Categories

Most Viewed

28 ऑक्टोंबर 1951 भाषण

आमचे सच्चे प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत असले तरच ते आपल्या हितासाठी लढा देतील.

दिनांक 28 ऑक्टोबर 1951 रोजी लुधियाना येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. ते आपल्या भाषणात म्हणाले,

प्रिय बंधु आणि भगिनींनो,
माझ्या लोकांशी बोलण्यासाठी लुधियानाला येण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. यापूर्वी बरेचदा या ठिकाणी येण्यासंबंधी योजना मी आखली होती परंतु अनिवार्य परिस्थितीमुळे मला तसे करता आले नाही. आपण सर्वजण येथे एकत्र जमला आहात हा किती मंगलदायक प्रसंग आहे.

तुम्हाला माहितच आहे की दोन किंवा तीन महिन्यानंतर निवडणुका घेतल्या जाणार असून त्यात अनेक पक्ष भाग घेणार आहेत. शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनही या निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार आहे. विधानसभेसाठी व मध्यवर्ती संसदेसाठी शेड्यूल्ड कास्ट्ससाठी ठेवलेल्या सर्व राखीव जागा आणि जेथे आमचे मतदार पुरेशा संख्येत आहेत अशा काही सर्वसामान्य जागी आम्ही निवडणूक लढविणार आहोत. आमचे उमेदवार विजयी होतील अशी मला आशा आहे. आमच्या उमेदवारांचे यश मुख्यतः आमच्या मतदारांवरच अवलंबून असते. आपल्या सर्व मतदारांनी आपल्या उमेदवारासच मते दिली तर ते यशस्वी होतील अशी माझी खात्री आहे. म्हणून शेड्यूल्ड कास्ट्स आणि अन्य मागासवर्गीय लोकांची जी शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन ही एकमेव संघटना आहे. त्या संघटनेने उभ्या केलेल्या उमेदवारांनाच सर्व शेड्यूल्ड कास्ट्सच्या लोकांनी आपली मते द्यावीत अशी मी विनंती करतो.

