Categories

Most Viewed

28 ऑक्टोंबर 1954 भाषण

माझे आयुष्य तीन गुरु आणि तीन उपास्य दैवतांनी घडले आहे.

गुरुवार तारीख 28 ऑक्टोबर 1954 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हीरक महोत्सवानिमित्त पुरंदरे स्टेडियम, मुंबई येथे भरविण्यात आलेल्या अपूर्व सोहळ्यात 1 लक्ष 18 हजार रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. हा सर्व पैसा डॉ. साहेबांनी आपल्या प्रकृतिस्वास्थ्यासाठी उपयोगात आणावा अशी विनंती हीरक महोत्सव समितीचे सेक्रेटरी श्री. शां. अ. उपशाम आणि श्री. आर. डी. भंडारे यांनी केली. त्यांच्या विनंतीचे सभेला जमलेल्या तीस हजार प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. परंतु ‘ माझ्यासारख्या बॅरिस्टरने आपल्या निढळाच्या घामाने जमविलेला गरीब जनतेचा पैसा स्वीकारणे बेशरमपणाचे आहे असे उद्गार काढून डॉ. बाबासाहेबांनी ती सर्व रक्कम मुंबईला बांधण्यात येणाऱ्या इमारत फंडाला दिल्याचे जाहीर केले.

अपूर्व स्वागत : एकशे पन्नासच्यावर संस्थांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हारतुरे अर्पण करण्यात आले. त्यांच्या समवेत सौ. माईसाहेब आंबेडकर याही होत्या. अध्यक्षस्थानी श्री. आर. डी. भंडारे होते. सिद्धार्थ कॉलेजचे प्रिन्सिपॉल श्री. पाटणकर, प्रा. व्ही. जी. राव, रा. ब. बोले, श्री. दादासाहेब गायकवाड, श्री. आर. आर. भोळे, जनतेचे संपादक श्री. यशवंतराव आंबेडकर, प्रा. बोराळे, श्री. अनंत हरी गद्रे, श्री. ब. ह. वराळे, श्री. डी. जी. जाधव, शांताबाई दाणी वगैरे मंडळी हजर होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले, मित्रहो,
आपण ही जी थैली, एक लाख अठरा हजार रुपयांची दिली आहे खरी, पण ती अगदीच हलकी आहे. (हशा) मला थोडासा संशय आला तरी हा जो मोठा आकडा मैनेजिंग ट्रस्टी यांनी जाहीर केला आहे त्याची सारी जबाबदारी मी त्यांच्याकडे सोपवीत आहे.

खरे म्हणजे माझा हीरक महोत्सव साजरा करून त्याप्रित्यर्थ ही थैली देण्यात आली, असे आताच सांगितले. हीरक महोत्सव हे माझं निमित्त झालं आहे. हे पैसे तुमचेच असून एक हॉल बांधण्यासाठी जमा केले आहेत. त्याला मूर्त स्वरूप यावं म्हणून मी ते माझ्या वयाच्या साठाव्या वर्षी द्यावे असे फक्त म्हटलेले आहे. हा फंड गोळा करायला सुरूवात बऱ्याच वर्षापूर्वी झाली. 1942 साली माझी एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये नेमणूक झाल्यामुळे मला मुंबई सोडून जावं लागलं. तेव्हा पैसा गोळा करण्याचं काम जरा जास्त सुस्त झालं होतं म्हणून 1952 साली परत आल्यावर पुन्हा ते काम हाती घेतलं. परंतु दुर्दैवाने इमारतीसाठी जी जागा घेतली होती तिथं भाडोत्री घातल्यामुळे इमारतीचे काम सुरू करता येईना. भाडोत्रीही काढून टाकणं अशक्य झालं आहे. आता सांगायला काहीच हरकत नाही. मी थोडसं वजन खर्च करून मुंबईचा कायदा बदलून घेतला आहे. त्या कायद्यामुळे ते भाडोत्री आता निघून जातील व इमारतीचे काम सुरू होईल, मी हे जे केले ते जनतेसाठी केले आणि ही जी रक्कम जमा झाली आहे ती तुमचीच आहे. आपल्या समाजातील या दारिदी बाया पुरुषांच्या निढळाच्या घामातून गोळा केलेला हा पैसा आहे आणि मी बॅरिस्टर आहे. एक्झिक्यूटिव्ह कौन्सिलचा मेंबर होतो. तेव्हा प्रकृतीच्या निमित्ताने या गरीब जनतेचा पैसा घेणे बेशरमेची गोष्ट आहे. तेव्हा हा सर्व पैसा, एकदा मी सांगून टाकल्याप्रमाणे इमारतीसाठी खर्च केला जाईल. मला त्यातली एक छदामही नको, असे येथे मी जाहीर करतो. (टाळ्यांचा गजर).

