Categories

Most Viewed

16 ऑक्टोंबर 1929 भाषण

कामगारांना जात नाही म्हणून ओरडणाऱ्या स्पृश्य पुढाऱ्यांनी याचा जबाब द्यावा. 

बुधवार तारीख 16 ऑक्टोबर 1929 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता परळ येथे मुंबईतील बहिष्कृत वर्गाची एक जंगी जाहीर सभा पुणे येथील पर्वतीच्या सत्याग्रहास पाठिंबा देण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. संबंध हॉल लोकांनी भरून गेला होता. व्यासपीठावर श्री. भुस्कुटे, देवराव नाईक, ठाकरे, प्रधान, खांडके, कवळी, कद्रेकर, आचार्य डॉ. सुरतकर वगैरे स्पृश्य मंडळी, शिवाय श्री. शिवतरकर, माळी, आडरेकर, वगैरे अस्पृश्य मंडळीही दिसत होती. श्री. शिवतरकर ह्यांनी डॉ. आंबेडकरांनी अध्यक्षस्थान स्वीकारण्याविषयी सूचना मांडली व त्यास खांडके ह्यांनी अनुमोदन दिल्यावर डॉ. आंबेडकर टाळ्यांच्या गजरात अध्यक्षस्थानी बसले.

भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी पुणे येथील सत्याग्रहाचा त्रोटक इतिहास सांगून पुणे येथील बहिष्कृतांच्या सत्याग्रहास सर्व ठिकाणच्या बहिष्कृतांनी सर्वतोपरी मदत करणे हे त्यांचे पवित्र कर्तव्य आहे असे सांगितले. जरूर पडल्यास आपण पुण्यास सत्याग्रहास जाण्याची तयारी करण्यास तयार आहात काय म्हणून जमलेल्या समुदायास सवाल टाकताच चोहोकडून होय म्हणून उत्तर मिळाले.

स्पृश्य लोकांच्या वागणुकीचा व त्यांच्या बहिष्कृता बद्दलच्या दृष्टिकोनाचा निषेध करून, आणखी काही काळ थांबा व मतपरिवर्तनाची वाट पहा म्हणणाऱ्या लोकांची हाव किती नीच वृत्तीची असते. काँग्रेसने देखिल विवक्षित मर्यादेत म्हणजे 31 डिसेंबरच्या आत जर डोमिनियन स्टेटस दिले नाही, तर आपला ब्रिटिश राज्यसत्तेचा संबंध अजिबात तोडून टाकू, असे जाहीर केले असताना उगाच बहिष्कृत वर्गास थापा सांगण्यात काही अर्थ आहे की काय, असा उघडपणे सवाल आहे. हजारो वर्षे थांबून देखील काही न देणाऱ्या स्पृश्यांच्या मनाचाच नीचपणा जास्त उघड होत असून थांबा म्हणणे हा त्यांचा लपंडाव असून बेगडी मुलामा आहे. तरी पण असल्या मुलभुलावणीला आता अस्पृश्य वर्ग बळी पडण्याइतका नादान राहिला नसून तो स्वाभिमानी व जागृत बनलेला आहे व त्याचेच प्रत्यंतर म्हणजे पुण्याचा सत्याग्रह होय. मुंबई येथे लवकरच मंदीर प्रवेशाच्या सत्याग्रहाची मोहीम सुरू करण्यात येणार असून ती यशस्वी करून दाखविण्यास मुंबईतील बहिष्कृतांनी आपल्या कंबरा कसल्या पाहिजेत. प्रास्ताविक भाषणानंतर त्यांनी श्री. वनमाळी ह्यास खालील ठराव मांडण्यास विनंती केली :

