Categories

Most Viewed

06 नोव्हेंबर 1937 भाषण

बहुजन समाजावर अन्याय होणार नाही असे कायदे करवून घेतले पाहिजेत.

मु मसूर, जि. सातारा येथे पूर्वी ठरल्याप्रमाणे तारीख 6 नोव्हेंबर 1937 रोजी सातारा महार परिषदेचे 7वे अधिवेशन डॉ. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी डॉक्टर साहेबांच्या जंगी स्वागतास हजारो स्त्रीपुरुषांचा अलोट जमाव जमला होता. परिषदेच्या अगोदर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मोटारमधून दोन मैल लांबीची मिरवणूक काढण्यात आली. पांचगणी दहिगाव व इतर ठिकाणच्या समता सैनिक दलांनी या मिरवणुकीची शिस्त वाखाणण्यासारखी ठेविली होती. डॉक्टर साहेबांच्या गगनभेदी जयजयकाराने ते सारे वातावरण दुमदुमून गेले होते. स्पृश्यवर्गीय समाज बांधवांना हे अपूर्व आणि उत्साही वातावरण पाहून कौतुक व आश्चर्य वाटल्यास नवल नाही. या मिरवणुकीत अध्यक्ष साहेबांबरोबर स्वागताध्यक्ष मि. के. एस. सावंत, एम. एल. ए. हे मोटारीत बसले होते. त्यांच्या मागील मोटारीत आमदार श्री. राजाराम भाऊ भोळे, अँड विनायकराव गडकरी, अण्णासाहेब पोतनीस वगैरे पुढारी बसली होती. सायंकाळी तीन वाजण्याच्या सुमारास ही प्रचंड मिरवणूक परिषदेसाठी खास उभारलेल्या भव्य मंडपात येऊन दाखल झाली. डॉ. बाबासाहेबाचे दर्शन होण्यासाठी लोकांच्या झुंडीच्या झुंडी मंडपाच्या प्रवेशद्वारी लोटू लागल्या होत्या. त्यामुळे परिषदेची व्यवस्था ठेवणे काही वेळ कठीण झाले होते. समता सैनिक दलाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे परिषदेची सारी व्यवस्था उत्तम प्रकारे राखण्यात आली.

स्वागत गीत झाल्यावर रीतसर बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली. त्यावेळी टाळ्यांचा व जयजयकारांचा प्रचंड ध्वनी झाला. त्यानंतर स्वागताध्यक्ष मि. खंडेराव एस. सावंत यांचे भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात नियोजित अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा परिचय करून देताना त्यांचे एका उक्तीत वर्णन केले ते असे ‘झाले बहू, आहेत बहू, होतील बहू, परंतु या सम हा’ हे त्यांनी केलेले डॉक्टर साहेबा विषयीचे वर्णन अतिशयोक्तीचे खास नव्हे !

यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले ते म्हणाले,

भगिनींनो आणि बंधूनो,
मसूर गावाचे नाव घेतले की मला माझ्या बालपणी अस्पृश्यतेसंबंधी अनुभवलेल्या कडू अनुभवांची आठवण होऊन डोळ्यात अजूनही अश्रू उभे राहतात. माझी या गावी गेल्या 35 वर्षानंतर ही दुसरी खेप आहे. या भागात गोरेगावला ज्यावेळी तळे बांधले त्यावेळी कामावर माझे वडील कॅशियर म्हणून काम करीत होते. मी, माझे दोघे बंधू आणि माझ्या बहिणीचा मुलगा असे चौघेजण सातारा येथे शिक्षणासाठी राहात होतो. माझी मातोश्री त्यावेळी स्वर्गवासी झाली होती. आम्हा सर्व मुलांवर आमचे वडिलांचे एक स्नेही, शेजारी राहात असत. ते लक्ष ठेवीत असत. उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या वडिलांनी आम्हास गोरेगावी बोलाविले. आम्ही तेथे येणार असल्याचे एक पत्र अगोदर एका हमालाबरोबर पाठविले होते. आम्हाला रेल्वेगाडीने जाण्यात मोठा आनंद झाला. कारण यापूर्वी ही गाडी इंजिनने कशी चालते, हे पाहिले नव्हते. त्यामुळे आम्हास एक प्रकारची आतुरता लागली होती. प्रवासासाठी नवीन कपडे, जरीच्या टोप्या वगैरे खरेदी करून आम्ही साता-याहून पाडली स्टेशनवर गाडीत बसलो. तेथून मसूर पर्यंतचा प्रवास अत्यंत आनंदात गेला. मसूर स्टेशनवर पोचताच आम्हास कोणीच उतरून घ्यावयास आलेले नाही, हे पाहून आश्चर्य वाटले. दुपारी 4 ते रात्री 7 वाजेपर्यंत आम्ही मसूर स्टेशनवर बसून राहिलो. आम्ही असे तिष्ठत बसलेले पाहून स्टेशन मास्तरने आमची चौकशी केली. आम्ही आमची जात सांगताच स्टेशन मास्तर चमकला. शेवटी त्याने मोठ्या मुश्किलीने गोरेगावास जाण्याकरिता एक गाडी ठरवून दिली. पण गाडीवानाला आमची जात सांगताच तो बिचकला. तो आम्हास महाराची पोरे म्हणून नेण्यास तयार होईना. शेवटी आमच्या बंधुने अशी तडजोड केली की ठरलेल्या भाड्यापेक्षा एक रुपया अधिक देऊन गाडी आम्ही हाकू व गाडीवानाने बरोबर चालावे. तडजोड मान्य करून त्याने गाडीस बैल जुंपले व आम्ही गाडी हाकू लागलो. पुढे मसूर गावच्या नाल्याजवळ गाडी उभी केली. त्यावेळेस आम्हास अत्यंत तहान लागली होती. आम्ही गाडीवानास कुठचे पाणी प्यायचे असे विचारताच त्याने अस्पृश्य लोकांसाठी असलेला शेणसड्याने भरलेला खड्डा दाखविला. येथील दुर्गंधी पाणी पिणे अशक्य होते. आम्हाला तहान फार लागली होती. परंतु या पाण्याच्या गैरसोयीमुळे मुकाट्याने पुढचा मार्ग धरावा लागला. रात्र पडत होती. पाण्याने व भुकेने जीव तळमळत होते. दुसऱ्या स्पृश्यांच्या नाल्यावर पाणी पिण्यास किंवा मागून घेण्यास आम्हास मज्जाव होता. मध्यरात्रीच्या सुमारास आम्ही टोलनाक्यावर आलो. तेथेही महार जातीमुळे पाणी मिळाले नाही. अखेर अशा घायाळ अवस्थेत आम्ही गोरेगाव मुक्कामी पोहोचलो. वडिलांनी आम्हास असे अगोदर कळविल्याशिवाय का आलात म्हणून विचारले. त्यावरून आमचे एका इसमाबरोबर पाठविलेले पत्र त्यांना अजून मिळाले नव्हते. त्यांना आमची ही वाटेतली शोचनीय अवस्था पाहून गहिवर आला. या प्रवासाने आपण अस्पृश्य आहोत. आपणांस कमी लेखतात, आपले पाणवठे गलिच्छ ठिकाणी असतात, स्पृश्य लोक आपला विटाळ मानतात वगैरे संबंधीचा पहिला अनुभव माझ्या आयुष्यात मला मिळाला. माझ्या बालमनाला ही गोष्ट फारच लागून राहिली. ती गोष्ट आज येथेच जमलेल्या हजारो लोकांपुढे सांगण्याची वेळ येईल, असे स्वप्नातही त्यावेळी वाटले नव्हते. असो.

