Categories

Most Viewed

04 ऑक्टोंबर 1947 भाषण

राजकारणात भक्तीला विभूतीपूजेचे रुप आले की सर्वाधिकारशाही निर्माण होण्याचे भय असते.

तारीख 15 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर कार्पोरेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला. सदर सत्कारास नागपूर शहरातील सर्व नगरपिते व प्रतिष्ठित नागरिक हजर होते. सत्कारासाठी खास मंडपही तयार करण्यात आला होता. सदर समारंभ, संध्याकाळी 6 ते 8 च्या दरम्यान पार पडला. सभा मंडप गच्च भरून गेला होता. बाहेर रस्त्यावर दोहो बाजूस प्रचंड गर्दी लोटली होती.

प्रथम नागपूर कार्पोरेशनचे मेयर (महापौर) श्री. रा. पै. समर्थ यांनी छापील मानपत्र वाचून दाखविले. ते मानपत्र असे,

              मानपत्र 

भारतीय पद्दलित जनतेच्या मूक भावनांची साकारमूर्ती सन्माननीय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
एम. ए., पीएच. डी., डी. एस्सी., बार अँट-लॉ. आपल्यासारख्या समाजसुधारक, तत्त्वज्ञ व विधिज्ञ पंडिताचे स्वागत करण्याची संधी नागपूरच्या जनतेस लाभली याबद्दल आम्हांस परमहर्ष होत आहे.

तसे पाहिले तर नागपूर शहराशी आपल्या जीवनाचा अत्यंत घनिष्ट संबंध आला आहे. महान परिश्रमाने विद्यासंपन्न झाल्यानंतर याच नगरीत आपण 1930 साली दलित जनता परिषद भरवून, देशातील दलित समाजाला मार्गदर्शन केले आहे. व आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला प्रारंभ केला आहे. याच नगरीत 1942 साली अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनला जन्म देऊन पददलित समाजाच्या राजकीय आकांक्षांचा निनाद आपण सा-या भारतात प्रथम दुमदुमविला आहे. आणि आज याच नगरीत आपल्या उत्तर जीवनात बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन आपण आपल्या नवीन जीवनाला प्रारंभ करीत आहात.

आपल्या अष्टपैलू जीवनाकडे दृष्टीक्षेप केल्यास असे दिसून येईल की, आपला पिंड प्रगाढ पंडिताचा असला तरी तो नुसत्या तार्किक विवेचनात गुरफटून न ठेवता प्रत्यक्ष कर्तव्यसृष्टीत उतरविला आहे. शतकानुशतके धार्मिक, सामाजिक व आर्थिक अशा सर्वच बाबतीत पिळवटून निघालेल्या अस्पृश्य समाजाच्या मूक व करूण किंकाळ्यांनी आपल्या हृदयाला पाझर फुटून आपण त्यांच्या सेवेचे असिंधाराव्रत स्वीकारले.

महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश “सत्याग्रह” यासारख्या कितीतरी सत्यपरीक्षांनी आपले जीवन अधिकच उज्ज्वल केले आहे. वन्ही तो चेतवावा रे, चेतविताची चेततो ! केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे !” या समर्थ रामदासांच्या उक्तीप्रमाणे दलित समाजाचा आत्मा आपल्या अविरत परिश्रमाने जागृत झाला. आणि त्याने आपल्या राजकीय व सामाजिक हक्कासाठी आपल्या नेतृत्वाखाली लढा आरंभिला. त्याचाच परिपाक लंडन शहरी भरलेल्या गोलमेज परिषदेत दलित समाजाचे एकमेव नेते म्हणून आपली निवड होण्यात झाला. गोलमेज परिषदेतील आपली कामगिरी स्पृहणीय आहे.

आपल्या अंगच्या अशा असामान्य गुणांमुळेच 1942 साली त्यावेळच्या भारत सरकारने मजूर मंत्री म्हणून आपली नियुक्ती केली आणि आपण ती जबाबदारी उत्कृष्टपणे सांभाळली व श्रमजिवी वर्गाची आपण अपरिमित सेवा केली.

