Categories

Most Viewed

26 ऑक्टोंबर 1954 भाषण

तुमची झोपडी जिवंत राहिली तर लोक तुमच्या आश्रयाला येतील.

तारीख 26-27 ऑक्टोबर 1954 रोजी मुंबई प्रदेश अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे अधिवेशन, मुंबई येथील पुरंदरे स्टेडियमवर घेण्यात आले होते. पहिल्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिषदेला हजर राहून त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्याच दिवशी श्री. आर. डी. भंडारे यांनी शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या कार्यकारिणीचे आणि शाखांचे विसर्जन करून नव्या निवडणुका घेण्यात याव्या हा ठराव डॉ. बाबासाहेबांच्या संमतीने मांडला व त्या ठरावाला पुण्याचे श्री. आर. आर. भोळे यांनी पाठिंबा दिला. सदर ठराव बहुमताने व टाळ्यांच्या गजराने पास करण्यात आला. या ठरावामुळे फेडरेशनच्या कार्यकर्त्यांमधील असंतोष कमी झाला यात तिळमात्र शंका नाही. कारण सध्याचे पदाधिकारी 1945 मध्ये नेमले गेले होते आणि तेव्हापासून ते जागा अडवून बसल्यामुळे इतर कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते. नव्या निवडणुका सहा महिन्यांच्या आत होणार आहेत.

पहिल्या दिवशी दिनांक 26 ऑक्टोबर 1954 रोजी परिषदेला मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले.

मित्रहो,
ज्या कार्याकरता आपण ही सभा भरविण्याचे ठरविले होते तो उद्देश सभासंचालकांना पूर्णपणे समजलेला दिसत नाही. नाहीतर ही आता जी सभा चव्हाट्यावर भरली आहे ती कुठे तरी गुप्त ठिकाणी भरली असती. कार्यकर्त्यांना बरेच सांगावयाचे होते परंतु ते गुप्त सांगावयाचे होते. मला आता मी जे सांगणार आहे ते स्पष्टपणे सांगणार नाही. त्याचा मी फक्त मतितार्थ सांगणार आहे. शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनमध्ये जी घाण साचली आहे ती उपसण्याचा माझा इरादा होता. म्युनिसीपालिटीची गटारे साचली म्हणजे कशी घाण होते त्याप्रमाणे शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनमध्ये घाण निर्माण झाली आहे. ती घाण गुप्तपणे उपसावयास पाहिजे होती. शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या राजकारणाला 1919 सालापासून सुरूवात झाली. त्याचे अगोदरसुद्धा अस्पृश्य चळवळीचे काम चालू होते. ही संस्था आजकालची नाही. ती काँग्रेसइतकीच नव्हे तर त्यापेक्षा जास्त जुनी आहे. काँग्रेसच्या आयुष्याला सुरूवात गांधीजींच्या पासूनच झाली, असे म्हणावयास हरकत नाही आणि ते साल देखील 1919 सालच आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्या सालापासूनच आम्हाला काँग्रेसशी विरोध करावा लागला आहे. तेव्हा तरी काँग्रेसशी विरोध करणे हेच कार्य ठरले होते. त्यांच्यापासूनच आपल्या हक्कांची पायमल्ली होत होती. शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन हे तेव्हापासून टिकून राहिले आहे. शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन हा दगडाचा परंतु भक्कम किल्ला आहे. काँग्रेसचा किल्ला हा पैशावर उभारला आहे. लोकमान्य टिळक फंड आणि गुजराथी बंधूंची थैल्यांची मदत यावर हा किल्ला उभारला आहे. परंतु शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचा किल्ला हा अस्पृश्य जनतेच्या भावनेवर उभारला आहे. हा किल्ला मोडू नये, अशी माझी पूर्ण इच्छा आहे. माझे शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनकडे गेली दहा वर्षे दुर्लक्ष झाले. या दहा वर्षाच्या गैरहजेरीत शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनमध्ये पुष्कळ मतभेद निर्माण झाले आहेत. यापूर्वी असले मतभेद नव्हते. प्रत्येक माणसाने फेडरेशनमध्ये गटबाजी सुरू केली आहे. प्रत्येकाने आपापले लहान लहान गट निर्माण केले आहेत. एकाचे वर्चस्व दुस-यास नको आहे. यामुळे आपले लोक अजून तरी राजकारणात पक्के मुरले नाहीत. राजकारण म्हणजे काय ह्याची त्यास पूर्णपणे जाणीव नाही. आपल्या समाजात आपापसात फार मतभेद असतात. ते मतभेद ताबडतोब नष्ट होत नाहीत. त्या मतभेदाची झाडे त्यांच्या पोटात वाढू लागतात. त्यांचे मतभेद त्यांच्या मुलांच्याही पोटात वाढतात. मतभेद हे वाढत जातात. हा गुणधर्म आपल्या लोकात जास्त प्रमाणात अशा रीतीने आहे. काँग्रेससारख्या पक्षातसुद्धा मतभेद आहेत. त्याबरोबरच त्यांच्याजवळ काही सद्गुणही आहेत. असे अनुभवाने म्हणावे लागते. त्यांचा एक गुण फार मग महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे बहुमताने ठरलेले ते सर्व मान्य करतात. त्या गोष्टीचे विरोधकसुद्धा खोट्याचे समर्थन करू लागतात. ही कृती राजकारणात फार आवश्यक आहे. माझ्या मताप्रमाणे जर कारभार चालला तरच मी संस्थेत राहीन, अशी प्रवृत्ती फार वाईट, हम करे सो कायदा नको.

