Categories

Most Viewed

22-23 ऑक्टोंबर 1938 भाषण

माझी महात्माजींची भेट झाली तेव्हा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अहमदाबादेस येणार हे कळल्याबरोबर अहमदाबादच्या काही काँग्रेस श्रेष्ठींच्या अंतःकरणाची तगमग होऊ लागली आणि वाटेल ते करून त्यांच्या येण्याला प्रतिबंध करण्यासाठी म्हणून टेलिग्राम-टेलिफोनद्वारा मुंबईशी बरीच गुफ्तगू झाली. त्याचा काहीच उपयोग न होता ते येणारच असे पाहिल्यावर खुद अहमदाबादेत त्यांचा धिःकार आणि निषेध करण्याचे निष्फळ प्रयत्न झाले.

तारीख 22-23 ऑक्टोबर 1938 या दोन दिवसांच्या अहमदाबाद येथील मुक्कामात डॉक्टरांच्या सत्कारांचे आणि व्याख्यानांचे निदान पंधरा तरी समारंभ झाले असतील. त्यांचे सगळेच कार्यक्रम चढाईचे दणदणीत झाले. गुजरात व्हर्नाक्युलर सोसायटीच्या प्रेमाभाई हॉलमधला समारंभ चालू राजकारणाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा झाला. त्या ठिकाणी दलित नवयुवक मंडळाच्यावतीने मिळालेल्या मानपत्राला उत्तर देताना त्यांनी जे भाषण केले ते अतिशय जोरदार, कळकळीचे आणि अत्यंत उद्बोधक होते. त्यातला काही भाग नमूद होऊन सर्वांच्या वाचण्यात येणे फार महत्त्वाचे आहे.

आपण गांधींचे विरोधी आहो आणि आपण काँग्रेसला येऊन मिळत नाही या दोन आरोपांना उत्तरे देताना ते म्हणाले.

माझ्यावर असा आरोप आहे की, मी गांधींचा विरोधक आहे. मी त्यांना मानीत नाही. अगदी खरे आहे. मी गांधींचा विरोधकच आहे आणि ही गोष्ट मी गुजरातच्या या पाटनगरात, गांधीवादाच्या बालेकिल्ल्यात आपणा सर्वांच्या समक्ष जाहीर रीतीने सांगतो. हे सांगताना मला बिलकूल दिक्कत वाटत नाही. मला हे ठाऊक आहे की, गांधींच्या विरुद्ध बोलणे ही गोष्ट हलकी-सलकी नाही. आज कोट्यावधी लोक त्यांना अवतारी पुरूष मानीत आहेत. जगापुढे ते हिंदुस्थानचे एकमेव प्रतिनिधी म्हणून मिरवीत आहेत. ते साधू महात्मा समजले जात आहेत. गांधींच्या पायाशी गोंडा घोळून त्यांच्यापुढे ‘ जी हुकूम ‘ करण्यात काय फायदा होतो हे काय मला ठाऊक नाही ? सुभाष बोसकडेच पहा. 1932 साली विठ्ठलभाई पटेलांच्या हाताला हात लावून यांनी गांधींबद्दल काय म्हटले होते ?

महात्मा गांधींनी कायदेभंगाची चळवळ तहकूब केल्याचे ऐकून आश्चर्य वाटले. म. गांधींनी आजपर्यंत राष्ट्राकडून झालेल्या भरीव कार्यावर लेखणीच्या एका फटकाऱ्याने काळीमा फासला आहे. गेल्या 13 वर्षात विलक्षण स्वार्थत्याग व आत्मयज्ञ करून हिंदी राष्ट्राने आपल्या चळवळीची कमावलेली किर्ती व इभ्रत महात्माजींच्या या चळवळ तहकुबीच्या खुलाशाने पार घालविली आहे. त्यांना अशा चळवळी मध्येच तहकूब ठेवण्याचा काय हक्क आहे हे अजूनही मला समजलेले नाही. एकदा नेपोलियनने आय अँम दी स्टेट (I am the State) असे उद्गार काढले होते. आज गांधी आय अँम दी काँग्रेस (I am the Congress) असे लोकांना अप्रत्यक्ष रीतीने सांगत आहेत. सविनय कायदेभंगाची चळवळ तहकूब ठेवणे म्हणजे सध्याचा काँग्रेसचा कार्यक्रम अयशस्वी झाला अशी कबुली देण्यासारखे आहे. महात्मा गांधी राजकीय पुढारी या दृष्टीने अयशस्वी ठरले आहेत असे आमचे व्यक्तिशः मत आहे. गांधींना अशा शिव्या देणारे हे गृहस्थ आज राष्ट्रभक्त आहेत. हा कायापालट होण्याचे कारण त्यांनी मागाहून पांघरलेली गांधी भक्तीची झूल. वर्गणीचे चार आणे आणि पांढऱ्या टोपीचे दोन आणे खर्चून मी काँग्रेसमध्ये जाईन तर मी मागेन तो मान मला मिळेल हे मला ठाऊक आहे. पण असला मान मी ठोकरेने उडवतो. मी गांधींचा विरोध का करतो ? मी गांधींचा विरोध करतो तो माझ्या स्वार्थासाठी करीत नाही, हा महात्मा विश्वासघातकी आहे म्हणून मी त्याला विरोध करतो. त्यांच्या विश्वासघातकीपणाचा माझ्याजवळ भरपूर पुरावा आहे. त्याचा मला माझ्या कार्यात प्रत्यक्ष अनुभवही आलेला आहे. म्हणून मी त्यांना विरोध करतो आणि करीत राहीन.

