मी नदीच्या प्रवाहालाच वळविणाऱ्या भक्कम खडकासारखा आहे.
मोहल्ला रामदासपुरा (बुटान मंडी) जालंदर येथे दिनांक 27 ऑक्टोबर 1951 रोजी पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. ते म्हणाले,
बंधु आणि भगिनींनो,
यापूर्वीही अशा प्रकारच्या कार्यक्रमांची आखणी करून त्या कार्यक्रमात मी सहभागी व्हावे अशी अपेक्षा तुम्ही अनेकदा केली आहे. परंतु मुख्यतः मध्यवर्ती सरकारच्या मंत्रीपदाच्या जबरदस्त जबाबदारीमुळे व माझ्या ढासळल्या प्रकृतीस्वास्थ्यामुळे मी आपल्या कार्यक्रमात यापूर्वी सहभागी होऊ शकलो नाही. याबद्दल सुरुवातीसच मी आपली क्षमा मागतो. मला असे सांगण्यात आले की माझे भाषण ऐकण्यासाठी यापूर्वी आपण अनेकदा येथे गोळा झालात. परंतु निराश होऊन तुम्हास परत जावे लागले आहे. म्हणून तुम्हाला हा जो त्रास झाला व निराश व्हावे लागले त्याबद्दल मी तुमची क्षमा मागू इच्छितो.
तुम्हाला माहीतच आहे की, मागील चार वर्षे मी केंद्रीय सरकारात एक मंत्री होतो आणि भूतकाळातील कोणत्याही विधी मंत्र्याला जेवढा कामाचा बोजा सहन करावा लागला नसेल किंवा भविष्यातील कोणत्याही विधी मंत्र्याला सहन करावा लागणार नाही इतका कामाचा बोजा मला सहन करावा लागत होता. मी दौरा काढू शकलो नाही याचे हे एक कारण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माझे प्रकृतिस्वास्थ्य ठीक नाही. आतासुद्धा माझी प्रकृती पूर्णतः ताळ्यावर आलेली नाही. माझ्या तब्येतीनेही माझ्या दौ-यात अडथळा निर्माण केला. तिसरी आणि शेवटची बाब म्हणजे या देशाच्या सर्व भागांमध्ये अस्पृश्य लोक आहेत. प्रत्येक तहसील, जिल्हा आणि प्रांतात जर मी दौरा काढण्याचे ठरविले तर चार किंवा पाच वर्षातही हा दो-याचा कार्यक्रम संपविणे मला शक्य होणार नाही. मी तुमच्या गावाला भेट देऊन तुमच्याशी हार्दिक संवाद करावा असा तुमचा माझ्यावरील प्रेमापोटी आग्रह असतो. यामागील माझ्यासंबंधी असलेली तुमची प्रेमभावना मी जाणतो. परंतु सर्व ठिकाणी जाणे मला असंभव आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने स्वयंनिर्भर होऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि अशातऱ्हेने स्वतंत्र सामाजिक जीवन जगावे अशी माझी अपेक्षा आहे.
माझ्या वयाची 60 वर्षे मी पूर्ण केली आहेत. मी जर सरकारी नोकरीत असतो तर सेवानिवृत्त होण्याची सक्ती माझ्यावर करण्यात आली असती. पण हा नियम राजकारणी लोकांना लागू होत नाही. तसे असते तर बरे झाले असते. आजकाल असे दिसून येते की ज्यांना उदरनिर्वाहाची साधने नाहीत व बुद्धिमत्ता नाही असे 55 वर्षे वयावरील लोक राजकारणी बनून आपला उदरनिर्वाह चालवीत आहेत.
मी राजकारणात असण्याचे कारण असे की राजकारणाच्या आखाड्यात उतरुन मला आता 30 वर्षांच्या वर काळ लोटला आहे. इतक्या लांब काळपर्यंत राजकारणात सतत वावरत असलेला एकही माणूस सध्या भारतात नाही. फावल्यावेळी राजकारण करणे हा एक सामान्य नियम आहे. या तीस वर्षांपैकी आठ वर्षे मी केन्द्रीय सरकारचा सभासद म्हणून घालविली आहेत. या क्षेत्रात सुद्धा कोणीही माझ्या पुढे गेलेला नाही. माझी इच्छा असती तर आणखी काही काळ मी सरकारचा सभासद म्हणून राहू शकलो असतो.
