तर खेड्यापाड्यातील अन्यायग्रस्त लोकांना मदत करता येईल.
दिनांक 01 नोव्हेंबर 1940 रोजी इमारत व तिच्याकरिता जमवायचा फंड या विषयीची योजना यासंबंधी जंगी सभा चित्रा सिनेमाच्या पाठीमागे घेतलेल्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आली होती. सभेत श्री. डी. व्ही. प्रधान, भा. र. कद्रेकर आणि के. व्ही. चित्रे वगैरे प्रमुख मंडळी हजर होती. डॉ. साहेबांचे स्वागत जमलेल्या समुदायाने टाळ्यांच्या कडकडाटात केले.
सभेस सुरवात श्री. बी. एस. गायकवाड यांनी केली. त्यांनी अध्यक्षांची सूचना आणताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्येष्ठ भावजय श्रीमती लक्ष्मीबाई ह्या बुधवार, तारीख 23.10.1940 रोजी पहाटे 2.30 वाजता स्वर्गवासी झाल्याचे वर्तमान उपस्थित असलेल्या लोकांना सांगितले आणि अशा तऱ्हेचे वैयक्तिक संकट आले असतानाही डॉ. बाबासाहेबांनी स्वतःचे व आपले दुःख बाजूला ठेवून सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याचे कबूल केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच चिटणीस विनंतीस मान देऊन मोठ्या जमावाने उपस्थित झाल्याबद्दल चिटणीसाचे वतीने जनतेचेही आभार मानले. नंतर डॉ. बाबासाहेबांना अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. श्री. एस. एल. वडवलकर यांनी अनुमोदन दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात बोलावयास उभे राहिले. ते म्हणाले,
आजची सभा घेण्याची वास्तविक जरूरी नव्हती. कारण इमारत व तिच्यासाठी फंड उभा करणे या विषयीची घोषणा मी दोन वर्षापूर्वी केलेली होती. तेव्हापासून एखादी सोईची जागा आम्ही मिळविण्याच्या प्रयत्नात होतो. मुंबई शहरात बहुधा दोन प्रकारच्या जागा आहेत. एक मुंबई म्युनिसीपालिटीच्या जागा व दोन इम्प्रुव्हमेंट ट्रस्टच्या जागा. इम्प्रुव्हमेंट ट्रस्टची जागा विकत घेणाराने त्या जागेच्या फक्त एक तृतीयांश जागेवर इमारत बांधावयाची व बाकीची दोन तृतीयांश जागा तिच्या भोवती रिकामी सोडावयाची असा नियम आहे. तसेच म्युनिसीपालिटीची जागा विकत घेणारास दहा फूट जागा चोहोकडे मोकळी सोडावी लागते. या जबरदस्त अटी आम्हास मान्य होण्यासारख्या नव्हत्या. म्हणून आम्ही दुसरी एखादी सोईची जागा शोधू लागलो. शेवटी ज्या जागेवर आपण आता बसला आहात ती जागा आम्ही पसंत केली. ही विस्तीर्ण जागा तोडून द्यावयास जागेचा मालक तयार नव्हता. पण काही मित्रांच्या मदतीने ही जागा आम्ही तोडून घेतली.
वीस वर्षेपर्यंत आपला सामाजिक कारभार चालला असताना सभा, समारंभ वगैरे निरनिराळ्या कार्याकरिता जागेसाठी आपणास इतरांकडे जाणे भाग होते. ही उणीव या जागेवरील इमारतीने खास भरून निघेल. ही जागा आपणा सर्वास फारच सोईची आहे. आहे. ह्या जागेचे क्षेत्रफळ 1100 चौरस वार आहे. बाजूला ट्रॅम आहे. जी. आय. पी. बी. बी. ॲन्ड सी. आय ची स्टेशने जवळ आहेत. किंमतीच्या दृष्टीने पाहता ही जागा आपणास सवलतीने मिळाली, असे म्हणावयास काहीच हरकत नाही. काही ठिकाणी जागेची किंमत 22 रुपये वार तर दुसरीकडे तिची किंमत 25, 27 आणि 30 रुपये वार अशी आहे. ही जागा आपणास 15 रुपये वार पडली आहे. (टाळ्या).
