पुढारलेल्या लोकांनी स्पृश्यास्पृश्यता काढून टाकली पाहिजे.
महार समाज सेवासंघ (राजापूर ते गोवा हद्द) यांच्या विद्यमाने दिनांक 22 ऑक्टोबर 1932 रोजी संध्याकाळी 7 वाजता सावंतवाडी येथील तुरुंग नजिकच्या महारवाड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागतार्थ व अभिनंदनार्थ अस्पृश्यांची जगी जाहीर सभा भरविण्यात आली होती. त्यादिवशी तर पाऊस मी म्हणत होता. त्याच्या दर पाच पाच मिनिटांनी सरीवर सरी येत होत्या. संघाच्या मंडळीनी फार मेहनत घेऊन स्टेज तयार केले होते. सभेस सुमारे हजार बाराशे स्पृश्य व अदमासे दोन हजार अस्पृश्य हजर होते. अध्यक्षांची सूचना शिवराम नारायण वालावलकर यांनी आणली व तिला अनुमोदन गणपत जाधव यांनी दिल्यानंतर अध्यक्षस्थानी बाबासाहेब घोरपडे यांची योजना झाली. अध्यक्ष स्थानापन्न झाल्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ओळख करून डॉ. साहेबांस चार शब्द बोलण्यास विनंती केली. बाबासाहेब बोलावयास उभे राहिले. टाळ्यांचा गगनभेदी कडकडाट झाला. आकाश काळवंडलेलेच होते. बाबासाहेबांनी सहज आकाशाकडे पाहिले व पावसाला उद्देशून ते बोलले,
“मेघराजा फक्त दहाच मिनिटे कृपा कर.” त्यानंतर डॉ. साहेबांनी लहानसे पण अत्यंत मार्मिक व चटकदार भाषण केले. आपल्या भाषणात डॉ. साहेबांनी अस्पृश्य बांधवांना आपल्या पायावरच अवलंबून आपल्या उन्नतीच्या मार्गास लावण्याविषयी चार कळकळीचे शब्द सांगितले व नंतर त्यांनी मूठभर पुढारलेल्या लोकांनी मागासलेल्या बहुसंख्यांक लोकांवर व अस्पृश्यांवर कसा जुलूम चालविला आहे. हे सांगून त्यांना ही स्थिती नष्ट करण्याबद्दल चार उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या. केवळ स्वार्थाच्या व आत्मसंरक्षणाच्या दृष्टीने तरी पुढारलेल्या लोकांनी स्पृश्यास्पृश्यता काढून टाकली पाहिजे व सर्वांना समानतेच्या हक्काने वागविले पाहिजे. तसे न झाल्यास हिंदू समाज आपल्या हाताने आपल्या नाकावर दगड मारून घेईल अशा आशयाचे भाषण केले. अशाप्रकारे नेमकी दहा मिनिटे त्यांनी भाषण केले. आणि ते खाली बसले व सभेतून उठून जाण्याची अध्यक्षांपाशी विदा मागून मोटारीत पाय ठेवला. आणि लगेच धो धो पाऊस सुरू झाला. तो पुढे पाच मिनिटे सुरूच होता.