Categories

Most Viewed

08 ऑक्टोबर 1936 भाषण

अंध व स्वार्थी दृष्टी ठेवली तर सर्व समाजाचाच घात होईल.

गुरुवार, तारीख 8 ऑक्टोबर 1936 रोजी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सकाळच्या गाडीने 6.30 ला जळगाव स्टेशनवर आले. त्यावेळी त्यांच्या स्वागतार्थ पूर्व खानदेशातील प्रमुख मंडळींनी हजर राहून स्वागत केले. स्वागतप्रसंगी अस्पृश्य पुढारी मे सेनू नारायण मेढे, शामराव कामाजी जाधव, रायला झगा निकम, लक्ष्मण पाहुणा मेढे, धनाजी रामचंद्र बि-हाडे, मोतीराम रामजी बिऱ्हाडे, देविदास सोनावणे, नामदेव सोनावणे, ओंकार सोनावणे, दिवाण सीताराम चव्हाण, माछाडे, मि. प्रधान वकील, वानखेडे, बारसे, बहिरूपे, के. एल. तायडे, बडगे, नामदेव भागाजी भालेराव, शिवा रघुनाथ, भास्कर गरबड, वाघ इत्यादि खानदेशातील प्रमुख मंडळी हजर होती. डॉ. बाबासाहेब गाडीतून उतरल्याबरोबर त्यांचे गगनभेदी जयजयकारात स्वागत करण्यात आले व रा. मेढे यांनी त्यांना पुष्पहार घातला. नंतर आलेल्या मंडळीची विचारपूस करीत मे. कलेक्टरसाहेब (पूर्व खानेदश) यांच्या मोटारीतून मि. बाळासाहेब प्रधान वकील यांच्या घरी गेले. डॉ. बाबासाहेबांना कोर्टाचे काम असल्याने ते 11 वाजता कोर्टात गेले. बाबासाहेब जाऊन पोहचत नाहीत तोच लोकांचे थवेच्याथवे कोर्टाकडे धाव घेऊ लागले. 15-20 मिनिटात सर्व कोर्ट अलोट गर्दीने फुलून जाऊन त्या ठिकाणी एक भली मोठी यात्राच आहे की काय असे भासू लागले. यावेळी कोर्टाच्या कामात बराच व्यत्यय येऊ लागला व शेवटी जज् साहेबांना कोर्टाचे दरवाजे बंद करावे लागले. तरीपण लोकसमुदाय कोर्टासमोरील भव्य पटांगणात सारखा बाबासाहेबांच्या आगमनाची वाट पाहात होता. कोर्टाचे काम बरोबर 5.20 ला संपताच ते बाहेर आले व थोड्याच वेळाने हस्तपत्रिकेत जाहीर केल्याप्रमाणे जळगाव येथील म्युनिसीपल टाऊन हॉलमध्ये डॉ. बाबासाहेबांची मोटार आली. त्यावेळी चार हजारावर लोकसमुदाय जमला होता. रणगर्जनेने व जयजयकाराने बाबासाहेबांचे स्वागत करण्यात आले व सभेच्या कामास सुरूवात झाली. सदर प्रसंगी नाशिक येथील प्रमुख पुढारी श्री. भाऊराव गायकवाड, अहमदनगरचे तरुण पुढारी श्री. प्रभाकर जनार्दन रोहम व बलराम दादा टेलर इत्यादि मंडळी हजर होती. पहिल्या प्रथम श्री. भाऊराव गायकवाड याचे येत्या असेंब्लीच्या निवडणुकीविषयी जोरदार व अत्यंत कळकळीचे भाषण झाले.

नंतर डॉ. बाबासाहेब बोलावयास उठले. त्यावेळी टाळ्यांचा एकच कडकडाट उठला. सर्वत्र त्यांच्या जयजयकाराचा ध्वनी उठू लागला. मग डॉ. बाबासाहेबांनी सर्वास शांत होण्याचा इशारा करताच क्षणात सर्व वातावरण शांत झाले. अशातऱ्हेने आमच्या सेनानायकाचा प्रत्यक्ष हुकूम अमलात आणण्याची साक्ष त्यांनी पटवून दिली. शांतता होताच डॉ. बाबासाहेब म्हणाले.