संस्थेत कोण मोठा ? डॉ. आंबेडकरांचे खालोखाल कोण ? वगैरे मतभेद फार वाढले आहेत. दलित फेडरेशनच्या परिषदा होत नाहीत. इलेक्शन्स होत नाहीत, असे मी नेहमी कार्यकर्त्यांकडून ऐकतो. हे सर्व खरे असले तरी त्याचा त्यांनी विचार केला आहे काय ? या गोष्टीला लागणारा पैसा आमचेजवळ नाही. म्हणून परिषदा बोलावणे, इलेक्शन्स घेणे हे आम्हाला शक्य नाही. भोळे यांनी जर आम्हाला पैसा पुरविला तर वर्षातून काय परंतु सहा महिन्यांनीसुद्धा आम्ही परिषदा घेऊ, तसे पैसे देऊन भोळ्यांनी पुण्याला बोलवावी बैठक । काँग्रेससारख्या संस्थेजवळ पैसा आहे. आम्हाला पैशाची अडचण आहे. काही लोक म्हणतात आपण सरकारवर टीका करू नये, त्याचेशी सहकार्य करावे. आमचे हक्क पदरात पाडणे, हेच आमचे पहिले काम आहे. ते हक्क जर पदरात पडत नसतील तर आम्ही टीका करणारच. सरकारवर टीकाच नसेल तर दलित फेडरेशनची आवश्यकता तरी काय आहे ? सरकार काय, देव आला तरी आम्ही त्याच्यावर टीका करूच, ज्यांना हे पसंत नसेल त्यांनी दलित फेडरेशन सोडून जावे. आम्ही सरकारशी सहकार्य केले नाही काय ? मी चार वर्षे त्याच्याबरोबर नव्हतो का ? आम्ही वेळोवेळी सहकार्य देत आलो आहोत. सरकार जर आमच्याकरिता काही करणार नसेल तर आम्ही सदोदित टीका करू. आम्ही गप्प का बसावे ?

