Categories

Most Viewed

15 ऑक्टोंबर 1956 भाषण

मला धर्म जास्त प्यारा आहे आणि त्यासाठीच मी माझी शक्ति वेचणार आहे. 

   मध्य प्रदेश दलित फेडरेशन शाखेच्या वतीने तारीख 15 ऑक्टोबर 1956 रोजी सायंकाळी 5.30 वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ, नागपूर मधील श्याम हॉटेल मध्ये छोटीशी चहा पार्टी देण्यात आली होती. या समारंभास सौ. माईसाहेब होत्या. शिवाय दलित फेडरेशनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांपैकी बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, श्री. दादासाहेब गायकवाड, श्री. हरिदास आवळेबाबू, श्री. मेश्राम, श्री. कुंभारे, श्री. गोंडाणे. श्री. जी. टी. परमार (गुजरात). श्री. ए. जी. पवार, श्री. आर. डी. भंडारे व श्री. बी. सी. कांबळे वगैरे हजर होते. 

   प्रथम श्री हरिदास आवळेबाबू यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजर राहून उपकृत केल्याबद्दल डॉक्टर साहेबांचे आभार मानले. नंतर दलित फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना उद्देशून मार्गदर्शनपर दोन शब्द सांगावेत म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनंती केली. 

   डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या विनंतीस मान देऊन, कार्यकत्यांना उपदेशपर असे भाषण हिंदीत केले. ते म्हणाले, 

   या ठिकाणी मला भाषण करावे लागेल याची काही कल्पना नव्हती. कल्पना असती तर माझे विचार संकलित करून मांडणे सोईचे झाले असते. तशी एकंदरित मला असे दिसते की तुम्हाला राजकारण फार प्यारे आहे. कोणत्याही गोष्टीपेक्षा राजकारणाची तुम्हाला अधिक आवड दिसते. माझे तसे नाही. मला धर्म जास्त प्यारा आहे आणि त्यासाठीच मी माझी शक्ती वेचणार आहे. 

   तुम्हाला काही खास अधिकार मिळवून देण्यासाठी मी आजवर खूप प्रयत्न केले. ते अधिकार मिळवून देण्यासाठी मी गांधींशी झगडा केला. काँग्रेसशी सामना दिला. त्यावेळी प्रथमतः त्यावेळच्या मुंबई असेंब्लीत आमचे 15-16 लोक निवडून आले. असेंब्लीत सरकार विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम केले. ते एवढे वाखाणण्यासारखे होते की असेंब्लीमधील आदर्श विरोध म्हणून त्यावेळचे मुख्यमंत्री श्री. खेर यांना उद्गार काढावे लागले. त्या काळानंतर लढाई आली. लढाईच्या काळात काही विशेष करता आले नाही. 

   आपला देश स्वतंत्र झाल्यावर राज्यघटना घडविली. जातेवेळी आपल्या राखीव अधिकारांचा विचार झाला. काँग्रेसवाल्यांना राखीव जागांकरिता स्वतंत्र मतदार संघ मान्य नव्हता. तेव्हा जे वारे वाहत होते ते संयुक्त मतदार संघाचे होते. याचाही प्रयोग करून पाहावा, असे पुष्कळांना वाटले, चोराची लंगोटीदेखील सोडू नये म्हणतात. त्याप्रमाणे राखीव जागा सोडून न देता त्यांचा संयुक्त मतदार संघाने प्रयोग करावा असे वाटले. पण आता असा अनुभव येऊन चुकला आहे की, काँग्रेसच्या तिकिटावर राखीव जागेवर जी माणसे येतात ती आपली तोंडे बंद करून बसतात. अशा तऱ्हेने संयुक्त मतदार संघामुळे जर गधे लोक निवडून येत असतील तर निवडणुकांचा व जागांचा उपयोग तरी काय ? त्यांचा काही उपयोग होत नाही हे अनुभवाने आता सिद्ध झाले आहे. 

राखीव जागा नकोत म्हणून फेडरेशनने ठराव केला आहे. त्या ठरावास मी चिकटून राहू इच्छितो. त्या ठरावापासून ढळण्याची माझी इच्छा नाही. राखीव जागा दहा वर्षांसाठी आहेत. त्या जागा आता या निवडणुकानंतर राहाणार नाहीत. आपल्या समाजाचे ऐक्य ही कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट आहे. या राखीव जागा गौण आहेत. 