भारतावरील ब्रिटिश सत्तेच्या काळात ब्रिटिशांनी आम्हाला कसे फसविले हे मी तुम्हास सांगतो. ते भारतापासून शेकडो मैल दूर राहात असले तरी भारतात त्यांचे राज्य स्थापण्यात यशस्वी झाले. प्रथमतः ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली तेव्हा तिचा हेतू केवळ व्यापार करण्याचा होता. क्रमाक्रमाने येथे आपले राज्य स्थापावे याबद्दल इंग्रज लोक कार्योत्सुक झाले. हा त्यांचा हेतू साध्य करण्यास ते समर्थ कसे बनले ? भारतात त्यांचे स्वतःचे सैन्य नव्हते. इंग्रजांच्या स्वतःच्या सैन्याशिवाय ते भारतातील सर्व राजामहाराजांना जिंकण्यास समर्थ कसे ठरले यांचे स्पष्टीकरण कोणीही करू शकला नाही. मी आता या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. ज्यांना त्यांचेच देशवासीलोक अस्पृश्य म्हणून संबोधित होते अशा शेड्यूल्ड कास्ट्सच्या लोकांच्या मदतीने ब्रिटिश लोक भारताचे राज्यकर्ते बनले. हे अस्पृश्य लोक निरक्षर होते आणि सवर्ण हिंदुनी त्यांना दिलेली वागणूक मानहानीकारक होती. त्यांना चरितार्थाचे कोणतेही साधन नव्हते आणि त्यांना नेहमी सवर्ण हिंदुच्या दयेवर अवलंबून राहावे लागत असे. जे काही घडले ते योग्य होते हे तुमच्या मनावर बिंबवावे असा माझा हेतू नाही. परंतु दुसऱ्या एका मुद्यावर मला जोर द्यावयाचा आहे. मला हे दाखवून द्यावयाचे आहे की ज्या लोकांना भारतात राज्य स्थापण्यासाठी मदत केली त्यांनीसुद्धा आमच्या लोकांना अशा निकृष्टपणे वागविले. ह्या ब्रिटिशांसाठी आमच्या लोकांनी लढाईत आपले प्राण गमावले परंतु त्यांना मोबदल्यात काय मिळाले ? लाभ कुणाला झाला ? ब्रिटिशांना शेड्यूल्ड कास्ट्सच्या लोकांनी मदत केलेली असताही त्यापासून ब्राह्मण आणि अन्य सवर्ण हिंदुनी पूर्ण लाभ उपटले, ब्रिटिशांनी त्यांच्याच मुलांना शिकविले आणि सर्वप्रकारची आर्थिक मदत त्यांनाच दिली व आमच्या लोकांकडे मुळीच लक्ष देण्यात आले नाही. याचा परिणाम असा झाला की, गरीब बिचा-या शेड्यूल्ड कास्ट्सच्या लोकांच्या जीवावर सवर्ण हिंदू संपन्न झाले आणि अस्पृश्य लोक जसेच्या तसेच राहिले. आजपर्यंत शेड्यूल्ड कास्ट्सचे कुटुंब सुसंपन्न का नाहीत, त्यांची मुले शिक्षित का नाहीत ? आणि ते मागासलेले का आहेत ? याचे हेच कारण होय. परिणामतः सैन्यातील पोलीस दलातील आणि प्रशासकीय खात्यातील महत्त्वाची पदे सध्या सवर्ण हिंदुच्याच हातात आहेत. ब्रिटिश लोकांनी आमच्या उन्नतीसाठी काहीतरी करावयास पाहिजे होते परंतु त्यांनी आमच्यासाठी काहीही केले नाही. 1858 मध्ये बंड झाले. बंडाची कारणे काय होती ? कारण आमच्या लोकांसाठी काहीतरी करण्यास ब्रिटिश लोक चुकले. सैन्यातील आमच्या लोकांना त्यांच्याविरुद्ध बंड करणे भाग पडले. जेव्हा हे बंड आटोक्यात आले आणि असे दिसून आले की सैन्यातील आमच्या लोकांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड पुकारले होते तेव्हा त्यांनी त्यापुढे आमच्या लोकांची सैन्यामध्ये भरती करणे बंद केले. त्यांच्याऐवजी हिंदू आणि राजपूतांची सैन्यात भरती करण्यात आली. अशाप्रकारे आपल्या लोकांचे उत्पन्नाचे मुख्य साधन नष्ट झाले. 1947 साली जेव्हा इंग्रजांनी भारत सोडला तेव्हा इंग्रज लोक भारतात येण्यापूर्वी अस्पृश्य ज्या स्थितीत होते त्याच शोचनीय स्थितीत होते. राज्यसत्तेचे हस्तांतरण करतेवेळी इंग्रजांनी सर्व सत्ता सवर्ण हिंदुच्या हाती सोपविली. आपणाला काहीसुद्धा मिळाले नाही. ज्यांना न्यायाबद्दल जरासुद्धा आस्था नाही अशा आमच्या देशवासी हिंदुच्या दयेवर आम्हाला सोडून देण्यात आले. यावरून गरीब बिचा-या शेड्यूल्ड कास्ट्सच्या लोकांना अन्य लोक कशी वागणूक देतात हे तुम्ही समजू शकता. आजपर्यंत आपण मागासलेले का राहिलो याचे हे कारण आहे. आता मी तुमच्यासमोर एक प्रश्न ठेवू इच्छितो. अजूनही तुम्हाला तसेच मागासलेले राहून सवर्ण हिंदुच्या हाताखाली गुलाम होऊन राहावयाचे आहे काय ? जेव्हा आर्य भारतात आले तेव्हा वर्णव्यवस्था कार्यरत झाली. लोकांना त्यांच्या जन्मावरून सामाजिक दर्जा देण्यात आला. काहींना ब्राह्मण म्हणण्यात आले. काहींना क्षत्रिय, काहींना वैश्य, काहींना शूद्र आणि इतरांना अस्पृश्य. या श्रेणीनुसार अस्पृश्य सर्वाचे आणि समाजापासून पूर्णतः वेगळे होते. सवर्ण हिंदू आणि अस्पृश्य यांच्यातील संबंध पाय आणि जोडा अशाप्रकारचा आहे. आपण जेव्हा घरात शिरतो तेव्हा जोडा घराबाहेरच ठेवतो. त्याचप्रमाणे ‘अछूत’ लोकांना समाजाच्या बाहेर ठेवण्यात आले आणि त्यांना कसल्याही प्रकारचे अधिकार देण्यात आले नाही. सवर्ण हिंदुकडून आम्हाला देण्यात आलेली अपमानकारक वागणूक आम्ही शेकडो वर्षे सहन केली आणि अजूनही सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या होत असलेला जुलूम आम्ही सोशीतच आहोत.