आजची ही सभा श्री. दौलतराव गुलाजी जाधव यांच्या उमेदवारीस पाठिंबा देण्यासाठी भरविण्यात आली आहे. तुमच्या पूर्व खानदेश जिल्ह्यातील पूर्व भागाचे राखीव जागेकरिता ते उभे आहेत. या जागेकरिता आणखीही उमेदवार उभे आहेत, असे मी ऐकतो. त्यापैकी मी मेढे, बिऱ्हाडे यांची नावे ऐकतो. या दोघाना मी चांगले ओळखतो. त्यांचा माझा संबंध आज 15-20 वर्षापासून आहे. त्यातल्या त्यात श्री. मेढेंशी माझा जास्त संबंध आहे. श्री. मेढेंनी येथे काही काम केले आहे, हे मी जाणून आहे. असे असता मी श्री. जाधवांनाच का उभे केले. असे पुष्कळांना वाटत असेल, पण त्याला कारण एकच आहे ते म्हणजे कायदे मंडळात हुशार, चाणाक्ष व समाजदक्ष लोकांची जरूरी आहे. आपणाला त्या कामास योग्य असाच इसम हवा आहे. भलत्या कामावर भलत्याच इसमाची निवड केली तर त्यास ते काम झेपणार नाही व त्याला ते काम येणार नाही. तुम्हाला जर एखादे घर बांधावयाचे असेल तर तुम्ही योग्य माणसांनाच जी ती कामे सांगता. सुताराला लोहाराचे काम सांगितले तर त्याला ती कामे करता येणार नाहीत. तुम्ही गवंड्याला गवंड्याचेच काम सांगणार आणि असे जर तुम्ही केले नाही तर घराऐवजी बेडौल डोलारा मात्र तुम्हाला दिसेल. पण योग्य ते काम योग्य त्या इसमाला दिले तर तुमच्या डोळ्यांचे पारणे फिटणारी सुंदर इमारत तुम्ही पाहू शकाल. हीच गोष्ट व्यवहाराची आहे व ती तुम्ही प्रत्येकाने थोडा विचार केला तर कळून येणार आहे. मे मेढे-बिहाडे हे म्युनिसीपालिटी, लोकल बोर्ड व स्कूल बोर्ड यांच्या कामालाच योग्य आहेत, पण त्यांनी जे काम आपणास पाहता येणे अशक्य आहे. अशा कामाची इच्छा करू नये. जर त्यांना खरेच समाजाचे हित व्हावे अशी कळकळ असेल तर त्यांनी थोडा वेळ मनाशी विचार करावा व अंतःकरणापासून त्या कामाला कोण लायक आहे, हे ठरवावे व जर त्यांनी प्रामाणिकपणे विचार केला तर श्री. जाधवच त्या कामास योग्य आहेत. असेच त्यांचे मन त्यांना उत्तर देईल ते काम त्यांच्याने होणार नाही. ते नालायक आहेत, असे मी म्हणत नाही, तर ज्या त्या कामाला जो तो इसम लायक असतो आणि या कामास श्री. जाधव जास्त लायक आहेत. कौन्सिलचे सर्व काम इंग्रजीतून चालते आणि म्हणूनच उमेदवाराला उत्तम तऱ्हेचे इंग्रजीचे ज्ञान पाहिजे. त्याला वाटेल ते प्रश्न विचारण्याची ताकद पाहिजे. या सर्व गोष्टी उत्तम इंग्रजी जाणण-यालाच शक्य आहेत. इंग्रजी न जाणण्याचा येथे उपयोग नाही. आम्हाला आमच्या मोजक्या खुर्च्या शोभवावयाच्या नाहीत. आम्हाला कार्य करावयाचे आहे. आज त्यांच्याइतका शिकलेला इसम तुमच्या जिल्ह्यात दुसरा नाही. तो बी. ए. झाला आहे. तो काही माझा नातेवाईक नाही किंवा तो त्याचा भत्ता मला देणार नाही. मी तुमच्याच फायद्याकरिता त्याची निवड केलेली आहे. मी काही पक्षपात केला नाही. मी सर्व सारासार विचार करून व पूर्वखानदेशचा नकाशा माझ्या नजरेसमोर ठेवून श्री. जाधवांची निवड केली आहे आणि मी पुन्हा सांगतो की तो लायक आहे.