आज येथे आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करण्यासाठी आपण सर्वजण जमलो आहोत. आपल्या पक्षाच्या कार्यक्रमाची आपणा सर्वांना जाणीव आहे. हिंदुस्थानावर लादलेल्या नवीन सुधारणात भरपूर दोष व व्यंगे असल्यामुळे त्या पूर्ण जबाबदारीचे स्वराज्य प्राप्त करून देण्यास असमर्थ आहेत. प्रांतिक राज्यकारभारातील कित्येक घटना, विशेषतः सेकंड चेंबरची घटना ही आपल्या पक्षास आक्षेपार्ह वाटते. तथापि या नवीन सुधारणा राबविण्यास हरकत नाही. मात्र जबाबदारीच्या स्वराज्याचे स्वरूप निष्प्रभ करून टाकण्याजोगे जे खास व अनियंत्रित स्वरूपाचे अधिकार गव्हर्नरास मिळालेले आहेत त्यांचा उपयोग या मुदतीत होऊ नये याबद्दल स्वतंत्र मजूर पक्ष जागृत राहील. तसेच अस्पृश्य बांधव, मजूर व शेतकरी यांचे नाते इष्ट कसे होईल याचा विचार करून सर्वसाधारण श्रमजीवी वर्गासाठी विधायक कार्य करण्याचा आपल्या पक्षाचा संकल्प आहे. तुम्हास ठाऊक असेलच की गिरणीतील मजूर वर्गात स्पृश्य मजूर व अस्पृश्य मजूर असा उघड भेदभाव आहे. स्पृश्य मजुरास कापड खात्यात काम मिळते व तो जॉबरचे जागेपर्यंत वर चढू शकतो. परंतु अस्पृश्य मजुरास तो कितीही लायक असला तरी त्याला कापड खात्यात काम मिळत नाही. तो तेलवालाच राहतो. सर्वसाधारणपणे मजुराची परिस्थिती हलाखीची व कष्टमय आहे. स्पृश्य मजुरांचे दारिद्र्य मालकशाहीमुळे तर अस्पृश्य मजुराचे दारिद्र्य, मालकशाही अधिक अस्पृश्यता या दोहोंमुळे आहे. परंतु दुःखाची गोष्ट ही की, काँग्रेसमधील व बाहेरील मजुराचे पुढारी या गोष्टीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. स्वतंत्र मजूर पक्षाचा सवतासुभा स्थापन करण्यास जी काही कारणे आहेत त्यापैकी हे एक होय. मजुरांना जातीभेदाने अगर वर्गभदामुळे त्यांच्या लायकीला धक्का मिळणार नाही व त्याचा उन्नतीचा मार्ग सुखकर होईल असा प्रयत्न आज काँग्रेस अगर इतर पक्षाचे मजूर पुढारी करू शकत नाहीत. कारण काँग्रेसचे पुढारी आज भांडवलवाल्यांच्या कचाटीत सापडल्यामुळे गरीब मजुरांचे व शेतकऱ्यांचे कल्याण त्यांच्याकडून होऊ शकत नाही. काँग्रेस भांडवलवाल्याचे हित करणार व गरिबांचेही हित करणार अशी घोषणा करते. अशा दुटप्पी परिस्थितीत एका म्यानात दोन सु-या राहू शकत नाहीत. अशा परिस्थितीत आपल्या श्रमजिवी वर्गाने काँग्रेसच्या विश्वासावर राहणे व्यर्थ आहे. काँग्रेसचे पंचप्राण महात्मा गांधी यांच्या मनाचा ठाव मला पूर्णपणे आहे.

त्यांचे हृद्गत जितके मला माहीत आहे तितके तुम्हास नाही. त्यांचा व माझा जो परिचय आहे त्यावरून पाहता महात्माजी तुमचे कल्याण करू शकत नाहीत. त्यांचे व आपले या बाबतीतले मार्ग अगदी भिन्न आहेत. ज्याला भाकरी पाहिजे त्याला देवळांचा काय उपयोग ? गेल्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये अस्पृश्य समाजाविषयी मोठा दुर्घट प्रश्न होता. नोकरशाहीची सत्ता काढून ती बहुजन समाजाचे हाती देताना त्यातील काही अंश अस्पृश्यांचे हाती द्या, असे सर्वांचे म्हणणे होते. परंतु हे महात्माजीच त्यावेळी अस्पृश्यांच्या हक्कांविरुद्ध गेले. मात्र मुसलमान, ख्रिस्ती वगैरे अल्पसंख्यांकांना या सत्तेतील काही अंश देण्यासाठी ते तयार होते. अशा बिकट प्रसंगी या हिंदुच्या महान पुढाऱ्याशी आपल्या स्वतंत्र हक्कासाठी झगडावे लागले. अस्पृश्यांचे कल्याणकर्ते म्हणविणारे हे हिंदुस्थानचे महात्मे या वेळी आपल्याविरुद्ध जावयास नको होते. ते आपले खरेखुरे कल्याणकर्ते असते तर त्यांच्याशी वादविवाद करण्यात मला माझी शक्ती खर्च करण्याचे कारण पडले नसते.

महात्माजीस स्वराज्यासाठी चटकन एक कोटी रुपये देणारे स्पृश्य लोक अस्पृश्यता निवारण्यास पाच, सहा लाखापर्यंत वर्गणी देण्यास समर्थ का होऊ शकत नाही ? यावरून स्पृश्य समाजाला अस्पृश्यता निवारणाच्या कार्याची किती तळमळ आहे, हे दिसून येते. ही जुलमाच्या रामरामाची गांधीजींची चळवळ आपला उत्कर्ष कसा काय करणार? आणि तुमचा विटाळ, तुमचेवरील जोर जुलुम, तुमची सामाजिक हाल अपेष्टा, मानहानी, दारिद्र्य हे लोक कशा रीतीने नष्ट करणार ? खरे पाहिले असता स्पृश्य हिंदू दिखाऊ कामे करण्यात पटाईत आहेत. आतून तुमच्या सामाजिक जीवनात काटे पसरविण्याचा ते नेहमी नेटाने प्रयत्न करतात. श्रीमंत, सावकार, खोत, भांडवलवाले हे तुमचे आर्थिक जीवन कष्टप्रद करीत आहेत. तर इकडे बहुजन समाजाची प्रातिनिधिक काँग्रेस दिमाखाने काँग्रेस हीच अस्पृश्यांची, गोरगरिबांची म्हणविणाऱ्या लोकांची रंजल्या गांजलेल्यांची असे तोऱ्याने म्हणत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता काँग्रेस ही संस्था जर आपली कल्याणकर्ती आहे, असे वाटले असते तर मी मोठ्या आनंदाने तीमध्ये सामील झालो असतो. पण मला काँग्रेसकडून आपल्या समाजाचे, मजूरांचे. शेतकऱ्यांचे व गोरगरिबांचे हित होत नाही, असे वाटल्यावरून मी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली आहे.

