Categories

Most Viewed

11 मार्च 1932 गांधीचे होअर यांना पत्र

गांधीचे होअर यांना पत्र

येरवड्याच्या तुरुंगातून तारीख 11 मार्च 1932 रोजी सर सॅम्युअल होअर यांना गांधींनी पुढील पत्र लिहिले.

प्रिय सर सॅम्युअल,

तुम्हाला आठवत असेलच की, अल्पसंख्यांकांच्या हक्काची मागणी गोलमेज परिषदेपुढे मांडण्यात आली. त्यावेळी केलेल्या भाषणाच्या शेवटी मी म्हटले होते की, अस्पृश्य वर्गांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याच्या योजनेला मी प्राण जाईपर्यंत विरोध करीन. हे शब्द मी वादाच्या भरात किंवा वक्तृत्वाच्या भरारीत बोललो नव्हतो. ते विधान मी गंभीरपणाने माझ्या विचाराचे निदर्शक म्हणूनच केले होते. ह्या विधानाची पूर्तता करण्याकरिता हिंदुस्थानात परत आल्यावर सामान्यपणे स्वतंत्र मतदारसंघाच्या पण विशेषतः अस्पृश्यांना ते देण्याच्या योजनेच्या विरुद्ध असे लोकमत तयार करण्याचा माझा इरादा होता. परंतु तसे घडून यावयाचे नव्हते! जी वर्तमानपत्रे वाचण्याची मला परवानगी आहे. त्यावरून मला असे दिसते की, अस्पृश्यांचे स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्याच्या बाबतीत ब्रिटिश सरकार लवकरच निर्णय जाहीर करणार आहे. प्रथम मला असे वाटत होते की, जर या निर्णयाने स्वतंत्र मतदारसंघ स्थापन केले गेले तर तो निर्णय जाहीर झाल्यानंतर मगच माझी शपथ पाळण्याकरिता कोणते उपाय योजावे हे ठरवावे. परंतु आता असे वाटते की, सरकारला आगाऊ कळविल्याखेरीज आपण आपली शपथ प्रत्यक्ष कृतीत आणणे ही गोष्ट न्याय्य होणार नाही. शिवाय, माझ्या विधानाबद्दल जे महत्व मला वाटते तितके इतरांना न वाटणे हेही साहजिकच होय.

   मी स्वतंत्र मतदारसंघास विरूद्ध का ?

अस्पृश्य वर्गाकरता स्वतंत्र मतदार संघ निर्माण करण्याच्या योजनेला माझा जो विरोध आहे तो तपशीलवार या ठिकाणी पुनः सांगण्याचे कारण नाही. मी एक अस्पृश्यच आहे असे स्वतःला समजतो. इतरांची गोष्ट व त्यांची गोष्ट अगदी वेगळी आहे. कायदे मंडळात त्यांचे प्रतिनिधी असावे याला मी विरुद्ध नाही. दुसऱ्या वर्गाकरिता मतदानाचा अधिकार कितीही संकुचित करण्यात आला तरी चालेल. परंतु शिक्षण, मालमत्ता वगैरे बाबतीतील जरूर अशा मत होण्याच्या अटी अस्पृश्यांना न लावता त्यांच्यापैकी प्रत्येक स्त्रीपुरुषाचे नाव मतदारांच्या यादीत समाविष्ट व्हावे असे माझे मत आहे. परंतु मतदारसंघ दिल्याने त्यांचे व केवळ राजकारणाचे दृष्टीने पाहता हिंदू समाज म्हणून जो काही आहे त्याचे फार नुकसान होणार आहे असे मला वाटते. स्वतंत्र मतदार संघामुळे त्यांचे किती नुकसान होणार आहे याची बरोबर समजूत पटण्याकरिता स्पृश्य हिंदू समाजामध्ये अस्पृश्य वर्ग कसा सामील आहे व तो त्या समाजावर किती अवलंबून आहे याची जाणीव असणे जरुरीचे आहे. हिंदू समाजाविषयी बोलावयाचे असल्यास मी असे म्हणेन की, स्वतंत्र मतदार संघामुळे त्या समाजाला जिवंतपणीच छिन्नविछिन्न केल्यासारखे होणार व त्यात फाटाफूट होणार !

