यात पडावे लागेल. कारण शांतता राखणे हे सरकारचे मुख्य कर्तव्य आहे. आणि सरकार जर या लढ्यात पडले तर ते कोणते धोरण स्वीकारील हे जाणून घेतल्याशिवाय सत्याग्रह कोणाविरूद्ध करावयाचा, हे ठरविता येणे शक्य नाही. सरकारने जर अस्पृश्य लोकांची बाजू घेतली आणि न्याय्य हक्कांची अंमलबजावणी करणाऱ्या लोकास सरकारच्या दीर्घ बाहूची मदत देणे हे न्याय आहे. त्या न्यायाप्रमाणे जर सरकार वागले तर हा प्रश्न चुटकीसरसा सुटून जाणार आहे. परंतु तसे न होता सरकारने जर उलट खाल्ली व सत्याग्रही अस्पृश्यांनाच जर ते म्हणू लागले की तुम्ही नव्या नव्या क्लुप्त्या काढून भलभलत्याच गोष्टी करू लागलात आणि तेणेकरून शांततेचा भंग होत आहे. सबब आम्ही तुम्हास मनाई करतो. असा हुकूम सरकारने काढला तर पुढे काय होणार ? अर्थात् असे जर झाले तर अस्पृश्यांस जो सत्याग्रह करावा लागणार आहे तो दिसावयास जरी स्पृश्यांविरूद्ध असला तरी अखेर तो सरकारविरुद्ध होणार आहे हे उघड आहे. तेव्हा या सत्याग्रहाची जबाबदारी काय आहे हे अस्पृश्यांनी ओळखून असावे हे बरे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे या सत्याग्रहात आपला देवळात किंवा तळ्यावर जाण्याचा आग्रह शेवटास नेण्यास अस्पृश्य लोकांना सरकारी हुकूम मोडल्याशिवाय गत्यंतर नाही. सरकारी हुकूम मोडल्याबद्दल सरकार सत्याग्रह करणाऱ्या अस्पृश्य लोकांस तुरूंगात टाकल्याखेरीज राहणार नाही. एकूण सत्याग्रह करणाऱ्या अस्पृश्य लोकांनी या कामी आपणास वेळ पडल्यास तुरूंगवासही पत्करावा लागणार आहे. अशी पूर्ण जाणीव ठेवूनच सत्याग्रहास आपली कंबर बांधावी. खरे म्हटले असता अस्पृश्यता ही इतकी अपमानकारक गोष्ट आहे की, तिच्या निवारणार्थ काहींचे प्राण खर्ची पडले तरी हरकत नाही. आपल्या स्पर्शाने अपवित्र झालेली वस्तू गोमूत्र शिंपडून शुद्ध होते असे स्पृश्य लोक मानतात. स्वधर्माच्या मनुष्याच्या स्पर्शाने जे विटाळते ते पशूचे मूत्र शिंपडल्याने शुद्ध होते. तिरस्करणीय विचारात ती मानवी स्पर्शाच्या भ्रष्टतेची कल्पना अधिक धिःकारणीय या अत्यंत आहे किंवा ती पशूच्या मूत्राने शुद्ध करण्याची भावना अधिक धिःकारणीय आहे हे जरी सांगणे कठिण असले तरी एक गोष्ट उघड आहे की, पशूंच्या मलमूत्रात जेवढे पावित्र्य आहे तेवढे देखील पावित्र्य स्पृश्यांच्या दृष्टीने अस्पृश्यांतील माणसात नाही. ही स्थिती जगण्यासारखी आहे असे कोणाही स्वाभिमानी माणसास वाटणार नाही. जगणे हाच काही जगातील पुरुषार्थ नव्हे. जगण्याच्या नानापरी आहेत. काकबळी खाऊन कावळेही पुष्कळ वर्षे जगतात परंतु त्यांच्या जीवितात पुरुषार्थ आहे असे कोणीही म्हणणार नाही. आज नाही उद्या निदान शंभर वर्षांनी तरी मुत्यू हा कोणासच चुकत नाही, तर मग त्याबद्दल डर किंवा रड कशाला ? हे शरीर बोलून चालून नाशिवंत आत्म्याच्या कल्याणार्थ जे काही या जगात