Categories

Most Viewed

22 ऑक्टोबर 1932 भाषण

वंशपरंपरेची कामे सोडून शिक्षणाची कास धरा.

शुक्रवार, तारीख 28 ऑक्टोबर 1932 रोजी मुंबईच्या अपोलो बंदर येथे सर कावसजी जहांगीर हॉलमध्ये अस्पृश्य वर्गाचे पुढारी डॉ. पी. जी. सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय अस्पृश्य वर्गाचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबईतील ऋषी समाजातर्फे मानपत्र देण्याकरिता जाहीर सभा भरली होती. सभेच्या ठिकाणी व्यवस्था ठेवण्याकरिता समता सैनिक दलाचे स्वयंसेवक हजर होते.

डॉ. आंबेडकरांनी मानपत्राचा स्वीकार केल्यावर ते म्हणाले. मी फार दिलगीर आहे की, हे मानपत्र फक्त मला एकट्यालाच देण्यात येत आहे. अस्पृश्य वर्गाचे जे काही काम होत आहे ते सगळे माझ्या एकट्याकडून होत आहे हे म्हणणे अगदी खोटे आहे. या कामात जितके तुम्ही मला श्रेय देता त्यापेक्षा जास्त श्रेय डॉ. सोळंकी व माझ्याबरोबर काम करणारे लोक यांना दिले पाहिजे. डॉ. सोळंकी माझ्याबरोबर काम करतात. मी गेल्या तीन वर्षात कौन्सिलमध्ये काहीच काम केले नाही. पण डॉ. सोळंकी साहेबांनी कौन्सिलात अस्पृश्य वर्गाची फार बहुमोल सेवा केली आहे. पुण्याला हिंदू पुढा-यांच्या बरोबर जी आमची वाटाघाट झाली त्यावेळी डॉ. सोळंकी यांनी मला फार फार मदत केली. त्यांनी त्यांना देण्यात यावयाच्या मानपत्राचा स्वीकार न करिता मलाच मानपत्र दिले पाहिजे असे जे या सभेच्या चालकास सांगितले हा त्यांच्या मनाचा थोरपणा होय. शेवटी मला आपणाला हेच सांगावयाचे आहे की, पुणे करारात आपला जो फायदा झाला आहे त्याचा उपयोग आपले लोक कसा करून घेतील हे समजत नाही. संसारामध्ये मनुष्याला जी सुख-दुःखे भोगावी लागतात ती ईश्वरी इच्छेनेच होतात, आपले दारिद्र्य हे आपणासाठीच आहे असे लोक मानतात. त्यासाठी सगळ्यांनाच मला हे सांगावयाचे आहे की, ही अशी स्वतःला नीच समजण्याची भावना सोडून द्या. लक्षात ठेवा की, राजकारणात जो मोठा बदल झाला आहे त्याची उच्च वर्णाचे हिंदू लोक काही किंमत करीत नाहीत. ते लोक या देशाचे राज्यकर्ते झालेले आहेत. त्याकरिता आपणाला पुन्हा हिंदू लोकांच्या गुलामगिरीत राहण्याचा प्रसंग येणार नाही. कारण आता यापुढे जे कायदे व्हावयाचे ते अस्पृश्य वर्गाच्या संमतीनेच होतील. ही एक सामाजिक क्रांती आहे. मी आपणास सांगतो की, अस्पृश्य वर्गाला जे हक्क मिळाले आहेत ते लुबाडून घेण्याचे प्रयत्न उच्च वर्णाचे हिंदू करतील. समतेच्या पायावर गांधींबरोबर झालेला तह हिंदू लोकांना आवडत नाही हे मी ओळखून आहे. फक्त गांधीनी उपवासास सुरुवात केली म्हणून त्यांना वाचविण्याकरिता हा तह हिंदूंना करावा लागला. तरीपण आपल्या हाती आलेली सत्ता हिसकावून घेण्याचा ते प्रयत्न करतील अशी मला शंका आहे. तेव्हा आपल्या हाती आलेली सत्ता तुम्ही गमावणार नाही अशी मला आशा आहे.

दुसरी एक महत्त्वाची पण अगत्याची सूचना मी आपणाला देतो की सहभोजन व मंदीर प्रवेश यांच्या मी विरुद्ध नाही. पण या प्रकाराने आपणास राजकीय हक्क मिळणार नाहीत. आपणाला संसार चालविण्याची आवश्यकता आहे. भाकर, अंगावर कपडा, राहावयास चांगली जागा आपणास पाहिजे. ज्याप्रमाणे उच्च वर्गाचे हिंदू लोक आपल्या मुलांना शिक्षण देतात, त्याचप्रमाणे आपल्या मुलांना शिक्षण देण्याची फार जरूरी आहे व त्यांच्याप्रमाणे आपणही सर्व प्रकारच्या सरकारी नोकरीत शिरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे जर आपण केले तरच आपला उद्धार होईल.

शेवटी ऋषी मंडळींना मी एक प्रेमाची सूचना देतो की, आपल्या अस्पृश्य वर्गात ज्या काही जाती आहेत त्या नाहीशा करण्याचे आपण प्रयत्न केले पाहिजेत, अस्पृश्य वर्गात सामाजिक सुधारणा करण्याचे पुष्कळ प्रयत्न केले पाहिजेत. ज्याप्रमाणे कोणत्याही घराचा पाया मजबूत असला तरच ती इमारत जास्त दिवस टिकते त्याप्रमाणे ऋषीसमाज अस्पृश्य वर्गाचा पाया आहे. म्हणून त्यांचे सामाजिक कार्य अस्पृश्य वर्गाला आदर्श रुप पाहिजे. ऋषीसमाज जर जाहीर करील की आम्ही कोणत्याही जातीपेक्षा नीच नाही व उच्चही मानीत नाही तर अस्पृश्य वर्गात सुधारणा फार झपाट्याने सुरू होईल. दुसरी गोष्ट उच्च वर्णाच्या लोकांनी आपली भावना अशी करून दिलेली आहे की, भंग्याचे काम वंशपरंपरा करणे हे आपले काम आहे व अशी मनोवृत्ती आपली झाली आहे, परंतु मी आपणाला स्पष्ट सांगतो की, आपली ही अशी मनोवृत्ती होण्याचे कारण आपली आर्थिक स्थिती होय. हल्ली भंग्याचे काम करणारांनी हे काम वंशपरंपरा करण्याचे धोरण सोडून दिले पाहिजे व त्यांना उत्तम शिक्षण दिले पाहिजे.

आपल्या परिस्थितीत जर काही फेरफार करावयाचे असतील तर अस्पृश्यता समूळ नाहीशी झाली पाहिजे तरच होईल, तरी आपण उच्च वर्णाच्या हिंदू लोकांच्या नादी न लागता आपला उद्धार करावयास लागले पाहिजे. असो. आपण आज मला जे मानपत्र दिले त्याबद्दल मी आपले आभार मानून माझे भाषण संपवितो.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password