सर सॅम्युअल होअर यांचे उत्तर
सर सॅम्युअल होअर यांनी महात्मा गांधीना 13 एप्रिल 1932 रोजी त्यांच्या पत्रास पुढीलप्रमाणे उत्तर दिले आहे.
प्रिय मि. गांधी,
तुमच्या 11 मार्चच्या पत्राला उत्तर म्हणून मी हे पत्र लिहीत आहे. प्रथमच मला म्हटले पाहिजे की, अस्पृश्य वर्गाचा स्वतंत्र मतदारसंघ उत्पन्न करण्याच्या बाबतीत तुमच्या भावना किती उत्कट आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे. मला आता इतकेच म्हणता येईल की, त्या प्रश्नासंबंधी निर्णय देताना त्या प्रश्नाच्या सर्व बाजूंचा विचार करूनच निर्णय दिला जाईल. तुम्हाला माहीतच आहे की, लॉर्ड लोथियन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कमिटीने आपला दौरा अद्याप संपविला नाही व त्या कमिटीने केलेल्या शिफारशी आमच्या हाती येण्यास काही आठवडे लागतील. त्या शिफारशी आमच्या हाती आल्यानंतर त्या शिफारशींचा विचार आम्हाला काळजीपूर्वक करावा लागेल आणि त्याच वेळी तुम्ही व तुमच्यासारखीच ज्यांची मते आहेत त्यांच्या मताचा पूर्ण विचार केल्याशिवाय आम्ही निर्णय देणार नाही. माझी खात्री आहे की, तुम्ही जर माझ्या जागी असता तर जो मार्ग मी रेखाटला आहे त्याच मार्गाने तुम्हीही गेला असता. कमिटीच्या शिफारशीची वाट पाहणे तुम्हालाही जरूर वाटले असते. मग त्या शिफारशीचा पूर्ण विचार तुम्ही केला असता आणि शेवटी निश्चित निर्णय करण्यापूर्वी त्या वादविवादात जे दोन पक्ष आहेत त्यांच्या म्हणण्याचाही तुम्ही विचार केला असता, यापेक्षा मी काही अधिक लिहू शकत नाही. आणि यापेक्षा अधिक मला काही लिहिता येईल अशी तुमची अपेक्षा असेल असे मला वाटत नाही.
आपला
(सही) सॅम्युअल होअर
संदर्भ : डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 1, पान क्रमांक 322