गांधींना मी विश्वासघातकी का म्हणतो हे मी तुम्हाला सांगतो. राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी हिंदुस्थानातील दलितवर्गाचा प्रतिनिधी म्हणून इंग्लंडला जाण्यापूर्वी मी गांधींना भेटलो होतो. त्यावेळी ते म्हणाले होते की अस्पृश्यांना स्वतंत्र जागा देण्याच्या मी विरुद्ध आहे. तथापि, अधिक बोलणे झाल्यावर त्यांनी कबूल केले की इतर अल्पसंख्य गटांच्या प्रतिनिधींनी अस्पृश्यांच्या मागण्या मान्य केल्या तर आपण त्यांच्या आड येणार नाही. पुढे आम्ही विलायतेत गेलो. दुस-या वर्तुळ परिषदेला गांधीही आले. मी ज्या कामासाठी गेलो होतो. त्यासंबंधी चर्चा चालल्याच होत्या. एक दिवस सरोजिनीबाईंनी मला गांधींच्याकडे नेले. त्यांना अस्पृश्यांचे म्हणणे काय आहे ते समजून घ्यायचे होते. वेळ रात्री 10 ची होती. आम्ही पोचलो तेव्हा गांधी चरखा फिरवीत बसले होते. मला काही सांगावयाचे होते ते मी सांगितले. माझे बोलणे चालू होते. गांधींचा चरखा चालू होता. मी दीड तास तिथे होतो, तेवढ्या अवकाशात गांधी एक शब्दही माझ्याशी बोलले नाहीत. शेवटी त्यांचे चरख्याचे चक्र थांबल्यानंतर आम्ही उठलो. तेव्हा गांधी मला एवढेच म्हणाले, मी तुमचे बोलणे ऐकले आहे. मी त्याचा जरूर विचार करीन. मी निघून आलो.

पुढे एकदा निरोप आला की गांधींनी सर्व अल्पसंख्य प्रतिनिधींना बोलावले आहे. आम्ही सगळे गोळा झालो. तिथे मग नामदेवाच्या लग्नात जरी एकाने व्याह्या कडच्या प्रत्येक माणसाला विचारले होते, तुम्हाला काय पाहिजे ? तुम्हाला काय पाहिजे तसे गांधींनी आमच्यापैकी प्रत्येकाला विचारले. ज्यांनी त्यांनी आपल्या मागण्या त्यांच्यापुढे मांडल्या. सगळे ऐकून घेऊन गांधी संथपणे म्हणाले. मी तुमचे म्हणणे ऐकले आहे, मी सगळ्या गोष्टींचा नीट विचार केला आहे. मला अस्पृश्यांना काही द्यायचे नाही. ‘

