Categories

Most Viewed

07 नोव्हेंबर 1937 भाषण

मनुष्य असूनही भाकरीसाठी स्वाभिमान शून्य होणार काय ?

मुक्काम दौड, जिल्हा पुणे येथे तारीख 7 नोव्हेंबर 1937 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरली होती. पुणे जिल्ह्यात हा भाग विशेष मागासलेला आहे आणि यासाठीच डॉ. आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी जाऊन तेथे एकंदर परिस्थिती पाहिली. त्यांच्या आगमन प्रसंगी सौ. ठकूबाई रोकडे, नीमाबाई मचार, चिमाबाई सोनवणे, गोधाबाई, भागीरथीबाई रोकडे, लक्ष्मीबाई डिखळे व जबाबाई भिंगारदिवे वगैरे स्त्रियांनी त्यांना पंचारती ओवाळून त्यांचे स्वागत केले व नंतर सभेस सुरवात झाली. प्रथम आमदार राजाराम यांनी सर्वांचे स्वागत करून डॉ. आंबेडकरांना अध्यक्षस्थान स्वीकारावयास सांगितले, त्यांच्यानंतर आमदार डॉ. भाऊसाहेब गडकरी यांचे पाठिंबादाखल भाषण झाले.

यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलावयास उठले. ते आपल्या भाषणात म्हणाले.

प्रिय भगिनीनों व बंधुनो,
येथे येऊन फारसे बोलावे लागेल, असे मला वाटले नव्हते. तुम्हा मंडळीची भेट घेतल्याने कार्यभाग संपला असे वाटत होते. परंतु तुमच्या येथील परिस्थिती पाहून मला दोन शब्द बोलणे भाग पडत आहे. आजच्या सभेचा मुख्य उद्देश म्हणजे स्वतंत्र मजूर पक्षाची शाखा काढणे हा आहे. हा आमचा पक्ष फक्त अस्पृश्य वर्गाकरिता नसून जे लोक मजूरी करून पोट भरतात व शेतकरी वर्ग आहे अशाचा मुख्यत्वेकरून या पक्षात समावेश होतो. आपल्या पक्षाची स्थापना होऊन एक वर्षही झालेले नाही. परंतु त्याच्या कार्याचा विस्तार व्यापकतेने वाढत आहे. यावरून या पक्षाच्या आवश्यकतेची जाणीव होईल. अजीवी वर्गाचे काँग्रेस मुळीच कल्याण करणार नाही. काँग्रेस ही गाया आहे. या महामायेच्या पाशात सापडून आपला अध:पात करून घेऊ नका. तुम्हाला ठाऊक आहे की, एखादा लांडगा जर मेंढीला म्हणाला की, ‘ चल मी तुला स्वर्गात नेतो पण तो तिला स्वर्गात घेऊन जाण्याऐवजी तिला मध्येच नखरा स्वर्ग दाखविल्याशिवाय राहाणार नाही. यासाठी आपण वेळीच सावध रहा. खरे खोटे कोण ते स्वतःच्या बुद्धीने ठरवा. तुमचे खरे हित व्हावे अशी जर तुमची इच्छा असेल तर आजच स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद कायदेमंडळात आपले लोक अधिक प्रमाणात जाणे जरुरीचे आहे. तेच आपले प्रतिनिधी आपल्या हिताचे काम करतील.

तसेच वतनाच्या बाबतीत कॉंग्रेसचे लोक तुमचा गैरसमज करतील. खेडेगावात तुमची वस्ती थोडी असते. तुमची उपजीविका येथील स्पृश्यांच्या मर्जीवर अवलंबून आहे. त्यासाठी ते तुमची हडकी हाडवळे जातील म्हणून दिशाभूल करतील त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. दिवाळीत महारणीने पाटलास ओवाळण्यास जावे आणि म्हणावे बळीचे राज्य येवो. आतापर्यंत त्याने पुष्कळ राज्य भोगले आहे. मग पाटलाच्या बायकोने महारास का ओवाळू नये ? दसऱ्याच्या दिवशी महाराने आपटा आणावा व तो पाटलाने खुशाल लुटावा. अशावेळी पाटलाला आपटा आणावयास काय झाले ? पंचायती वगैरे महत्त्वाच्या कामासाठी सर्व लोकास बोलाविण्याकरिता महारास पाठविले जाते. पण पंचायतीमध्ये बसण्याचा अधिकार महारास का नसावा ? मयताचे निरोप पाटाने किंवा तारेने पाठवावयाचे सोडून ते सारे महाराने पायपीट करून काय म्हणून कळवाव. मी आतापर्यंत फक्त दोन गोष्टी सांगितल्या आहेत. त्या म्हणजे (1) मृतमास न खाणे (2) उच्छिष्ट अन्न न भाकरी वगैरे भीक मागून आणण्याच्या प्रकाराविरूद्ध मी आहे. अशामुळे आपण इतराप्रमाणे मनुष्य असूनही भाकरीसाठी स्वाभिमानशून्य का व्हावे ?

