भांडवलदारांच्या कृपेवर श्रमजीवी वर्गाचे कल्याण अशक्य. पूर्वी जाहीर झाल्याप्रमाणे गेल्या रविवारी दिनांक 16 ऑक्टोबर 1938 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मुंबईतील प्रमुख कामगार संस्थांच्या विद्यमाने विशेषतः स्वतंत्र मजूर पक्ष व ट्रेड युनियन काँग्रेसतर्फे कामगारांची एक संयुक्त परिषद परळच्या कामगार मैदानावर भरली होती. या परिषदेचे अध्यक्षस्थान बॅ. जमनादास मेहता यांनी स्वीकारले होते. मुंबई प्रांतिक असेंब्लीमध्ये काँग्रेस मंत्रिमंडळाने कामगारांच्या हितरक्षणाच्या नावाखाली जे ट्रेड डिस्प्यूट बिल मांडले आहे त्याचा निषेध करण्यासाठी ही 50 हजार कामगारांची प्रचंड परिषद भरली होती. तसेच या परिषदेमध्ये तारीख 7 नोव्हेंबर 1938 रोजी मुंबई इलाख्यात एक दिवसाचा सार्वत्रिक संप पुकारून कामगारांचा या सरकारी बिलाला किती तीव्र विरोध आहे हे जाहीररित्या सरकारच्या निदर्शनास आणण्याचा निश्चय कामगारांनी या परिषदेमध्ये जाहीर केला. गेल्या रविवारी या परिषदेच्या प्रचार कार्यासाठी काही कामगार व त्यांचे पुढारी कामगारांच्या वस्तीतून मोटार लॉरीतून फिरत होते. घोडपदेवच्या बाजूने ही मोटार लॉरी जात असताना आजूबाजूच्या माऱ्याच्या जागेचा आश्रय धरून काही गुंडांनी कामगारांच्या लॉरीवर दगडफेक केली. या अवचित व बेसावधपणे आलेल्या दगडधोंड्यांच्या मा-यात 10-12 कामगारांना जबर दुखापती झाल्या. त्यांचे रक्ताने माखलेले कपडे बॅ. मेहता यांनी सभेत सर्वांना दाखविले. त्यावेळी कामगारांनी काँग्रेसच्या या गुंडगिरीचा जाहीररित्या निषेध केला. काँग्रेसच्या या हिंसावादी वर्तनाचा कडक भाषेत बॅ. जमनादास मेहता यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात समाचार घेतला. यानंतर कॉ. मिरजकर यांनी ठरावाचा मसूदा वाचून दाखविल्यावर, आमदार खेडगीकर, अँड. जोशी, शामराव परूळेकर, बी. टी. रणदिवे, जोगळेकर, सौ. उषाबाई डांगे, ओक, पाटकर, कॉ. निमकर, जे. बुखारी, स्वतंत्र मजूर पक्षाचे सेक्रेटरी भाई डी. व्ही. प्रधान, आमदार भोळे, मध्यप्रांताचे कामगार पुढारी श्री. दशरथ पाटील, भाई जयवंत वगैरे पुढारी मंडळींची भाषणे झाल्यावर टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण सुरू झाले. त्यांनी प्रथम जमलेल्या असंख्य कामगारांच्या एकजुटी बद्दल आनंद प्रदर्शित केला आणि ते पुढे म्हणाले. आज येथे येऊन कामगार पुढा-यांपुढे व माझ्या कामगार बंधुभगिनीपुढे बोलण्याचा जो हा योगायोग आला आहे तो माझ्या दृष्टीने अपूर्व असा आहे. ज्या बिलाचा जाहीर निषेध करण्याकरिता आपण सर्वजण जमला आहात त्या बिलासाठी मी असेंब्लीमध्ये एकदा माझे मत जाहीर करून या अन्यायमूलक कायद्यासंबंधीच्या काँग्रेस सरकार धोरणाचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यानंतर या बिलाबाबत मला अधिक वेळ खर्च करून असेंब्लीमध्ये कार्य करता आले नाही. मला खरोखरच खेद