Categories

Most Viewed

04 ऑक्टोबर 1930 भाषण

देशाच्या स्वराज्यास माझा पाठिंबा असेल.

दिनांक 4 ऑक्टोबर 1930 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी इंग्लंडला जात असल्याने दिनांक 2 ऑक्टोबर 1930 रोजी मुंबई इलाख्यातील अस्पृश्य मानलेल्या वर्गाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र व थैली अर्पण करण्याचा समारंभ दामोदर हॉलच्या भव्य पटांगणात सायंकाळी 4 वाजता डॉ. सोळंकी यांचे अध्यक्षतेखाली झाला. समारंभास सुमारे सहा ते सात हजार जनसमूह जमला होता.

अध्यक्षांनी प्रास्ताविक भाषण केल्यानंतर समारंभ कमिटीचे जनरल सेक्रेटरी श्री. सीताराम नामदेव शिवतरकर यांनी मानपत्र वाचून दाखविले व थैलीसाठी रूपये 3,700 जमले असून दुसरे दिवशी संध्याकाळपर्यंत सदर थैलीची रक्कम पाच हजार रुपयांपर्यंत जाईल अशी आशा त्यांनी प्रदर्शित केली. ” येणेप्रमाणे : मानपत्र

‘मानपत्र
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. एम. ए., पीएच. डी., डी. एस्सी., बार-अँट-लॉ., एम. एल. सी.

परमप्रिय महाराज, हिंदुस्थानला ग्रेट ब्रिटनने स्वराज्याचे हक्क देण्याचे बाबतीत वाटाघाट करण्याकरता लंडन येथे भरणाऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला हजर राहण्यासाठी सरकारच्या निमंत्रणावरून आपण तिकडे जाण्यास निघत आहात. अशा वेळी आपल्या संबंधाने आमच्या दलित वर्गामध्ये वाटत असलेला उत्कट आदर, विश्वास व प्रेम ही व्यक्त करणे हे आमचे पवित्र कर्तव्य आहे असे आम्ही समजतो. आपण संपादन केलेल्या प्रशंसनीय ज्ञानाचा व अनुभवाचा सदुपयोग स्वदेशाच्या व विशेषतः स्वकीय जनांच्या हितार्थ करण्याचा हा असा सुयोग आल्याबद्दल आम्ही आपले अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो.

विद्वतरत्न महाशय, समाजशास्त्र, राजनीतिशास्त्र, अर्थशास्त्र, इत्यादी गहन विषयांचे दीर्घकाळ अध्ययन करून तदंतर्गत प्रमेयांचे यथोचित मनन आपण केले आहे. त्याचा पडताळा व्यवहारात पाहण्याचे अनेक प्रसंग आपणास स्वदेशी व परदेशी प्राप्त झाले आहेत. आमच्या देशाच्या उन्नतीस कोणत्या गोष्टींची साप्रतकाळी आवश्यकता आहे, हे आपण आपल्या मनाशी ठरविले आहेच.

ह्या सिद्धांत रूप गोष्टीने निर्भयपणे व निरपेक्ष बुद्धीने समर्थन करण्याचे मनोधैर्य आपल्याठायी अलौकिक असल्याचा आम्हास चांगला अनुभव आहे. तरी आपण ज्या कामगिरीवर जात आहात तीत आपल्या ह्या प्रशंसनीय गुणाचे योग्य दिग्दर्शन होऊन आपण खरे देशभक्त व सत्यनिष्ठ असल्याबद्दलच्या आपल्या कीर्तीत भर पडेल असा आम्हास पूर्ण भरवसा आहे. लोभलाभास वश होऊन स्वदेशाच्या वास्तविक चिरस्थायी कल्याणाच्या गोष्टीविषयी आपण कदापि उदासीन होणार नाहीत किंवा त्यांचा पुरस्कार करण्यात आपण बिलकूल माघार घेणार नाहीत अशी आम्हास पूर्ण खात्री आहे. कारण आपली संस्कृती अत्युच्च दर्जाची असल्यामुळे असा प्रकार आपणाकडून सहसा होणार नाही. तरी आमच्या देशाची खरी वकिली करण्याचा सुयोग आपणास प्राप्त झाला आहे. त्याचा योग्य फायदा घेण्यास आपण यत्किंचितही कसूर करणार नाहीत अशी आम्हास पूर्ण उमेद आहे.