मित्रहों ! आज या ठिकाणी बसलो असताना माझ्या पूर्व आयुष्यात ज्या काही घडामोडी झाल्या त्या सर्व चित्रपटासारख्या उभ्या राहतात. मी जन्मलो कुठे, माझ्या वडिलांनी कुठं कुठं मला नेल, माझं काय काय केलं हे सार डोळ्यांपुढे उभं राहिलं आहे. परंतु मला इथे एक गोष्ट सांगावयाची आहे ती ही की, माझ्या वयाला 60 वर्षे पूर्ण झाली याला पुरावा तरी काय आहे ? (हशा) मी कोणत्या साली जन्मलो याचा रेकार्ड नाही. कारण माझे वडील सिक्स पायोनियर बटालियनमध्ये होते. नंतर ते सेवन पायोनियर बटालियनमध्ये गेले. तेव्हा त्यांना मी त्यांचा मुलगा म्हणून काहीच महत्त्व वाटल नाही, जन्म तारीख लिहून ठेवली नाही. जमली नाही. शकत नाही. ही किती यःकश्चित गोष्ट आहे. पण तीही त्यांना आज जी जन्मतारीख आहे ती खरीच आहे असं कोणी सांगू शकत नाही.

परंतु माझ्याविषयी दोन तीन गोष्टी मात्र निश्चित सांगता येतील. राजपुतान्यात महू मुक्कामी मी जन्मलो. त्यामुळे कोकणाचा माझा काही संबंध राहिला नाही. वडील कोकणातलेच. परंतु नोकरीमुळे त्यांना राजपुतान्यात जावे लागले. तेव्हा जन्म महू मुक्कामी झाला हे मात्र नक्की. दुसरी गोष्ट म्हणजे माझा जन्म बरोबर बाराच्या ठोक्याला झाला. त्यावेळी माझे वडील कामावर होते आणि माझ्या आईचं बाळंतपण चाललं होतं. माझा पिंड फार मोठा होता. माझ्या आईला फार त्रास झाला असे म्हणतात. माझ्या वडिलांना चिंता वाटत होती. परंतु एकदा दाईनी त्यांना येऊन सांगितले “घरात जा. मुलगा झाला.”

तिसरी गोष्ट म्हणजे मी मूळ नक्षत्रावर जन्मलो आणि ज्योतिषाने सांगितले की मूल फार वाईट आहे. याची आई लवकर मरेल. यामुळे इतर भावंडांना मी अतिशय अप्रिय झालो. जे ते मला झिडकारीत व म्हणत हे मूल आईला वाईट आहे शेवटी आमची आई लवकरच वारली. या अशा माझ्या जन्माविषयी तीन गोष्टी सांगता येतील.