परंतु जेव्हापासून मला जीवनाचा अर्थ समजू लागला तेव्हापासून म्हणजे माझ्या लहानपणापासूनच मी सतत एका तत्त्वाचे अनुसरण केले. ते तत्त्व म्हणजे माझ्या अस्पृश्य बांधवांची सेवा करणे हे होय. मी कोठेही असो किंवा कोणत्याही पदावर असो परंतु नेहमीच माझ्या बांधवांच्या भल्याकरिता मी चिंतन करीत असतो व कार्य करीत असतो. दुसऱ्या कोणत्याही प्रश्नाला मी कधीही इतके महत्त्व दिलेले नाही. अस्पृश्यांच्या हिताचे संरक्षण मी केलेच पाहिजे हेच माझ्या भूतकाळातील जीवनाचे ध्येय होते आणि भविष्यातही हेच माझे ध्येय राहील. किफायतशीर अशा भल्या मोठ्या पगाराच्या अनेक नोक-या मला देऊ करण्यात आल्या होत्या परंतु माझ्या लोकांची सेवा करणे हे माझ्या जीवनाचे ध्येय असल्यामुळे त्या नोकऱ्या मी नाकारल्या.
परदेशातून अर्थशास्त्राची उच्च पदवी धारण करून येणारा केवळ अस्पृश्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातून मी पहिला माणूस होतो. मी मुंबईत उतरल्यावर ताबडतोब मुंबई सरकारने मला राजनैतिक अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाची जागा देऊ केली. मी ती नोकरी स्वीकारली असती तर आज मला फार मोठा पगार मिळाला असता. परंतु मी ती नोकरी नाकारली कारण मला माहीत होते की तुम्ही एखादी सरकारी नोकरी पत्करल्यावर स्वभावतःच तुमच्या लोकांची सेवा करण्याच्या इच्छेवर बंधने येऊन पडतात. माझा उदरनिर्वाह होऊन मी स्वतंत्रही असावे म्हणून कायद्याच्या शिक्षणासाठी एक किंवा दोन वर्षानंतर मी पुन्हा इंग्लंडला गेलो. आपल्या उदरनिर्वाहासाठी दुसऱ्या कोणावरही जो अवलंबून नसतो तोच माणूस खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतो.
बार-अँट-लॉ ची पदवी प्राप्त करून इंग्लंडमधून परत आल्यावर पुन्हा एकदा मला डिस्ट्रिक्ट जज्जाच्या जागेचे तीन वर्षाच्या आत हायकोर्ट जज्जाच्या जागेवर पदोन्नती करण्याचे आश्वासन देऊन नेमणूक करण्याचे प्रलोभन दाखवण्यात आले. त्याकाळी माझे मासिक उत्पन्न 100 रूपये सुद्धा नव्हते. अत्यंत गरीब लोकांसाठी मुद्दाम बांधलेल्या मुंबईतील एका चाळीतील एका खोलीत त्यावेळी मी राहात होतो. परंतु ही जज्जाची जागा जरी फार मोठ्या पगाराची होती आणि जन्मभर मला पैशाची ददात भासणार नव्हती तरीसुद्धा ती जागा मी नाकारली कारण ती जागा जर मी स्वीकारली असती तर स्वभावतःच माझ्या आयुष्याचे ध्येय गाठण्यात म्हणजे माझ्या लोकांची उन्नती करून त्यांची स्थिती सुधारण्याच्या माझ्या अंगीकृत कार्यात अडचण निर्माण झाली असती.