अनेक वर्षे झगडल्यानंतर आपण काही राजकीय हक्क प्राप्त केलेले आहेत. आणि त्याचा समावेश खुद्द भारतीय राज्य घटनेतच करण्यात आला आहे. वीस वर्षांइतक्या लांब काळापर्यंत मी महात्मा गांधींच्या विरुद्ध लढा दिला. आपणाला कोणतेही वेगळे अधिकार देण्याच्या कल्पनेच्या ते विरुद्ध होते. त्यांचा युक्तिवाद असा होता की, जर अस्पृश्यांना वेगळे हक्क देण्यात आले तर ते हिंदू जीवन पद्धतीत येण्याला कधीही पात्र ठरणार नाहीत. याशिवाय ते नेहमीसाठी हिंदुपासून तुटक राहातील. गोलमेज परिषदेतही आमच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीला महात्मा गांधीनी विरोध केला. इतक्या मोठ्या काळपर्यंत झगडून आपण थोडेसे राजकीय हक्क मिळविलेले आहेत, आता शेड्यूल्ड कास्ट्ससाठी राखीव असलेल्या जागेवरून आपण आपले प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत पाठवू शकतो.

हे आपले हक्क हिसकावून घेण्यासाठी बरेच पक्ष कार्यरत झालेले आहेत. आपल्या लोकांसाठी राखीव असलेल्या जागेवरून आपले अनुचर निवडून आणण्यासाठी आपली मते त्यांना मिळावीत यासाठी हे पक्ष कार्यरत आहेत. त्यांचा हेतू तुम्ही चांगल्यारीतीने समजू शकता. शेड्यूल्ड कास्ट्सचे लोक जेथे आहेत आणि जसे आहेत तसेच त्यांनी राहावे. त्यांनी राजसत्ता प्राप्त करू नये म्हणजे आज आपले लोक करीत असलेल्या तिरस्करणीय धंद्याची आबाळ होणार नाही असे त्यांना वाटते. म्हणून येत्या निवडणुकीत तुमच्या मताबद्दल तुम्ही सतर्क राहिले पाहिजे. आमच्या मतांच्या बळावर केवळ आपले खरे प्रतिनिधीच निवडल्या गेले पाहिजेत, दुसरे नाही, याची तुम्ही काळजी घ्यावी, असे झाले तरच तुमचे जे हक्क राज्यघटनेत समाविष्ट झाले आहेत ते सुरक्षित राहतील.

जर आपले खरे प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत निवडल्या गेले नाहीत तर आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकणार नाही. आपल्या लोकांकरिता स्वातंत्र्य हे एक नाटक ठरेल. हे स्वातंत्र्य हिंदू लोकांचे स्वातंत्र्य होईल. आपल्यासाठी नव्हे. परंतु जर आपले सच्चे प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत असले तर ते आपल्या हितासाठी लढा देतील आणि आपली दुःखे दूर करतील. फक्त तेव्हाच आपल्या मुलांना योग्य असे शिक्षण मिळेल फक्त तेव्हाच आपले दारिद्र्य दूर होऊ शकेल आणि फक्त तेव्हाच जीवनाच्या सर्व क्षेत्रात आपणाला बरोबरीचा वाटा मिळेल. भारतीय राज्यघटनेमध्ये जरी शेड्युल्ड कास्ट्सच्या लोकांना खास हक्क देण्यात आलेले आहेत तरीसुद्धा अन्य पक्ष विशेषतः काँग्रेस त्यामध्ये विनाकारण ढवळाढवळ करीत आहे. शेड्यूल्ड कास्ट्ससाठी राखीव असलेल्या जागांवर निवडणुकीसाठी ते आपले अनुचर उभे करीत आहेत. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या लोकांना त्याच्या धन्याच्या इच्छेनुसार वागावे लागते त्यामुळे ते आमच्या हिताचे संरक्षण कसे करु शकतील ? आमच्यासाठी ते काय करु शकतील ?