माझं बालपण म्हणाल तर माझं मलाच आश्चर्य वाटतं. मी बारा-तेरा वर्षाचा होईपर्यंत सर्व लोकांना अशी खात्री वाटत होती की हे पोर घराण्याला काळिमा लावणार. याच्या हातून काही होणार नाही. कारण मी बारा-तेरा वर्षाचा होईपर्यंत लंगोटीशिवाय दुसरी वस्तूच नेसलो नाही (हंशा) शिवाय दारोदार गावच्या बायकांना विचारी की “तुमची लाकडं फोडायची आहेत काय ?” मला शिक्षणात प्रथम काही राम वाटेना. आई वारल्यावर माझं संगोपन आत्याने केले. मला वाटे शिकून काय करणार ? सहा महिने मी माळ्याचा धंदा केला. मिलिटरी कॅम्पात बागबागाईत असायची. तेथील माळ्याच्या पोराशी संगत केली. माती, दगड उचलले. जागा साफ केली. नळानं पाणी बागेला द्यायचं होतं पण ते काही होईना. तेव्हा मी घरावरची सर्व कौलं काढली आणि त्याच्या नाल्या केल्या होत्या. काय पण माझं आयुष्य असं वाटतं.

साताऱ्याला जेव्हा आम्ही होतो तेव्हा इतर सुभेदार नातेवाईकही होते. त्यांच्या घरासमोर एक उकिरडा होता. शेणकचरा होता आणि त्या उकिरड्यावर एक उंबराचं झाडही होतं. मी झाडावर चढण्यात फार पटाईत. इतक्या लवकर चढणार नाही. आता पायाने अशक्त झालो. वानर देखील त्या झाडावर मी चढे आणि त्यावर कांबळ टाकून झोपत असे व लहर आली की त्या उकिरड्या वरील राखेत उडी घेत असे. त्यावेळी साता-याला प्लेग आला होता, लोक म्हणत, बरेच लोक प्लेगने मेले आणि या पोरालाच प्लेग का होत नाही. ही अशी माझी परिस्थिती ! एकदा कसाई तीन रुपयाला बकरी देईनात. तेव्हा आम्ही उगारणी केली आणि दोन बकऱ्या घेऊन आलो. तेव्हा लांब बांबू घेऊन आम्ही बकऱ्यांना चारा घालीत असू. रस्त्यात कोणी या बकऱ्या चांगल्या नाहीत म्हणून सांगितलं. बिन शिंगाच्या बकऱ्या चांगल्या म्हणे. असं हूडपणाचं माझं बालपण गेलं.

घरात बऱ्याच लोकांनी लडिवाळपणानं वागवलं. आमची आत्या होती. तिचा मी फारच लाडका. तिने सर्वांना ताकीद दिली होती. आईविना पोरगं आहे. त्याला धुसफूस करू नका आणि यामुळेच मी स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला. सर्वांना वाटे की ह्या पोराच्या हातून काही होणार नाही. ज्यांनी माझे लालन पालन केले त्यातील कोणी जगली नाहीत. ते आज हे माझे कौतुक पहायला हजर असते तर मला फार आनंद झाला असता. अशा प्रकारे माझे बालपण गेले. तुम्हाला कल्पना असेल आयुष्यात किती क्रांती झाली. मी गुराखी झालो असतो किंवा काबाडकष्ट करणारे काम केले असते तर ह्या पदाला पोहोचलो नसतो. माझे वडील मला नेहमी सांगत, सावलीतले काम शीक या साऱ्या आठवणी एकत्र करून एक चरित्र लिहावे असा माझा विचार आहे. ( टाळ्यांचा कडकडाट ) पण चरित्र नाही तर एक लहानसे माझं बालपण म्हणून चरित्रपर पुस्तक लिहिणार आहे. त्यात सर्व गोष्टी मी सविस्तर देईन.

माझ्यामध्ये काही उपजत गुण होते आणि म्हणून मी या पदाला पोहोचलो. असं काही नाही. माझं आयुष्य जसं चाललं तसं चालू दिलं असतं तर मी एक नीतिपर माणूस झालो असतो, पण मला माझी पूर्ण आठवण होती. माझ्या आयुष्याला जे काही वळण मिळालं ते का मिळालं. कसं मिळालं, याचे कारण मी देणार आहे.

