Categories

Most Viewed

06 नोव्हेंबर 1938 भाषण

मालक-मजूर तंटा निवारण कायदा, मजुरांच्या माना कापणारा.

रविवार तारीख 6 नोव्हेंबर 1938 रोजी संध्याकाळी परळच्या कामगार मैदानावर एक लाखापेक्षा अधिक अशा जमावाने कामगार जाहीर सभेला हजर होते. ही कामगारांची विराट सभा पाहाणारांची आधीच खात्री झाली होती की, तारीख 7 नोव्हेंबरचा कामगारांचा एक दिवसाचा सार्वत्रिक संप पूर्णपणे यशस्वी होणार. त्या दिवशी सभेचे अध्यक्ष बॅ. जमनादास मेहता तसेच शामराव परूळेकर, भाई याज्ञिक, एस. ए. डांगे, मिरजकर यांची भाषणे झाली. त्या सभेतील विराट जनसमुहापुढे भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,

आज आपण या ठिकाणी मुंबई सरकारने लेजिस्लेटिव्ह असेंब्लीत ट्रेड डिस्प्यूट बिल या नावाचे जे बिल आणले आहे त्याचा निषेध करण्याकरिता जमलो आहो. हे आता माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी आपणांस सांगितले आहेच. या बिलाला ‘ट्रेड डिस्प्यूट बिल अथवा मालक मजूर तंटा निवारण्याचा कायदा’ असे संबोधण्यात येत आहे. या बिलाने कामगार वर्गाची मान किती सफाईदार रीतीने कापली गेली आहे. याची चर्चा मी आता करीत नाही. कारण ही चर्चा माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी व असेंब्लीतील आपल्या सभासदांनी गेले दोन अडीच महिने अखंड उत्साहाने आणि कर्तव्य तत्परतेने केलेली आहे. आपण ती वर्तमानपत्रात वाचलेली आहे. आज मला आपणाला एवढेच सांगावयाचे आहे की, कॉग्रेस सरकार अधिकारावर आल्यावर मजुरांच्या संबंधाने इतका अन्याय कायदा संख्या बळाच्या जोरावर पास करून घेऊन त्या अन्यायाचा परिस्फोट करणारांविरूद्ध खोटानाटा, निद्य आणि बेशरमपणाचा प्रचार करण्याइतकी काँग्रेसची सत्य-अहिंसा वृत्ती आज अधोगतीला गेली आहे ही गोष्ट आपणाला विसरता येणार नाही.

‘मजुराचे पुढारी स्वार्थसाधू आणि लबाड आहेत’ असे हवे त्या उप-या भाडोत्री खादीवाल्यापासून तो थेट पट्टीच्या कॉंग्रेस जंबुकापर्यंत सर्वांनी खुशाल बरळत सुटावे! मी तुमच्यापुढे आज स्पष्ट सवाल टाकतो की, पूर्वी 1930-34 साली कॉंग्रेसनै मजुरांच्या हितसंबंधाचे धोरण स्पष्ट जाहीर केले असता त्याला मूठमाती देऊन मजुरांच्या माना कापणारा कायदा तयार करणारे काँग्रेसचे पुढारी लबाड की सत्तामदांघ काँग्रेस पक्षाकडून होणारा अपमान सहन करून कामगारांची बाजू असेंब्लीत निर्भीडपणे मांडणारे मजूर पुढारी लबाड, याचा निर्णय आपणच द्यावा. ‘देशहिताचा आणि देशभक्तीचा सारा मक्ता काँग्रेसवाल्यांकडे वारसानेच येतो, डॉ. आंबेडकर जातीनिष्ठ! डॉ. आंबेडकर देशद्रोही. कारण ते तुरुंगात गेले नाहीत ! केवळ तुरुंगात जाऊन मनुष्य देशभक्त कसा बनतो ते मला समजत नाही. मी तुरुंगात गेलो नाही ही गोष्ट सत्य आहे. माझ्या तुरुंगात जाण्याचा उपयोग काय? मी तुरुंगात गेलो असतो तर खात्रीने ‘ए’ क्लास मिळाला असता आणि ‘ए’ क्लासात ऐष आरामात तुरुंगवास भोगून आपल्या अनुयायांना चकविण्याइतका दांभिकपणा माझ्याजवळ नाही, हे मी प्रांजळपणे कबूल करतो. आजच्या काँग्रेसवाल्यांनी नावाचा तुरुंगवास भोगला आहे. खरा तुरुंगवास भोगला लोकमान्य टिळकांनी आणि इतर महाराष्ट्रीय पुढाऱ्यांनी।