1942 साली पुन्हा एकदा अशाच एका प्रसंगाशी मला सामना करावा लागला. आर्थिकदृष्ट्या संपन्न करू शकणारी आणि दहा वर्षे नोकरी झाल्यावर पुढील आयुष्य मी सुखासमाधानात घालवू शकलो असतो अशी हायकोर्ट जज्जाची जागा मला देऊ करण्यात आली. व्हाईसरॉयच्या कौन्सिल मध्येसुद्धा जागा देण्याचे मला आश्वासन देण्यात आले. माझे जीवनध्येय डोळ्यापुढे ठेवून मी दुसरी जागा स्वीकारली. प्रत्येकाने आपल्या लोकांची सेवा करण्यात आपले आयुष्य वेचले पाहिजे व सेवेतच मरण पत्करले पाहिजे.
केन्द्रीय सरकारात 1947 साली मी सामील झालो. मी काँग्रेसला मिळालो अशी टीका माझ्या काही टीकाकारांनी माझ्यावर केली. माझ्या टीकाकारांनी केलेल्या निंदेला मी लखनौच्या भाषणात उत्तर दिले आहे. त्या भाषणात माझ्या देशबांधवांना मी सांगितले की, पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाणा-या मातीच्या ढेकळाप्रमाणे मी भुसभुशीत नसून मी पाण्यात न विरघळता नदीच्या प्रवाहालाच वळविणा-या एखाद्या भक्कम खडकासारखा आहे. मी कोठेही असलो किंवा कोणाच्याही संगतीत मी राहिलो तरी माझे स्वतःचे वैशिष्ट्य मी कधीही गमावणार नाही. एखाद्या चांगल्या कामासाठी जर कोणी माझ्या सहकार्यासाठी विचारणा केली तर मी आनंदाने सहकार्य करीन. मागील चार वर्षेपर्यंत काँग्रेस सरकारशी मी माझ्या सर्व सामर्थ्यानिशी प्रामाणिकपणे माझ्या मातृभूमीची सेवा करण्यात सहकार्य केले. परंतु या संपूर्ण काळाच्या दरम्यान काँग्रेस संघटनेत मी विरून जाण्यापासून स्वतःस अलिप्त राखले आहे. जे लोक आपल्या शब्दाशी व कर्तृत्वाशी प्रामाणिक राहून अस्पृश्यांच्या कार्यात मदत करू इच्छितात त्यांच्याशी मी आनंदाने सहकार्य करून त्यांना मदत करीन. जे केवळ गोडबोले व गोड गोड थापा मारणारे आहेत परंतु ज्यांचा अंतस्थ हेतू आणि कृती आमच्या लोकांच्या हिताच्या विरोधी असते त्यांना मी कदापिही मदत करणार नाही.
आता येत्या सार्वजनिक निवडणुकीसंबंधी सांगायचे म्हणजे, ही निवडणूक शेड्यूल्ड कास्ट्सच्या लोकांनी त्यांच्या जीवन-मरणाचा लढा आहे असे समजून येत्या काळात जोमाने कार्य करावे. आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावावी. मनुष्यमात्राला या जगात शक्तींचा पुरवठा संपत्ती आणि लोकसंख्या बळातून होत असतो. आपण अल्पसंख्य आहोत आणि आपण धनवानही नाही. प्रत्येक खेड्यात आपली संख्या एकूण लोकसंख्येच्या शेकडा 5 पेक्षा अधिक नाही. 95 टक्के लोकांच्या संघशक्तीच्या आणि त्यांच्या संपत्तीच्या तुलनेत आपण हतबल आहोत. पोलीस मुख्यतः उच्चवर्णीय लोकांपैकीच असल्यामुळे आपल्या खऱ्याखुऱ्या तक्रारींचीही दाद घेत नाहीत. उलट तक्रार केल्याबद्दल धारेवर धरण्यात येते. दारिद्र्यामुळे अधिकारी वर्गास आपल्या बाजूस वळवून घेण्यासही आपण असमर्थ ठरतो. परंतु आपणाला एक शक्ती प्राप्त होऊ शकते ती म्हणजे राजकीय शक्ती ! ही शक्ती आपण मिळविलीच पाहिजे. या शक्तीने सुसज्ज होऊन आपण आपल्या लोकांचे हितसंरक्षण करू शकतो.