करावयाचे असते त्यास नाशिवंत मनुष्य देह हेच काय ते एक साधन असल्यामुळे “आत्मनाम सततं रक्षेत दारैरपि धनैरपि !” बायकामुले किंवा संपत्ती यापेक्षा आपल्या स्वतःचे पहिल्याप्रथम रक्षण करावे असे शास्त्रात सांगितले आहे खरे. तथापि, हा दुर्लभ पण नाशिवंत मानव देह खर्ची घालून यापेक्षाही अधिक शाश्वत अशी एकादी वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी. उदाहरणार्थ देशासाठी, सत्यासाठी, ब्रीदासाठी, व्रतासाठी, यशासाठी, अब्रुसाठी अथवा भूतमात्रासाठी अनेक महापुरुषांनी अनेक प्रसंगी कर्तव्याच्या अग्नित आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. आम्हाला तरी असे वाटते की, महाभारतात वीरपत्नी विदुला हिने आपल्या पुत्रास जसे सांगितले की, अंथरूणावर पडून कुजत किंवा शंभर वर्षे निरर्थक जीवित घालविण्यापेक्षा घटकाभर पराक्रमाची ज्योत दाखवून मेलास तरी बरे, असेच दरेक अस्पृश्य मातेने आपल्या पुत्रास सांगण्याची वेळ येऊन ठेपली आहे. परंतु इतके मोठे असिधाराव्रत पाळण्यास अस्पृश्यास कोणीच लावत नाही. फक्त तुरुंगात जाण्यास तयार व्हा या पलिकडे त्यांच्यापासून दुसऱ्या कोणत्याही स्वार्थत्यागाची मागणी नाही. आणि तितकेही जर होत नसेल तर अस्पृश्य लोक पुरुष नसून हिजडे आहेत असेच म्हणावे लागेल. कारण महाभारतात एके ठिकाणी असे सांगितले आहे की,

एतावानेव पुरुषो यदमर्षी यदक्षमी I
क्षमावान्निरमर्षच नैव स्त्री न पुनः पुमान् ॥

“ज्या पुरुषाला अन्यायाचा राग येतो व जो अपमान सहन करीत नाही तोच पुरुष म्हणावयाचा. ज्या पुरुषाला राग किंवा चीड येत नाही तो आणि नपुंसक सारखेच. परंतु आम्हाला आशा आहे की. अस्पृश्यता निवारण्याकरिता प्राण खर्ची घालण्याचा निश्चय जरी थोड्याच अस्पृश्यांचा झाला असला तरी अस्पृश्यता निवारणार्थ बंदीवास पत्करण्याचा निश्चय पुष्कळशा अस्पृश्यांचा झालाच आहे. हे जर खरे असेल तर या कार्यात त्यांना यशप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण सरकार अन्यायाने अस्पृश्यातील सत्याग्रहींना जरी तुरुंगात घालू लागले तरी ते किती दिवस घालील आणि किती जणांना घालील व स्पृश्य लोक तरी सरकारचा आधार किती दिवस घेतील! शेवटी शिकस्त झाली म्हणजे सरकारलाही या गोष्टींचा विचार करावा लागेल. कारण सरकार जरी झाले तरी त्याला जनलज्जा ही आहेच. ती काही काळपर्यंत सरकारास वाटली नाही तरी ती वाटावयास लावणे हे देखील अस्पृश्यांच्याच हाती आहे. शांतताभंग होतो म्हणून सरकार आमचे न्याय्य हक्क बजावण्याच्या आड जर येईल तर आम्हास सुधारलेल्या राष्ट्राचे न्याय कोर्ट जो राष्ट्रसंघ त्याच्याकडे फिर्याद लावून सरकारास त्याच्या अन्यायीपणाबद्दल लाजविता येईल. तसेच ज्या स्पृश्य लोकांच्या हेक्यासाठी, हक्कासाठी नव्हे, अस्पृश्यांना सरकार दंड करणार त्या स्पृश्य लोकांनाही याचा विचार