अस्पृश्य लोकांसाठी राखीव असलेल्या जागेवरुन काँग्रेसच्या तिकिटावर संसदेमध्ये निवडून गेलेल्या सभासदासबंधीची माहिती मी तुम्हास सांगू इच्छितो. त्यांची संख्या जवळजवळ 30 होती आणि मागील चार वर्षापासून ते संसदेत होते. या 30 सभासदापैकी एकानेही अस्पृश्यांच्या गाऱ्हाण बद्दल एकही प्रश्न संसदेत कधी विचारला नाही. जर कोणी एखादा प्रश्न संसदेत उपस्थित केला असेल तर सभाध्यक्षांनी त्याला परवानगी दिली नाही आणि तो विषय तेथेच संपला. जर एखादेवेळी सभाध्यक्षांनी उदार होऊन एखादा प्रश्न सभेच्या कामकाजात समाविष्ट करण्याची परवानगी दिलीच तर काँग्रेसचा मुख्य प्रतोद त्या संबंधित सभासदाकडे जाऊन तो प्रश्न छापण्याच्या अगोदरच परत घेण्यास सांगत असे. एखादे वेळी चुकून जर असा प्रश्न छापण्यात आलाच तर त्याचे जेव्हा उत्तर देण्याची वेळ येई तेव्हा प्रश्न विचारणा-या त्या सभासदाने गैरहजर राहावे असे त्या सभासदाला मुख्य प्रतोद सांगत असे आणि ज्याने प्रश्न विचारला तोच सभासद हजर नसल्यामुळे त्या प्रश्नावर चर्चा होत नसे. गेला एक महिना अंदाजपत्रकावर संसदेत चर्चा चालू आहे. यावेळी कोणीही सभासद या अंदाजपत्रकावरील चर्चेत भाग घेऊन अशाप्रकारची तरतूद त्याच्या समाजासाठी किंवा पक्षासाठी करण्यात यावी असे मत मांडू शकतो, तो निदर्शनास आणू शकतो की, इतकी मोठी रक्कम अमुक तमुक अनावश्यक योजनेवर खर्च होत आहे आणि अमुक तमुक महत्त्वाच्या योजनांकडे दुर्लक्ष होत आहे. एकाही हरिजन सभासदाला एखादा ‘कटमोशन’ मांडताना मी या चार वर्षाच्या काळात पाहिलेले नाही. हे सर्व काँग्रेसच्या दंड्यामुळे घडते. सभासदांना जर काही ठराव मांडावयाचा असेल तर तो ठराव प्रत्यक्ष मांडण्यापूर्वी बरेच आधी त्याला मुख्य प्रतोदाची परवानगी हासिल करावी लागते. या चार वर्षात या सभासदांनी कधीही बिल मांडले नाही. अस्पृश्य, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन इत्यादी लोकांसाठी राज्यघटनेद्वारा जे अधिकार दिलेले आहेत ते जर काँग्रेसच्या द्वाराने त्यांच्या शत्रुंनी काबीज केले तर त्या अधिकाराचा फायदा काय ?

जर तुम्ही काँग्रेसला मते दिलीत तर तुम्हाला नेहमीसाठी दुःख भोगावे लागेल. हा मुद्दा मी स्पष्ट करू इच्छितो. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून गेलेले आपले प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत तोंड मिटून बसतील. शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशन हीच आपली एकमेव संघटना असल्यामुळे तिच्या तिकिटावर निवडून गेलेले आपले सच्चे प्रतिनिधीच आपल्या हिताचे संरक्षण करू शकतात. काँग्रेसमध्ये राहून आपली दुःखे दूर करण्याचा काही संभव असता तर ती संघटना मी अव्हेरली नसती. मला माहीत आहे की कांग्रेसजवळ रग्गड पैसा आहे आणि त्याद्वारे ती मते विकत घेण्याचे प्रयत्न करील परंतु तुम्ही याबाबत सतर्क राहिले पाहिजे. मला जर हवे असते तर काँग्रेस सरकारात मी नेहमीसाठीच राहू शकलो असतो आणि निश्चितच मला तेथे एखादी चांगली जागा मिळाली असती. परंतु जर माझा हेतू स्वार्थी असता आणि माझ्या समाजासंबंधी मला काही आस्था नसती तरच मी तसे करू शकलो असतो. मला एखाद्या लायसन्सची अगर परमिटची आवश्यकता असती तरच मी तिथे राहिलो असतो. लायसन्स आणि परमिट मिळविणारा माणूस समाजहिताचा बळी देऊनच तसे करू शकतो. काँग्रेस सरकारात मी असतानाच्या काळात आलेला हा माझा अनुभव आहे.