अशा परिस्थितीत मी तुम्हास स्पृश्य लोकांकडे भाकरीसाठी भीक मागा, असे कसे सांगेन. मला येथे जमलेल्या स्त्रियांना सांगावयाचे आहे की, तुम्ही मुलांना जन्म दिल्यानंतर त्याची योग्य निगा न करता, त्यांना इतर स्पृश्य समाजातील मुलाबाळांप्रमाणे वळण लावून त्याचे शिक्षणाकडे लक्ष न वेधविता गावातून भीक मागीत का फिरविता? तुम्ही मनुष्य आहात. स्पृश्य समाजातील मुले शिकून आपला नावलौकिक काढतात. त्याप्रमाणे आपल्या मुलांना का वळण देत नाही. माझ्या सांगण्याप्रमाणे जर येथले लोक वागायला लागले. असे कळले तरच मला आनंद होईल.

या सभेस पुण्याहून मे. सुभेदार घाटगे बंधु, मधाळे, अण्णा पोतनीस, डिखळे बंधू बोराळे, पानसरे, गायकवाड, घोटके वगैरे बरीच मंडळी हजर होती. या समेत (1) महार वतन बिलास पाठिंबा. (2) लोकल बोर्डाच्या विहिरी अस्पृश्यांच्या वस्तीजवळ बांधणे. (3) खोती पद्धती नष्ट करणाऱ्या बिलास पाठिंबा. (4) मिलिटरी गोळीबारामुळे महार लोकांना होणारा त्रास दूर व्हावा किंवा त्याबद्दल त्यांना वेतन मिळावे वगैरे ठराव पास झाले. शेवटी हारतुरे वगैरे देण्याचा समारंभ झाल्यावर ही सभा बरखास्त करण्यात आली.

मी जे कमाविले ते अखिल अस्पृश्यांसाठी

रविवार तारीख 7 नोव्हेंबर 1937 रोजी रात्री 8 वाजता पुण्यातील भवानी पेठ, भंगी वस्तीला अस्पृश्य समाजाचे एकमेव पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली. सदर प्रसंगी आमदार भोळे खंडेराव सखाराम सावंत, में सुभेदार आर. एस्. घाटगे साहेब, मे. रेवजी दगडूजी डोळस, मे. के. गायकवाड, में एस्. थोरात में शांताराम पोतनीस, मे. के. आर. नघाळे, मे. एस्. गायकवाड, वगैरे प्रमुख मंडळी महार, मांग, भंगी वगैरे जनसमुदाय हजर होता. डॉ. बाबासाहेबांची मोटार येताच त्यांचे जयजयकारात स्वागत करण्यात आले. प्रथम भंगी समाजातील प्रसिद्ध गायनरत्न कासम इसूफ ज्ञानज्योत याचे साथीदारासह सुस्वर असे संगीत गायन झाल्यावर भंगी समाजातील तरूण कार्यकर्ते विठ्ठलदास अल्लीभाई, चव्हाण यांनी भंगी समाजाच्या आर्थिक परिस्थितीविषयी व फ्लशींग संडास सिस्टिममुळे झालेल्या बेकारीची डॉ. बाबासाहेबांना माहिती दिल्यावर भंगी समाजातर्फे त्यांचे स्वागताप्रित्यर्थ पुष्पहार अर्पण केले. नंतर हरिजन हितचिंतक मंडळाकडून चालत असलेल्या मोफत वाचनालयातर्फे मंडळाचे जॉईंट सेक्रेटरी मे, किसन तुकाराम भोसले यांनी मंडळ व वाचनालय यांची माहिती सांगून वाचनालयातर्फे पुष्पहार अर्पण केले.

नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अमृततुल्य भाषणाच्या अमोल प्रसादाने जमलेल्या श्रोतृजनास तृप्त केले. ते म्हणाले.

मी जे कमाविले आहे ते केवळ महारांकरिता नसून अखिल अस्पृश्यांसाठी आहे. आम्ही जसे ब्राह्मणासंगती मिळून मिसळून वागण्यास पाहतो तसेच महारांनी भंगी, मांग यांच्यात मिसळून वागले पाहिजे. नाही तर मी महारांकरिता काही करणार नाही. तसेच भंगी समाज सांगेल ते मी करीन.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password