एकांगी आणि खोडसाळ प्रचारामुळे काही थोड्या लोकांची झाली तरी या प्रचाराचा फोलपणा निष्पक्षपाती पटल्यावाचून राहणार नाही. काँग्रेसवाल्यांचे गुरु महात्मा गांधी दुसऱ्या वर्तुळ परिषदेला गेले त्यावेळी तेथे हिंदुस्थानचा एकमेव प्रतिनिधी म्हणून आपण गांधीचा मोठा जयजयकार केला. माझे गांधीच्या भक्तांना आणि अभिमान्यांना असे स्पष्ट आणि जाहीर आव्हान आहे की, त्यांनी राऊंड टेबल कॉन्फरन्समधील माझी आणि गांधीची सर्व भाषणे जी राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या प्रोसिडिंग्स मध्ये सुरक्षित आहेत ती पुस्तक रूपाने एकत्र करावी. डॉ. आंबेडकरांची भाषणे खंड 1, महात्मा गाधीची भाषणे खंड 2 अशी ती भाषणे एकत्र छापावी आणि देशद्रोही कोण याचा निर्णय आपण द्यावा. कोणत्याही निर्भिड आणि निस्पृह न्यायाधिशाने हा निकाल द्यावा, मी तो मान्य करावयास तयार आहे. हे मी या सभेत जाहीर करतो.

उद्याचा संप खरे म्हटले असता संप नव्हेच. आज तरी आपले भांडण मालकाजवळ नाही. मुंबई सरकारने दुराग्रहाने आणि मालकांना खूष करण्याच्या इराद्याने कामगारांची कत्तल करणारे बिल पास केले आहे. असेंब्लीत ते बिल पास झालेच. कौन्सिलात पास होण्यास वेळ लागणार नाही. त्याबद्दलच्या आपली साऱ्या कामगार व मजूर वर्गाची नापसंती व्यक्त करण्याकरिता आपण उद्या एक दिवसाचा सार्वत्रिक संप घडवून आणणार आहो. या एका दिवसाच्या शांततेने पार पडणाऱ्या संपाच्या रूपाने कामगार आणि मजूर वर्गाच्या विराट शक्तीचे स्वरूप आपण जगाच्या निदर्शनास आणून देणार आहोत.

आपण सर्वांनी संपात भाग घ्यावा आणि तो यशस्वी करून दाखवावा, अशी माझी इच्छा आहे. परंतु मी सांगतो अथवा इतर मजूर पुढारी सांगतात म्हणून आपण या संपात सामील व्हावे, असे मला वाटत नाही. ज्या बिलाविरूद्ध निषेध म्हणून हा संप पुकारला जात आहे त्या बिलाचे हिडीस स्वरूप आणि त्यासंबंधीचे आपले कर्तव्य यांचा मनोमन विचार करून संपात जाणे योग्य वाटले तरच आपण संपात सामील व्हावे, असे माझे आपणास सांगणे आहे.

उद्याचा संप यशस्वीरीतीने पार पडला म्हणजे संपले, असे मात्र समजू नका. तुम्हाला पुढे झगडाव्या लागणाऱ्या झगड्यापैकी एकाची ही मुहूर्तमेढ आहे हे ध्यानात असू द्या. आपण हजारोंनी या सभेला हजर राहिल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन मी आपली रजा घेतो.

डॉ. बाबासाहेबांनी सार्वत्रिक संपाबाबत केलेले भाषण कामगारांच्या मनावर पूर्णपणे बिंबलेले दिसत होते. इतक्या दिवसांच्या प्रचारकार्याने कामगारांची एकजूट अपूर्व अशी झालेली दिसत होती.

सभेनंतर कामगारांची, प्रत्येक कामगार मोहल्ल्यातून वरळीपर्यंत निघालेली प्रचंड मिरवणूक संपाच्या यशाची खात्री पटवीत होती. ही रात्रीची हजारो कामगारांची मिरवणूक इतक्या शिस्तीने आणि शांततेने चालली होती की तिचे कोणीही कौतुकच केले असते. संपाच्या प्रचारार्थ एवढी मोठी मिरवणूक पूर्वी कधीच निघाली नव्हती. या मिरवणूकीची स्वतंत्र मजूर पक्षाच्या समता सैनिक दलाने ठेवलेली शिस्त विशेष अभिनंदनीय होती. स्वतंत्र मजूर पक्षाच्या कार्यकत्यांनी ट्रेड युनियन काँग्रेसच्या सहकार्याने संप यशस्वी करण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची करणे शक्तीबाहेर आहे. संपाच्या रात्री सर्व कामगार पुढारी संपाची जय्यत तयारी करीत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बॅ. जमनादास मेहता, डी. व्ही, प्रधान, डांगे, निमकर वगैरे मंडळी रात्रभर कामगार विभागातून फिरत होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password