कोणत्याही परिस्थितीत मजुरांच्या प्रतिनिधींना निवडून दिले पाहिजे
तारीख 7 नोव्हेंबर 1938 रोजीच्या मुंबई कामगारांचा प्रचंड संप यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दीड लाख कामगारांची कामगार मैदानावर संध्याकाळी सभा झाली. कामगारांनी संपापासून कोणता धडा शिकावा व या पुढचे आपले ताबडतोबीचे धोरण काय असावे व प्रत्यक्ष लढ्याच्या जोडीला कामगारांचे संप, लढे व स्वातंत्र्याचा लढा यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता, कायदे कौन्सिले, म्युनिसिपालट्या, लोकल बोर्ड वगैरे ज्या ज्या ठिकाणी म्हणून जी काही राजकीय सत्ता आहे ती कामगारांच्या शेतकऱ्यांच्या व जनतेच्या खऱ्याखुऱ्या प्रतिनिधींच्या हाती येणे किती आवश्यक आहे, हे डॉ. आंबेडकरांनी आपल्या मुद्देसूद व सडेतोड भाषणात समजाऊन दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
आजच्या सायंकाळच्या वर्तमानपत्रात काय आहे ते पहा. म्हणजे विचित्र लीला दिसून येईल. त्या वर्तमानपत्रात ज्या हकीकती प्रसिद्ध झाल्या त्या आश्चर्यजनक आहेत. एक म्हणतो, मजुरांचा संप यशस्वी झाला नाही आणि सर्व मजूर कामावर आहेत. ही गोष्ट खरी की खोटी मी सांगत नाही. मात्र मुंबईतील वर्तमानपत्रे मुंबई मंत्रीमंडळ व भांडवलदार यांनी विकत घेतली आहेत असे दिसून येईल. अत्यंत यशस्वी संप झाला असताना असली खोटी व विपर्यस्त परिस्थिती चितारावी हे निषेधार्ह आहे. काय लिहून आले याची तुम्ही चिंता करू नका. समोर काय आहे ते पहा व धीर धरा.
आज तुम्ही सव्वालाख कामगारांनी एकत्र येऊन पोटाची फिकीर न करता रोजची कमाई बुडवून या बिलाला असलेला विरोध दाखवून दिलेला आहे. काँग्रेसने जो कायदा केला त्याला आपण विरोध केला. या बिलाला वरच्या कौन्सिलमध्ये देखील असाच विरोध माझे मित्र अँ. जोशी करणार असले तरी त्यांना मदत नाही. म्हणून हा कायदा आपल्या छातीवर बसणार. काँग्रेसने हा कायदा करावा आणि आपण विरोध करावा, हेच आपण करणार काय ? जर नुसते बावटे फडकवाल, स्लोगन्स ओरडाल आणि स्वस्थ बसाल तर तुमच्यासारखे महामूर्ख दुसरे कोणीही नाहीत, असेच मी म्हणेन. ज्या काँग्रेस सरकारने घोड्यावर बसून आपल्या तोंडात लगाम घातला त्या काँग्रेस सरकारला उडवून देणे हे शहाणपणाचे आहे. शत्रुच्या हाती कायदा करण्याची जरादेखील संधी देऊ नका, जर आपण शहाणपणा अगोदर पाळला असता, अधिक मजूर पुढारी निवडून दिले असते तर हा कायदा पास झाला नसता. आज काँग्रेसचे मताधिक्य आहे. म्हणूनच हा कायदा काँग्रेस पास करू शकेल. आज जेथे सत्ता आहे ती जागा काबीज केली तरच तुमचा बचाव होईल.
म्युनिसीपालिटी, लोकल बोर्ड, कायदे कौन्सिले जेथे जेथे राजकीय सत्ता आहे. ती सर्व स्थाने मजुरांनी काबीज केली तर आजचा कार्यक्रम यशस्वी झाला, असे म्हणता येईल.
येत्या म्युनिसीपल निवडणुकीत मजूर पक्षाचे पुढारी उभे राहाणार आहेत. त्यांनाच तुम्ही आपली मते द्या. काँग्रेसने गेल्या 50 वर्षात जी अब्रू कमाविली ती गेल्या 15 महिन्यात घालविली आहे.
काँग्रेसने आज खरोखरच साम्राज्यशाही विरुद्ध निकराचा लढा सुरु केला तर मी स्वातंत्र्याकरिता माझी सर्व शक्ती काँग्रेसच्याच बाजूला टाकीन, परंतु काँग्रेसची आजची साम्राज्यशाही विरोधाची भाषा जनतेची शुद्ध दिशाभूल करण्याकरिताच वापरली जात आहे. परंतू मी अजूनही असे सांगतो की जर खरोखरच मला असे आढळून आले की कॉंग्रेस आज प्रामाणिकपणे स्वातंत्र्याकरिता युद्ध करीत आहे तर मी माझी आजची भूमिका सोडून काँग्रेसला स्वातंत्र्याच्या लढ्यात पाठिंबा देण्यास तयार आहे.
म्हणूनच मी तुम्हाला परत असे सांगतो की तुम्ही कोणत्याही निवडणुकीत मजुरांच्याच प्रतिनिधींना निवडून दिले पाहिजे. सरकारने कायदा करावा आणि तुम्ही त्याला नुसता विरोध प्रदर्शित करावा हा काही खरा लढा नव्हे. तुम्हाला नको असणारे, तुमच्या अहिताचे कायदे करणाऱ्या काँग्रेसवाल्यांना तुम्ही का निवडून देता ? मुंबई म्युनिसीपालिटीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकीत तुम्ही वाटेल त्याला मते द्या पण काँग्रेसला मते देऊ नका. असे न केलेत तर तुमचा लढा योग्य मार्गाने जाणार नाही, हे लक्षात ठेवा.