इंग्रजांनी मनात आणले असते तर ते त्यांच्या येथील वास्तव्याच्या काळात आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी काही काम करू शकत होते. परंतु त्यांनीही आम्हाला फसविले. तो काळ आता निघून गेला आणि दुसरे अवस्थांतर आता अस्तित्वात आले आहे. इंग्रज आम्हाला सोडून गेले. दुसरे लोक आता राज्य सत्तेवर आले. यावेळी तरी आपण सतर्क राहिलो नाही आणि डोळे मिटून बसलो तर आपला सर्वनाश होईल. आजपर्यंत जो जुलूम तुम्ही सोशीत आहात तो तुमच्या भावी पिढ्यांना सोसावा लागू नये अशी तुमची इच्छा असेल तर तुम्हाला आताच त्यासाठी काहीतरी केले पाहिजे. जेव्हा तुम्ही झाड लावता तेव्हा काही काळानंतर तुम्हाला फळे प्राप्त होतात. मी तुमच्या मनावर हे बिंबवू इच्छितो की, विधानसभा आणि संसदेतील राखीव जागा फक्त दहा वर्षासाठी आहेत, भारतात अस्पृश्यता प्रचलित असेपर्यंत त्या राहाव्यात असे मला वाटत असले तरी काँग्रेसच्या तिकिटावर जे आपले लोक संसदेचे सभासद झाले त्यांनीच मला विरोध केला. अशा स्थितीत उच्चवर्णीय लोकांबद्दल बोलावयासच नको. काहीच नसण्यापेक्षा थोडे जरी मिळत असेल तर बरे असा विचार करून दहा वर्षेपर्यंत राखीव जागा असाव्यात याला मी संमती दिली आणि आमच्या लोकांसाठी थोडे फार मिळविले. या राखीव जागा फक्त येत्या दोन निवडणुकी पुरत्याच आहेत. आणि त्या काळापर्यंतच काँग्रेससारखे हितसंबंधी पक्ष तुमच्याकडे येतील व मते मागतील अशाने हा 10 वर्षांचा कालावधी निघून जाईल आणि या काळात बाद करा अशी मागणी करण्यासाठी तुमचा कोणीही माणूस तेव्हा संसदेत असणार नाही. तेव्हा तुम्ही काय करणार आहात असे मी तुम्हास विचारु इच्छितो. तेव्हा हे काँग्रेसवाले तुमच्याकडे येऊन त्यांच्या तिकिटावर निवडणुकीसाठी उभे राहाण्याची विनंती करतील काय ? निश्चितच नाही. ते इतके मूर्ख नाहीत तुम्हा लोकांना ते मूर्ख बनवू इच्छितात आज जे लोक कॉंग्रेसचे तिकिट मिळविण्याच्या प्रयत्नात असलेले दिसतात, त्यांच्या तोंडावरही तेव्हा हे काँग्रेसवाले थुंकणार नाहीत म्हणून तुम्ही सर्वांनी या समस्येवर विचार करावा आणि नंतरच तुम्ही कोणत्या उमेदवाराला मत द्यावे ते ठरवा.