आनंदाची गोष्ट ही की, जागेच्या मालकाची आजच्या आज जागेची सर्व रक्कम द्या व मग तिचा ताबा घ्या, अशी अट नाही. तसे झाले असले तर इतकी मोठी 15-16 हजार रुपयांची रक्कम देणे आपणास कठीण झाले असते. आपणास बारा वर्षात ही रक्कम हप्त्याहप्त्याने द्यावयाची आहे.
ही जागा आम्ही 999 वर्षांच्या कराराने घेतली आहे. व्यावहारिक दृष्टीने हा करार म्हणजे यावच्चंद्रदिवाकरौ मालकी असावयाचा करार आहे. असे म्हणण्यास हरकत नाही.
या जागेवर तीन मजली इमारत बांधण्याचा आमचा इरादा आहे. पहिल्या मजल्यावर अर्ध्या भागात भारत भूषण छापखाना व अर्ध्या भागात म्युनिसीपल युनियनची व इतर ऑफिसे व काही राहण्याच्या खोल्या ठेवण्याची व्यवस्था करावयाची आहे. दुसरा मजला भाडोत्री लोकांकरिता तयार करावयाचा आहे. त्यात सुमारे सोळा खोल्या तयार होतील, असा अंदाज आहे व त्याचे जवळ जवळ वर्षाचे 3,500 रुपये भाडे येण्याचा संभव आहे.
तिसऱ्या मजल्यावर 50 फूट रुंद व 100 फूट लांब असा हॉल बांधावयाचा आहे. हॉलचे भाडे नियमित यायचे नाही. तरीपण वर्षाचे 400-500 रुपये भाडे येईल, असा अंदाज आहे.
या प्रमाणे वार्षिक 4,000 रुपये उत्पन्न होईल, असे वाटते. त्यातून म्युनिसीपल पट्टी, व्याज वगैरे वजा जाता 2,500 रुपये शिल्लक राहातील, असा अंदाज आहे. यावरून या जागेवर इमला उठविला तर आपले नुकसान न होता फायदा आहे, असे दिसून येईल.
प्रिय बंधूंनो. अशा तऱ्हेने दरसाल 2,500 रुपये पुंजी झाली तर खेड्यापाड्यातील लोकांवर इतर स्पृश्य लोकांकडून जो अन्याय करण्यात येतो. त्यास मदत करता येईल. अशा रीतीने खेड्यापाड्यातील लोकांचे संरक्षण होऊन प्रसंग आला असता इकडे तिकडे झोळी पसरण्याचा प्रसंग टळेल.
हे तीन मजले बांधावयाचे झाले तर जागेची किंमत व इमारतीचा खर्च याकरिता एक लक्ष रुपये लागतील. लढाईमुळे सिमेंट, लोखंडी वस्तू महाग झाल्या आहेत. दुसरी गोष्ट या फंडाकरिता इतर जातीतून मदत मिळणे कठीण आहे. धार्मिक लोक आपआपल्या जातीलाच दानधर्म करतात. आपल्या लोकात श्रीमंत लोक नाहीत, आपण कॉंग्रेसमध्ये नाही.
हा फंड आपल्या लोकांमधूनच आपण उत्पन्न केला पाहिजे. धनिकांप्रमाणे आपल्या लोकांकडून एकदम 200, 500 किंवा 1,000 रुपये देणगी मिळणे कठीण आहे. आपल्यातील प्रत्येक माणसाने दोन दोन रुपये देणगी देऊनच ही रक्कम जमली पाहिजे. ठिकठिकाणी इमारत फंड कमिट्या तयार करा आणि आपले काम करा. पैसे घेण्यासाठी मीच आपणाकडे यावे, अशी आपली इच्छा असेल तर मी येईन. पण तुम्हास माहीत आहे की आपल्या समाजाची जबाबदारी सर्वपरीने माझ्या शिरावर आहे. तेव्हा प्रत्येक ठिकाणी मला बोलविण्याचा हट्ट धरू नका. असे असूनही आपले सुद्धा खरोखरच इतके वेडे असेल तर मी येईन. पण इमारत फंडाच्या कामाच्या बाबतीत कोणीही कुचराई करता कामा नये, इतके बोलून मी माझे भाषण संपवितो.
सदर भाषण जनता वृत्तपत्रात दिनांक 16 नोव्हेंबर 1940 रोजी प्रसिद्ध झाले.
संदर्भ : डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 2, पान क्रमांक 347 ते 349
Sandesh Shriram Borkar
November 1, 2021 at 10:36 amजय भीम
Suresh Hire
November 3, 2021 at 3:21 pmजयभीम.