अस्पृश्यांच्याच पैशावर चळवळीसाठी भव्य इमारत उभारा.
गुरुवार तारीख 10 ऑक्टोबर 1940 रोजी महाड तालुका महार हितसंरक्षक संघातील मंडळीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चहा पार्टी देण्याचा कार्यक्रम परळ येथील आर. एम. भट हायस्कूलमध्ये आनंदाने पार पडला.
प्रथम संघाच्या सभासद व कार्यकारी मंडळीसह आमदार भाई चित्रे, श्री. कमलाकात चित्रे, दादासाहेब संभाजी गायकवाड, लोखडे, सवादकर, इत्यादी कार्यकर्त्यांसमवेत डॉ. बाबासाहेबांबरोबर ग्रुप फोटो काढण्यात आला. नंतर चहा पार्टीचा कार्यक्रम उरकण्यात आला. संघाचे अध्यक्ष श्री. आर. व्ही. मोरे यांनी कबूल केल्याप्रमाणे ‘जनते’ ला 40 रुपये रोख दिले व 10 रुपये मागाहून देण्याचे जाहीर अभिवचन दिले. डॉ. बाबासाहेबांनी काही बोलावे अशी सर्व जनसमूहामार्फत आग्रहाची विनंती करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब टाळ्यांच्या गजरात बोलावयास उठले. ते आपल्या भाषणात म्हणाले,
ज्या महाड तालुक्याने अस्पृश्यांच्या चळवळीची मुहूर्तमेढ रोवण्याबाबत पुढाकार घेतला त्याच तालुक्यातील मंडळीनी मला 50 रुपये देऊन सभेला बोलविण्याची प्रथा अस्पृश्य समाजात घालून दिली याबद्दल ते स्तुतीस पात्र आहेत. मुंबई येथे अस्पृश्य समाजासाठी एक भव्य इमारत बांधली जाणार आहे. ती निव्वळ अस्पृश्यांच्याच पैशावर बांधली जाणार आहे. त्या इमारतीकरिता द्रव्याची आत्यंतिक आवश्यकता आहे. ही मोठी जबाबदारी पार पाडण्याकरिता आपण आपल्या पूर्वीच्या कर्तबगारीला शोभेल अशा रीतीने याही बाबतीत पुढाकार घ्याल अशी मला खात्री वाटते. मला महाड तालुक्यातील मंडळीबद्दल अभिमान वाटतो. अशा प्रकारचे अमोल उद्गार काढून झालेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करुन त्यांनी आपले भाषण संपविले.
नंतर संघाचे उपाध्यक्ष श्री. विठ्ठल साळवे यांनी प्रमुख मंडळीस हार घातले. शेवटी एस. एस. निकम यांनी सर्वांचे आभार मानले व सभा बरखास्त झाली.