पारतंत्र्याच्या काळोख्यात रात्रीनंतर भारतीय क्षितिजावर स्वातंत्र्यसूर्याचा उदय झाला. या स्वातंत्र्यवीचा प्रकाश प्रत्येक भारतीयाच्या जीवनात पडून त्याचे जीवन तेजोमय झाले पाहिजे, म्हणून भारतीय सार्वभीम गणराज्याची घटना तयार करण्याचे ठरले. आपण घटना समितीवर निवडून आलात आणि या मसूदा समिती अध्यक्षपदी विराजमान झालात. समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या त्रयींवर उभारलेल्या सामाजिक, राजकीय व आर्थिक न्याय्य हक्कांच्या राष्ट्रीय सनदेचा जन्म आपल्या नेतृत्वाखाली झाला. भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून आपणांस “कलियुगातील स्मृतिकार मनू” अशी सार्थ पदवी भारतीयांनी दिली. भारतीय राज्यघटना आपली स्मृती भारतवर्षात चिरकाल टिकविल अशी आम्हाला खात्री आहे. तसेच स्वतंत्र भारत सरकारचे विधिमंत्री असताना आपण हिंदू कोड बिलाच्या योगाने भारतीय स्त्री जातीच्या हक्कांचे जे समर्थन केले त्याला दुसरी तोड नाही. युगानुयुगे भारतीय स्त्री जात आपल्या सेवेबद्दल ऋणी राहील.

शिक्षणाशिवाय जीवन पवित्र व तेजस्वी होत नाही हे ओळखून बहुजन समाजाच्या जीवनात त्याचा प्रसार करण्याकरिता अनेक अडचणींना तोंड देऊन आपण मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था स्थापन केली व तिच्या विद्यमाने मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालय व औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय काढून दलित समाजाकरिता उच्च शिक्षणाचे महाद्वार मुक्त केले आहे. बाबासाहेब, आपले सारे जीवन बहुजन हिताय व बहुजन सुखाय खर्च झाले आहे. पददलितांच्या उन्नतीशिवाय राष्ट्र उन्नत होणार नाही या आपल्या मताविषयी दुमत होऊ शकणार नाही.

आजच्या अशांत युगात शांती व अहिंसेचेच तत्त्व जगाला आशेचा किरण दाखवून पथप्रदर्शन करील अशी प्रत्येकाची धारणा आहे. शांती व अहिंसेचा भारतात व भारताबाहेर अडीच हजार वर्षांपूर्वी प्रचार केलेल्या सम्राट अशोकाच्या अशोकचक्राला आपल्या राष्ट्रीय ध्वजावर स्थान प्राप्त झाले आहे. सम्राटने स्वीकारलेल्या बौद्ध धर्माची दीक्षा आपण घेत आहात. त्याच महान भारताच्या शांती व अहिंसा नीतीचा प्रकाश आपण सा-या विश्वात प्रसारित कराल अशी आम्हास खात्री आहे. परमेश्वर आपणास दीर्घायुष्य प्रदान करो !

नागपूर : विनित
दिनांक 15-10-1956 महापौर व सदस्य,
नागपूर महानगरपालिका,

मानपत्र वाचल्यानंतर महापौरांनी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून सत्कार केला. मानपत्राच्या उत्तरादाखल केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,

नागपूर कार्पोरेशनचे मेयर, कार्पोरेटर्स आणि उपस्थित नागरिकहो,
नागपूर शहराशी व या प्रांताशी माझा विशेष संबंध नाही. माझा राजकीय संबंधही तितकासा नाही. या प्रांताशी माझा संबंध एवढाच आहे की, येथे माझे काही लोक राहातात. या प्रांतासाठी मी विशेष असे काहीही केलेले नाही, म्युनिसीपालिटीचा मी काही सभासद नव्हतो. त्यामुळे म्युनिसीपल कारभाराबाबत तुम्हास उपदेश करू शकणार नाही. (हंशा) तुम्हास कोणत्या विषयावर दोन शब्द सांगावे याचा विचार मी करीत आहे. या प्रसंगी विचार करताना मला असे वाटते की, म्युनिसीपालिटीचा कारभार व देशाचा कारभार यात पुष्कळ साम्य आहे, म्हणून या प्रसंगी आपल्या देशाच्या कारभारासंबंधी मी तुम्हास दोन शब्द सांगू इच्छितो.