वाटतो. परंतु ती सारी लढाऊ स्वरूपाची कामगिरी माझे मित्र बॅ. जमनादास मेहता यांनी योग्य रितीने बजावल्यामुळे या परिषदेमध्ये मी त्यांचे जाहीर अभिनंदन करतो. हे बिल कामगारांच्या स्वातंत्र्यावर व एकदर हितसंबंधावर कसे गदा आणणारे आहे. हे चालू असेंब्लीमध्ये या बिलाच्या चर्चेच्यावेळी कामगार प्रतिनिधींनी काँग्रेसच्या नजरेस आणण्याचा कसून प्रयत्न केलेला आहे. आजच्या परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या बिलाविषयी असंतोष व्यक्त करण्याकरिता जो एक दिवसाचा सार्वत्रिक संप पुकारण्याचा संकल्प केला आहे, त्याला माझी पूर्णपणे अनुमती आहे. अशा रितीनेच कामगारांनी स्वतःच्या संघशक्तीच्या बळावर या घातुक बिलाला हाणून पाडण्याचा प्रयत्न करणे केव्हाही हिताचेच ठरेल. या देशात सन 1850 पासून गिरण्या, कारखाने वगैरे प्रकारच्या धंद्यास सुरुवात झाली. त्यावेळेपासून हजारो संप झाले. त्यावेळी त्यांच्या या न्याय्य शस्त्राविषयी कुणीही आडकाठी उत्पन्न केली नाही. गुलामगिरीवर प्रकाश पाडणारे संपासारखे हत्यार अधिकाराच्या बळावर नोकरशाहीने सुद्धा काढून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आज कामगारांची पाठीराखी म्हणविणारी, गुलामगिरीचा धिक्कार करून स्वतःची वल्गना करणारी काँग्रेस तिच्या मुंबई असेंब्लीच्या मंत्रिमंडळाकडून या उज्ज्वल तत्त्वास काळीमा फासून ट्रेड डिस्प्यूट बिलासारखा काळा कायदा कामगारांच्या मानेवर ठेवीत आहे. कोणत्याही सरकारने जनतेला न आवडणारे कायदे केले तर त्यांचा प्रतिकार करण्यासाठी असहकारितेसारखा लढा लढविणे आवश्यक आहे, अशी काँग्रेसचे पंचप्राण गांधीजी यांनी जी शिकवण या देशातील बांधवांना दिली आहे. तिचा 'गुरूची विद्या गुरूस फळली' या न्यायाने कामगारांना उपयोग करणे भाग पडले आहे. मी आतापर्यंत या प्रश्नाचा शांतपणे विचार केला आहे. त्यावरून नुसत्या सार्वत्रिक संपाने, निषेधकारक प्रचंड सभांनी किंवा मिरवणुकींनी श्रमजीवी वर्गाच्या सर्वांगीण उन्नतीच्या हितसंबंधाचा प्रश्न सोडविला जाईल, असे वाटत नाही. त्याहीपेक्षा काही अधिक कार्य केल्याशिवाय भागणार नाही, ते कार्य करण्यासाठी कामगारांनी दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या छायेखाली आपली चळवळ चालविण्यापेक्षा अगदी स्वतंत्र पक्षाची स्थापना करणेच खरे हितावह आहे. माझे अनेक मित्र मला काँग्रेसमध्ये सामील होण्याचा कळकळीचा उपदेश करीत आहेत. परंतु आपला लढा स्वतःच्या पायावर उभारूनच लढविला पाहिजे. दुसऱ्याकडे भिक्षा मागून कुणाचा केव्हाही कार्यभाग होणार नाही. स्वतःची हिम्मत हीच खरी मार्गदर्शक असते आणि म्हणून भांडवलदारांच्या कृपेवर जगणाऱ्या काँग्रेसच्या हातून श्रमजिवी वर्गाचे कधीही कल्याण होणार नाही. यासाठी कामगारांनी सारी राजकीय सत्ता काबीज करण्यासाठी स्वतंत्र पक्षाच्या निशाणाखाली लढाऊ वृत्तीने लढणेच जरूरीचे आहे.