लोक सांगतात की दलित फेडरेशन चढाव करत नाही. चढाव म्हणजे काय ? चढ़ावाचे राजकारण आम्हाला पचणार आहे काय ? आम्ही चढाव केला तर त्याचा तुम्हालाच त्रास होईल. आम्ही तुरुंगात जाऊन बसलो तर तुम्हालाच लोक छळतील. तुम्ही आंबेडकरांना मदत करता काय बेट्यांनो ? तुमचे पाहून घेऊ. असे म्हणून तुम्हालाच त्रास देतील. त्यापेक्षा तुम्ही कष्ट करा. कष्ट करणे हा माझा धर्मच होऊन बसला आहे. मला अजून विश्रांती मिळाली नाही आणि मी विश्रांतीही घेत नाही. दुसरी गोष्ट आपले मन निर्मळ पाहिजे. त्यामुळे आपसातील मतभेद नाहीसे होतात. दलित फेडरेशनमध्ये मुख्य वाद आहे तो डॉ. आंबेडकरानंतर मुख्य कोण ? याचा अर्थच मला कळत नाही. मी मरण्याचे अगोदरच हा वाद निर्माण झाला आहे. म्हणजे मी लवकरच मरावे की जगावे असा प्रश्न माझ्यापुढे निर्माण होतो. बरे हा वाद तर मिटविलाच पाहिजे, यावर मी एक उपाय शोधून काढला आहे. हा वाद मिटविण्याकरिता दलित फेडरेशनच्या पुढाऱ्यांचे आणि मेंबर्सचे इलेक्शन झाले पाहिजे. तरच हा वाद मिटेल. जो काम करतो तोच खरा पुढारी लोकांना माहीत आहे. खरा पुढारी कोण ? काम केले तर लोक खरा पुढारी कोण हे समजू शकतात. ही पद्धत अंमलात आणण्याकरिता चार आण्याची वर्गणी आम्हास नको, दलित फेडरेशनमध्ये पैसे खाण्याची प्रवृत्ती फार प्रमाणात शिरली आहे. म्हणून काँग्रेससारखे चार आण्याचे बंधन आम्हास नको. प्रत्येक अस्पृश्य माणूस हा दलित फेडरेशनचा सभासद आहे. तो जरी तसे म्हणाला नाही तरी तसे आम्ही समजणार. अशा रीतीने प्रत्येक गावातील लोकांनी आपल्या गावातील पाच लोक निवडून द्यावे. याप्रमाणे सर्व तालुक्यातील गावची पाच माणसे प्रमाणे लोकांनी आपले अध्यक्ष, सेक्रेटरी यांची निवड करावी. यामुळे तक्रार राहण्याचे कारण नाही. ही निवड सर्वांनाच बंधनकारक राहील. जे पैसे जमतील ते बँकेमध्ये ठेवण्यात येतील.

लोकांकरिता जे झटतात तेच पुढारी होतात. लोकांना हे समजते आणि म्हणूनच काम केले पाहिजे. राजकारणातून मी आता बाहेर पडणार आहे. मी आता फक्त सल्ला मसलत देणार आहे. सल्ला देण्यास नेहमी तयार आहे. मी जरी शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनमधून बाहेर पडलो तरी फेडरेशन जिवंत ठेवली पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. इलेक्शनमध्ये आपणास मान नाही असे समजू नये. इलेक्शन आपण जिंकूच असे सुद्धा नाही, किडवाई हा माझा दोस्त होता. तो काँग्रेसचा प्राण होता. त्याच्यामागे काँग्रेस ही पोरकी झाली आहे. त्याप्रमाणे जवाहरलाल नेहरू हे देखील काँग्रेसचा प्राण आहेत. नंतर काँग्रेस काहीच नाही. जनता तुमचेच पाठीमागे येणार आहे. बाकीच्यांची घरे मोडली तरी आपली झोपडी तशीच ठेवा. लोक तुमच्याच झोपडीच्या आश्रयाला येतील. तुमची झोपडी जिवंत राहिली तरच तुमचा जय आहे. शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचा किल्ला हा अस्पृश्य जनतेच्या भावनेवर उभारला आहे. तो मोडू देता कामा नये. हा समाज ब्राह्मणेतर पक्षाशी सहकार्याने वागत होता. आम्ही जोतीबाचे शिष्य आहोत. त्यांच्याशी आम्ही सहकार्य केले. परंतु पुढे हा समाज काँग्रेसशी जाऊन मिळाला. तशी त्यांना दुर्बुद्धी आठवली. आपणास ध्येयप्राप्ती होण्याकरता इतरांशी संबंध ठेवावे लागतील. कोणाशी संबंध ठेवायचे हे मी नंतर सांगणार आहे. जे लोक आपले बरे करतील तो पक्ष आमचा मित्र राहील. राजकारणात भांडणे होतात ती विसरुन जाण्याची सवय ठेवली पाहिजे. स्वभाव बरा नाही. या भांडणाचे झाड मनात वाढते. माझे हृदय निर्मळ आहे. माझेसुद्धा इतरांशी मतभेद असतात परंतु ते मी लवकर विसरतो. माणसाचे मन फुलाप्रमाणे स्वच्छ असावे लागते. मारवाड्याच्या मिशीप्रमाणे आमचे धोरण ठेवायला पाहिजे. आपले ध्येय साधण्याकरिता काही वेळा मिशी वर तर काही वेळा मिशी खाली, अशी मारवाड्याची स्थिती असते. त्याप्रमाणे आपले धोरण ठरविले पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्यावी. एवढे बोलून मी आपली रजा घेतो.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password