माझे तीन गुरू आहेत. प्रत्येकाला गुरू असतातच. तसे मलाही आहेत. मी काही संन्याशी नाही की बैरागी नाही. पण मला गुरू आहेत. माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरू बुद्ध होत. मी दहा बारा वर्षाचा असेन. माझे वडील कबीर पंथी साधु होते. हे मला तेव्हापासून आठवतं, माझ्या वडिलांचं घर धर्मासन म्हणता येईल. तसेच विद्यासन असंही म्हणता येईल. माझे वडील विद्येचे भक्त होते, तसेच ते धर्माचे चाहते होते, माझ्या लहानपणी रामायण, महाभारत इत्यादी सर्व ग्रंथांची त्यांनी माझ्याकडून पारायणे करवून घेतली होती. रामायण, महाभारत वाचून माझ्या मनावर फार मोठा परिणाम झाला. माझे वडील मला म्हणत, “आपण गरीब असलो म्हणून भिण्याचं काही कारण नाही. तू विद्वान का होऊ शकणार नाहीस ?” एकदा मी कोणती तरी परीक्षा पास झालो होतो. त्यावेळी चाळीतल्या लोकांनी माझ्या वडिलांची इच्छा नसताही दादा केळुस्करांच्या मदतीने माझा सत्कार करायचं ठरविलं. माझे वडील म्हणायचे.
“नको सत्कार, मुलांचा असा सत्कार केला म्हणजे त्यांना पुढारी झालो असे वाटते. ( हंशा आणि टाळ्या ) त्यावेळी शेवटी सत्कार झालाच आणि दादा केळुस्करांनी मला बुद्धाच्या चरित्राचं एक पुस्तक बक्षीस दिलं. हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्यात काही निराळाच प्रकाश पडला. मारुती, सीता, राम वनवासाला गेले. धोब्याच्या सांगण्यावरून सीतेचा त्याग, कृष्णाच्या सोळा सहस्त्र बायका ह्या गोष्टी काहीतरी भयंकरच वाटल्या. ह्या गोष्टी माझ्या मनाची पकडच धरेनात. परंतु बुद्ध धर्माच्या त्या अभ्यासाने मला जास्त अभ्यास करावासा वाटला. त्या धर्माची पकड माझ्या मनावर कायमची आहे व माझी अशी ठाम खात्री झाली आहे की जगाचं कल्याण फक्त बुद्ध धर्मच करू शकेल. हिन्दू लोकांना आपलं राष्ट्र जगवायचं असेल तर बुद्ध धर्मच स्वीकारला पाहिजे असं माझं नेहमीच सांगणं आहे.

माझे दुसरे गुरु कबीर होत. माझे वडील कबीर पंथी होते. त्यामुळे कबीराच्या जीवनाचा आणि तत्त्वाचाही माझ्यावर फार मोठा परिणाम झाला. माझ्या मताप्रमाणे कबीराला बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचे खरे रहस्य कळले. मी मोठा कोणालाच म्हटले नाही. गांधीला मी महात्मा म्हटले नाही. कारण कबीराने म्हटले आहे. माणूस होना कठीण है ! तो साधु क्या बने ! जो माणूस झाला नाही तो महात्मा कसा होईल ?

आणि माझे तिसरे गुरू म्हणजे जोतीबा फुले होत. ब्राह्मणेतरांचे खरे गुरु तेच होत. शिंपी, कुंभार, न्हावी, कोळी, महार, मांग, चांभारांना माणुसकीचे धडे फुल्यांनीच दिले आणि शिकविले. पूर्वीच्या राजकारणात आम्ही जोतीबांच्या मार्गानेच जात होतो. पुढे मराठे आमच्यातून फुटले. कोणी काँग्रेसमध्ये उष्टे खाण्यासाठी गेले व त्यांच्याचपैकी आमचे रा. ब. बोले हे हिन्दू महासभेत गेले. ते येथे हजर आहेतच. कोणी कोठेही जावोत, पण आम्ही मात्र जोतीबांच्याच मार्गानी जाऊ. जोडीला कार्ल मार्क्स घेऊ किंवा दुसरे काही घेऊ पण जोतीबांचा मार्ग सोडणार नाही. हे असे माझे तीन गुरू आहेत. यांच्या शिकवणीने माझे आयुष्य बनले आहे.