सुजन महाशय, आमच्या देशातील एका मोठ्या जनवर्गाच्या बाबतीत धार्मिक व सामाजिक संबंधाने अतिघोर अन्याय कैक शतके चालू राहून त्यास हीनदीन स्थिती प्राप्त झाली आहे. तीतून त्याचा उद्धार झाल्यावाचून आमच्या देशास खरी उन्नती प्राप्त होणार नाही. या गोष्टीविषयी अलिकडे कित्येक मोठ्या मनाच्या माणसास थोडेसे वाटू लागले आहे. आणि ह्या जनवर्गाच्या उद्धारासाठी त्यांच्याकडून थोडीसी खटपट चालू आहे. परंतु आपण ती हाती घेतल्यापासून तिला विशेष महत्त्वाचे व विशेष परिणामकारक असे स्वरूप येऊ लागले आहे. आणि आणखी काही वर्षे आपण आपले प्रयत्न चालू ठेवले तर ह्या प्रकरणी बरेच यश प्राप्त होणार आहे. आपल्यासारख्या खऱ्या कळकळीचा व समर्थ वाली ह्या जनवर्गास कधीही प्राप्त झाला नव्हता. आपण चालविलेल्या उद्योगामुळे आपणास ह्या वर्गाकडून देवासारखा मान मिळू लागला आहे. त्याची आपणावर निःसीम भक्ती बसली आहे. ह्या मानाला व विश्वासाला आपण सर्वतोपरी पात्र आहा. कारण त्यांच्या हिताप्रित्यर्थ वाटेल तो आत्मयज्ञ करण्यास आपण सर्वदा तत्पर असता. आपली योग्यता अतिशय मोठी असल्याकारणाने आपल्या वजनाचा, बुद्धिमत्तेचा व स्वहितपरतेचा परिणाम सर्व प्रकारच्या लोकांच्या मनावर उत्तम होत असतो. अशा योग्य व निश्चयी पुरूषाचा ह्या जनवर्गास राजकीय हक्क प्राप्त करून देण्याच्या कामी उत्तम उपयोग होणार आहे. लंडन येथील परिषदेत ह्या जनवर्गाच्या राजकीय हक्कांचे योग्य समर्थन आपल्या हातून अवश्य होणार आहे. ह्या वर्गाची वकिली आपण उत्तमप्रकारे बजावून तीत सुयश संपादाल अशी आम्हास उमेद आहे.

राजकीय बाबतीत आपल्या धोरणाची रूपरेषा नागपूर येथे थोड्या दिवसापूर्वी भरलेल्या अखिल भारतीय बहिष्कृत वर्ग परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून केलेल्या आपल्या भाषणात दाखविलीच आहे. ते धोरण एकंदर हिंदी राष्ट्र आणि अस्पृश्य मानलेले वर्ग यांच्या हिताचे आहे. याविषयी आमची खात्री आहे.

हीनदीन जनांचे कैवारी महाराज, आपण नुसती लंडनची यात्रा करूनच परत येणार नसून पूर्वोक्त जनवर्गाच्या उद्धारार्थ लागणारे द्रव्य सहाय्य मिळविण्याच्या उद्देशाने अमेरिका वगैरे देश फिरून तिकडील जगमित्रांच्या सहानुभूतीचा ओघ या अकिंचन जनवर्गाकडे वळविण्याचा प्रयत्न करणार आहा असे आम्ही ऐकतो. हा आपला उद्देश अत्यंत स्तुत्य होय. आपल्यासारख्या सुविद्य थोर व स्वार्थरहित पुरुषाला अमेरिकेसारख्या धनसंपन्न देशात आपला सदुद्देश खात्रीने चांगला सिद्धिस जाईल व स्वकीय जनांचे थोडेबहुत उर्जित साध्य केल्याचे आपणास सुयश प्राप्त होवो असे आम्ही मनापासून इच्छितो आणि “ जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा” ह्या साधुक्तीप्रमाणे आपण सर्वमान्य व सर्वपूज्य होऊन आपल्या जीविताचे साफल्य होईल.

