भोळसट कल्पनांमुळे इहलोकातील खडतर आयुष्यक्रम कष्टमय झाला आहे.
बेलासीस रोड इंप्रूव्हमेंट ट्रस्टच्या चाळीजवळील मैदान रविवार तारीख 09 ऑक्टोबर 1932 रोजी रात्रौ 10.30 वाजता स्त्री-पुरुषांनी भरून गेले होते. सोशल सर्व्हिस लीगचे एक प्रमुख कार्यकर्ते श्री. बापुसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी त्या दिवसाच्या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारले होते. आपल्यास अध्यक्षपदाचा मान दिल्याबद्दल सभेच्या चालकांचे मनःपूर्वक आभार मानताना ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या विशाल विद्वत्तेने, अचल मनोधैर्याने व अद्वितीय पराक्रमाने जगमान्य झाले आहेत. त्यांच्या व्याख्यानाचे प्रसंगी आपल्यासारख्या साध्या समाजसेवकास अध्यक्षपदाचा मान देणे म्हणजे आपल्यावर ते एक संकट लादणे होय, पण दगडास देव करण्याची हिंदू लोकास सवयच आहे. तेव्हा तुम्ही तरी त्यास कसे अपवाद ठरणार! आणखी थोडे समयोचित असे भाषण करून त्यांनी सभेच्या कार्यास सुरवात केली. या सभेतील मुख्य ठराव म्हणजे पुण्याच्या तहनाम्यास पाठिंबा देणे. तो श्री. सी. ना. शिवतरकर यास सभेपुढे मांडावयास सांगितला. रा. शिवतरकर हे पुण्याच्या तहनाम्यावर सही करणा-यापैकी एक आहेत. डॉ. आंबेडकरांचा व हिंदू पुढाऱ्यांचा खल चालू असताना ते पुण्यास स्वतः हजर होते. त्यामुळे त्यांनी तहनाम्यातील कलमांवर चांगले भाषण केले. रा. चव्हाण व इतर वक्त्यांनी या ठरावास दुजोरा दिल्यानंतर तो टाळ्यांच्या गजरात पास झाला.
नंतर दुसरा ठराव रा. ब. बोले यांचे बिलास पाठिंबा देण्याकरिता होता. तो रा. वनमाळी यांनी मांडला. मुंबईच्या म्युनिसीपल कॉर्पोरेशनच्या स्कूल कमिटीवर अस्पृश्यांचा खास प्रतिनिधी असणे कसे अवश्य आहे हे व्यवस्थित रीतीने त्यांनी विषद केले. या ठरावासही योग्य रीतीने दुजोरा मिळाल्यावर तो पास झाला. नंतर अध्यक्षांनी डॉ. बाबासाहेबांस भाषण करण्याची विनंती केली. त्यांचे भाषण ऐकण्यास श्रोतृवृंद आधीच अतिशय उत्सुक, त्यात वरील दोन ठराव मांडण्यात जास्त वेळ गेल्यामुळे ऐकणान्यांची उत्कंठा क्षणोक्षणी वाढत गेली होती. त्यांच्या भाषणात नाटकी आविर्भावास वाव नाही पण उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात चित्ताकर्षकता भरपूर व विचार प्रकर्षतेस अगडबंब शब्दांचा लेपही नाही. पण प्रत्येक विचार मालिका इतक्या सरळ व साध्या शब्दांत गुंफित केलेली असते की, ती अजाण बालकांनी किंवा अज्ञ खेडवळानेही ती ग्रहण करावी. इतके असूनही प्रत्येक शब्द व मुद्दे एखाद्या कुशल कायदेपंडिता प्रमाणेच मांडले जातात. खुनाकरिता फासावर लटकवल्या जाणा-या आरोपीची केस रंगविताना कुशाग्रबुद्धीचा वकील ज्याप्रमाणे आपली बाजू ज्युरीस समजावून देण्याकरिता मांडीत असतो. त्याचप्रमाणे ते कोणताही विषय श्रोत्यांस समजावून देतात. ज्ञानाभिलाषी पठीक विद्यार्थ्यास सहज विषय विशद करून देण्याची त्यांची हातोटी अन्य श्रोत्यांसही कोणताही विषय समजावून देताना सहज प्रतिबिंबित होते. शनिवारी रात्री झालेले त्यांचे भाषण असेच संस्मरणीय झाले. ते आपल्या भाषणात म्हणाले,
