Categories

Most Viewed

04 नोव्हेंबर 1932 भाषण

आपल्यातील भेद मोडणेच इष्ट.

शुक्रवार तारीख 4 नोव्हेंबर 1932 रोजी रात्रौ 9 वाजता बालपाखाडी येथे गुजराती मेघवाळ व इतर सर्व अस्पृश्यांची जंगी जाहीर सभा भरविण्यात आली होती. त्या ठिकाणी “गांधी-आंबेडकर करार अजरामर होवो, डॉ. आंबेडकर हेच आम्हा अखिल अस्पृश्यांचे खरे पुढारी आहेत. डॉ. आंबेडकर यांना अस्पृश्यांचा उद्धार करण्यास परमेश्वर उदंड आयुष्य देवो.” अशा म्हणी व्यासपीठावर सर्व बाजूस लावण्यात आल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बरोबर नऊ वाजता डॉ. सोळंकी, शिवतरकर, गोविंद चव्हाण, सुभेदार सवादकर, फणसे, चित्रे बंधू व इतर पुढा-यांबरोबर येऊन सभास्थानी हजर झाले. ते आल्याबरोबर “डॉ. आंबेडकर झिंदाबाद” चा ध्वनी सर्वत्र घुमू लागला. डॉ. आंबेडकर यांचा जयजयकार एकसारखा पाच मिनिटे झाल्यावर श्रीयुत भाणजी राठोड यांनी, डॉ. सोळंकी साहेबांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी सूचना आणली. त्यास शिवराम चौहाण यांनी अनुमोदन दिल्यावर डॉ. सोळंकी साहेब प्रचंड टाळ्यांच्या गजरात अध्यक्षस्थानी विराजमान झाले. नंतर लक्ष्मण डी. सोळंकी डिप्रेस्ड क्लास वेलफेअर कमिटीचे प्रमुख यांनी मानपत्र वाचून दाखविले व रौप्य करंडकातून अध्यक्षांच्या हस्ते अर्पण केले. मानपत्रास उत्तर देताना डॉ. आंबेडकर साहेब म्हणाले,

बंधु भगिनींनो !
तुम्ही मला जे मानपत्र दिले त्याचे महत्त्व मी सर्व ठिकाणी मला मिळालेल्या मानपत्रापेक्षा जास्त आहे असे समजतो व त्याबद्दल मी तुमचा फार आभारी आहे. आपण या चाळीमध्ये राहणारे लोक म्युनिसीपालिटीत काम करणारे आहात. याठिकाणी पुष्कळ वेळा खादी भक्त काँग्रेसचे अभिमानी म्हणविणारांनी येवून तुम्हाला उपदेश केलेला आहे. काँग्रेस हीच तुमचा उद्धार करील. तिला मदत करा. पण तेच खादीभक्त म्युनिसीपालिटीच्या कार्पोरेशनमध्ये आहेत. त्याठिकाणी त्यांनी तुमच्याकरिता काय केले आहे याचा विचार करा. पाच रुपये भरणारास मताचा अधिकार असावा असे ज्या ज्या वेळी ठराव आले ते सर्व ठराव गरीबांचे कैवारी म्हणवून घेणारे पण श्रीमंतांच्या हिताकरिता प्राणापलिकडे जपणारे लोक म्हणजे हे खादीभक्त काँग्रेसवादी यांनी फेटाळून लावले आहेत. तुमच्या राहण्याच्या खोल्यांची स्थिती सुधारण्याची किंवा तुम्हास मिळत असलेला अपुरा पगार वाढविण्याची या लोकांनी केव्हाही खटपट केली नाही. तुम्ही जर आपले काम चार दिवस बंद पाडले तर या शहरात घाण साचून त्यामुळे रोगाचा फैलाव होईल, पण अशा परोपकारी कामाचा मोबदला काय ? तर आपलेच हे हिंदू लोक आपणाला गुलामगिरीत ठेवीत आहेत. आपणाला स्वतंत्र मतदार संघ मिळाला म्हणून माझे मित्र म. गांधी यांनी उपोषणाला आरंभ केला. त्याचाच परिणाम हा आहे की, हे लोक गांधींसाठी देवळे उघडी करावयास लागले आहेत. पण ही चळवळ अळवावरच्या पाण्यासारखी आहे. ती ओसरून जाईल म्हणून या लोकांवर तुम्ही भरवसा ठेवू नका. आपणाला सामाजिक दर्जा समानतेच्या पायावर मिळावायचा आहे. आपली आर्थिक गुलामगिरी नाहीशी केली पाहिजे याकरिता आपण आपल्या पायावर उभे राहून संघटना केली पाहिजे. आपले शील विकून पोट भरणारे लोक तुम्हाला निरनिराळ्या वेळी थापा देतील. त्यापासून सावध रहा व आपल्या मनाला पटेल तेच करा. शेवटी आपणाला हेच सांगावयाचे की हिंदू लोकांना जातीभेद मोडावयास ज्याप्रमाणे आपण सांगतो त्याप्रमाणे आपणही आपल्यातील भेद मोडण्याची पराकाष्ठा केली पाहिजे. असो. आपण मला मानपत्र देऊन माझा जो गौरव केलात त्याबद्दल मी पुन्हा आपले आभार मानून आपली रजा घेतो.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password