माझ्या समजुतीने या दलित वर्गाचा प्रश्न हा प्रामुख्याने नैतिक व धार्मिक आहे. या प्रश्नाच्या नैतिक व धार्मिक महत्त्वापुढे राजकारणाच्यादृष्टीने त्याचे महत्त्व कवडी किंमतीचे ठरते.

   मी प्राणांतापर्यंत अन्नत्याग करणार

मी अगदी लहान असल्यापासून या वर्गाच्या स्थितीबद्दल किती काळजी करीत होतो व अनेक वेळा त्यांच्याकरिता मी प्राणार्पणही करावयास तयार झालो होतो ही गोष्ट तुमच्या लक्षात आली, तरच याबाबतीत माझ्या भावना कोणत्या प्रकारच्या आहेत याची तुम्हाला पारख होईल. या प्रकरणात ही गोष्ट मी गर्वाने सांगतो असे मात्र नव्हे कारण माझे असे मत आहे की, शतकेच्या शतके या अस्पृश्य वर्गांना ज्या अपमानाच्या दलित स्थितीत हिंदू समाजाने ठेवले आहे त्याची भरपाई हिंदू समाजाने कोणतेही प्रायश्चित्त यापुढे घेतले तरी होणार नाही.

परंतु स्वतंत्र मतदारसंघ निर्माण केल्याने ज्या अपमानाच्या मरणप्राय दुःस्थितीत आज ते आहेत ती सुधारत नाही व त्याचप्रमाणे हिंदू समाजाने त्यांच्या बाबतीत केलेल्या अपकाराची निष्कृतीही होत नाही असे मला वाटते, म्हणून अत्यंत नम्रतापूर्वक मला ब्रिटिश सरकारला कळवायचे आहे की, जर ब्रिटिश सरकारने अस्पृश्यांकरिता स्वतंत्र मतदार संघ निर्माण केले तर मी प्राण जाईपर्यंत अन्नत्याग करीन!

मी तुरुंगात कैदी असताना अशा तऱ्हेची गोष्ट करू लागलो तर सरकारला एका मोठ्या घोटाळ्यात पाडून त्यांच्या कारभारात अडचण उपस्थित करणे होय याची मला जाणीव आहे व त्याबद्दल मला दुःखही होते. शिवाय मी अन्नत्याग करू लागलो तर राजकारणाच्या क्षेत्रात जे मला उच्च स्थान आहे ते लक्षात घेता मी असल्या अन्नत्यागाच्या गोष्टी करणे म्हणजे ही एक माझी वेडी लहर आहे इतके तरी कित्येकांना वाटल्याशिवाय राहणार नाही व असे करणे हे अत्यंत अनुचित आहे असेही ते म्हणतील. मी अन्नत्याग करण्याचे जे ठरविले आहे ही एक काम करण्याची माझी पद्धत आहे. एवढेच तुम्हाला माझ्यातर्फे म्हणता येईल. मी मोठा समंजस मनुष्य आहे. अशी जी काही माझी ख्याती असेल ती मी गमावून बसलो तरी हरकत नाही. पण मला माझ्या सद्सद्विवेक बुद्धीची आज्ञा मोडता येत नाही. आता जी माझी दृष्टी आहे त्या दृष्टीने पहाता मला तुरुंगातून सोडले तरी माझ्या अन्नत्यागाची शपथ मोडता येणार नाही. मला अशी आशा आहे की, अस्पृश्य वर्गाकरिता स्वतंत्र मतदार संघ निर्माण करण्याचा सरकारचा काही निश्चय आहे असे नसल्यामुळे तसे संघ करण्यात येणार नाहीत व मला वाटणारी भीती पोकळ ठरेल.

तुमच्याशी हा जो पत्रव्यवहार मी चालू केला आहे त्याबाबतीत माझ्यापुरता तरी मी अत्यंत गुप्तपणा ठेवला आहे, हे मी सांगणे नकोच. सरदार वल्लभभाई व श्री महादेव देसाई हे मजबरोबर राहाण्याकरिता नुकतेच आले आहेत. त्यांना मात्र या पत्रव्यवहाराची माहिती आहे. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे व त्या वेळीच ह्या पत्रांचा मी उपयोग करीन.

आपला (सही) एम. के. गांधी

संदर्भ : डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 1, पान क्रमांक 319

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*

  Forgot Password