हिंदुस्थानात माझ्यासारखे विद्वान आहेत पण मला अभिनंदनपत्र भेट करून आपण माझा गौरव केला, ही आपली उदारता आहे. भारताची राज्यघटना अमलात येऊन पाच वर्षे झालीत, ही घटना चालते याचा प्रत्येकाने विचार करावयास पाहिजे, बाह्यात्कारी असे दिसेल की, आपली व इंग्लंडमधील राज्ययंत्रणा काही भाग सोडला, तर बहुतांशी सारखीच आहे. तिकडे प्रौढ मतदान पद्धतीने निवडणुका होतात, आपल्या देशातही तशाच निवडणुका होतात. त्या देशात पार्लमेंट आहे, आपल्या देशातही पार्लमेंट आहे. त्या देशातील पार्लमेंटमध्ये बहुमताने निर्णय घेतात. आपल्या देशातील पार्लमेंटमध्येही बहुमताने निर्णय घेतात. असे असले तरी त्या देशातील राज्यकारभारात एक विलक्षण फरक दिसून येतो. इंग्लंडमध्ये प्रजातंत्रात्मक पद्धती आहे. आणि आपल्या येथे डिक्टेटरशीपचा उदय झालेला दिसत आहे. आपल्या देशातील कारभारात दिसायला एक व वागायला दुसरे असा प्रकार चालला आहे. तुम्ही या गोष्टीबाबत आपल्या देशाची राज्यघटना कशी काम करते व ती कशी राबविली जाते याचा विचार करता की नाही मला माहीत नाही. लोकांनी आता राज्यकारभार बाबत व राज्यघटनेबाबत जागृत राहिले पाहिजे. भारताच्या नव्या संविधानाचा आद्यकर्ता मी आहे हे मी अभिमानाने सांगतो असे नाही पण निदान मी तरी तिचा आद्यकर्ता असल्यामुळे तसा नित्य विचार करीत असे आणि विचार करताना शेवटी या देशाचे होईल तरी काय असे भयानक चित्र माझ्या डोळ्यापुढे उभे राहते.

मला निवडणुकीची आता मोठी आवड नाही. राजकारणाचा उपयोग घेऊन मी पाहिला आहे. जातीपातीच्या भेदामुळे या देशातील राजकारण आता कॉंग्रेस राजवटीत असे बनले आहे की, अल्पसंख्य असलेल्या जमातींना जीवनासाठी तरणोपाय राहिलेला नाही. तरीपण मी काही राजकारण सोडणार नाही. जातीभेदामुळे अनेक वेळा अपयशच आले. पण झगडणार आहे. मी माझे राजकारण चालूच ठेवणार आहे. मी बॅट सोडून तंबूत जाणार नाही. (हंशा व टाळ्या)