या देशाने जे स्वातंत्र्य प्राप्त केले त्या स्वातंत्र्याने तुम्हाला या राज्यशक्तीची हमी दिलेली आहे काय ? आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या आम्ही कधीच विरोधी नव्हतो. परंतु आम्हाला एका प्रश्नाचे सरळ उत्तर हवे होते. स्वतंत्र भारतामध्ये आमची अवस्था कशी राहील ? हा प्रश्न मी गांधीजीसमोर आणि अन्य पुढाऱ्यांसमोर ठेवला. त्यांच्या 'स्वराज्या' मध्ये आमची अवस्था कशी राहील हे आम्हाला जाणून घ्यावयाचे होते. आमच्यावरील जाचणूकीचा अंत होईल काय ? आमच्या मुलांच्या शिक्षणाची सोय होईल काय ? आमचे लोक भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून जीवन जगण्यास समर्थ होतील काय ? अत्याचार आणि पिळवणूक थांबेल काय ? आमच्या स्त्रियांची अब्रू सुरक्षित राहील काय ? गांधीजी किंवा कोणत्याही अन्य नेत्याने या प्रश्नांची उत्तरे समाधानकारकपणे किंवा आढेवेढे न घेता सरळसोटपणे दिली नाहीत.
गोलमेज परिषदेत पहिल्या प्रथम हा प्रश्न मी समोर ठेवला आणि मुसलमान, खिश्चनं, शीख व इतर अल्पसंख्यांकाप्रमाणे अस्पृश्यासाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ असावा या न्याय्य मागणीला गोलमेज परिषदेत माझ्या देशवासियांकडून मला समर्थन प्राप्त होऊ शकले नाही. तथापि माझ्या लोकांसाठी मी राजकीय हक्क मिळविले. त्यानंतर काय घडले हे या देशातील प्रत्येकाला माहीत आहे. एवढे सांगितले म्हणजे पुरे की आधुनिक भारताच्या इतिहासात प्रथमतःच आम्ही जे हक्क प्राप्त केले ते राजकीय हक्क नागवण्यासाठी गांधीजींनी प्राणांतिक उपोषण आरंभिले. अस्पृश्यांच्या मनात ज्या राजकीय आकांक्षा निर्माण होऊ लागल्या होत्या त्यांना भिऊन गांधीजी अस्पृश्यांच्या विरुद्ध होते. आपल्या परोपकारी धन्यांच्या म्हणजे सवर्ण हिंदुच्या दयेवर अस्पृश्यांनी अवलंबून राहावे असे त्यांना हवे होते. गांधीजींच्या शब्दावर विश्वास ठेवून आणि हिंदू पुढा-यांच्या आश्वासनावर विसंबून गांधीजींचा जीव वाचविण्यासाठी आम्ही आपल्या हक्कांचा बळी दिला. याचा परिणाम आता तुमच्यासमोर असून प्रत्यक्ष दिसतच आहे. विश्वासघाताची आणि कपटीपणाची ज्यांना अस्पृश्य ती एक दुःखद कथा आहे. सर्व प्रकारच्या भल्याबुऱ्या मार्गाचा अवलंब करून काँग्रेसने अस्पृश्यांना त्यांच्या न्याय हक्कांपासून नागविले आहे. समाजामध्ये मानाचे स्थान नाही असे लोक केवळ सवर्ण हिंदुच्या पाठिंब्यामुळे कायदे मंडळावर निवडल्या जात आहेत. तथाकथित हरिजन हे काँग्रेसचे हस्तक आहेत. या हरिजन उमेदवारांना तिकीट देताना कॉंग्रेस त्यांना कोणता निकष लावते हे मला काही समजत नाही. साधारणतः कोणत्याही उमेदवाराला निवडणुकीसाठी तिकीट देताना त्याने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कारावास भोगला आहे काय ? असे काँग्रेस विचारते. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की हरिजनांना तिकिटे देताना हा निकष काँग्रेस लावीत नाही. राखीव जागेवर हरिजन उभे करून अस्पृश्यांनी मिळविलेले हक्क काँग्रेस सहजपणे धुळीस मिळवीत आहे.