यानंतर माझी तीन उपास्य दैवतेही आहेत. कोणाची मरीआई, खंडोबा, अशी दैवतं असतात, तशी माझी तीन दैवतं आहेत. माझे पहिले दैवत विद्या होय. विद्येशिवाय मानवाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. विद्या ही सर्वांना अवगत झाली पाहिजे. ती महासागरासारखी आहे. बुद्धाने एकदा म्हटले आहे की बुद्ध धर्म हा शुद्ध धर्म आहे. येथे भेदभाव नाही, श्रमण, भिक्षु, ब्राह्मण, भंगी मग तो कोणीही असो, सारे एक आहेत. माझ्या संघात येण्यापूर्वी नदी नाला, मग नाव कोणतेही असो, यमुना असो, ब्रह्मपुत्रा, गंगा, गोदावरी कोणतीही नदी असो, ह्या सर्व नद्या आपल्या प्रांतातून सागरात गेल्या. त्यांच पाणी एक झालं की हे पाणी मग सांगता येणार नाही की हे यमुनेचं की हे गंगेच, की हे गोदावरीच ! तेव्हा माझा संघ हा महासागरासारखा आहे. जात पात नाही, तुम्ही सर्व एक आहात. तुझी विद्येची आवड आहे ना मग ती सफल कर. ज्याप्रमाणे माणूस जगायचा असला तर अन्नाची आवश्यकता आहे तशीच विद्येचीही आवश्यकता आहे. ज्ञानाशिवाय तो काय करू शकेल ? ब्रह्मदेशात शेकडा 90 लोक सुशिक्षित आहेत. आज हिन्दुस्थानात शेकडा 90 लोक निरक्षर आहेत. याचे कारण ब्राह्मणांनी आम्हाला विद्या दिली नाही हेच होय. धर्माचे कायदे आमच्या आड आले आणि आमची विद्या हिरावून घेतली. आपले लोक समजत की दगड ही विद्या म्हणून आपल्या धार्मिक समजुती अतिशय रसातळास गेल्या दगडाची पूजा करणारे भाविक आमच्यात सर्वच लोक आहेत. तुकोबाने एके ठिकाणी म्हटले आहे. नवस सायासे कन्या पुत्र होती तरी कासया करणे लागे पती !! याचे कारण त्यांना विद्या दिली नाही. अत्यंत मोठी वस्तू आहे ही विद्या. माझे विद्येचे वेड भयंकर आहे. ब्राह्मणाच्या घरी नाहीत इतकी पुस्तके आता दिल्लीला मजजवळ आहेत. एकूण वीस हजार पुस्तके आहेत मजजवळ आहेत कोणा ब्राह्मणाजवळ ? दाखवून द्यावीत त्याने ! ठाकूर आणि कंपनीची माझ्यावर हजाराची उधारीची बील थकलेली आहेत. मला उधारीचा माल कुठेही मिळतो. जिथे माझी उधारी थकली तिथं मी दारातच मोटार उभी करतो, इतके माझं विद्येविषयीचं वेड आहे. हे वेड सर्वांना पाहिजे. एखाद्याची रांड असते ना! ती दुस-या गावाला असते. समजा, रात्री बारा वाजता त्याला आठवण मग तो रात्रीचा उठून स्मशान पाहत नाही. काही पाहत नाही. तो तिच्या घरी जाणारच ! एवढं जेव्हा पुस्तकावर प्रेम होईल तेव्हाच तो विद्येचा खरा पुजारी होईल. मी विद्येची पूजा 24 तास करीत असतो.