करावा लागणार आहे. अस्पृश्यांविषयी प्रेमाचा पान्हा नसला तरी त्यांना आपल्या संरक्षणाची चिंता स्पृश्य लोकांना आहे. त्या चिंतेमुळे ते पोळत नसले तर त्यांना पोळावयास लावणे हे आमच्या हातात आहे व ते सत्याग्रहाच्या मार्गाने आम्हास सहन करता येण्यासारखे आहे. अस्पृश्यांचे सत्व पाहूच असा जर स्पृश्य लोकांनी निर्धारच केला तर, फार तर सत्याग्रह अयशस्वी होईल. पण असे झाल्याने तोटा होणार तो कोणाचा? स्पृश्यांचा! सत्याग्रह करूनदेखील आपणास हिंदू धर्मात थारा देत नाहीत याची जाणीव पटल्यावर अस्पृश्य लोक जे आज ढकलून दिले तरी हिंदू धर्मातून जात नाहीत तेच हिंदू धर्म हा दगडांचा धर्म आहे. त्याच्यापुढे कपाळ फोडून घेतले तरी काही होणार नाही अशी खात्री होऊन, स्पृश्यांनो! घ्या तुमचा धर्म असे म्हणून आपोआप परधर्मात जाण्यास तयार होतील. इतक्या थराला ही गोष्ट स्पृश्य लोक जाऊ देतील असे संभवत नाही. मात्र आमचा सत्याग्रह आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावर केला पाहिजे की, सरकारचे तुरुंग तुडुंब भरुन सत्याग्रही कैद्यास जागा नाहीशी झाली पाहिजे. स्पृश्य लोकांना हा पोरखेळ आहे असे न वाटता त्यांना धसका बसला पाहिजे.

सत्याग्रहाच्या सिद्धीचा विचार करताना सत्याग्रह कोणाविरुद्ध करावयाचा हे जाणणे जितके जरूर आहे तितकेच तो सत्याग्रह कोणी करावयाचा याचाही विचार करणे अवश्य आहे. उपाय तर आहेच. सत्याग्रह हा आपले मानवी हक्क प्राप्त करून घेण्याचा तो उपाय फलदायक होण्यास जेवढ्या म्हणून अस्पृश्य वर्गातील स्त्री पुरुषास त्यात भाग घेता येईल त्या सर्वांनी त्यात भाग घेणे सिद्धिच्या दृष्टीने आवश्यक आहे. परंतु आमच्या मते सत्याग्रह हा फक्त व्यावहारिक उपाय आहे इतकेच नसून तो एक प्रकारची आत्मशुद्धी करून घेण्यास आरंभलेला यज्ञ आहे. त्या यज्ञात दरेक अस्पृश्याने उडी टाकून आपणास शुद्ध करून घ्यावे. स्पृश्य लोक अस्पृश्य लोकांस अपवित्र व अशुद्ध मानतात ही गोष्ट जितकी खरी आहे तितकीच अस्पृश्य लोक आपणा स्वतःस अशुद्ध व अपवित्र मानून वागतात ही गोष्ट खरी आहे. आतापर्यंत स्पृश्य लोकांचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यामुळे ते सांगतील ते करण्याची आणि वागवतील तसे वागण्याची अस्पृश्य लोकांना सवय लागून गेलेली आहे. स्पृश्य लोक श्रेष्ठ आहेत. आपण कनिष्ठ आहोत, ते आपले नायक आहेत आपण त्यांचे किंकर आहोत या भावनेचे पूट जे अस्पृश्य लोकांच्या मनावर बसून गेलेले आहे. त्यामुळेच अस्पृश्यता टिकून राहिलेली आहे. पूट जाळून टाकल्याशिवाय आत्मसन्मानाची भावना अस्पृश्य लोकात जागृत होणार नाही. ती जागृत झाल्याशिवाय अस्पृश्यता निवारण होणार नाही. या आत्मशुद्धीच्या दृष्टीने दरेक अस्पृश्याने या सत्याग्रहात भाग घेणे जरूर असले तरी संसाराच्या उपाधीत सापडलेल्या अस्पृश्य लोकांना ही