Categories

Most Viewed

04 नोव्हेंबर 1932 भाषण 1

ऐक्याने वागल्यास भावी राजकारण आपली गुलामगिरी नाहिशी करील.

शुक्रवार, तारीख 4 नोव्हेंबर 1932 रोजी रात्रौ श्री. गजोबा दुधवले यांनी मराठी भाषा बोलणाऱ्या अस्पृश्य लोकांची सभा बालपाखाडी येथे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तिसऱ्या राऊन्ड टेबल कॉन्फरन्सला जातात म्हणून प्रेमाचा निरोप देण्याकरिता भरविली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे गुजराती बंधुच्या सभेला गेले होते म्हणूनच ते येईपर्यंत रामचंद्र अडांगळे यांचा राऊन्ड टेबल कॉन्फरन्सवरील जलसा लोकांच्या मनोरंजनार्थ चालू होता. गुजराती बंधूच्या सभेहून बरोबर 11 वाजता डॉ. आंबेडकर साहेब, सोळंकी, शिवतरकर, चित्रे, फणसे, झकेरिया, मणियार, उपशाम, रेवजी डोळस, मडके बुवा, गायकवाड वगैरे अस्पृश्य पुढाऱ्यांसह आले. आल्यावर थोडा वेळ जलशातील गाणी ऐकल्यावर ते खुश झाले. नंतर नियोजित अध्यक्ष डॉ. सोळंकी साहेब म्हणाले. बंधुभगिनींनो, आपण डॉ. आंबेडकर साहेबांच्या तोंडचे शब्द ऐकण्यास उत्सुक झाला आहात हे आपल्या चर्येवरून समजते म्हणून मी भाषण न करता डॉ. आंबेडकर साहेबांस आपणास जाते वेळचा संदेश सांगण्यास विनंती करतो. नंतर डॉ. आंबेडकर साहेब हे प्रचंड टाळ्यांच्या गजरात भाषण करण्यास उठले. ते म्हणाले,

बंधु भगिनींनो,
आपणाला जे राजकीय हक्क आता मिळालेले आहेत ते कशाच्या जोरावर मिळाले तर आपल्या संघशक्तीच्या जोरावर मिळाले आहेत. राऊन्ड टेबल कॉन्फरन्समध्ये जेव्हा माझा व म. गांधी यांचा तीव्र मतभेद झाला तेव्हा म. गांधींची समजूत त्यांच्याभोवती लांगूलचालन करणाऱ्या लोकांनी अशी करून दिली होती की, डॉ. आंबेडकर म्हणजे महार जातीतील एक पोर आहे. त्यांच्या पाठीशी त्यांच्या ऑफिसातील चार-दोन माणसांशिवाय कोणी नाही. पण म. गांधी राऊन्ड टेबल कॉन्फरन्सहून मुंबईला आले त्यावेळी बेलार्ड पियर बंदरावर अस्पृश्य वर्गातील वीस हजार बंधुभगिनींनी त्यांचे काळे बावटे दाखवून स्वागत केले तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि म्हणू लागले की, विलायतेमध्ये व येथे माझी माझ्याच अनुयायांनी दिशाभूल करून मला फसविले. डॉ. आंबेडकर यांच्या पाठीशी अस्पृश्यांचा प्रचंड लोकसमुदाय आहे अशी माझी खात्री करून दिली असती तर मी त्यांच्या मागण्यांना विरोध केला नसता. माझ्या मित्रांनी व अनुयायांनी अस्पृश्यातील गारगोट्या व नदीतील दगड यांना शेंदूर फासून त्यांना जाणून बुजून पुढारी केले व माझी फसवणूक केली. अस्पृश्यांच्या खऱ्या पुढा-यांची मला ओळखसुद्धा होऊ दिली नाही. असो. म्हणून मी जाताना आपणाला प्रेमाचे दोन शब्द सांगतो ते लक्षात ठेवा. ते हे की, तुम्ही आपली एकी कायम ठेवा, दुभंग होऊ देवू नका. जातीभेद, वर्गभेद, जिल्हाभेद हे वाढवू नका. माझ्या पश्चात डॉ. सोळंकी साहेब व माझ्या ऑफिसात माझ्याबरोबर काम करणारी माझी सहकारी मंडळी यांच्या सहाय्याने वागा. इतरांच्या भुलथापा ऐकून सैरावैरा धावत सुटू नका. माझ्याबरोबर काम करणाऱ्या मंडळीच्या विरूद्ध लोकमत कलुषित करण्याचा प्रयत्न काही बुद्रुकांनी चालू ठेवला आहे हे मला माहीत आहे. तरीपण तुम्ही आपली मने विकारवश होऊ देऊ नका व मी येईपर्यंत ऐक्याने वागा. ऐक्याने वागल्यास आपले भावी राजकारण आपली गुलामगिरी नाहीशी करण्यास इष्ट फलदायी होईल. तसेच मी काढलेल्या विनंती पत्राप्रमाणे आपण सर्वांनी बोर्डींग फंडास शक्य ती मदत करावी. यानंतर हारतुरे झाल्यावर डॉ. आंबेडकरांच्या जयजयकारात सभा आटोपली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password