कोणत्याही पक्षाजवळ सत्ता तरी असली पाहिजे किंवा पैसा तरी असला पाहिजे. आपल्या समाजाजवळ पैसाही नाही आणि सत्ताही नाही. आपण या उच्चवर्णीय हिंदुच्या दयेवर खेडवून थोड्या थोड्या संख्येने राहात आहोत. बनिया आणि मारवाडी इत्यादी लोकही सत्ताविष्ठित नाहीत. परंतु पैसा आहे. पैशाच्या जोरावर ते वाटेल ते विकत घेऊ म्हणून तुमच्या स्वतःसाठी काहीतरी करण्याची ही एक सुसंधी आहे. तुम्ही जर संघटित झालात तर तुमच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी तुम्ही तुमचे प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत पाठवू शकता; नाहीतर तुमचा नाश होईल म्हणून या गोंधळातून तुमच्या समाजाला बाहेर काढण्यासाठी कास्ट्स फेडरेशनच्या ध्वजाखाली तुम्ही संघटित झाले पाहिजे. आपले सच्चे प्रतिनिधी निवडण्याकरिता प्रत्येक अस्पृश्याने फेडरेशनला मदत करावी. पुष्कळ पक्ष तुमच्याकडे येऊन मताची मागणी करतील परंतु त्यांचे ऐकून चुकीच्या मार्गाने जाऊ नका.

काही दिवसांपूर्वी पंडित नेहरू येथे आले होते. असे सांगण्यात आले की, दोन किंवा तीन लाख लोक त्यांचे भाषण ऐकण्यासाठी येथे जमले होते. किती लोक तेथे होते हे काही मला माहीत नाही.. काल जेव्हा मी जालंदरला भेट दिली तेव्हा दोन लक्षापेक्षाही जास्त लोक तेथे जमले होते. परंतु हिंदू आणि काँग्रेसी वर्तमानपत्रांनी तेथे अंदाजे फक्त 35 हजार लोक जमल्याचे लिहिले आहे. मला तुम्हास सांगावयाचे आहे ते हे की, जर काँग्रेसची एखादी परिषद असली तर श्रोते अगदी थोडे असले तरीसुद्धा ते प्रसिद्ध करतील की या परिषदेला फार मोठा जनसमूह जमला होता. पाच असले तर पन्नास, पन्नासाला ते पाचशे म्हणतील, पाचशेला ते पाच हजार म्हणतील आणि पाच हजाराला ते पाच लाख जमले म्हणून लिहितील. या वर्तमानपत्रांनी अशाप्रकारे खोटी माहिती दिल्याबद्दल आणि खोटी टीका केल्याबद्दल मला काहीच नवल वाटत नाही. ही वर्तमानपत्रे पुष्कळ वर्षापासून माझ्यावर टीका करीत आली आहेत. तरीसुद्धा माझी शारीरिक आणि मानसिक प्रगती होतच आहे. फार मोठ्या जनसमूहासमोर भाषण देण्याची मला आवड नाही. मला जे हवे आहे ते इतकेच की, या हिंदू लोकांकडून होणाऱ्या अत्याचारांना तोंड देण्याकरिता आमच्या लोकांनी संघटित व्हावे माझे विचार त्यांनी ऐकावे एवढीच माझी इच्छा आहे. मग ते फार मोठ्या संख्येने जमोत की लहान संख्येने ही गोष्ट महत्त्वाची नाही.