अल्पसंख्य प्रतिनिधींची (मायनॉरिटी कमिटीची) रीतसर बैठक भरली. मॅक्डोनाल्ड अध्यक्षस्थानी होते. कामकाजाला सुरूवात व्हायच्या आधी मुसलमानांनी तहकुबीची सूचना आणली. कारण काय तर त्यांना गांधींशी काही खाजगी चर्चा करायची होती. मी आश्चर्याने स्तंभित झालो. मला या घटनेचा अर्थच कळेना. मी उठलो आणि तहकुबीला विरोध केला. मी म्हटले, “जर ही चर्चा अल्पसंख्यांकांच्या हक्कासंबंधी असेल तर ती एकट्या गांधींशी खाजगी काय म्हणून ? तीत आम्हाला बोलावणे का नाही ? खाजगी भेटी-गाठी यापूर्वीही झालेल्या आहेत. जर ही चर्चा अस्पृश्यांच्या मागण्यासंबंधी असेल तर ती आम्हाला वगळून का यासंबंधी गांधींनी आपले म्हणणे स्पष्ट केले पाहिजे.” त्यावर अध्यक्षांनी गांधींना त्यांचे यासंबंधी काय म्हणणे आहे असे स्पष्ट विचारले तेव्हा गांधी म्हणाले, “मला स्वतःला अस्पृश्यांना काहीही द्यायचे नाही. पण इतर अल्पसंख्य प्रतिनिधींनी जर अस्पृश्यांच्या मागण्या मान्य केल्या तर त्यांना मी विरोध करणार नाही.” या गोष्टी मी आपल्या मनाच्या सांगत नाही. राऊन्ड टेबल कॉन्फरन्सच्या प्रोसिडिंग्ज मध्ये त्या नमूद आहेत. वाटेल त्याला पहायला मिळतील. शेवटी माझ्या विरोधाचा उपयोग न होता सभा तहकूब झाली.

त्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्या, त्यानंतर गांधींनी ज्या काही गोष्टी केल्या त्या माझ्या काळजावर डागल्या गेल्या आहेत आणि त्यामुळेच माझी खात्री पटली की गांधी विश्वासघातकी मनुष्य आहे.

अल्पसंख्य समितीच्या सभेत वरील प्रकारचे भाषण केल्यानंतर या महात्म्याने काय केले असेल? आपलाच हेका तडीस नेण्यासाठी त्यांनी आपल्या मते एक नामी युक्ती शोधून काढली. त्यांनी एक कुराणाची प्रत मिळविली, तिची पाने चाळली आणि एक मनाशी ठरवून रिट्झ हॉटेलमध्ये ना. आगाखानांच्या मुक्कामी मुसलमानांची खाजगी सभा चालली होती तिथे ते गेले आणि कुराणाची प्रत त्यांच्यासमोर धरून ते म्हणाले, ” हे पहा तुमचा धर्मग्रंथ काय सांगतो. कोणत्याही समाजात फूट पाडणे पवित्र इस्लाम धर्माला विहित आहे काय ? ते म्हणाले नाही. गांधी म्हणाले, “तर मग तुम्ही एक फार मोठे अधर्म्य कृत्य करीत नाही काय ? अस्पृश्यांच्या मागण्यांना मान्यता देऊन तुम्ही हिंदुसमाजात फूट पाडीत आहात हे तुमचे कृत्य इस्लाम धर्माच्या विरुद्ध आहे ते लोक म्हणाले, पण गांधीजी, यात धर्माचा संबंध काय ? हा प्रश्न राजकीय हक्कांचा आहे. आम्ही अस्पृश्यांपेक्षा अधिक संपन्न अधिक सुस्थित अधिक प्रगत असून काही राजकीय हक्कांकरता झगडत आहो. आम्हाला आणि इतर अल्पसंख्य समाजांना जे हक्क मागण्याचा आणि मिळवण्याचा अधिकार आहे ते हक्क अस्पृश्यांना देणे रास्त आणि सरळ आहे. यात अधर्म्य ते काय ?

कुराणाच्या मागे दडून केलेला हा वार फुकट गेलेला पाहून आणि अधिक बेशरम प्रयोग केला. ते म्हणाले. बरं असो. मागण्या तुम्हाला तर हव्या आहेत ना ? अलबत.. दुसरा तुमच्या चौदा मागण्या हव्या आहेत. मग मी त्या तुम्हाला मिळवून देतो. मात्र तुम्ही माझे काम केले पाहिजे, तुम्ही जर कमिटीच्या सभेत अस्पृश्याच्या मागण्या नाकाराल तर मी तुमच्या चौदाच्या चौदा मागण्या स्वीकारल्या जातील असे करीन.

अस्पृश्यांना काहीही द्यायचे नाही ही आपली बैठक धरून बसण्याकरिता हा महात्मा कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो हे पाहिल्यानंतर त्यांच्यावर कोणाचाही विश्वास बसेल काय ? मुसलमानांशी त्यांनी केलेल्या या कराराचा मसुदा माझ्याजवळ आहे. तो मी माझ्या पुस्तकात प्रसिद्धही करणार आहे. मी नुसत्या वा-यावरच्या गोष्टी बोलत नाही.