मी तुम्हाला इंग्लंडमधील यंत्रणा व आपल्या देशातील यंत्रणा याबाबत सांगत होतो. इंग्लंड व आपल्यात मुख्य भेद असा की, आपल्याकडे मतदाराला उमेदवार निवडण्याचा हक्क दिसत नाही. तिकडे मतदारच उमेदवाराची निवड करतात. त्यांच्या मतदारसंघातील जे मतदार असतील त्यांना त्यांच्यामधील कोणता उमेदवार कसा आहे, त्याचे शिक्षण काय आहे, त्याचे चारित्र्य कसे आहे. त्याची समाजसेवेची वृत्ती कशी आहे याची चांगली कल्पना असते व त्यानुसार तेथील मतदारच आपला उमेदवार कोण असावा हे ठरवितात. आपल्या देशात याबाबतची त-हा काही निराळीच आहे. कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार उभा करावा यांचे स्वातंत्र्य अजूनही मतदारांना नाही. आज काँग्रेसची निवडणुकी बाबतची जी पद्धती चालू आहे त्यावरून तुम्हास हे दिसून येईल की, कोणत्या मतदारसंघात कोणास उभे करावे, हे सर्व दिल्ली काँग्रेस हायकमांड ठरविते. त्याची वास्तपुस्त मतदारसंघातील मतदारांना काहीच नसते. हायकमांडने उभा केलेला उमेदवार कसा आहे, त्याचे चारित्र्य काय, त्याने काही काळाबाजार, अफरातफर केली आहे काय, तो समाजाच्या कल्याणाची बाजू घेऊन पार्लमेंट असेंब्लीमध्ये झगडतो काय याच्याशी काँग्रेस हायकमांडने मतदारांना कोणतेच कर्तव्य ठेवलेले नाही. आम्ही सांगू त्याला तुम्ही मत दिलेच पाहिजे असा काँग्रेस हायकमांडचा दंडक आहे. काँग्रेसने एखादे गाढव उभे केले तरी त्याला तुम्ही मते देता. जर रस्त्यावरील खांबाला मते द्या असे सांगितले तरी काँग्रेसच्या हुकूमाप्रमाणे तुम्ही रस्त्यावरील खांबालासुद्धा मते द्याल. याला तुम्ही लोकशाही म्हणता ? यास लोकशाही कोण म्हणेल ? लोकशाहीवर हा शुद्ध घाला आहे. अशी पद्धत राष्ट्राला घातक आहे.

उमेदवार निवडण्याचा अधिकार त्या त्या मतदारगटाचा आहे. असे जर झाले नाही तर याला लोकशाही म्हणता येणार नाही. इंग्लंडमध्ये पक्षच नेत्याची आणि मंत्र्याची निवड करतो. आपल्याकडे मात्र नेता आपले सहकारी निवडण्याचे हक्क मागतो आणि ते राजरोस बजावतोही. ही उघड उघड हुकूमशाही आहे. त्यामुळेच आज काँग्रेस सत्ताधारी आहे. ज्या रितीने येथील कारभार चालतो व तुम्हीच कॉंग्रेसच्या हातात सुत्रे देता यावरून तुम्ही मूर्ख आहात. हे स्पष्टपणे तुम्हाला कोणीतरी सांगायलाच पाहिजे. (टाळ्या) हिंदुस्थान कोणीकडे जात आहे ?