शेवटी आम्ही असे मनःपूर्वक इच्छितो की, आपणास हा अत्यंत महत्त्वाचा प्रवास सुखाचा होवो व आपले आरोग्य कायम राहून आपण ज्या महत्त्वाच्या कामगिरीवर जात आहा ती यशस्वी रितीने पार पाडण्याचे सामर्थ्य आपल्या ठायी कायम राहो आणि आपण सुकिर्ती संपादून स्वदेशी सुखरूप येण्याची आम्ही उत्कंठापूर्वक वाट पाहात राहू.

मानपत्र वाचून झाल्यानंतर ते व थैली अध्यक्ष डॉ. सोळंकी यांच्या हस्ते अर्पण केली. डॉ. बाबासाहेब यांनी त्या दोहोंचाही स्वीकार केला.

नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानपत्रास उत्तर देण्यासाठी उभे राहिले परंतु त्याचा कंठ दाटून आल्याने सुमारे पाच ते सहा मिनिटे त्यांना काहीच बोलता येईना. नंतर त्यांनी आपल्या भाषणास सुरूवात केली. ते म्हणाले.

अध्यक्ष महाराज व बंधु भगिनींनो,
आजच्या प्रसंगी मी आपणास काय सांगावे हे काही सुचत नाही; कारण आता आपणा सर्वांची व माझी जवळ जवळ पाच ते सहा महिने भेट होणार नाही या विचाराने माझे हृदय भरून येत आहे. गेल्या दोन वर्षात माझ्याकडून जी काही थोडीफार कामगिरी झाली असेल, त्याला हजारो सद्गृहस्थांनी मदत केली नसती, तर माझ्या एकट्याच्या हातून काहीच झाले नसते. मी केलेल्या कामगिरीच्या वाट्यापैकी मुंबई कायदे कौन्सिलमधील कामात माझे मित्र डॉ. सोळंकी यांनी जास्त सहाय्य केले आहे. 1926 साली गव्हर्नरने मला बोलावून विचारले की, जर अस्पृश्य वर्गापैकी डॉ. सोळंकी यांना मुंबई कायदे कौन्सिलतर्फे निवडले तर त्यांचे व तुमचे कौन्सिलमध्ये जमेल किंवा नाही ? यावर मी उत्तर दिले की सोळंकी हे चांगले सुशिक्षित असल्याने कौन्सिलमध्ये आमचे जमेल. मी थोडासा उद्घट व रागीट असा आहे. कौन्सिलमध्ये असताना डॉ. सोळंकी यांच्याशी वागताना तसे दोष मजकडून घडले असतील. परंतु डॉ. सोळंकींनी मनात काहीएक न बाळगता मनोभावाने मदत केली आहे म्हणून कौन्सिलच्या सर्व कामाचे श्रेय डॉ. सोळंकी यांनाच आहे. कौन्सिल बाहेरच्या गोष्टीत समता संघाने मला फार मदत केली आहे. श्री. देवराव नाईक यांनी आजपर्यंत मला केलेल्या मदतीवरून मी त्यांना माझा उजवा हात मानतो. मला खात्री आहे की, जरी मी पाच ते सहा महिन्यांसाठी परदेशात जात असलो, तरी आमच्या एकमेकांच्या सहवासाने आमचे इतके तादात्म्य झाले आहे की माझ्या मागे श्रीयुत नाईकच काम करू शकतील. दुसरे माझे समता संघाचे स्नेही श्रीयुत प्रधान, कद्रेकर, कवळी इ. मंडळींनी बरीच मदत केली आहे. तसेच श्री. शंकरराव परशा यांनी पैशाच्या बाबतीत फारच मदत केली आहे. श्री. शंकरराव सारखा आधारस्तंभ दुसरा मला कोणीच नव्हता. सार्वजनिक कार्याला पैसा आवश्यक असतो परंतु सुरवातीस मी काढलेल्या सोलापूर बोर्डिंगच्या वेळी मजजवळ फक्त रूपये 500 हातात होते. नंतर एका ज्यू मित्रास रूपये 1,000 ची प्रॉमिसरी नोट लिहून देऊन या बोर्डींग संस्था सुरू केल्या आहेत. त्यात श्री. शंकररावांनी फारच मदत केली आहे. प्रेस घेण्यासाठी त्यांनी रूपये 1,800 ची मदत केली आहे.