प्रत्येक राजकीय पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. प्रत्येक पक्षाने तो निवडून आल्यास हे करू आणि ते करू अशी आश्वासने दिली आहेत. शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशननेही आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. सर्वांच्या आधी काँग्रेसने आपला जाडजूड जाहीरनामा प्रसिद्ध केला, परंतु जेव्हा त्यांना समजून आले की सर्वसाधारण लोकांना तो आकलन होणार नाही तेव्हा त्यांनी त्यात बदल केला आणि त्याला लहान रूप देण्यात आले. दिवसेंदिवस त्यांचा जाहीरनामा लहान लहान होत जाईल आणि एक दिवस असा येईल की, काँग्रेसचा जाहीरनामा राहणार नाही असे मला वाटते. जाहीरनाम्यात काय असावे आणि काय नसावे हे मी तुम्हास सांगू इच्छितो. माझे सर्व राजकीय पक्षांना आव्हान आहे की, त्यांनी सर्वात उत्तम जाहीरनामा कोणता हे निवडण्यासाठी एक कमिटी बनवावी. शंका नाही की आमचा जाहीरनामाच सर्वश्रेष्ठ ठरेल. मला मुळीसुद्धा सर्व पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यात जनतेला नाना प्रकारची आश्वासने दिलेली आहेत. आश्वासने देणे फार सोपे आहे परंतु ती प्रत्यक्षात उतरविणे अत्यंत कठीण आहे. एका गोष्टीचे तुम्ही आश्वासन देत असाल तर तुम्ही शंभर गोष्टीचेही आश्वासन देऊ शकता. जाहीरनामा हा केवळ आश्वासनांची जंत्री असू नये. देशाला ज्या समस्यांशी तोड द्यावे लागते त्यांचा जाहीरनाम्यात विचार असला पाहिजे आणि त्या समस्या कशा सोडवाव्या हेही असले पाहिजे. कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात अशा प्रकारचे काहीतरी आहे काय ? काँग्रेसच्या जाहीरनाम्यात फक्त एकाच गोष्टीवर भर देण्यात आला आहे. ती गोष्ट म्हणजे मुस्लिम समस्या. कोणीतरी या मुद्यावर सहमत होऊ शकतो काय ? भारत अभंग असताना आणि जेव्हा पाकिस्तान नव्हते तेव्हा अर्थात मुस्लिम समस्या होती. परंतु तेव्हासुद्धा देशासमोर असलेली ही एकमेव समस्या नव्हती. मुस्लिमांनी फार मोठ्या संख्येत पाकिस्तानात स्थलांतर केले असून फक्त हिंदू, शिख आणि अन्य अल्पसंख्य लोक भारतात आहेत. भारत आता मुस्लिम समस्येला तोंड देत आहे असे तुम्हास वाटते काय ? मुसलमानांपेक्षा जे दसपट गरीब आणि मागासलेले आहेत अशा दलित लोकांसाठी काहीही करावयास नको हे तुम्हास मान्य आहे काय ? अनुसूचित जाती, आदिवासी आणि गुन्हेगार जमाती यांच्याकडे सरकारने सर्वात जास्त लक्ष द्यावयास पाहिजे. परंतु काँग्रेसवाले सांगतात की लोकांनी जातीयवादी होऊ नये आणि मागास जातीकरिता काही खास तरतुदीची मागणी करू नये. भारतातील दुसरी समस्या दारिद्र्याची आहे. भारतातील लोक अत्यंत दरिद्री आहेत. ते इतके दरिद्री आहेत की 90 टक्के लोकांना खावयास योग्य अन्नही मिळत नाही. त्यांना कपडे मिळत नाहीत. त्यांना निवारा नाही. कोट्यावधी रुपयांचे अन्नधान्य दरवर्षी परदेशातून आयात केले जाते. आम्हाला जर अन्नधान्यही परदेशातून आयात करावे लागते आणि त्याच्या खरेदीवर व आयातीवर एवढी मोठी रक्कम खर्च करावी लागते तर आमचा निभाव कसा लागेल ? परंतु या सर्व गोष्टींकरिता कॉंग्रेसवाल्यांच्या मनात काहीच स्थान नाही. त्यांच्यासमोर एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे मुस्लिम समस्या !

मला तुम्हास सांगावयाचे आहे की, येत्या निवडणुकीत आम्ही शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे उमेदवार उभे करीत आहोत. शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन हा सर्व मागासवर्गीय लोकांचा प्रातिनिधीक पक्ष आहे. प्रत्येक मागासवर्गीयाला त्यात प्रतिनिधीत्व देण्यात येईल. त्याची कोणीही भीती बाळगू नये. चांभार आणि भंगी हे सर्व समसमान आहेत. आपण एका जमातीचे एक लोक आहोत. आपण आपसात भांडू नये. मी सर्व पुरुष आणि स्त्रियांना विनंती करू इच्छितो की, मतदानाच्या दिवशी सर्व कामे बाजूला सारून मतदान केन्द्रावर जाऊन मतदान करावे. आधीच आपली मते पुरेसी नाहीत आणि त्या दिवशी जर त्यांनी मतदान केले नाही तर ते आपल्या भल्याचे होणार नाही. आपण प्रतिनिधीत्वाशिवाय राहू. मतदानाचा दिवस अनुसूचित जातीच्या लोकांसाठी जीवन-मरणाचा दिवस आहे.