समाज समता संघ व भारतीय बहिष्कृत समाज सेवा संघ ह्यांच्या विद्यमाने भरलेली ही जाहीर सभा येथील बहिष्कृत हिंदूंनी त्यांच्या न्याय्य व मानवी हक्कांकरता सुरू केलेल्या सत्याग्रहास आपला पूर्ण पाठिंबा देत असून ज्या ज्या स्पृश्य लोकांनी त्यांना मदत केली त्यांचे अंतःकरणपूर्वक आभार मानते व आपल्या दृढनिश्चयापासून न डगमगता आपला सत्याग्रहाचा लढा चालू ठेवण्याची बहिष्कृत वर्गास विनंती करते

वरील ठराव मांडताना श्री. वनमाळी ह्यांनी बहिष्कृतांना मंदिरात जाण्याच्या आपल्या हक्कांचे समर्थन करून तो हक्क बजावून घेत असताना स्पृश्य लोकांनी का विरोध करावा ह्याबद्दल आश्चर्य प्रकट केले.

श्री. वडवलकर ह्यांनी ठरावास दुजोरा देणारे भाषण केले. त्यानंतर ही सभा शांततामय सत्याग्रही लोकांवर हल्ला करणाऱ्या स्पृश्य लोकांचा निषेध करते. अशा अर्थाचा ठराव श्री. के. सी. ठाकरे ह्यांनी मांडिला. वरील ठरावास श्री. द. वि. प्रधान यांनी दुजोरा देणारे भाषण केले.

श्री. खटावकर व आचार्य ह्यांची भाषणे होऊन ठराव पास झाला तिसऱ्या ठरावान्वये अस्पृश्य लोकांवर होत असलेला हल्ला स्वतःच्या डोळ्याने पाहत असताना देखील कलेक्टरने ताबडतोब बंदोबस्त केला नाही म्हणून दिलगिरी प्रदर्शित करण्यात आली. या सभेत श्री. देवराव नाईक व भुस्कुटे यांचीही भाषणे झाली. कोणत्याही जुलुमी सत्तेविरुद्ध सत्याग्रह करण्याचा हक्क जुलुमाखाली दडपलेल्या लोकांस असतो म्हणून तो करण्याचा सल्ला डॉ. आंबेडकर बहिष्कृतास देतात. परंतु येथे गिरणी कामगार युनियनचा गिरण्यांच्या मालकांविरुद्ध जो लढा सुरू झाला होता. त्यास डॉ. आंबेडकरानी का विरोध केला ? असा प्रश्न सभेच्या सुरुवातीला एका पृच्छकाने केला असता सभेचे काम बरखास्त करण्यापूर्वी त्याचे उत्तर देण्याचे आश्वासन त्यांनी त्यास दिले होते. त्यानुसार डॉ. बाबासाहेब म्हणाले, 

आपण गिरणी कामगार युनियनला का विरोध केला याबाबत गेल्या संपाच्या कारणांची व परिस्थितीची बऱ्याचशा जणांना माहिती नाही असे दिसते. एकतर हा संप सार्वत्रिक नव्हता, गिरण्यात काम करणाऱ्या मुसलमान कामक-यापैकी एकही कामगार संपात सामील झालेला नव्हता व ज्या भागातील गिरण्यांमध्ये मुसलमान कामगार जास्त संख्येने आहेत, त्या गिरण्या अगदी बिनबोभाट चालू होत्या. तसेच संपाच्या एक दिवस अगोदर गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष, सेक्रेटरी व इतर दोन लोक मला भेटावयास आले. त्या वेळेस तेथे श्री. देवराव नाईक व श्री. द. वि. प्रधान हेही हजर होते. बरीचशी चर्चा होऊन संपास पुरेशी कारणे नसताना व भरभक्कम पैशाचे पाठबळ नसताना संप करणे मूर्खपणाचे आहे, असे गिरणी कामगार युनियनच्या लोकास मी सांगितले. जर संपास अगदी पुरेशी कारणे असतील व त्यात जर आमच्या बहिष्कृत वर्गाचा काही फायदा होत असेल तर मी मोठ्या आनंदाने संपास पाठिंबा देऊन संपात सामील होईन, असे सांगितले

