Categories

Most Viewed

26 ऑक्टोंबर 1939 भाषण

स्वातंत्र्याचा अर्थ उच्चवर्णीयांना स्वातंत्र्य व आमच्यावर अधिराज्य असा कधीच होऊ शकत नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महायुद्धाशी संबंधीत ठरावावरील चर्चेत सहभागी होताना तारीख 26 ऑक्टोबर 1939 रोजी विधीमंडळात भाषण झाले.

स्वतंत्र मजूर पक्षाचे पुढारी डॉ. भीमराव आंबेडकर टाळ्यांच्या गजरात भाषण करावयाला उभे राहिले. प्रथम त्यांनी अध्यक्षांना जास्त वेळ देण्याची विनंती केली व ययातीला त्याचा मुलगा कुरुरव याने आपले आयुष्य दिले त्याप्रमाणे आपल्या पक्षातील सभासदांनी जास्त वेळ मिळावा म्हणून त्यांना एकट्याला भाषण करण्याची परवानगी दिल्याचे सांगितले. महाभारतातील दृष्टांताने डॉ. बाबासाहेब यांनी भाषणाला सुरुवात केली व सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले.

ते म्हणाले,
हा ठराव अप्रस्तुत आहे असे मला वाटते. ज्या राष्ट्रीय मागण्यांचा या ठरावात उल्लेख केला आहे. त्या मागण्या या असेंब्लीत ना. मुख्य प्रधानांनी मांडल्या नव्हत्या. त्या मागण्या त्यांच्या हायकमांडने सादर केल्या. हायकमांडला कायद्यामध्ये अस्तित्व नाही. काँग्रेस मंत्रिमंडळाच्या बऱ्या वाईट कृत्यावर देखरेख ठेवणारी ती समिती (व्हिजिलन्स कमिटी) आहे. आता त्या मागण्या सरकारने नाकारल्या म्हणून ना. खेर, सर्व डाव फिसकटला, धावा हो धावा. आम्हाला मदत करा, अशा रीतीने हा ठराव मांडीत आहेत. हा या असेंब्लीचा मोठा अपमान आहे.

ना. व्हाईसरॉय यांचे पत्रक तारीख 18 रोजी प्रसिद्ध झाले. त्याला आज सात दिवस झाले. त्या पत्रकाविषयी मत व्यक्त करण्याकरिता हा ठराव नाही. तो क्षुल्लक व उथळ आहे. मला यावर बरेच बोलता येईल. प्रतिस्पर्ध्यावर टीका करण्याची प्रत्येकाला संधी मिळते. पण ना. खेर यांनी मतभेद विसरून जा अशी विनंती केली आहे. म्हणून या ठरावाशी कोणत्या बाबीपुरते माझे सहमत आहे ते मी प्रथमतः सांगतो. हिंदी लोकांच्या इच्छेविरुद्ध त्यांना या युद्धात पडावे लागले यात शंका नाही. आमचे परराष्ट्रीय धोरण ब्रिटिश साम्राज्याच्या गाड्याला जोडले आहे. वसाहती इतकाही आम्हाला दर्जा नाही.

संरक्षणाकरिता हिंदुस्थान समर्थ नाही. संरक्षण खातेही हिंदी कायदेमंडळाला जबाबदार करावे अशी गोलमेज परिषदेचेवेळी आम्ही मागणी केली होती, यादृष्टीने ब्रिटिश सरकारने काहीच केले नाही. इतक्यापुरते आमचे काँग्रेसशी एकमत आहे.

दक्षिण अमेरिकेतील राष्ट्रांना योग्य अशी घटना जेरेमी बेंथम याने तयार करून दिली पण ती अयशस्वी झाली. कपडा शरीराला उत्तम बसला पाहिजे. त्याप्रमाणे घटना योग्य असणे हे मुख्य तत्त्व आहे. गृहमंत्री मुन्शी यांच्या किरकोळ शरीराकरिता तयार केलेले कपडे माझ्यासारख्या जाडजुड शरीराला उपयोगी नाहीत. (हंशा) वाकड्या पायाचा बूट सरळ पायाला बसणार नाही. या गोष्टी लक्षात घेऊन लोकशाहीचा विचार केला पाहिजे. लोकशाही म्हणजे बहुमताचे राज्य होय. आज मुसलमान, अस्पृश्य हे अल्पसंख्य आहेत व ते तसेच राहाणार. बहुसंख्य हिंदूंकडून सहनशीलता, समानता व बंधुत्वाची वागणूक मिळेल काय ?