काँग्रेसच्या तिकिटावर पुष्कळसे अस्पृश्य कायदे मंडळात निवडून गेलेले आहेत. या हरिजन आमदारांना मी विचारू इच्छितो की मागील चार वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या लोकांसाठी काय केले आहे. पार्लमेन्टमध्ये आणि घटनासमितीत 30 हरिजन होते. अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलेल्या या 30 सभासदांपैकी एकाने तरी भारताच्या राज्यघटनेवरील चर्चेत कधी भाग घेतला काय ? या हरिजन सभासदांपैकी कोणीतरी एखादा प्रश्न विचारला एखादा ठराव मांडला किंवा एखादे बिल मांडले काय ? या हरिजनांच्या चूप बसण्यावरून पार्लमेन्टच्या कामकाजाचा विदेशी समालोचक बरोबर हाच निष्कर्ष काढू शकतो की भारतात अस्पृश्यांचा कोणत्याही प्रकारे छळ होत नाही. त्यांची कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. प्रामाणिकपणे बोलावयाचे तर सत्य याच्या विरूद्ध आहे. आमच्या दुःखाबद्दल निर्भयपणे कायदेमंडळात आवाज उठवतील असे प्रतिनिधी आम्हाला हवेत. परंतु काँग्रेसने नेमलेले हे अस्पृश्यांचे प्रतिनिधी आज्ञाधारकपणे त्यांच्या धन्याचे गुणगान तरी करतात किंवा अस्पृश्यांचे हक्क, मूलभूत गरजा नाकारल्याच्या, अस्पृश्यांचा उपमर्द व अवमानाच्या, पिळवणुकीच्या व अत्याचाराच्या घटना सर्व भारतभर प्रत्यही घडत असल्याच्या भयानक कथा ऐकू येत असल्या तरी आपली तोंडे बंद करून बसतात.
अस्पृश्य लोकांच्या प्रश्नात पं. नेहरूनी कधीही थोडीसुद्धा आस्था दाखविली नाही. गेली वीस वर्षे ते राजकारणाच्या आघाडीवर आहेत. त्यांनी दोन हजारापेक्षाही जास्त सभातून भाषणे दिली असावीत अस्पृश्य लोकांवर जे अत्याचार होतात त्यांचा त्यांनी कधीतरी उल्लेख केला आहे काय ? माझ्या स्मरणानुसार कधीही नाही. त्यांना मुसलमानांचे वेड लागले आहे. त्या आजाराने ते दुःखी आहेत. मुसलमानांवर अन्याय झाला किंवा अन्याय झाल्याची कल्पना त्यांना आली तरी ते विचलित होतात. भारतातील मुसलमानांचे संरक्षण करण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतील. मुसलमानांना संरक्षण देण्याच्या मी विरुद्ध नाही. माझे असे मत आहे की मुसलमानांनी पाकिस्तानात जावे. लोकसंख्येच्या अदलाबदलीचा योग्य मार्ग सापडू शकत नसेल तर भारतातील मुसलमानांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्यच आहे. परंतु मुसलमान अल्पसंख्य असले तरी अस्पृश्यांशी तुलना करता ते त्यांच्या संरक्षणासाठी अधिक उत्तम स्थितीत आहेत. अस्पृश्य, आदिवासी गुन्हेगार जमाती, हे नावही किळसवाणे आहे. मागासजाती किंवा खिश्चन लोक यासारख्या अन्य अल्पसंख्य लोकांनाही संरक्षण देण्याचा किंवा त्यांच्या उत्थानासाठी काहीतरी भरीव करण्याचा विचार नेहरुनी कधीतरी केला आहे काय ? जर काँग्रेसच्या लोकांना अस्पृश्यांबद्दल प्रेम किंवा सहानुभूती नाही तर काँग्रेसच्या लोकांवर अस्पृश्यांचा विश्वास कसा बसू शकतो.