मरणोत्तर मोक्षप्राप्तीकरिता तळमळणारी वृत्ती किंवा काल्पनिक स्वर्गीय नंदनवनाकडे खिळलेली दृष्टी ही आजच्या परिस्थितीत आत्मघातकी आहे. इहलोकातील खडतर आयुष्यक्रम त्या भोळसट कल्पनांमुळे कष्टमय झाला आहे. स्वपराक्रमाने पोषक अन्न मिळविणे, ज्ञानार्जनाची साधने अंकित करणे व इतर प्रकारे जीवितक्रम सुखकर करणे या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे बहुजन समाज पराङमुख झाल्यामुळे सर्व देशाची उन्नती स्थगित झाली आहे हे रोजच्या आयुष्यक्रमातील अनुभवावरून स्पष्ट होते. गळ्यातील तुळसीमाला तुम्हास मारवाड्याच्या कैचीतून मुक्त करण्यास उपयोगी पडत नाही किंवा तुम्ही रामनामाचा जप करता म्हणून घरवाला भाड्याची सूट देत नाही अगर वाणी आपले पैसे कमी करत नाही. तुम्ही पंढरीचे वक्तशीर वारकरी आहा म्हणून तुमचा मालक तुम्हास पगारात वाढ देत नाही. समाजातील अत्यंत मोठा भाग या मूढ कल्पनात गढून गेल्यामुळे काही आपमतलबी माणसांचा कावा साधतो व ते तुम्हाला सर्वथैव नाडून आपला डाव साधतात. तेव्हा तुम्ही यापुढे तरी अत्यंत सावधगिरीने वागले पाहिजे. आज तुम्हाला थोडीबहुत राजकीय सत्ता प्राप्त होत आहे. त्या सत्तेविषयी जर तुम्ही उदास राहाल. आपली आजची स्थिती बदलण्याकरिता योग्य उपाययोजना न कराल तर तुमचे हाल झाल्याशिवाय राहणार नाहीत. ‘येरे माझ्या मागल्या आणि ताक कण्या चांगल्या’ ही एक मराठीत म्हण आहे. त्याप्रमाणे जर तुम्ही वागाल तर तुमची कधीच ऊर्जितावस्था होणार नाही. या प्रकाराची उदासीनता व मनाची प्रवृत्ती ही तुमच्या ऊर्जितावस्थेत अत्यंत विघातक आहे आणि मला मोठी शंका येते ती हीच की, आज आपल्यात जागृती होत आहे ती क्षणिक ठरून जर विराम पावली तर काय ? ज्या गुलामगिरीस नेस्तनाबूत करण्यास आज आपण सज्ज झालो आहो तिचा पगडा परत तुमच्यावर बसणार नाही ना ? आजपर्यंत वैष्णवपंथी संतजनांनी तुम्हास समानतेच्या पायरीवर आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांची शिकवणूक सर्वस्वी पारमार्थिक स्वरूपाची असल्यामुळे व ते स्वतः ऐहिक सुखांपासून अलिप्त राहिल्यामुळे ते आपला सामुदायिक दर्जा वाढवू शकले नाहीत. त्यांच्या शिकवणुकीने तुमच्या गुलामगिरीत काडीचाही फरक पडला नाही. हिंदुस्थानातील बहुजन समाज राजकारणापासून अलग राहिल्यामुळे आज देशास दुर्दशा प्राप्त झाली आहे. तरी त्या चुकीची पुनरावृत्ती आपण न करता अत्यंत जागरूकतेने पुढील कार्यक्रम आखला पाहिजे. शिक्षण व अस्पृश्यांची उन्नती याचा अत्यंत निकट संबंध आहे. मुंबई शहरात त्यांची संख्या दोन लाखाजवळ आहे. मुंबईतील प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था