आजपर्यंत अस्पृश्यवर्गासाठी जी थोडीबहुत कामगिरी मजकडून झाली आहे. तिच्या श्रेयाचे अनेक लोक वेगवेगळ्या कामातले सहकारी भागिदार आहेत. आपण दिलेली थैली व मानपत्र मी स्वीकारतो परंतु थैलीतल्या रकमेचा आपल्या खाजगी कामाकरिता मुळीच उपयोग करावयाचा नसून ज्या गरीब समाजाकडून ही थैलीची रक्कम जमा झाली आहे, त्याच गरीब जनतेच्या कार्यात तिचा उपयोग होणे इष्ट आहे. अखिल भारतीय दलित काँग्रेसच्या मध्यवर्ती संघटनेच्या खर्चाकरिता मुंबई इलाख्यातर्फे वर्गणी जमवून देण्याचे मी कबूल केले आहे. त्याकरिता सदरील रकमेचा काही भाग डॉ. सोळंकी यांचेजवळ ठेवून जाणार आहे. बहिष्कृत काँग्रेसकरिता त्यांनी सदर रकमेचा उपयोग करावा, बाकीच्या रकमेचा दुसऱ्या तऱ्हेने उपयोग करणार आहे. आपले बंद पडलेले बहिष्कृत भारत पत्र पुनः सुरू करावे अशी इच्छा आहे. सद्यःस्थितीचे निरीक्षण करून त्यावरील लेख सदर पत्रात येतील. पत्राचे नाव बदलण्याचा मी निश्चय केला आहे. कारण नावामुळे बरेच लोक आपले पत्र घेत नसत व आपले म्हणणे काय आहे हे सर्वांना समजावे हा जो आपला उद्देश तो साधला जात नसे. त्यासाठी नाव बदलण्याचे मी ठरविले आहे. पत्राचे नाव जनता ठेवून त्याचे संपादकत्व श्री. देवराव नाईक यांच्याकडे राहील. सदर पत्रास वर्गणीदार मिळवून देण्याची कृपा करावी, थैलीच्या रकमेतील काही भाग मी चालविलेल्या बोर्डींगांना मदत म्हणून द्यावा. याप्रमाणे थैलीच्या पैशाचा विनियोग केला जाईल. “राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी विलायतेस जाण्यायेण्याचा डॉ. आंबेडकरांचा खर्च जर इंग्रज सरकार देणार आहे, तर मग ही थैली कशासाठी ? असे आपल्यापैकी काही जणांना वाटणे स्वाभाविक आहे; परंतु ज्यावेळी मला आपल्या मदतीची जरूरी होती त्यावेळी सुद्धा जेथे मी आपल्या मदतीची अपेक्षा केली नाही त्या मला आज माझ्या खाजगी कार्यासाठी तुमच्या मदतीची जरूरी नाही. जेव्हा जरूर लागेल त्यावेळी मी अवश्य मदत मागेन.

मी राऊंड टेबल कॉन्फरन्सला जाणार आहे. या परिषदेपासून निदान अस्पृश्य वर्गाचा तरी फायदा झाल्याशिवाय राहाणार नाही. परंतु ज्या लोकांनी या परिषदेवर बहिष्कार घातला आहे. अशा लोकांना मी असे विचारतो की, जर दोन पक्षात लढाई जुंपली तर तहाची भाषा बोलणे काय वाईट ? आज सरकार व काँग्रेस यांच्यामध्ये निकराचा लढा चालू आहे. काँग्रेसच्या चळवळीमुळे सरकारचे नुकसान होते. असले दोन्ही पक्ष हट्टास पेटले असता कोणी तरी मध्यस्थी करून तडजोडीचा मार्ग काढून भांडण मिटविणे अवश्य आहे. हा तडजोडीचा मार्ग राऊंड टेबल कॉन्फरन्सद्वारे निघू शकेल, या परिषदेपासून काही निष्पन्न होणार नाही असे सांगण्यात येत आहे परंतु मला तसे वाटत नाही. ज्यांना ही परिषद अपेशी वाटत असेल, त्यांना मी असे विचारतो की, या परिषदेस अपयश कसे व का येईल ? सध्या हिंदू, मुसलमान व अस्पृश्य या सर्वांना स्वराज्य असावयास पाहिजे आहे. नुकत्याच नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय बहिष्कृत काँग्रेसने तसा ठरावही पास केला आहे. सर्वांची एकवाक्यता आहे. मतभेद एकाच गोष्टीवर आहे व ती ही की, स्वराज्य कोणत्या पद्धतीवर द्यावयाचे ! अल्पसंख्यांक लोकांचे संरक्षण होऊन त्यांना कोणत्या परीने सामाजिक, धार्मिक, राजकीय समता मिळेल. सर्व हिंदू मात्र स्वतंत्र असू शकतील असे स्वराज्य आज हवे आहे; परंतु वाद आहे तो स्वराज्याने मिळणारी सत्ता सर्व समाजामध्ये योग्यरीतीने विभागली जावी की एखाद्या विशिष्ट वर्गाच्या हातीच ती राहावी या संबंधाने आहे. दलित समाज, मागासलेले वर्ग व अल्पसंख्यांक वर्ग यांचे समाधान करण्याच्या कामी पुढारलेल्या वर्गाने व बहुसंख्यांक समाजांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखविला तर आपसातला वाद मिटणे अशक्य नाही.