आपल्या आजपर्यंतच्या फेडरेशनच्या चळवळीने स्वाभिमान अवश्य निर्माण केला ही गोष्ट फेडरेशनला भूषणावह आहे. त्यामुळे संघटना झाली. तथापि त्यामुळे एक प्रकारची तटबंदीही निर्माण झाली. दुसरे लोक आम्हाला मत देत नाहीत व आपण लोक त्यांना मत देत नाही. ही एक प्रकारची तटबंदीच होय. दुर्दैवाने आपली लोकसंख्या कमी आहे. आपण केवळ अल्पसंख्यांक आहोत. अशा परिस्थितीत फेडरेशन आहे त्या स्थितीत ठेवणे कठीण आहे. 

यासाठी इतर समाजातील आमचे दुःख जाणणारे कोण आहेत हे पाहिले पाहिजे. अशा सर्वांना आपण एकत्रित करून त्यांच्यासह जाण्याची आपली सिद्धता पाहिजे. अशा लोकांना एकत्रित करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. तो प्रयत्न यशस्वी झाल्यास आपल्याला नवीन पक्ष स्थापावा लागेल व त्या पक्षात आपल्याशिवाय इतरांनाही दार मोकळे राहील. 

तुमच्यातच नव्हे तर या देशात एक विचित्र विकृती दिसून येते. ती ही की आज झाड लावले की त्यास दुस-या दिवशी फळ खावयास आले पाहिजे, असे लोकांना वाटते. राजकारणात अशी अपेक्षा धरणे चूक आहे.

इंग्लंडमधील राजकारण घ्या. तेथील ब्रिटिश मजूर पक्षाचा इतिहास काय सांगतो. 1900 साली त्यांचे फक्त दोन लोक पार्लमेंटात निवडून आले. 1906 साली त्यांना सुमारे 14 जागा मिळाल्या. 1924 पर्यंत त्यांना विशेष यश नव्हते. त्या साली मात्र त्यांचे जवळजवळ 125 लोक निवडून तो खरा विरोधी पक्ष बनला. अशा तऱ्हेने राजकारण हा दमाचा व धीराचा खेळ आहे. ज्यांना दम, धीर नाही त्यांना राजकारण करता यावयाचे नाही.

आता इतर समाजाच्या सर्व लोकांबरोबर काम करावयास तुम्ही शिकले पाहिजे. तुमच्यात तुम्ही फूट ठेवून चालणार नाही. माझ्या दबदब्यामुळे अजून काही वेडेवाकडे घडत नाही. पण मी तुम्हासाठी कोठपर्यंत राहाणार ? 

आता उमेदवार निवडण्याचे काम लोकांनीच केले पाहिजे. लोकांमध्ये तुम्ही काम केले पाहिजे. त्यांच्या अडीअडचणींना तुमच्या ताकदीप्रमाणे वाचा फोडली पाहिजे. त्यांच्या सुखदुःखाशी समरस होण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. 

मी भंडा-यातील निवडणुकीमध्ये पडलों त्याचे मला कधी वाईट वाटले नाही. तरी त्या निवडणुकीत मला बरीच मते पडली. आपली मते सोडली तर इतर समाजाने देखील मला मते दिलेली आहेत. ही गोष्ट माझ्या समाधानाची आहे. मी पडलो की निवडून आलो हा प्रश्न मी विचारात घेत नाही. तुम्हीही अशाच प्रकारे कर्तबगार होण्याचा प्रयत्न करून, इतर समाजास देखील तुम्हास मते द्यावीत असे वाटले पाहिजे. माझी खात्री आहे की या गोष्टीचा विचार करून तुम्ही तुमचे राजकीय जीवन व कार्यक्रम चालवाल, यापेक्षा आता अधिक काही मी सांगत नाही. 

शेवटी श्री. हरिदास आवळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हार्दिक आभार मानले व बाबासाहेबांच्या उपदेशाप्रमाणे आम्ही वागू असे आश्वासन त्यांनी व्यक्त केले व चहापार्टी समाप्त झाली. 

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*

  Forgot Password