आत्मशुद्धी करून घेण्यास प्रत्यक्षपणे सत्याग्रहात भाग घेता येईल किंवा नाही, याबद्दल शंका वाटणे अगदी साहजिक आहे. झालेच तर फारच थोड्या लोकांना यात भाग घेता येईल. पुरेशा लोकांनी सत्याग्रहात भाग घेतला नाही तर त्यापासून विशेष फायदा होईल असे आम्हास वाटत नाही. कारण सत्याग्रह हा दुराग्रही माणसांस सत्याचा अवलंब करण्यास भाग पाडण्याचा एक मार्ग आहे. अशा दुराग्रही माणसास त्राहि त्राहि वाटेल इतक्या मोठ्या प्रमाणावर सत्याग्रह झाला नाही तर तो आपला दुराग्रह सोडणार नाही. म्हणून आमची अशी सूचना आहे की, त्याचबरोबर संसाराच्या उपाधीतून मुक्त झालेल्या किंवा उपाधीत न सापडलेल्या पाच हजार अस्पृश्य तरूणांचे एक सत्याग्रह दल तयार करावे. त्या दलामार्फत जेथे जेथे सत्याग्रह करण्याचा प्रसंग येईल तेथे तेथे सत्याग्रह करण्यात यावा. ही योजना जर अंमलात आणली तर सत्याग्रहाच्या तयारीत काही न्यून उरणार नाही. एवढ्या मोठ्या पाच हजार सत्याग्रही दलाचा मारा करिता आला तर सत्याग्रहाच्या सिद्धीबद्दल कोणालाच शंका राहणार नाही. परंतु अशाप्रकारचे दल तयार होण्यास द्रव्याचे साह्य झाले पाहिजे. तसेच काही काळही गेला पाहिजे. हे घडेतोपर्यंत अस्पृश्य लोकांनी ज्या थोड्या थोडक्या प्रमाणावर त्यांना सत्याग्रह करता येईल त्या प्रमाणावर त्यांनी सत्याग्रह करण्यास सुरवात करावी हे बरे.

अस्पृश्यांनी सत्याग्रह करण्याच्या आड काही स्पृश्य लोक येत आहेत, हे आम्ही जाणून आहोत. या स्पृश्य लोकांपैकी काहींचा असा मुद्दा आहे की, अस्पृश्यांच्या समान हक्कांचा प्रश्न हा अस्पृश्यांनी सत्याग्रह करून सुटणार नाही. तो प्रश्न स्पृश्यांनी स्पृश्यातच चळवळ करून सोडविला पाहिजे. ज्या दिवशी देवस्थानावर, “अस्पृश्यांनी देवदर्शनास यावे.” अशी फळी स्पृश्य लोक स्वखुषीने लावतील त्या दिवशी अस्पृश्यांनी खुशाल आत जावे. तोपर्यंत त्यांनी काही गडबड अगर धांदल करू नये ! पण स्पृश्य लोक हा प्रश्न आपखुषीने सोडवितील काय ? आम्हाला त्यांची बिलकूल आशा नाही. कारण या लोकांचे असे म्हणणे आहे की, हा बहुमताचा, दयेचा, मायेचा, नीतीचा अगर समान हक्काचा प्रश्नच नाही. हा फक्त धर्मतत्त्वाचा प्रश्न आहे. अस्पृश्य स्वधर्मरूपी विराट पुरुषाचा कोणताच भाग बनू शकत नाही. कारण ब्राह्मण हे मुख, क्षत्रिय बाहू वैश्य मांड्या व शूद्र पाय बनल्यामुळे अस्पृश्यांना या विराट पुरुषाच्या आत स्थानच उरत नाही. अस्पृश्य लोक हे या हिंदू विराट पुरुषाच्या पायातली एक वहाण आहे. पादत्राण हा शरीराचा भाग कधीच होणे शक्य नाही तसेच अस्पृश्य हे कधीही हिंदुंशी एकजीव होऊ शकत नाही. तसे व्हावे म्हणणे मुर्खपणाचे व अविचाराचे आहे. अस्पृश्य वर्ग हा मुसलमान वर्गासारखा असाच कक्षेबाहेरचा वर्ग आहे. स्वधर्मरूपी विराट पुरुषाचा पायापलीकडचा व देहाशी प्रत्यक्ष संबंध नसलेला तो एक वेगळा भाग आहे. असे ज्या लोकांचे विचार आहेत त्या लोकांच्या दानतीवर व शीलावर अस्पृश्य लोकांनी विश्वास ठेवून स्वस्थ बसावे हा उपदेश कपटी जरी नसला तरी मुर्खपणाचा आहे, हे खास.