कॉंग्रेसने अस्पृश्यांसाठी खूप काही केले असे जगाला सांगताना पं. नेहरू कधी थकत नाहीत. उदाहरण देतो. ते म्हणतात ते कसे खोटे आहे हे दर्शविण्यासाठी मी फक्त एकच उदाहरण देतो.
विभाजनानंतर पाकिस्तान सरकारने अस्पृश्यांना पाकिस्तानातून भारतात येण्यावर बंदी घालणारे एक फर्मान काढले. कितीही हिंदुनी पाकिस्तान सोडले तरी पाक सरकारने त्यांची पर्वा केली नाही; परंतु अस्पृश्यांनी पाकिस्तान सोडले तर मैला वाहण्याचे, सडका झाडण्याचे, मेलेली जनावरे उचलण्याचे तिरस्करणीय जातीचे घाणेरडे धंदे कोण करणार होते ? मी पं. नेहरुंना विनंती केली की या लोकांच्या स्थलांतर करण्यावर बंदी घालणारा हा आदेश काढून घेण्यासंबंधी काहीतरी कारवाई करा. परंतु त्यांनी काहीही केले नाही. या समस्येसंबंधी ते झोपी गेले आणि पाकिस्तानशी ज्या काही चर्चा वेळोवेळी झाल्या त्यावेळी त्यांनी या प्रश्नाचा प्रासंगिक उल्लेखही केला नाही. एकाकीपणे जेवढे मला करता येणे शक्य होते तेवढे मी केले आहे. महार बटालियनच्या शूर शिपायांनी गंभीर धोका पत्करून मला मदत केली आणि पाकिस्तानातून अनेक अस्पृश्य लोकांना आणले.
अशा स्थितीत आम्ही काँग्रेस पुढा-यांच्या आश्वासनावर विश्वास कसा ठेवावा. अस्पृश्य लोकासंबंधीचा काँग्रेसचा हेतू प्रांजळ असेल तर ते सर्वसाधारण जागेवर अस्पृश्य उमेदवार उभा करून आपला प्रांजळपणा सिद्ध का करीत नाहीत ?
काँग्रेसशी लढा देणे शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनला कठीण जाईल असे आम्हास सांगण्यात येते. ही शुद्ध लोणकढी आहे. या निवडणुकीत आम्ही यशस्वीपणे बाहेर पडू याबद्दल मला मुळीच शंका नाही. काळ बदललेला आहे. मागच्या निवडणुकीच्या वेळी प्रत्येकजण आमच्या विरुद्ध होता आणि काँग्रेसनेच स्वातंत्र्य मिळवून देशाला स्वतंत्र केले. अशा प्रकारच्या काँग्रेसच्या प्रचारामुळे काँग्रेसवर विश्वास ठेवून प्रत्येकजण तिच्या सोबत होता. आज काय स्थिती आहे ? पंजाब काँग्रेसकडे नुसती नजर फेका ! पंजाबमध्ये खरोखरच काँग्रेस अस्तित्वात आहे काय ? पंजाबातील कॉंग्रेस आधीच मेलेली दिसते. तिचे दोन आधारस्तंभ डॉ. गोपीचंद भार्गव आणि श्री. भीमसेन सच्चर हे श्रेष्ठतेसाठी परस्पराशी लढत आहेत. उमेदवार निश्चित करण्याची तारीख अगदी हाताशी येऊन ठेपली असली तरीही येत्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी अजून काँग्रेसने संमत केलेली नाही. जे लोक आम्ही एका आईची लेकरे आहोत असे घराच्या गच्चीवरून जाहीर करीत होते तेच लोक आता कडव्या शत्रुप्रमाणे एकमेकाशी लढत आहेत. भार्गव गट आणि सच्चर गट या दोहोंमध्ये हार्दिक एकी होणे पूर्णतः असंभव आहे.