या देशातून एकवेळ इंग्रज लोक जाऊ शकतील परंतु सर्व गरीब जनतेला नागवून तिचे रक्त शोषण करणारा जळवांसारखा जो धनिक भांडवलवाला वर्ग आहे तो या देशातून जाणारा नाही. तो काँग्रेसमध्ये सामील झाला म्हणून त्याची रक्त शोषक वृत्ती नाहीशी होणार नाही. त्याची भरमसाट व्याज घेण्याची आसुरी वासना नष्ट होणार नाही. त्यांची गोरगरिबाच्या घरादारावर निखारे ठेवण्याची बुद्धी नाहीशी होणार नाही.

आपल्या मुंबई इलाख्यातील ब्राह्मणेतर पक्ष गरिबांसाठी काही कार्य करील, असे वाटत होते. इतकेच नव्हे तर त्याचा काही काळ अभिमान वाटत होता. परंतु शेवटी शिस्तीच्या व संघटनेच्या अभावी आणि वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याच्या वृत्तीमुळे या पक्षाचे सारे बळ लयास गेले आहे. उच्च म्हणविणाऱ्या ब्राह्मण समाजाचे चढेल धोरण नेस्तनाबूद करण्याचा त्यांचा हेतू कोठल्या कोठे लयास गेला आहे. एका प्रबळ अशा पक्षाची ही आजची शोचनीय अवस्था आपण लक्षात घेतली पाहिजे. आपल्या प्रत्येक माणसाने पक्षाशी पूर्ण इमानी राहिले पाहिजे. त्याने पुढाऱ्याची आज्ञा शिरसावंद्य मानली पाहिजे. पक्षाच्या कार्यक्रमावर नितांत विश्वास ठेवून प्रतारणा न करता अंमलात आणण्याचा जोमाने प्रयत्न केला पाहिजे. त्याने वैयक्तिक स्वार्थ सोडला पाहिजे. पक्षासाठी हाल, कष्ट सोसले पाहिजे व शिस्तीने सारे कार्य करणे हे ध्येय बाळगले पाहिजे, म्हणून स्वतंत्र मजूर पक्षात सामील होणारांनी या सर्व गोष्टीचा नीट विचार केला पाहिजे.

आज असेंब्लीमध्ये आपल्या पक्षाचे प्रतिनिधी थोडे असले तरी असेंब्ली मधील दुसऱ्या पक्षांना त्याची भीती वाटते. याचे कारण आपण लोककल्याणासाठी जो कार्यक्रम आखला आहे तो पूर्णपणे पार पाडण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करू याची त्यांना खात्री आहे. बहुजन समाजाला सुख मिळेल, त्यांच्यावर अन्याय होणार नाही असे कायदे सत्ताधारी पक्षाकडून करवून घेतले पाहिजेत. आपणास जे थोडे राजकीय हक्क मिळाले आहेत त्यात तूर्त समाधान मानून अधिकारासाठी झगडले पाहिजे. फौजदार, मामलेदार, सर्कल, इन्स्पेक्टर, तलाठी व पाटील यांचे हाती सत्ता नाही. महार ज्याप्रमाणे सरकारी नोकर त्याचप्रमाणे ते नोकर आहेत. खरी राजसत्ता लोकांचे हाती म्हणजे कौन्सिलच्या हाती आहे. म्हणून तुम्हास सरकारी नोकरांना भिण्याचे कारण नाही. त्यांनी व इतरांनी तुम्हास त्रास दिल्यास त्याची दाद लावण्यासाठी. तुमची गा-हाणी, दुःखे व जुलूम देशीवर टागून, स्वतंत्र मजूर पक्ष ती नाहीशी करण्याचा प्रयत्न करील, असे आश्वासन मी तुम्हास देतो. स्वतंत्र मजूर पक्षाच्या जिल्हानिहाय शाखा स्थापन होणार आहेत. माझे बालपण व प्राथमिक शिक्षण या जिल्हायाला झाल्यामुळे या जिल्हयाची शाखा स्थापन करताना मला अत्यंत आनंद होत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password