दुसरे काही स्पृश्य लोक असे म्हणतात की, अस्पृश्य लोकांनी जर सत्याग्रह आरंभिला तर त्यांच्या हातून तो पार पडणे शक्य नाही. कारण सत्याग्रहाचे शस्त्र जर त्यांनी स्पृश्य समाजावर उगारले तर ज्या काही थोड्याबहुत स्पृश्य लोकांची अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला जी काही थोडीबहुत सहानुभूती आहे ती ते गमावून बसतील. कारण, हा आघात साऱ्या स्पृश्य समाजावर होणार असल्यामुळे सुधारक तसेच सनातनी स्पृश्य या आघाताचा प्रतिकार करण्यासाठी एकजीव झाल्याखेरीज राहणार नाहीत. पण या लोकांना आम्ही असे विचारतो की, स्पृश्य जनतेपैकी काही भाग आमच्यासोबत आहे हे आम्हास सांगावयास तुमची जरूरी नाही. आम्हाला ते कळतच आहे. तुम्हाला खरोखरीच जर आमच्याबद्दल सहानुभूती असेल तर काही स्पृश्य लोक आमच्यासोबत आहेत अशी सबब सांगून सत्याग्रहापासून आम्हास परावृत्त करु नका, तुम्ही जर खरोखरीच आमच्या तर्फेचे आहात. आमच्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल तुम्हाला राग किंवा चीड आली असेल तर तुम्ही आमच्या सत्याग्रहात सामील व्हा, यातच तुमच्या सहानुभूतीची खरी पारख आहे. नाही तर तुमची मैत्री असली काय आणि द्वेष असला काय आम्हाला सारखेच.

अमर्षशून्येन जनस्य जन्तुना न जातहार्दन न विद्विषादराः !!

अमेरिकेत जेव्हा गुलामगिरीचे उच्चाटन करण्यासाठी मोहीम सुरवात करण्यात आली तेव्हा अमेरीकेतील गोऱ्या लोकात दोन पक्ष होते. दक्षिणेतील गोरे लोक या मोहिमेच्या विरुद्ध होते व उत्तरेकडील गोरे लोक या मोहिमेच्या तर्फे होते. तथापि उत्तरेकडील प्रांतातील गोऱ्या लोकांनी दक्षिणेतील काही गोरे लोक तुमच्याविरूद्ध आहेत सबब तुम्ही गुलामगिरी विरुद्ध चळवळ करू नका असा काही ब्राह्मणी उपदेश त्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या काळ्या शिद्दी लोकांना केला नाही. उलट काळ्या शिद्दी लोकांशी संगनमत करून व त्यांच्याशी सहकार्य करून त्यांच्या स्वातंत्र्याला त्यांनी विरोध करणाऱ्या आपल्या जातभाईंना त्यांनी स्वर्गाची वाट दाखविली व कोणत्याही प्रकारचा अंगचोरपणा दाखविला नाही. त्याचप्रमाणे स्पृश्य वर्गातील जे लोक तुमची मागणी रास्त आहे अशी सहानुभूतीची कबूली दाखवितात त्यांना शिद्दी लोकांच्या गोऱ्या सहानुभूतीवाल्यांनी जे करून दाखविले तसेच वर्तन तुम्ही करून दाखवाल तरच आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू असे अगदी रोखठोकपणे बजाविले पाहिजे. नाही तर हे लोक सहानुभूतीची साखर पेरून जो अन्याय एकही दिवस सहन करणे पाप आहे तोच अन्याय तसाच पुढे आपणास स्वसंतोषाने सहन करावयाची भूरळ पाडतील.