म्युनिसीपल कॉर्पोरेशनची स्कूल कमिटी पाहात असते. त्या कमिटीचा 30-32 लाखाचा दरवर्षी खर्च होत असतो. हा खर्च होत असताना दोन लाख अस्पृश्य वर्गातील लोकांची काय व्यवस्था होत आहे ? निरनिराळ्या शाळांकरिता शिक्षकांच्या ज्या नेमणुका होतात त्यात अस्पृश्य शिक्षकांची सोय होत असते की नाही इत्यादी अस्पृश्यांच्या हिताचे अनेक प्रश्न आहेत. त्यांची वासलात कशी लागते हे दक्षतेने पाहण्याकरिता कमिटीवर अस्पृश्यांचा एक तरी प्रतिनिधी असला पाहिजे. या साध्या मागणीस इतरांनी का विरोध करावा हे समजणे कठीण आहे. हल्ली कायदे कौन्सिलात चर्चेकरिता पुढे आलेल्या ग्रामपंचायत बिलानुसार पंचायतीस लहानसहान फौजदारी व दिवाणी खटल्यात न्यायदानाचा अधिकार देण्यात येणार आहे. पंचायतीतील सभासद लोकमताने निवडले जाणार अशा निवडून आलेल्या लोकांच्या निःपक्षपातीपणाबद्दल शंका आहे. प्रत्येक गावात अस्पृश्य हा अल्पसंख्यांक वर्ग असून तो अगदी परावलंबी असल्याकारणाने या ग्रामपंचायतीच्या घटनेत अस्पृश्यांस स्वसंरक्षणार्थ योजना असल्याशिवाय या गरीब समाजाची धडगत नाही. वरळी येथील सभेत जाहीर केल्याप्रमाणे संघटित कार्य करण्यासाठी एक मध्यवर्ती संस्था स्थापावयाची आहे. अशा संस्थेच्या अभावी आज अस्पृश्य वर्गातील लोकांच्या अनेकविध गा-हाण्यांची दाद लागत नाही. कोठे अस्पृश्यांस मराठ्यांनी मारले. कोठे त्यांच्या मुलास त्रास दिला. कोठे त्यांची वतने बंद केली अशा एक ना अनेक तक्रारी आहेत. एके गावी अशाच काही कारणांवरून मामलेदाराकडून महारांचा जबाब घेण्यात आला. खालील अधिकाऱ्यांनी खोटी तक्रार केली होती की, महार सरकारी कामे करीत नाहीत. महारांनी सरकारी काम करण्याचे कधीच नाकारले नव्हते व त्याप्रमाणे मामलेदाराजवळ त्यांनी जबाब दिला, मामलेदारांनी उलट जबाब लिहून घेतला व महारांची वतने जप्त करण्याची शिफारस केली. वरिष्ठ अधिका-यांचीही तीच गोष्ट. कोणीही महारांचे म्हणणे कबूल केले नाही व शेवटी वतने काही वर्षाकरिता जप्त झाली व त्यात महारांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. या तक्रारी कानी आल्याबरोबर एखादा वकील तिकडे पाठवावयास पाहिजे, अधिक चौकशी करावयास पाहिजे, पण पैशाच्या अभावी हे घडणे दुरापास्त आहे. या कामाकरिता फंड जमवून योग्य तजवीज केल्याशिवाय गत्यंतर नाही. मात्र सरकारी अंमलदारांस याबाबतीत असे स्पष्ट बजावल्याशिवाय राहवत नाही की, अशी परिस्थिती चालू राहिल्यास त्याचा परिणाम चांगला होणार नाही.
अशाप्रकारे त्यांचे भाषण झाल्यावर अध्यक्षांनी मे. मणियार साहेब सभेस आले होते त्यांना दोन शब्द बोलण्यास विनंती केली. मे. मणियार साहेबांनी पुण्याच्या तहनाम्यासंबंधी आपला आनंद व्यक्त करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कामगिरीची अत्यंत प्रशंसा केली. नंतर अध्यक्षांचे आभार मानण्यात आले व सभा बरखास्त झाली.