राजकारणात बोललेले जेव्हाच्या तेव्हा विसरले पाहिजे.
दिनांक 26 ऑक्टोबर 1938 रोजी मध्यप्रांत वऱ्हाड प्रांतातील कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या राजगृहात भेटले होते. कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर डॉ. आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना उद्देशून जो हितोपदेश केला होता, तो खाली दिला आहे. लेखक स्वतः त्या कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळात त्या प्रसंगी उपस्थित होते आणि डॉ. आंबेडकर जे काही बोलले ते लेखकाने नमूद करून ठेवले असल्यामुळे ते उद्धृत केले आहे.
कार्यकर्त्यांनी सकाळी 7 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली. त्यावेळी ते गंभीर व शांत दिसत होते. मुद्रेवर करारी बाणा दिसत होता. कार्यकर्त्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर आम्हाला उद्देशून ते बोलू लागले. त्यावेळी त्यांच्या भाषणातून कळकळीचे करारी उद्गार बाहेर पडताहेत असे आम्हास वाटत होते.
डॉ. आंबेडकर म्हणाले,
तुमच्या मध्यप्रांत वऱ्हाडच्या कौन्सिल इलेक्शनला जवळजवळ दीड वर्ष झाले. इतक्या दिवसात आपण काहीच करू शकलो नाही. तुम्हाला 20 जागा मिळवून दिल्या. त्यापैकी फक्त 7 जागा मिळाल्या. 13 जागांचे काहीच करता आले नाही. सात माणसात सुद्धा कधी आपलेपणा दिसून आला नाही. कधीच एकीचा संबंध राहिला नाही. आमच्या मुंबईत पहाल तर आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे काँग्रेसपेक्षाही उत्तम ऑर्गनायझेशन आहे. लोकजागृती आणि राजकारणातील संघटन हे दोन्ही कार्य निराळे.
इलेक्शन झाल्यानंतर आपण काय सभासद बनवले ? मागे मी केसच्या वेळेस आलो असताना चौकशी केली. तेव्हा पक्षाचे कोणी सभासद झाल्याची बातमी मिळाली नाही. तेथे स्वतंत्र मजूर पक्षाचे ऑफिस नाही. त्यात कोणी मनुष्य काही दाद मागण्याकरिता आला. त्याची काही तक्रार असेल, त्याची व्यवस्था करण्याची काहीच सोय नाही. तुमच्या जवळ पैसा नाही. पैशाशिवाय राजकारण कसे चालणार ! केवळ एखाद्या माणसावर पैशाकरिता अवलंबून राहिल्याने राजकारण चालू शकत नाही. आम्ही जे सभासद केले आहेत त्यात बरेच कायम सभासद आहेत म्हणूनच राजकारण आहे. तुम्ही असे काहीच केलेले नाही आणि मी सांगतो ते तुम्ही काही करीत नाही. मी फक्त मुंबईची जबाबदारी घेईल. मला मध्यप्रांत व-हाडबद्दल काय करायचे आहे. तुम्हाला जर काही कार्य करायच नाही तर मला तुमच्या प्रांताबद्दल काही कर्तव्य नाही. तुमच्या प्रांतात काही स्वार्थी, काही गोड बोलणारेही आहेत. काही कार्य करणारेही आहेत. परंतु आतापर्यंत काहीच झाले नाही. ते कार्य तुम्हास केले पाहिजे. तुम्हास कोणती तरी एक गोष्ट केलीच पाहिजे. एक तर मी सांगतो त्याप्रमाणे केले पाहिजे किंवा दुसरी गोष्ट मी जे केले आहे त्याप्रमाणे वागले पाहिजे. भाई जयवंतला ऑर्गनायझर नेमले आहे. तेव्हा त्यांच्याबरोबर सहकार्य करून तुम्ही कार्य केले पाहिजे. मग तुम्ही त्याला विरोध का करावा ? आपल्यात एक दोष आहे की एकदा भांडण झालं की ते भांडण पिढ्या न पिढ्या चालाव. राजकारणात बोललेल जेव्हाच्या तेव्हा विसरले पाहिजे. हरदास बद्दल मला आदर आहे. परंतु त्यांच्यात काही दोषही आहेत. हरदासने पाटलास तिकीट दिली नाही म्हणून पाटलांनीसुद्धा अस करायला नको.