येत्या निवडणुकीत भाग घेणा-या प्रत्येक राजकीय पक्षाला एक पक्षचिन्ह देण्यात आले आहे. आपल्या फेडरेशनचे चिन्ह हत्ती आहे. आपल्या लोकांच्या मनात कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून मी हे चिन्ह निवडले आहे. काही पक्षांनी बैल, घोडा आणि गाढव अशी चिन्हे निवडली आहेत. ठळकपणासाठी मी हत्ती निवडला आहे.

आपल्या निवडीच्या एकाच उमेदवाराला आपल्याजवळील सर्व मतपत्रिका या निवडणुकीत देता येणार नाहीत. कारण यावेळी एकत्रित (Cumulative) मतदान पद्धती नाही आता विभाजित (Distributive) मतदान पद्धती आहे. म्हणून निरनिराळ्या उमेदवाराला आपल्याजवळील मतपत्रिका द्यावयाच्या आहेत. एक सर्वसाधारण जागेवरील उमेदवाराला आणि दुसरी राखीव जागेवरील उमेदवाराला राखीव जागेवरून निवडणूक लढविणाऱ्या आपल्या उमेदवाराला आपण आपल्या जवळील दोन्ही मते देवू शकत नाही. त्याला आपण एकच मत देवू शकतो व सर्वसाधारण जागेवर उभ्या असलेल्या दुसऱ्या कोणालातरी दुसरे मत द्यावे लागणार आहे. म्हणून जो पक्ष आपले दुसरे मत आमच्या उमेदवारास व आपले दुसरे मत आपण त्यांना देऊ अशा दुसऱ्या पक्षाशी आपण समझोता केला पाहिजे. आपली हातमिळवणी कोणत्या पक्षाशी करावी हे आपण अजून ठरविलेले नाही. पुष्कळ पक्ष आमचेकडे मैत्रीसाठी आले परंतु अंतिम स्वरूपाचे अजून काही ठरविलेले नाही. बोलणी चालू आहेत. एखाद्या पक्षाशी हातमिळवणी करण्यापूर्वी आपणाला खूप विचार केला पाहिजे. परंतु कोणत्यातरी पक्षाशी आपणाला मैत्री केलीच पाहिजे.

शेवटी मला हेच सांगायचे आहे की पंजाब, उत्तर प्रदेश आणि अन्य दूरदूरच्या प्रदेशातून हजारो लोक दिल्लीला माझ्याकडे आपली गा-हाणी सांगण्याकरिता येत असतात. काहींचे गाऱ्हाणे असते की जमीनदाराने त्यांना मारपीट केली. जेव्हा त्यांनी संबंधित अधिका-याकडे दाद मागितली तेव्हा त्याच्याविरुद्ध निर्णय देण्यात आला. कारण अधिकाराच्या जागेवर असलेले लोक सवर्ण हिंदू होते. अशा प्रकारच्या इतक्या तक्रारी आहेत की, रिकाम्या हाताने त्यांचा परामर्श घेणे असंभव आहे. पुष्कळ लोक निराश होऊन आपल्या गावी परत जातात. म्हणून दिल्लीत एक इमारत उभारण्याचे मी ठरविले आहे. तेथे आपला एक वकील राहील. तो आपल्या लोकांच्या तक्रारींकडे लक्ष देऊन त्या त्या प्रकरणात सल्ला देईल. आपण यापूर्वीच या कामासाठी दिल्लीत एक जमिनीचा तुकडा खरेदी केला आहे त्या जागेवर इमारत उभारावयाची आहे. तेथेच आपल्या फेडरेशनचे कार्यालय राहील. बाहेरून येणाऱ्या लोकांचे तेथे स्वागत होईल आणि त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील. या बिल्डिगच्या बांधकामासाठी अत्यंत आवश्यक असूनही पुरेसा पैसा नाही म्हणून तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या शक्तीनुसार वर्गणी द्यावी. अशाप्रकारे आपला हेतू आपण साध्य करू शकू. दिल्लीचे बाबा तुलादास हे इमारत निधी गोळा करण्यासाठी पंजाबचा दौरा करतील. या उदात्त कार्यासाठी तुम्ही सर्वांनी उदारपणे मदत करावी अशी पुन्हा एकदा मी विनंती करतो.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password