आपल्याला आवश्यक ते मागेनच परंतु त्याचबरोबर या देशास स्वराज्य द्यावे असा ठराव आल्यास त्यास मी पाठिंबा देणार आहे. या देशाची सर्वतऱ्हेने उन्नती होऊन हा देश उच्च पदास चढावा हे काँग्रेसप्रमाणे आम्हासही वाटते. शेवटी राऊंड टेबल कॉन्फरन्स आटोपल्यानंतर दुसरे काम करू इच्छितो व ते हे की, लोकमत जागृत करणे. हे फार महत्वाचे काम आहे. काँग्रेसची चळवळ अमेरिका, जर्मनी इत्यादी सा-या देशभर होत आहे. तद्वतच आपल्या अस्पृश्यतेचे दुःख परक्यांच्या वेशीवर टांगले पाहिजे व म्हणून रशिया, जर्मनी, अमेरिका व जपान इत्यादी देशातील प्रमुख पुढा-यांच्या भेटी घेऊन आपले दुःख त्यांचेपुढे मांडीन. इतकेच नव्हे तर, जुळल्यास लीग ऑफ नेशन्सपुढेही अस्पृश्यांचा प्रश्न मांडणार आहे. तसेच अस्पृश्यांना सध्या पोलीस व लष्करी नोकरीत मज्जाव आहे तो काढून टाकण्यासाठी खास प्रयत्न करीन. मला आपणा सर्वांना शेवटची एकच विनंती करावयाची आहे व ती ही की, आपण सर्वांनी एकोप्याने व ऐक्यानी वागण्याचा प्रयत्न करावयास हवा आहे. आपणामध्ये आपापसात पुष्कळसे गट पडले आहेत. गेल्या दोन चार वर्षात एक अगदीच वाईट दृश्य माझ्या नजरेस पडले व ते हे की, दरेक मनुष्य स्वतःला पुढारी म्हणून मिरवू इच्छितो ही फार वाईट गोष्ट आहे. यापुढे हा प्रकार आपण बंद करावा अशी माझी विनंती आहे. आपल्यापुढे इतक्या अडचणी व कामाचे इतके डोंगर पडले आहेत की. त्यांचे निवारणार्थ एक जिल्हा किंवा एक इलाखा सुद्धा काही करू शकणार नाही. तेव्हा अखिल बहिष्कृत बंधुनी आपापसातील मतभेद बाजूला सारून खांद्यास खांदा लावून कार्यास लागावे, यातच आपले हीत आहे. माझ्या मागे डॉ. सोळंकी व श्री. नाईक यांच्या मताप्रमाणे वागून समाजात झालेली जागृती वाढीस लागण्याचे कार्य आपणा सर्वांवर सोपवून आपली रजा घेतो.”

हे विचार डॉ. आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. सभा संपल्यानंतर अस्पृश्य लोक तेथून बाहेर पडले. तेव्हा बाहेर जमलेल्या काही लोकांनी अस्पृश्यांवर हल्ला केला असे म्हणतात. परेल येथे अस्पृश्य व कॉंग्रेसच्या पक्षाचे लोक यांच्या दरम्यान बरीच मोठी मारामारी झाली. तीत दगड व लाठ्या यांचा उपयोग करण्यात आला. दंग्यात 8 माणसे जखमी झाली व त्यांना जवळच असलेल्या किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password