आपण अल्पसंख्यांक लोक आहोत. बेडकी फुगली तरी बैलाएवढी होऊ शकत नाही. तेव्हा कोणाच्या जोडीला जोड लावल्याशिवाय राजकारण आपल्या हाती येऊ शकत नाही. पूर्वीची चळवळ आपल्या पुरतीच होती. आपणास ब्रिटिश सरकारकडून त्यावेळेस मिळवायचं होत. आता ब्रिटिश सरकार उरले नाही. आजच राजकारण बहुमताने चालणार आहे. बहुमत असल्याशिवाय राजकारण आपण काबीज करू शकत नाही. करिता बहुमत वाढवले पाहिजे. जयवंत बद्दल एवढा बाऊ का करता ? जयवंत काही कोणी राजा नाही. कोणीही उत्तम कार्य करत असतील तर उत्तम आहे. जर कोणी विरुद्ध कार्य करू लागले तर त्याला मी एका शब्दासरशी काढू शकेन, कोणीही स्वतंत्र मजूर पक्षाचा सभासद असल्यावर दुसऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाचा सभासद राहू शकत नाही. राजकारणाशिवाय समाजकार्य, धर्मकार्य वगैरे करू शकतात. अधिकारावर कोणी राहावे हे ठरवणे लोकांच कर्तव्य आहे. सभासदावर देखरेख करणारा लायक मनुष्य नाही म्हणून असा गोंधळ होत असावा. माझ्या हातून जर काही कमी जास्त झाल तर मला येथील लोक विचारावयास येतात. सत्याग्रह आपण करतो तो ज्या मनुष्यावर आपल प्रेम आहे त्या विरुद्ध मूल आईच्या विरुद्ध सत्याग्रह करते. डॉ. खरे यांच्या कडून मी कबूली जबाब लिहून घेतला आहे. “हे लोक (अस्पृश्य) अज्ञानी आहेत. त्यांना महत्त्वाकांक्षा नाहीत. मला अस्पृश्य मिनिस्टर घेतला असता, का घेतला ? व एक मिनिस्टर घेऊन त्यांच्या मनात तुम्ही महत्त्वाकांक्षा उत्पन्न केली.” असे म. गांधी म्हणाले.
तुम्ही सत्याग्रह केला होता त्यावेळेस अग्निभोज याने थोडा तरी भाग घेतला होता काय ? तो जर केवळ आपल्या हक्काकरिता भांडायला तयार नाही तर तुम्ही गांधींविरुद्ध सत्याग्रह का केला ? जो मनुष्य भांडायला तयार आहे त्याच्याकरिता भांडायला तयार होण हे कर्तव्य ठरत. तेथे जे स्वतंत्र मजूर पक्षाचे कार्य करण्यात येईल त्या बँचवर हेड ऑफिसचा कंट्रोल असायला पाहिजे. मी शिस्तीचा भोक्ता आहे आणि मी जवळ जवळ एक प्रकारचा डिक्टेटर आहे. पैशाच्या बाबतीत आपण अत्यंत प्रामाणिक असले पाहिजे.
दरेक जिल्ह्याचे पाच पाच सभासद आणून त्यांची सभा घ्या. त्यात सातही एम. एल. ए. लोकांना बोलवा व सर्व मिळून स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन करा. कॉंग्रेस ही भरभक्कम पायावर उभारलेली संस्था आहे. त्यापुढे आपले काहीच चालत नाही. त्यांचे बहुमत असल्यामुळे आपणास काहीच करता येत नाही. म्हणून त्यांच्यात फूट पाडणे आपले कर्तव्य आहे. डॉ. खरे हा शत्रु पक्षाचा एक दगड आहे. तो पाडण्याचा मी प्रयत्न केला.
पक्षाच्या सभासदांचे पैसे एका माणसाजवळ ठेवू नये. पैसा दोन किंवा पाच माणसांच्या नावाने बँकेत ठेवायला पाहिजे. पक्षाच्या कामाकरिता एक सेक्रेटरी नेमा ! (हे काम तर झालंय) ऑफिस करिता एक घर घ्या. जो फॉर्म आहे त्यावर महिन्यास जी वर्गणी होईल ती लिहून पाठवा. तुम्ही सुरळीत कार्य सुरू केलं की जनता पत्रात सी. पी. व बेरार करिता दोन पाने रिझर्व ठेवू. आताची एक तात्पुरती कमेटी नेमा आणि नंतर इलेक्शन होईल. प्रचारकाच्या कामाकरिता निरनिराळ्या लोकांकडे निरनिराळे विभाग द्यावे. स्वतंत्र मजूर पक्षाच्या राजकारणाकरिता सभासद जास्त वाढवून संघटन करणे अत्यंत आवश्यक आहे.
ज्या माणसाच्या हाती सत्ता जाते तो मनुष्य उत्तम निवडून दिला पाहिजे. समाजकार्य कशात आहे. समाजाचे हित कशात आहे. कोणत्या गोष्टीची समाजाकरिता आवश्यकता आहे. ही जाणीव त्याला असली पाहिजे. कार्य करणारे अव्वल दर्जाचे लोक निवडून न देता त्या ठिकाणी जर कोणी आपले नातलग म्हणून भरती करू लागले तर काहीही कार्य होणार नाही. जाहीर सभेत आपल्या मनुष्याबद्दल मतभेद जरी असला तरी सुद्धा आपला पक्ष लंगडा पडू शकणार नाही असं प्रत्येक सभासदाचे वर्तन असले पाहिजे.
पक्षाचे सभासद बनवा व एक मध्य प्रांताचा नकाशा काढून मला पाठवा. नकाशात जिल्ह्या जिल्ह्याचे विभाग दाखवून त्यात आपले मतदार किती व सर्वसाधारण मतदार किती, कोठे जागा रिझर्व आहेत व कोणत्या ठिकाणी इलेक्शन लढवावे लागतात. ही सर्व माहिती त्यात भरून मला पाठवा, म्हणजे पुढील व्यवस्था कशा तऱ्हेची असावी हे ठरवावयास अगदी सुलभ जाईल.