माझे दुसरे दैवत स्वाभिमान होय, मी कोणाची याचना केली नाही. माझं ध्येय असं होतं की पोट तर भरलं पाहिजे आणि माझ्या लोकांची सेवाही केली पाहिजे. डॉ. परांजपे यांच्या विनंतीने एका महाविद्यालयात एकॉनॉमिक्सचा प्रोफेसर झालो. तेव्हा मला त्यांनी तेरा व्याख्यानं देण्यासाठी सांगितले. मी म्हणालो फक्त चार व्याख्यानं देईन. पटलं तर ठेवा नाहीतर माझा मार्ग मला मोकळा आहे. कारण मला माझ्या लोकांची सेवा करावयाची होती, त्यासाठी वेळ हवा होता. पोयबावडीच्या नाक्यावरच्या 48 व 50 नंबरच्या खोलीत मी कण्याचा भात आणि कण्याची भाकरी खाल्ली. पण समाज सेवेला सोडून भारी पगाराकडे वळलो नाही. मार्ग निघाला. लोकांनी थैली स्वीकारून घरं बांधली. माझ्या माहितीच्या एका पुढान्याने म्हणे 47 हजाराच्या प्रॉमिसरी नोटा लिहून दिल्या होत्या आणि लोकांनी जेव्हा लाखभर रुपयांची थैली अर्पण केली तेव्हा ते फेडले. मला तसे करायचे नाही. मी माझे स्वतःचे पोट स्वतःच भरून जी काही सेवा करायची ती केली. नोकरी मला करायची नव्हतीच. कोणीही गव्हर्नर जनरल येवो त्याच्याशी माझी मैत्री असे. परंतु मी कोणाजवळही याचना केली नाही की मला अमुक बनवा किंवा मला ही जागा द्या. हो, दुस-यासाठी मी काही केलं असेल पण स्वतःसाठी एक बोट भर चिट्ठी लिहिल्याचं कोणीही दाखवून द्यावं. एक्झिक्युटिव्ह कौन्सिलर व्हावं ही मात्र माझी दांडगी इच्छा होती; ती पुरी झाली. आता मला ना पेन्शन ना पगार, ना प्राव्हिडंड फंड ! काही नाही. एकदा इंग्रजांच्या राज्यात कौन्सिलरशिप पत्करली. एकदा काँग्रेसच्या राज्यात. पण तेथेही काँग्रेसशी माझा खटका उडाला. मला जज होता आलं असतं. पण अडकून घेऊन करणार काय? तेव्हा माझं सागणं हेच की दीनता असू नये. मी काही तरी आहे असं मानलं पाहिजे. मी परमेश्वराला देखील कमी मानतो इतका माझा स्वाभिमान तळपता आहे.

आणि माझं तिसरं दैवत म्हणजे शील होय. माझ्या आयुष्यात मी दगाबाजी, फसवणूक, आत्मसिद्धीकरिता पाप केलं, असं मला आठवत नाही. याबद्दल मला मोठा अभिमान वाटतो. मी विलायतेला अनेक वेळा गेलो. पण अजून दारू प्यालो नाही, विडी प्यालो नाही. मला कसलं व्यसन नाही. पुस्तक आणि कपडा या गोष्टी अधिक प्रिय आहेत. शील संवर्धन हा गुण माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे, हे मला सांगायला फार अभिमान वाटतो. अशाप्रकारे माझे तीन गुरू आणि तीन उपास्य दैवतं आहेत. यांचा मी बनलेला आहे. या पदाला मी पोहोचलो हे त्यांच्याच शक्तिमुळे होय. मी मात्र केवळ कारण आहे. त्यांचा मी बनलेला एक पुतळा आहे. तेव्हा यांच अनुकरण करा. तुम्ही माझा समारंभ केलात तो व्यक्ती करिता केला नसून या तीन दैवतांचा आदर्श म्हणून त्यांचा कृतार्थ होण्यासाठी केलात असं म्हणून मी ही थैली स्वीकारीत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password