नंतर मी स्वतः संपाच्या सर्व कारणांचा तपास केल्यावर माझी अशी खात्री झाली की, हा संप काही लोक स्वतःच्या अरेरावी मतावर करून टिकवू पहात आहेत. युनियनने दिलेली अभिवचने जर युनियनचे चालक पाळणार नाहीत, तर त्या युनियनच्या शब्दास कवडीकिंमत राहणार नाही, अशी परिस्थिती होती. मुंबई सरकारने नेमलेल्या संप चौकशी कोर्टापुढे साक्षी देताना ह्याच युनियनच्या अधिका-यांनी आपली संघटना विस्कळीत झाली म्हणून आपण संप केला असा घडधडीत कबुलीजबाब दिलेला आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवावे.

तिसरे मुख्य कारण म्हणजे अजूनपर्यंत जे जे काही संप झाले त्यात बहिष्कृतांना कोणत्याही प्रकारे न्याय मिळाला नसून त्यांना कपडे खात्यात असलेली बंदी अजूनही कायम आहे. जमल्यास कपडे खाते बहिष्कृतास मोकळे व्हावे व मुंबईच्या लोकास कपड्याचे काम यावे म्हणून विरोध केला. कारण येथील स्पृश्य लोक त्यास काम शिकविण्यास तयार नाहीत. म्हणून वऱ्हाडातून 130 माणसे आणली. परंतु कपडे खात्यातील स्पृश्य लोकांनी आपण अस्पृश्य लोकांबरोबर काम करणार नाही म्हणून ठिकठिकाणी ह्या स्पृश्य वर्गीय मजुरांनी संप केले व त्यामुळे आपण आणलेल्या अस्पृश्य मजुरांना परत जावे लागले. अस्पृश्यांवर जुलूम हाच जर कामगार चळवळीचा न्याय असेल तर कामगारांना जात नाही म्हणून नेहमी ओरडणा-या स्पृश्य पुढा-यांनी याचा जबाब द्यावा.

त्याचप्रमाणे गिरणीतील कोणतीही मोठी जागा अस्पृश्य वर्गाच्या लोकास देण्यात येत नाही. कारण काय तर हे जात मानणारे स्पृश्य कामगार अस्पृश्य अंमलदारांच्या व मुकादमांच्या हाताखाली काम करण्यास तयार नसतात. गिरणीतील नळावरची भांडणे व स्पृश्य स्त्रियांकडून अस्पृश्य स्त्रियांचा होणारा पाणउतारा करणे या नित्याच्या बाबी आहेत. ज्या चळवळीमध्ये बहिष्कृतांच्यावर जुलूम होत असून तो चालू ठेवण्याची प्रवृत्ती त्यात असेल अशा कोणत्याही चळवळीस विरोध करणे हेच आपले कर्तव्य होय. 

ज्यांना बहिष्कृत वर्गाच्या सहकार्याची अपेक्षा असेल त्यांनी बहिष्कृतांस न्याय दिला पाहिजे. जेथे जी माणसे माझ्या बहिष्कृत वर्गास न्याय देऊन त्यांची गुलामगिरीतून व आहे त्या स्थितीतून वर आणण्याची अंतःकरणपूर्वक चळवळ करीत असतील त्या लोकांशी सहकार्य करण्यास मी कधीही मागे पाहणार नाही. परंतु प्रत्येक चळवळीचे सूत्र म्हणजे बहिष्कृतांस न्याय व समतेची वागणूक हेच असेल, तरच ते न्याय्य व रास्त ठरेल. अप्पलपोट्या स्पृश्यांच्या फायद्याच्या चळवळीशी मला काही कर्तव्य नाही. पुन्हा आपण सर्व लोकांस पर्वतीच्या सत्याग्रहास मदत करण्याची विनंती करतो. अशाप्रकारे सभेचे काम संपल्याचे 9 वाजता जाहीर झाले. 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password