Categories

Most Viewed

29 नोव्हेंबर 1944 भाषण

बुद्धाच्या वेदांवरील हल्ल्यामुळेच शूद्रांचा सेवाधर्म जावून ते राज्यकर्ते झाले. 

   डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 29 नोव्हेंबर 1944 रोजी सायंकाळी अखिल भारतीय दलित फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी श्री. पी. एन. राजभोज यांनी पुणे येथे चहापार्टी दिली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,

   आज भाषण करण्याची माझी इच्छा नव्हती. एकाने मी सर तेजबहादूर सप्रू यांच्या योजनेवर अभिप्राय द्यावा अशी सूचना केली. परंतु त्या बाबतीत येथे बोलण्याची माझी इच्छा नाही. मी मद्रासमध्ये गीतेसंबंधी जे बोललो त्याबद्दल पुण्यातील ब्राह्मणांनी नापसंती व्यक्त केली आहे. त्याला उत्तर देणे उचित वाटते. माझे म्हणणे समजून घेण्यासाठी एखादी जाहीर सभा पुण्यात घेतली गेली असती तर तेथे मी माझी बाजू मांडली असती. पण तशी संधी न मिळाल्यामुळे या समारंभ प्रसंगीच मी आपले म्हणणे मांडतो.

   वेद हे ईश्वरनिर्मित आहेत, अपौरुष आहेत, त्यांची आज्ञा मानावी, असे सांगण्यात येते. पण त्याला इतिहासात कोठे पुरावा नाही. ब्राह्मणांखेरीज कोणीच वेदाला प्राधान्य दिलेले नाही व आपला धर्मग्रंथ म्हणून कधीच मानलेले नाही. वेदाला प्रमाण मानणे ही ब्राह्मणांनी मागाहून आणलेली पद्धती, 'थीअरी' आहे. याचा पुरावा आश्वलायन गृह्य सूत्रातून भरपूर मिळतो. त्यावेळी ब्राह्मणही वेदाला प्रमाण मानीत नव्हते, याचा स्पष्ट उल्लेख आहे. सामाजिक मूल्ये निर्माण करण्यापूर्वी जनता पंचायतीचा निर्णय ग्राह्य मानीत असत. त्यावेळी वेदाला चौथे किंवा पाचवे स्थान असे. शबर स्वामींनी जनमेजयाची सूत्रे घेऊन त्यावर भाष्य केले आहे. त्यात पूर्वपक्ष व उत्तरपक्ष मांडले आहेत. पूर्वपक्षात वेदासंबंधी उल्लेख आला असून वेदविरोधकांची बाजू मांडलेली आहे. शबर स्वामींनी ब्राह्मण वेद मानीत नव्हते, असेच म्हटले असून वेद निर्मिती म्हणजे मूर्खाचे व वेड्यांचे कार्य होय असा दावा मांडला आहे. बुद्धांनी वेद प्रमाणभूत कधीच मानले नाहीत. वेदप्रणित धर्मास बुद्धधर्माने धक्का दिला. हा बुद्धधर्म शूद्रांचा होता व तो वेदप्रामाण्य कधीच मानीत नव्हता.

   मी गीता न वाचता टीका करतो अशी टीका केली जाते. पण ती टीका खोटी आहे. गेली पंधरा वर्षे गीतेचा अभ्यास केल्यावरच माझी मते मांडण्यास मी सुरवात केली.

   गीतेत विशेष असे काही नाही. तीत प्रामुख्याने तीन गोष्टी सांगितल्या आहेत. मरणे, मारणे, हिंसा करणे पाप आहे काय, वर्णाश्रम धर्माची महती व भक्तीने मोक्ष मिळेल, ह्या त्या तीन गोष्टी होत. गीतेचा अभ्यास करताना निव्वळ गीता पुस्तकावर अवलंबून गीतेचा अर्थ कळणार नाही तर त्या कालीन इतर वाङ्मयाचाही अभ्यास करून गीतेचा अर्थ लावला पाहिजे.

   या देशाचा पूर्वीचा इतिहास ध्यानात घेतला म्हणजे जवळजवळ दोन हजार वर्षे ब्राह्मणवर्ग व बुद्धधर्म यांचा वाद चालू होता. या वादात जे वाङ्मय निर्माण झाले ते धार्मिक स्वरूपाचे नसून राजकीय स्वरूपाचे आहे. देशातील सत्ताकेन्द्रावर आपली हुकूमत चालावी म्हणून गीता ग्रंथाचा जन्म झाला.