ना. खेर यांनी होकारार्थी मान हालविली या गोष्टीचा उल्लेख करून डॉ. आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाचे कसे हाल होतात याची उदाहरणे दिली. 1929 मध्ये अस्पृश्यांच्या परिस्थितीची चौकशी करण्याकरिता नेमलेल्या कमिटीचा रिपोर्ट 10 वर्षापूर्वीची परिस्थिती कशी होती ते उत्तम प्रकारे दाखविते असे ते म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले की, या परिस्थितीत काही बदल झाला आहे काय ? कायदेभंगाच्या वेळी काँग्रेसने कौन्सिलवर बहिष्कार घातला. “कौन्सिल में जाना हराम है” हे त्यांचे त्यावेळी ब्रीदवाक्य होते. त्याचप्रमाणे कौन्सिल में कौन जायगा ? घेड जायगा, चमार जायगा असेही ते म्हणत असत. (यावेळी काँग्रेस पक्षीय सभासदांनी नाही, नाही अशी ओरड केली.) याबद्दल मी पुरावा देईन. त्यावेळी अखेर टाइम्सला अग्रलेख लिहावा लागला होता. जात विसरलो, धर्म विसरलो अशी फुशारकी मारणा-या या काँग्रेसवाल्यांची ही मनोवृत्ती, मग मनाचा कायदा पूज्य मानणा-या सनातनींचे मत काय असेल. याची कल्पनाच केलेली बरी.

यानंतर डॉ. आंबेडकर यांनी अस्पृश्य वर्गावर होत असलेले अत्याचार, अन्याय, हाल व जुलूम यांची 5-6 उदाहरणे विस्ताराने निवेदन केली. प्रांतिक राज्यकारभारात बहुसंख्य हिंदुचे कसे वर्चस्व आहे हे रेव्हेन्यू खात्यातील त्यांनी आकडेवार माहिती देऊन सांगितले.

ही सर्व उदाहरणे निवेदन केल्यावर ते पुढे म्हणाले. ना. मुन्शी यांच्या उपसूचनेत संरक्षणाचे तत्त्व मान्य करण्यात आले आहे. पण ते संरक्षण अस्पृश्यांच्या अधिकृत प्रतिनिधींना समाधानकारक असे पाहिजे. गृहमंत्री आपण अल्पसंख्यांकांचे ट्रस्टी आहोत असे समजतात. आमचे ट्रस्टी व संरक्षक दुसरे कोणी नाही म्हणून त्यांची उपसूचना मला मान्य करता येत नाही. दुसऱ्या उपसूचनेत ना. मुन्शींनी आमचे अर्धे म्हणणे मान्य केले आहे.. सध्याची राज्यव्यवस्था आर्याच्या चातुर्वर्ण्यासारखी आहे. क्षत्रियांनी राज्य करावे, ब्राह्मणांनी ज्ञानदान करावे, वैश्यांनी व्यापार करावा व शुद्र आणि अतिशुद्रांनी सेवा करावी अशी ती तत्त्वे होती. वैश्यांनी आता राजकारणाचाही व्यापार सुरु केला आहे. (हंशा) पण शुद्रांच्या दर्जात फरक झालेला नाही. या अन्यायाविरुद्ध माझे रक्त उसळते. सामाजिक, आर्थिक व धार्मिक वर्चस्वाच्या जोडीला राजकीय वर्चस्व घालण्याला मी माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबाने विरोध करीन, (टाळ्या) स्वातंत्र्याचा अर्थ उच्चवर्णीयांना स्वातंत्र्य व आमच्यावर अधिराज्य असा कधीच होऊ शकत नाही.

आयर्लंडमध्ये अल्स्टर प्रांतीय लोकांनी संरक्षण नको पण स्वातंत्र्य पाहिजे असा आग्रह धरल्याचा दाखला देऊन डॉ. आंबेडकर म्हणाले, मी ते मागत नाही. आम्हाला योग्य ती संरक्षणे द्या इतकीच आमची मागणी आहे. वैयक्तिक स्वार्थापेक्षा देश मोठा आहे. स्वार्थाची मी कास धरली असती तर निराळ्या ठिकाणी मी आज असतो. मला दोन गोष्टी पूज्य आहेत. एक देश व ज्या जातीत जन्मलो व वाढलो ती अस्पृश्य जात ह्या त्या होत. माझ्या जमातीकरिता मी इतर सर्वांचा त्याग करावयाला तयार आहे.

नंतर मुस्लिम लीग लोकशाहीच्या तत्त्वाविरुद्ध असली तरी स्वायत्ततेच्या विरुद्ध नाही असे त्यांनी स्पष्टीकरण केले. लोकशाही, राजसत्ता हे सर्व घटनेचे प्रकार आहेत. स्वायत्तता हे मुख्य तत्त्व आहे असे ते म्हणाले.

शेवटी त्यांनी सांगितले की, ना. मुख्य प्रधान उत्तम मुत्सद्दी आहेत. पण मंत्रिमंडळाने राजीनामा देण्याला ते कायदेमंडळाची संमती का मागतात तेच मला कळत नाही. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. राजीनामा देण्याला जर त्यांना माझी परवानगी पाहिजे, तर मी बोलाविल्याशिवाय यावयाचे नाही अशी अट ते कबूल करावयाला तयार आहेत काय ?

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password