माझ्यावरचा आणखी एक आरोप म्हणजे मी काँग्रेसला मिळत नाही. गोष्ट खरी आहे. काँग्रेसला जाऊन मिळण्याने काय काय लाभ होतात याची थोडीशी कल्पना मी दिली आहे. मी काँग्रेसला मिळावे यासाठी प्रयत्नही करण्यात आलेले आहेत. त्यापैकी एकासंबंधी मी सांगतो. म्हणजे काँग्रेसला जाऊन मिळण्याचे रहस्य काय असते ते तुम्हाला कळून येईल. 1935 साली एकदा माझ्या एका मित्राने मला आग्रह करून गांधींकडे वर्ध्याला त्यांचा माझा सलोखा घडवून आणण्यासाठी नेले. मला माहीत होते की या जाण्याचा काही उपयोग होणार नाही. पण मित्राच्या भिडेखातर मी गेलो. शेगावला गांधींची भेट झाली आणि माझाच अंदाज खरा ठरला. आम्ही परत वर्ध्याला शेठ जमनालालजीकडे आलो. त्याठिकाणी पुन्हा काही मंडळी माझे मन वळवण्याचा प्रयत्न करू लागली.
जमनालालजी म्हणाले, “देखो डॉक्टरसाब, आप बड़ी भूल कर रहे हो.”
मी म्हटले, “ते कसे काय ?”
ते म्हणाले. “पहा, काँग्रेसला येऊन मिळून तुमचे किती हित होईल ते. अस्पृश्योद्धाराची चळवळ आम्ही तुमच्या हाती देऊ. तुम्हाला माहिती आहे पूर्वी आमच्या मारवाडी समाजाबद्दल लोक काय म्हणत असत ? हे लोक समाजाच्या जळवा आहेत. कुळांच्या घरादारावरून नांगर फिरवणारे, उलट्या काळजाचे बदमाश आहेत. पण आज! आज मारवाडी राष्ट्रपुरूष आहेत. जिथे तिथे त्यांची शेखी आहे. याचे कारण काय ? याचे कारण आज आम्ही काँग्रेसला मिळालो आहो. तुम्ही काँग्रेसला मिळा. तुम्हीही राष्ट्रपुरुष व्हाल.”
मी म्हटले “हे कसे शक्य आहे ? माझा गांधींवर विश्वास नाही, त्यांच्या कार्यावर विश्वास नाही. माझे त्यांच्याशी मतभेद आहेत. मी कॉंग्रेसमध्ये येऊन त्यांच्याबरोबर कसे काम करणार ?”
“यह कोई बड़ी बात नही, मतभेद असला म्हणून काय झाले ? जवाहरलाल नेहरू पहा. त्यांचेही गांधींशी मतभेद आहेत. पुष्कळ बाबतीत त्यांच्या झटपटीही होतात. पण ते मधूनमधून गांधी माझे गुरू आहेत असे म्हणत असतात. तसेच तुम्हीही केलेत म्हणजे झाले. फिर सब बात ठिक होयेगी.”

मी हसून म्हणालो, “एखाद्यावर आपला विश्वास असला म्हणजे मतभेद असला तरी त्यांच्याबरोबर काम करीत राहाता येते. पण माझा गांधींवर विश्वासच नाही. मग अधूनमधून तरी त्यांना गुरू कसे म्हणणार आणि त्यांच्याबरोबर काम कसे करणार ?”

त्यावरच बोलणे थांबले. मग परत गांधींचा निरोप घ्यायला म्हणून आम्ही शेगावला गेलो. तिथे गेल्यावर मी पाहातो तो माझ्या आधीच वर्ध्याच्या संभाषणाची हकीकत शेगावला पोचलेली! मी तिथे पोचून गांधींच्या समोर जाताच महादेव देसाई गांधींना म्हणाले, खबर छे बापूजी, डॉक्टरसाहेब सूं कहे छे ? “काय म्हणतात ?” गांधींनी विचारले. गांधींच्या समोर मी माझे त्यांच्यासंबंधीचे मत सांगायला कचरेन असा भाव दाखवून महादेव देसाई म्हणाले, “ते म्हणतात की तुमच्यावर त्यांचा विश्वास नाही म्हणून ते तुमच्याबरोबर कार्य करायला तयार नाहीत.”

गांधींनी माझ्याकडे प्रश्नार्थक दृष्टी टाकली. मी म्हणालो, “खरे आहे अगदी. माझा तुमच्यावर मुळीच विश्वास नाही. आज काँग्रेस पैसेवाल्यांची मिंधी झालेली आहे आणि तिच्याकडून खरोखर लोकहिताची कामे होणे अशक्य आहे. आजच्या परिस्थितीत काँग्रेसमध्ये शिरून कोणताही चढाईचा किंवा लढाईचा कार्यक्रम हाती घेता येणार नाही. म्हणून आपण तीत शिरत नाही.”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password