सध्या काँग्रेसच्या राजकारणात स्त्रियांच्या सभासदांची संख्या वाढविण्यात येत आहे. स्त्रियांच्या या काँग्रेसी राजकारणाचा अर्थ काही समजत नाही. स्वधर्म सोडून बायकांनी राजकारणात हिंडावे यासारखी शरमेची गोष्ट नाही. महाराष्ट्रातील बायकांनी आता फक्त कासोटा सोडावयाचाच ठेवला आहे. काँग्रेसने 292 बायका लोकसभेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. जर बायका विधीमंडळात गेल्या तर पुरुषांनी काय करावे ? दिवसभर लोकसभेत राहिल्यानंतर जेव्हा फाईल्स बगलेत धरून बायका घरी येतील तर काय नवरे त्यांच्या टेबलावर भोजन ठेवतील ? या बायांनी दिवसभर पार्लमेंट असेंब्लीमध्ये जावयाचे आणि संध्याकाळी परत आल्यावर नव-याला विचारायचे.’ अहो मी पार्लमेंटमधून आले आहे. झाली आहे की नाही घरातील सर्व व्यवस्था ? या बाया पार्लमेंटमध्ये जायच्या आणि त्यांची मुलं कोणी सांभाळायची ? एक मूल रडत आहे. दुसऱ्याला शेंबूड आहे, तिसरे भलते ठिकाणी गेले आहे अशा मुलांची व्यवस्था मग ठेवणार कोण ? हे सर्व उलटे होत आहे. हा जगाचा उलटा कारभार आहे बरे तर पार्लमेंटमध्ये जाऊन या बाया करतात तरी काय ? त्याबाबत मला तरी सांगण्याची शरम वाटते. त्यांच्याबाबत सांगावे असा माझा विचार नव्हता. पण आता सांगतोच. (हंशा) त्यांच्या अंगची नीतीमत्ता साफसाफ निघून चालली आहे. माझ्याकडे काही पत्रे आलेली आहेत. त्या पत्रातील मजकूर तर पंतप्रधानाबाबतचा आहे. अशी पत्रे लिहिणारी बाई महाराष्ट्रीयन आहे. ही मोठ्या शरमेची गोष्ट आहे. तिने पत्रामध्ये तर नेहरूचा उल्लेख करून आमचे ‘ते’ व आमचे’ हे ‘ असे करतील नि तसे करतील अशाप्रकारे लिहिले आहे. मी कॅबिनेटमध्ये असताना मला बडोद्याच्या महाराष्ट्रीयन बाईची पत्रे येत. मला भाऊजी म्हणत असे. जवाहरलाल नेहरूंना ती पती मानत असावी. त्यात ती दोन-तीन पत्रे मी जाळून टाकली. एक पत्र ठेवले. मी राजीनामा दिल्यावर मला जी पार्टी नेहरूंनी दिली त्याप्रसंगी नेहरू दुसऱ्या लोकात हिंडत म्हणून बाजूला त्यांचा कोट धरून खेचला. मजजवळचे पत्र दाखविले तेव्हा ते म्हणाले, अशी फडतूस पत्रे मला हजारो येतात. त्याकडे दुर्लक्ष करावे. मालवणकरांना विचारा, हे काय उत्तर झाले ? बडोद्याची बाई तुझे नाव बदनाम करीत आहे हे मला समजावून द्यावयाचे होते. पण अशी अनेक पत्रे येतात असे उत्तर देऊन टाकले. याला काय चारित्र्याची चाड आहे म्हणावे ? या सर्व गोष्टींचा तुम्ही सर्वांनी पूर्ण विचार करावयास पाहिजे. या पार्लमेंटमध्ये जाणाऱ्या स्त्रिया अशा बहकलेल्या असतील तर त्यांना तेथे कॉंग्रेसने जाऊ देण्याचे काय कारण आहे ?