तिसऱ्या प्रतीचे स्पृश्य लोक म्हणतात की, स्पृश्य व अस्पृश्य हे एकाच समाजाचे घटक आहेत. सत्याग्रह करावयाचा तो स्वकियांशी करावयाचा नसतो. तो परकियांशी करावयाचा असतो. तसे जरी नसले तरी हिंदू समाजावर बाहेरून हल्ले होत असताना अस्पृश्यांनी त्यांचे निवारणास मदत करण्याऐवजी आपापसात यादवी माजवावी हे रास्त नाही. उपदेश मोठा गोड आहे । पण तो अस्पृश्यांनी काय म्हणून ऐकावा ? ज्या धर्मात त्यांना मुळी स्थानच नाही. ज्यात त्यांना पायातली वहाण म्हणून वागविले जाते त्या धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी काय म्हणून मरावे ? ही जबाबदारी स्पृश्य लोकांची आहे. कारण हिंदू धर्माचे हक्क ही त्यांची मिरास आहे. खानेकू हम और लढनेकू तुम’ असा हा उपदेश वेडसरपणाचा आहे व तो ऐकण्याइतके अस्पृश्य लोक मुर्ख नाहीत. आजवर हिंदू धर्माचे रक्षण केले हीच मोठी चूक झाली असे त्यांना वाटू लागले आहे. अशी वृत्ती धारण करणाऱ्या अस्पृश्य लोकास वरील प्रकारचा उपदेश करण्याचा अधिकार स्पृश्य लोकास आहे असे आम्हास वाटत नाही. विरोधी पक्षाच्या नडीचा फायदा घेऊन आपली सवड साधून घेणे हे व्यवहार संमत आहे. तेच धोरण अस्पृश्य लोकांनी आपले सामाजिक हक्क मिळविण्याकरिता स्पृश्य लोकाशी ठेवले आहे. हे नीतीच्या दृष्टीने वाजवी नसेल. पण राजकीय हक्क मिळविण्याकरिता “साम्राजाच्या गरजा येती कामाच्या काजा ” अशी घोषणा करून भर लढाईच्या प्रसंगात सरकारला अडवावयास मागे पुढे न पहाणाऱ्या स्पृश्य लोकास नावे ठेवण्याचा अधिकार कसा पोहोचतो हेच आम्हास कळत नाही. आता आपापसात यादवी करू नये असे जे म्हणतात त्यांना आम्ही असे सुचवितो की, तुमची गीता काय सांगते ते पहा. गीतेत भगवंताने अर्जुनास जो उपदेश केला आहे त्यापेक्षा आम्ही निराळे असे काय सांगितले आहे. कौरव-पांडवांची सैन्ये लढाईस सज्ज होऊन कुरुक्षेत्रावर उभी असताना लढाईस तोंड लागण्यापूर्वी अर्जुनानी मध्यभागी आपला रथ नेऊन दोन्ही सैन्याकडे दृष्टी फेकिली व पाहिले तो आपलेच स्नेही, आप्त, गुरु त्यास कौरवांच्या सैन्यात दिसले. तेव्हा हा लढाईचा प्रसंग कोणत्या स्वरुपाचा आहे हे त्याच्या डोळ्यांपुढे आले व तो युद्ध करण्याचे नाकारून व आपल्या हातचे धनुष्य बाण ठेवून खाली