   वेदातील थोडाफार अनुवाद गीता ग्रंथात करण्यात आला आहे. परंतु वेदात तरी असे कोणते ज्ञान साठविले आहे ? खरे पाहिले तर वेद दोनच आहेत. एक ऋग्वेद व दुसरा अथर्ववेद, मी वेद किती तरी वेळा वाचले आहेत. त्यात समाजाच्या किंवा मानवाच्या उन्नतीसाठी व नीतिमत्तेस पोषक असे काही सांगितलेले नाही. अथर्ववेदात, बायको प्रेम करीत नसली तर काय करावे, दुसऱ्याची बायको कशी वश करावी, द्रव्यहरण कसे करावे हे सांगितले असून जारण मारणादी गोष्टींचाही उल्लेख आहे. वास्तविक वेदांसारख्या ग्रंथात या विषयांची काय जरुरी होती ? यातील पुरुष सूक्तात ब्राह्मणांपासून शूद्रांपर्यंत कोणी कसे वागावे हे दिले आहे. बुद्धाचा याचबाबत कटाक्ष होता व त्याच दृष्टीने चातुर्वर्ण्याबद्दल त्यांनी टीका केली आहे. क्षत्रियांनी मारणे हे त्यांचे कर्तव्य आहे असे सांगितले आहे. एकाने दुसऱ्याला मारणे हे जरुरीही असू शकेल, पण कर्तव्य ठरणार नाही. गीतेच्या दुसऱ्या अध्यायात 18 ते 39 श्लोकात वेदान्ताचा आधार घेऊन आत्मा अविनाशी आहे, देह जरेने किंवा अन्य कारणाने नाहिसा होणारच, असेच विवरण केलेले आढळेल. परंतु विचार करा की एखाद्या खुनी खटल्यात वकिलाने जज्जास असे सांगितले की 'साहेब आत्मा अविनाशी आहे. तेव्हा खुनाबद्दल आरोपीस का शिक्षा करता ? तर हे वकिलाचे म्हणणे कसे दिसेल ?

   बुद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानापुढे हा पुरावा टिकणे शक्य नव्हते. बुद्ध तत्त्वाने सामाजिक, मानसिक व राजकीय क्रांती करुन शूद्रांना उच्चपद प्राप्त करुन दिले. त्याकाळी अनेक शूद्र राजे झाल्याचे दाखले आहेत. आपल्या हातातील सत्ता गेल्यामुळे ब्राह्मणांनी पुन्हा चातुर्वर्ण्य पद्धतीचा पाया घालून भगवद्गीतेच्याद्वारे ते काम केले व देशाची आपल्या हातून गेलेली सत्ता पुन्हा परत आपल्या हातात आणली.

   वर्णाश्रम धर्माचा गीतेपूर्वी काय पाया होता तो जैमिनीने आपल्या पूर्वमीमांसा ग्रंथात दिला आहे. वेदावर बुद्धानेच नव्हे तर चार्वाक वगैरे विद्वानांनीही टीका केलेली आहे. बुद्धाच्या वेदावरील हल्ल्यामुळेच शूद्रांचा सेवाधर्म जावून राज्यकर्ते झाले.

   सांख्य तत्त्वज्ञानावर श्रीकृष्णाने चातुर्वर्णाची चौकट निर्माण केली. सांख्यकारांनी त्रिगुणाला मान्यता दिलेली आहे आणि गीताकारांनी चार गुण, चार वर्ण यांची सांगड घातलेली आहे. आतापर्यंत एकाही विद्वानाने सांख्यकारांच्या व गीताकारांच्या या तफावतीचा मेळ बसविलेला नाही. श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेने चातुर्वणांस आधार दिला म्हणूनच आज चातुर्वर्ण्य टिकून राहिला आहे.

   भगवद्गीतेचा ऐतिहासिक दृष्टीने अभ्यास करताना मला या पुस्तकात चार ठिगळे बसविल्याचे आढळून आले. माझे मत असे आहे की प्रथम हा एक कृष्ण वर्णनाचा त्याच्या जातभाईनी म्हणजे सातवतानी गवळ्यांनी, अर्जून हतवीर्य झाला असताना कृष्णाने त्याला युद्धप्रवण केले म्हणून कृष्णाचे गुणगान करण्यासाठी रचलेला पोवाडा होता. त्यात धर्म अगर तत्त्वज्ञान नव्हते. त्यावेळी त्यात फक्त 60 श्लोक असावेत. नंतर हे लोक जेव्हा कृष्णाला ईश्वर मानू लागले त्यावेळी त्यांनी गायिलेली स्तुती म्हणजे भक्तिमार्ग झाला व अशारीतीने कृष्णाला देव बनविला. नंतर पुढे गीतेचे असेच रूपांतर होऊन ती आजच्या स्वरूपात आली. यात मला कोणाला दोष द्यावयाचा नाही. परंतु जोपर्यंत तुम्ही हे ग्रंथ प्रमाण म्हणून मानाल तोपर्यंत जगात तुमचा उद्धार होणार नाही. या पुस्तकातून शूद्रांची निंदा व अवहेलना करण्यात आली आहे. त्यांच्यावर निरनिराळे आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होईल. ते कायमचे दलित राहतील, अशी योजना करण्यात आली आहे. ती पुस्तके जर तुम्ही आम्हाला धर्मग्रंथ म्हणून प्रमाणभूत माना अशी सक्ती करीत असाल तर ते मी कधीही मान्य करणार नाही. हे माझे एक जीवन कार्य आहे. स्वतः समजावून घेऊन ते मला माझ्या लोकांना समजावून द्यावयाचे आहे. खालच्या वर्गातील लोकांना निःसंतान करण्याचा, त्यांना कायमचे पायदळी ठेवण्याचा व त्यांना रसातळाला नेण्याकरिता पद्धतशीर प्रयत्न करणारा असा एखादा विशिष्ट वर्ग जगातील इतर कोणत्याही देशात आढळणार नाही. 

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*

  Forgot Password