काँग्रेसच्या राजकारणातील आता दुसरे एक उदाहरण पहा. आमच्या मुंबई राज्यातील मोरारजी देसाई म्हणतात. मला बिनविरोध निवडा व मंत्री कोण घ्यावयाचे ते मी ठरवीन. एकदा निवडल्यावर माझ्या कारभारात कोणीही ढवळाढवळ करता कामा नये. पहा आता या प्रकारास काय म्हणावे ते तुम्ही उद्या समजा मोरारजींना निवडले आणि त्यांनी त्यांच्या मंत्रीमंडळात एखादे कुत्रे नेमले तरी देखील त्यामध्ये कोणी ढवळाढवळ करू नये, असे सांगण्याचा मतलब आहे. ज्या इंग्लंडची राज्यपद्धती आपल्या राज्यघटनेमध्ये स्वीकारण्यात आली आहे तेथे हे कार्य कसे केले जाते ? त्या ठिकाणी सत्तेवर असलेल्या पक्षातील पहिल्या रांगेत पार्लमेंटमध्ये बसलेले जे सभासद असतात त्या सर्वांच्या अनुमतीने या गोष्टी ठरविल्या जातात. एका माणसाला एकदा निवडले म्हणजे दुसरा कोणीही ढवळाढवळ करु नये असे तत्त्व तेथे कोणीही सांगत नाही व तसे सांगितले तर चालणारही नाही. पण आमच्या देशात मोरारजीभाई सारखे म्हणतात की, मी म्हणेन तेच झाले पाहिजे. उद्या मोरारजी मेले तर ती जागा त्यांच्याऐवजी तशीच राहील काय ? विधवेचा पुनर्विवाह होत नसे पण आता तसे नाही. जर्मनीमध्ये हिटलरची हुकूमशाही होती. त्याच्या एकट्याच्या तंत्राप्रमाणे त्याला राज्यकारभार हवा होता. त्यापेक्षा मोरारजी काही निराळे सांगत आहेत काय ? हा अजब प्रकार या देशातच व काँग्रेस पक्षामार्फतच चालू शकतो. त्याचे काय घोर परिणाम या देशाला भोगावे लागतील याची कल्पना पुष्कळांना नाही. काँग्रेसच्या चालू राजवटीतील सुवेझ कॅनलबाबतचे नेहरूंचे धोरण घ्या. इजिप्तचे राष्ट्रपती नासेरने त्या कॅनलचे राष्ट्रीयीकरण केले आहे. नेहरू त्यास पाठिंबा देऊन एकप्रकारे चंचलता प्रदर्शित करीत आहेत. याबाबतीत मुख्य प्रश्न आहे तो हा की, जगाचा व्यापार-उदिम ज्या कॅनलच्या जलमार्गाच्या रहदारीवर अवलंबून आहे तो कॅनल एकाच राष्ट्राच्या अखत्यारीखाली असला पाहिजे की आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली असला पाहिजे ? भारताचा फार मोठा व्यापार या कॅनलच्या मार्गाने होतो.

पंडित नेहरू म्हणतात, म्हणून सुवेझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण करा, असे सर्व लोक म्हणतात. पण नासेर यांनी भारताची जहाजे कालव्यातून नेणे बंद केले. तर विलास योजनेचे काय होईल ? याचा विचार करा. आज नासेर तुमचा दोस्त आहे. उद्या नासेरने कालवाबंदी केली तर काय होईल ?

या देशात भक्तियोग फार बोकाळलेला आहे. भारताची घटना तयार झाल्यानंतर यासंबंधात मी पार्लमेंटमध्ये शेवटचे भाषण दिले व त्यात याची मीमांसा केली होती. भक्तीला राजकारणात विभूतीपूजेचे रूप येते. त्यातून सर्वाधिकारशाही निर्माण होण्याचे भय असते. म्हणून आपण फार जागृत राहिले पाहिजे, असा मी त्यावेळी इशारा दिला होता. चमत्कारिक गोष्टींना फाजील महत्त्व दिले जाते. गटारातील पाणी पिणाऱ्यांना गटारातच सर्वत्र ब्रह्म दिसते. त्यालाच महासाधु म्हटले जाते. अशी पूर्वपरंपरा आमच्या देशात चालत आलेली आहे.

जमिनीचे तुकडे गोळा करतो. दगडधोंडे गोळा करतो. काय त्याचे नाव ? (श्रोत्यांतून आवाज, विनोबा भावे) होय. तोच तो विन्या, काय गोळा केले आहे त्याने ? नाकातून एकीकडे शेंबूड वाहात असता दुसरीकडे तो व्याख्याने देतो. देशाच्या राजकारणाशी त्याचा काय संबंध ? पार्लमेंट कशासाठी आहे ? त्याच्यासाठी पार्लमेंट का मोडून टाकीत नाही ? हे गृहस्थ ठिकठिकाणी हिंडून भूदानासाठी जमिनी गोळा करीत आहेत. एवढेच जर आहे तर लोक विनोबा भावे यांनाच पंतप्रधान का करीत नाही ? विनोबा भावे यांनी पंतप्रधान व्हावे व देशातील जमिनीचा प्रश्न सोडवावा, नाही तर उगीच हा चोंबडेपणा कशाला हवा ? हे ना घड कॉंग्रेस सरकारचे काम ना धड भावेचे काम असे होऊन बसले आहे.