बसला. कौरव व पांडव हे आप्त आहेत ही गोष्ट श्रीकृष्णाला ठाऊक नव्हती असे नाही. कौरव जरी पांडवांचे हक्क देण्यास तयार नव्हते तरी भीष्म, द्रोण, विदूर, वगैरे शिष्ठ लोक त्यास अनुकूल होते. काही कालाने त्यांच्या मतांचा परिणाम कौरवावर झाला असता ही गोष्ट श्रीकृष्णाला अवगत होती. आपापसात यादवी करू नये हे तत्व जर सत्य असते तर अर्जुनाचे वर्तन पाहून “खरोखर तू म्हणतोस तेच खरे. उपरति पाहून मला आनंद वाटतो असे कृष्ण परमात्मा का म्हणाला नाही ?” उलट “तुला झालेली अरे ही अवदसा तुला कोठून आठवली. हा हिजडेपणा तुला शोभत नाही, हे दुबळेपण सोडून युद्धाला उभा रहा” असे त्याने अर्जुनास सांगितले. इतकेच नव्हे, तर या युद्धात असंख्य लोकांची प्राणहानी होणार आहे हे धडधडीत दिसत असताना त्याला या गोष्टीची कवडीची देखील दिक्कत वाटली नाही. हे सारे कशाकरिता तर कौरवांनी हिरावून घेतलेले पांडवाचे राज्य परत मिळविण्याकरिता ! ज्या वस्तुसाठी अर्जुन सत्याग्रह करीत होता त्या वस्तूला ज्या वस्तूसाठी अस्पृश्य लोक सत्याग्रह करणार आहेत त्या वस्तूच्या मानाने फुटक्या कवडीचीही किंमत नाही. पांडव राज्यासाठी भांडत होते, अस्पृश्य लोक माणुसकीसाठी भांडत आहेत. माणुसकी गेल्याने माणसाचे सर्वच काही जाते. परंतु राज्य गेल्याने माणुसकी तरी शिल्लक राहते. राज्यावाचून पांडव काही मेले नसते. पण माणुसकीवाचून अस्पृश्य लोक जिवंतपणी मेले आहेत. राज्यासारख्या क्षुल्लक ध्येयासाठी जर पितृहत्त्या, गुरुहत्या, बंधुहत्त्या किंवा कूलक्षय या सारखी घोर कर्मे करावयास अर्जुनास श्रीकृष्ण सांगतो तर माणुसकी कमविण्यासारख्या अत्युत्तम ध्येयासाठी साधा हटयोग देखील अस्पृश्यांनी करू नये असे स्पृश्यांनी सांगणे हा निव्वळ बाष्कळपणा होय.

खरे म्हटले असताना या स्पृश्य लोकांचे ऐकण्याचे आम्हास काही प्रयोजन नाही. कारण ते आमचे कितीही जरी हितचिंतक असले तरी ते आम्हास या बाबतीत उपदेश करण्यास अपात्र आहेत. कारण हा प्रश्न अधिकाराचा जातीचा, स्वार्थाचा व मनोधर्माचा आहे. विद्येचा ज्ञानाचा अगर बुद्धिचा नव्हे. यास्तव त्यांचा हा आपमतलबी उपदेश आपण न ऐकता त्यास स्पष्टपणे आपण बजाविले पाहिजे की, तुम्ही आम्हास उपदेश करण्याच्या भानगडीत पडू नका.