पंजाबचा मुख्यमंत्री कोण होणार हाच एकमेव प्रश्न या पुढा-यासमोर आहे. या सभ्य गृहस्थांना लोकांच्या गा-हाण्यांशी काहीएक कर्तव्य नाही. पंजाबातील लढा हा कोणत्याही तत्त्वासाठी नाही तर तो लढा सत्तेसाठी आहे. हीच स्थिती बिहार आणि अन्य अनेक राज्यात आहे. लाचलुचपत, भ्रष्टाचार आणि भाई-भतिजा वादाबद्दल अनेक कॉंग्रेस उमेदवारांच्या विरुद्ध अनेक तक्रारी काँग्रेसच्या ऑफिसात प्रत्यही येत. आहेत. 1947 मध्ये काँग्रेस तिच्या कीर्तीच्या कळसावर होती. आता केवळ चार वर्षाच्या काळानंतर, ती अगदी खालच्या पातळीपर्यंत घसरली आहे. राजकीय पक्षांच्या इतिहासातील हे असे अद्वितीय उदाहरण होय. जगातील आणि सज्जन हे परस्परविरूद्ध अर्थाचे ठळक वेगवेगळे आणि परस्पराशी कधी संबंधित नसणारे दोन शब्द होत. काँग्रेसवाला अशा स्थितीत आपण ही लढाई हरू अशी भीती बाळगावयास नको. काँग्रेस-आपला पुर्वापार शत्रु-तिच्या जुन्या शक्तीपासून वंचित झाली आहे. स्वाभिमान आणि ऐक्य या बळावर फेडरेशन यशस्वी होईल हे निश्चित. फक्त आपण जिद्दीने व खुणगाठ बांधून प्रयत्न केले पाहिजेत. मी तुम्हा सर्व बंधु-भगिनींना असे आवाहन करतो की मतदानाच्या दिवशी तुम्ही सर्व कामे बाजुला सारून तुमच्या मतदानाच्या हक्काची अंमलबजावणी करा.
काँग्रेसने आमच्यात फूट पाडू नये म्हणून शेड्यूल्ड कास्ट्सच्या लोकांनी पहारा दिला पाहिजे. काँग्रेसच्या बोलघेवड्या प्रचाराच्या आणि काँग्रेसवाल्यांच्या वाचाळ बोलण्याच्या त्यांनी आहारी जाऊ नये. त्याचप्रमाणे तुम्ही" ठेविले अनंते तैसेचि राहावे" अशाप्रकारची समाधानी वृत्तीही ठेवू नये. तुम्ही सतत सतर्क राहिले पाहिजे. आपणाला राखीव जागा केवळ दहा वर्षासाठी आहेत याची आपण सतत आठवण ठेवावयास हवी. अस्पृश्यतेचा पूर्णतः नायनाट होईपर्यंत या राखीव जागा चालू राहाव्यात अशी माझी इच्छा होती. सरदार पटेलांनी या माझ्या ठरावाला संसदेत आणि संसदेच्या बाहेर मोठ्या आवेशाने विरोध केला. सरदार पटेलाचे एक सोडाच परंतु अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून काँग्रेसने नेमलेल्या घटना समितीतील 30 हरिजनांना सुद्धा माझ्या ठरावाला पाठिंबा देण्याची हिंमत झाली नाही. सरदार पटेलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्यापेक्षा हे काँग्रेसचे हस्तक दुसरे काय करू शकणार ? निवडणुकीचे तिकिट खुंट्याला बांधून होतेच आणि या संधिसाधू व सत्तापिपासू लोकांकडून दुसरी कोणतीही अपेक्षा कोणी करू शकत नाही. या राखीव जागा फक्त दहा वर्षेपर्यंतच राहाणार आहेत. या दहा वर्षाच्या काळानंतर आपण काय करणार आहोत. आपणाजवळ मजबूत संघटन नसेल तर देशाच्या राजकारणात आपणाला कोणतेही स्थान असू शकत नाही. 'अछूत' लोक जर एकसंध अशा एका जातीत संघटित झाले तर आपण राजकारणात काही स्थान प्राप्त करू शकतो.