तुम्ही म्हणाल की अडाणी मराठे व कुणबी कौन्सिलमध्ये जातात. इंग्रजी येते ? त्यांना कुठे जर त्यांचा इसम चालतो मग आमचा का नको ? पण मी तुम्हास असे सांगतो की मराठे, कुणबी आणि तुमच्यात जमीन अस्मानचे अंतर आहे. त्यांना सर्वकाही अनुकूल आहे. त्यांना कोठलीही उणीव नाही, पण तुम्ही कंगाल आहात तुम्हास सर्व काही कष्टाने प्राप्त करावे लागते आणि ते सुलभरितीने प्राप्त करावयाचे असेल तर फक्त कायद्याने मिळविता येणे शक्य आहे. एवढ्याकरिता तुमचे मूर्ख उमेदवार चालणार नाहीत, तज्ञ हवे आहेत कारण तुमची ग्रहदशा काढून टाकावयाची आहे आणि म्हणूनच श्री. जाधवराव सारख्या लायक उमेदवारास तुम्ही निवडून देणे तुमचे कर्तव्य आहे. जर तुम्ही तसे न कराल तर तुम्ही स्वतःचा नाश करून घ्याल, ही मी तुम्हाला आजच धोक्याची सूचना देतो. जर एखाद्याने मूर्खपणा केला तर तुम्ही तो करू नका. एकाने चोरी केल्यास दोरी बांधून फुकट मरू नका. आज दोन हजार वर्षापासून तुमचे पूर्वज या हिंदुस्थानात आहेत. पण कोणकोण ब्राह्मणाच्या मांडीला मांडी लावून बसले होते ? तो भाग्योदय आज तुम्हाला प्राप्त झाला आहे आणि अशावेळी जर तुम्ही अंध व स्वार्थी दृष्टी ठेवली तर सर्व समाजाचाच नव्हे तर स्वतःच्या बायका-मुलांचा घात कराल. मंडळीतर्फे मी, मेढे-बिहाडे यांना विनंती करतो की तुम्ही समाजाच्या आड येऊ म्हणून मी या सर्व नका व विनाकारण गोंधळ करू नका. पण इतकेही सांगून त्यांनी ऐकले नाही तर तुम्ही काय कराल ? तुम्ही मला विरोध कराल काय ? (सर्वत्र आवाज नाही! नाही !! नाही !!!) समाजाचा घात कराल ? (फिरून नाही नाही) मग काय कराल ? तुमच्या भागात पाच हजार मतदार आहेत. प्रत्येकाला मतदानाचा हक्क प्राप्त झाला आहे आणि त्याचा तुम्ही योग्य तोच उपयोग केला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने विचार केला पाहिजे व सर्व समाजाचे कार्य उत्तम व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचे कर्तव्य करा आणि सर्वांनी वाटेल ती खटपट करून श्री. जाधवाला निवडून आणा फुटकी नाव व कुचकामाचे नावाडी देऊन ती नाव पैलतीरावर न्या, असे जर तुम्ही म्हणत असाल तर त्या नावेला मी केव्हाही पैलतीराला नेणार नाही. इतकेच नव्हे तर त्या नावेत पायदेखील ठेवणार नाही. म्हणून मी सांगेन तेच नावाडी मला दिले पाहिजेत. तरच मी त्या जहाजाला सहजरीत्या पार नेईन, शेवटी तुम्ही श्री. जाधवालाच निवडून आणावे अशी मी तुम्हास विनंती करतो.

यानंतर श्री. वारभूवन यांनी डॉ. साहेबांनी जो अमूल्य उपदेश केला तो सर्वांनी लक्षात ठेवून व श्री. जाधव यांना निवडून देणेबद्दल एक जलसा खेडोपाडी नेण्याचे जाहीर केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password