कसलाही लढा पडला तर प्रथम त्यात शिष्टाई होत असते. शिष्टाईचा उपयोग नच झाला तर मग युद्ध करण्यांची पाळी येते. अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात पुष्कळ काळपर्यंत शिष्टाई झाली आहे असे आम्हास वाटते. जेव्हापासून ही अस्पृश्यता हिंदुधर्मात शिरली तेव्हापासून तिच्याविरुद्ध अनेक महात्म्यांनी प्रयत्न केले. परंतु या बाबतीत स्पृश्य लोकांचा दुराग्रह इतका भयंकर आहे की अपरिहार्य प्रसंग सोडून दिले तर त्यांनी याबाबतीत सूईच्या अग्रावरही जितकी माती राहते तितकी सुद्धा माती पांडवांना न देणाऱ्या पाषाणहृदयी व अधर्मप्रेमी दुर्योधनापेक्षा विशेष औदार्य दाखविले आहे असे कोणालाही वाटणार नाही. यापुढे त्यांच्या वृत्तीत आत्मप्रेरणेने अस्पृश्यांस अनुकूल असा काही तरी फरक होईल असेही दिसत नाही. वास्तविक पाहिले असता ह्या अन्यायाला आम्ही मान दिली म्हणूनच तो आज इतके दिवस चालू राहिला आहे. तो झुगारून देण्याचा जर आम्ही मनापासून निश्चय केला तर तो कोणीही आमच्यावर लादू शकणार नाही. ज्या ब्राह्मणी धर्माने आपल्याला हीन करून टाकीले. त्याच ब्राह्मणी धर्माने कायस्थासारख्या जातीवरही हीनत्वाचा शिक्का मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. परंतु त्यातील लोकांनी वेळेवर प्रयत्न केल्यामुळे त्यांचा दर्जा त्यांना कायम ठेविता आला. कालाचे चक्र उलट फिरत असताही आमच्या पूर्वजांनी गाढ झोप घेतली. इतरांप्रमाणे आमच्या लोकांनीही डोळे उघडे ठेऊन होत असलेल्या अन्यायाचा प्रतिकार वेळीच केला असता तर आज अस्पृश्य हा केवळ इतिहासातला शब्द म्हणून राहिला असता. तसे करण्याचा निश्चय मागील पिढीने केला नाही ही अत्यंत लांछनाची गोष्ट आहे. परंतु मागील पिढीत ज्ञानाचा प्रसार नसल्या कारणाने त्यांच्या बेफिकीरी वर्तनास क्षम्य म्हणता येईल. परंतु या पिढीची गोष्ट निराळी आहे. अस्पृश्यांना कदापि न प्राप्त झालेले ज्ञान या पिढीला लाभलेले आहे. म्हणून मागील पिढीचे हातून जी गोष्ट घडली नाही, ती गोष्ट घडवून आणणे हे ह्या पिढीचे कर्तव्यकर्म आहे. त्यास जर या पिढीतील लोक जागणार नाहीत तर ते कुलवंत नसून, कुलांगार आहेत असेच म्हणावे लागेल.

अध्यक्षांचे भाषण झाल्यावर विषय नियामक कमेटीची निवडणूक करण्यात येऊन सभेचे काम दुसऱ्या दिवशी 8 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

परिषदेत खालील सद्गृहस्थ प्रामुख्याने दिसत होते. खुद्द अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख, बॅरिस्टर तिडके, श्री. चौबळ वकील, श्री. गवई एम. एल. सी.. श्री. के. बी. देशमुख, डॉ. भोजराजा, डॉ. पटवर्धन, श्री. उत्तमराव कदम इत्यादि गृहस्थ असून परिषदेकरिता बाहेरून मुद्दाम आलेले श्री. नानासाहेब अमृतकर, मोर्शी, श्री. दे. वि. नाईक. सं. ब्राह्मण ब्राह्मणेतर श्री. दत्तात्रय विठ्ठल प्रधान, दादर, श्री. रा. दा. कवळी. श्री. द. रा. रारावीकर हे हजर होते.

त्याच दिवशी रात्री विषय नियामक कमेटीची बैठक होऊन दुसऱ्या दिवशी परिषदेपुढे येणाऱ्या ठरावाची चर्चा झाली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password