आपले मजबूत व एकसंघ संघटन करण्यासाठी आपण दहा वर्षेपर्यंत थांबू नये. ही संघटना आतापासूनच बांधली पाहिजे, ही संघटना आजच आपण बांधली पाहिजे. होय, उद्याही नव्हे, परवाही नव्हे तर आजच ! जर या दहा वर्षांच्या अवधीत आपण आपली संघटना दृढ आणि मजबूत पायावर उभी करून कार्यरत केली नाही तर या दहा वर्षानंतर 'मनुस्मृती-राज' स्वीकारण्याचे दुर्दैव आपल्या नशिबी येईल वस्तुतः अशी संघटना आधीच आपणाजवळ आहे. आपली फेडरेशन हीच आपली संघटना होय. आपणाला फक्त ती मजबूत करावयाची आहे. झाड आधीच लावण्यात आलेले आहे. आपणाला फक्त त्याला पाणी घालून त्याची जोपासना करावयाची आहे. निवडणूक आयुक्ताकडून आपली फेडरेशन ही अखिल भारतीय स्वरुपाची संघटना असल्याचे मान्य करण्यात आले आहे. आपणाला नवीन घर बांधावयाचे नाही; घर पूर्वीचेच आहे. आपणास जे काही करावयाचे आहे ते इतकेच की ते सुव्यवस्थित स्थितीत सांभाळावयाचे आहे. आतापासूनच आपण त्यासाठी जोमदार प्रयत्न केले नाही आणि जर समाधान मानून राहिलो तर अशी वेळ येऊन ठेपण्याची शक्यता आहे की बेघर होउन आपणास इकडे तिकडे भटकावे लागेल आणि सर्व प्रकारचा अपमान, अन्याय, अत्याचार सहन करावा लागेल व वेदकाळापासून ज्याची आपण शिकार झालो होतो अशाप्रकारचे पंगुत्व आपणास येईल.
आता तुम्हास सर्वांना माहित आहेच की शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे येत्या निवडणुकीत हत्ती हे चिन्ह आहे. हत्ती हे चिन्ह मी निवडले कारण भारतातील प्रत्येकालाच माहीत शकतात. निरक्षर लोकही ते सहजपणे ओळ याशिवाय हत्ती हा शहाणपणा, शक्ती आणि धैर्यासाठी प्रसिद्ध आहे.
आपले लोक हत्तीप्रमाणे आहेत. त्याला पायावर उभे राहाण्यास वेळ लागतो परंतु एकदा तो आपल्या पायावर उभा झाला म्हणजे तुम्ही त्याला सहजगत्या गुडघे टेकावयास लावू शकत नाही.
आता निवडणूक समझोत्याविषयी सांगावयाचे म्हणजे शेड्यूल्ड कास्ट्सचे लोक अल्पसंख्यांक आहेत. आपणाला स्वतंत्र मतदारसंघही प्राप्त झालेले नाहीत म्हणून निवडणुकीपुरता आपणाला अन्य पक्षांशी मैत्री करार करणे आवश्यक आहे. शेड्यूल्ड कास्ट्ससाठी राखीव असलेल्या मतदार संघात आपणाला प्रत्येकाला दोन मते आहेत. ज्या पक्षाशी आपण मैत्री करू त्या पक्षाला आपण एक मत देऊ शकतो. एक मत शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या उमेदवाराला जाईल. निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाशी समझोता करावा हे अजून ठरलेले नाही. लवकरच ते ठरविण्यात येईल, एकदा ते ठरल्यानंतर ज्या पक्षाशी आपण मैत्री करार करू त्या पक्षाला आपले एक मत देणे हे शेड्यूल्ड कास्ट्सच्या प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे.
भाषण संपविण्यापूर्वी पंजाबातील प्रत्येक मतदाराला मी अशी विनंती करतो की त्याने फेडरेशनच्या उमेदवाराला मत द्यावे आणि आपल्या उन्नतीचा मार्ग मोकळा करावा.