या देशात बुवाबाजीचे फार मोठे खूळ आहे. एखाद्या माणसाने काही विचित्र केले तर तो साधुपुरुष बनतो. त्याने जर फाटके कपडे घातले.. गटारातील पाणी तो प्याला अगर लंगोटी लावली असे काही विचित्र केले की, या देशात त्या माणसाला साधुपुरुष मानतात. पण एखाद्याने स्वच्छ कपडे वापरले, स्वच्छ पाणी पाहिजे असे म्हटले की, मोठा मिजासखोर आहे असे म्हणतात. हा देश असा विक्षिप्त विचारसरणीत सापडला आहे. त्यासाठी आता सर्वांनी जागृत राहून हे प्रकार बंद केले पाहिजेत.

आपण नवीन घटना घेतली आहे. आपल्याला या नवीन पद्धतीचा अनुभव नाही. ती जर अत्यंत दक्षतेने राबविली नाही तर या देशाचा नाश होईल. केवळ पांढऱ्या टोप्यांनी काम चालणार नाही. सगळ्या राष्ट्राने बसून राजकारणाचा अभ्यास केला पाहिजे. एकट्या जवाहरलाल नेहरूलाच बुद्धी दिली आहे असेही नाही. जवाहरलालपेक्षा बुद्धिमान अनेक आहेत. मी पाच वर्षे कॅबिनेटमध्ये होतो. पाच वर्षाचा मला अनुभव आहे. आठ दिवसातून एकवेळ मी कॉंग्रेसच्या बैठकीला हजर राहात असे. जवाहरलाल चांगले तोलून पाहिले आहेत. त्याचे डोके केवळ पोकळ भोपळ्याप्रमाणे आहे. त्यापलिकडे काही नाही. जवाहरलालचे नाक सरळ आहे. रंग गोरागोमटा आहे. म्हणून त्यास महत्त्व येत असेल तर गोष्ट वेगळी. पण अशी व्यक्ती शारदा नाटकात म्हटल्याप्रमाणे पाहिजे मुलीला सुंदर नवरा या दृष्टीने उत्तम ठरेल. पण नेता बुद्धिमान पाहिजे, कणखर पाहिजे. तो देशाचे कार्य करणारा हवा असेल तर असे अनेक लोक सापडतील. पण तुम्हाला मात्र तोच पाहिजे ना ! विषयांतर झाले आणि काहींना ते अरुचकर वाटले तर त्यांनी क्षमा करावी. तुम्ही कदाचित मला मते देणार नाहीत. पण त्याची मला फिकीर नाही.

मी चांगले ओळखतो की, या देशाच्या जातीगत राजनीतीमध्ये आम्हाला कोणतेही स्थान नाही. राजकीय जीवन व्यतीत करता येत नाही, अशी स्थिती आहे. जीवनातील पाच वर्षे मी केंद्रिय मंत्रीमंडळात काढली व दहा वर्षे केंद्रीय विधी मंत्रीमंडळात सदस्य म्हणून राहिलेलो आहे. आता मला पाहाण्यासारखे काही बाकी राहिले नाही. पूर्ण समाधान झाले आहे. राष्ट्राची हानी होऊ नये यासाठी हे सारे मी करतो. आज काँग्रेस सत्ताधारी आहे. ती तशीच पुढे सत्ताधारी राहिली तर या देशाला आग लागल्याशिवाय राहाणार नाही.

शेवटी स्थायी समितीचे चेअरमन श्री. चौधरी यांनी आभार मानले. आभार मानताना श्री. चौधरी म्हणाले, “काँग्रेसच्या राजकारणात पडद्यामागे कशा कशा गोष्टी चालतात व काँग्रेस राज्य कसे हुकूमशाहीकडे चालले आहे. याची खात्री आम्हास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणावरून पटली आहे. त्यासाठी, आपण सर्वांनी जागरुक राहिले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देशकार्य करण्यास दीर्घायु लाभो अशी भी कार्पोरेशनच्या वतीने प्रार्थना करून आभार प्रदर्शन संपवितो.

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*

  Forgot Password