Categories

Most Viewed

05 सप्टेंबर 1932 भाषण

आजचा आमचा लढा राजकीय सत्तेकरिता आहे.

मुंबईच्या वडाळा, समस्त मंडळीच्या आग्रही विनंतीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वडाळा येथे सोमवार दिनांक 5 सप्टेंबर 1932 रोजी रात्रौ 9 वाजता भरलेल्या सभेमध्ये हजर राहिले. सभा वाय. एम. सी. ए. च्या भव्य पटांगणात घेतली होती. पावसाची जरी मेहरनजर झाली होती तरी स्त्रीपुरुषांचा समुदाय तीन हजार जमला होता. बरोबर नऊ वाजता बाबासाहेब सभेच्या जागी हजर झाले. फाटकापाशी तानाजी बालवीरांनी त्यांना सलामी दिली. या सभेची सर्व व्यवस्था वडाळा येथील गेंदाजी गायकवाड यांच्या स्काऊटनी केली.

पहिल्या प्रथम बालवीरांचे गायन झाल्यावर श्री. मोगल मारुती गायकवाड यांनी स्थानिक मंडळींच्यातर्फे बाबासाहेबांना चार शब्द सांगण्यास विनंती केली. डॉ. आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,

मला गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात भाग घ्यावयाचा आहे असे कळल्यावर थोडीशी खंत वाटली होती व मी गणपतीच्या मूर्तीबद्दल काही बोलणार होतो. मला येथे कोठेही गणपतीची मूर्ती दिसली नाही म्हणून मी त्याबद्दल आता काही बोलत नाही. या हिंदू धर्माने आपले जितके अकल्याण केले आहे तितके अकल्याण कोणत्याच साथीच्या रोगानेसुद्धा केले नाही. मी तुम्हाला सांगत नाही की, तुम्ही या हिंदू धर्माला चिकटून राहा. आज ज्या हिंदूधर्मात आम्ही दोन हजार वर्षे राहिलो. ज्यांची उभारणी केली व ज्यांचे रक्षण करण्याकरिता आमची संबंध आयुष्ये गेली त्याच हिंदू धर्मात आमची किंमत काडीमोल आहे. काही दिवसापूर्वी मला काशीच्या ब्राह्मणांची पत्रे आली आहेत की, आम्ही तुमच्यास्तव काशी विश्वेश्वराची देवालये उघडी करितो, परंतु आम्हाला दगडाच्या देवालयांची मुळीच जरूरी नाही. आम्ही हा जो संग्राम चालविलेला आहे तो केवळ देवळे खुली व्हावीत म्हणून नव्हे किंवा शेवाळ साठलेल्या तळ्याचे पाणी पिण्याकरिता नव्हे. आम्हाला ब्राह्मणांच्या घरात जावयाचे नाही. आम्हाला सहभोजन नको. आम्हा अस्पृश्यांना ब्राह्मणांच्या मुली नकोत, आमच्या समाजात का काही मुलीच नाही म्हणून आम्ही ब्राह्मणांच्या मुलींची अपेक्षा करावी, की आमच्या बायांना संतती होत नाही की, त्यांच्या पोटच्या पोरांना इंद्रिये नसतात. तसे काही नाही. तर आजचा आमचा हा लढा फक्त राजकीय सत्तेकरिता आहे. हिंदूंजवळ जर आम्ही चिकटून राहिलो तर आम्हाला नरकात खितपत पडावे लागते व यामुळे मी या माझ्या सारख्यालासुद्धा या हिंदू धर्माचा अगदी वीट आला आहे. एवढेच नव्हे तर धर्मांतरसुद्धा करावेसे वाटते. परंतु मी तसे का करीत नाही. मी या नरकातच का राहतो म्हणाल तर मला तुम्हाला सर्वांना सोडून जाववतच नाही. मी कोठेही गेलो तरी मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर राहू शकेन. परंतु मी तुमच्यामध्येच का राहतो याचे कारण मला तुम्हाला सोडून जाववत नाही एवढेच आहे आणि दुसरे मी जे काम हाती घेतलेले आहे ते मला शेवटास न्यावयाचे आहे. मी तुम्हाला इतकेच सांगतो की, तुम्ही या धर्माच्या भानगडीत पडू नका. मागे दोन हजार वर्षे हिंदुनी राज्यकारभार केला त्यानंतर आता 150 वर्षे इंग्रजांनी चालविला, परंतु आता यापुढे जे स्वराज्य मिळणार आहे त्यात एकटे हिंदूच राज्यकारभार चालविणार नसून तोच राज्यकारभार तुम्हा अस्पृश्यांच्या व हिंदुच्या संमतीने चालणार आहे.

प्रत्येक समाजामध्ये काहीना काहीतरी सामर्थ्य असते. काहींच्या हातात आर्थिक सामर्थ्य असते. पारशी समाज पाहा. तो या ठिकाणी बसलेल्या लोकांपेक्षा काही जास्त नाही. परंतु त्याच्यात आर्थिक सामर्थ्य आहे. आपल्या समाजातील माणसे तर त्यांच्याकडे मजुरीची कामे करतात. ब्राह्मण समाजामध्ये जरी आर्थिक सामर्थ्य नाही कारण सर्वच ब्राह्मण काही श्रीमंत आहेत तसे नाही. परंतु त्यांच्या हातात धार्मिक सत्ता आहे. समाजाच्या हाती राजकीय सत्ता असणे फार इष्ट आहे व अशा प्रकारची राजकीय सत्ता आपल्यासाठी मिळविण्याकरिताच मी राऊंड टेबल परिषदेला गेलो होतो व त्या जाण्याचा फायदाही आपणास मिळाला आहे. ते मी थोडक्यात सांगतो.

मी राऊंड टेबल परिषदेला जाऊन अस्पृश्यांकरिता 10 जागा मिळविल्या. माझ्याविरुद्ध जे टीका करतात ते म्हणतात की, डॉ. आंबेडकरांनी राऊंड टेबल परिषदेस जाऊन काय मिळविले ? परंतु तीच माणसे जर आता ह्या ठिकाणी हजर असती तर मी त्यांची पक्की खात्रीच करून दिली असती की. जे काही मी मिळविलेले आहे ते दुसऱ्या इतर कोणत्याच समाजास मिळालेले. नाही. एखाद्या कोंबड्यापुढे जर आपण मोती टाकले तर त्यास त्या मोत्याची काही एक किंमत न कळता ते मोती त्याला जोंधळ्याच्या एका दाण्यापेक्षा हलके वाटले असते.

या दहा जागा मिळाल्यामुळे आपल्या समाजाच्या हाती बरीच सत्ता आलेली आहे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे आता जे स्वराज्य मिळणार आहे ते स्वराज्य तुम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी चालवितील. ते स्वराज्य तुमच्या संमतीने. तुमच्या सल्ल्याने, तुमच्या मतानेच चालेल. त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावरच आहे. आपणास आता जे काही मिळाले आहे ते माझ्या मताप्रमाणे अगदी पुरेसेच आहे. आपल्याकरिता 10 जागा अगदी राखीव आहेत. त्याशिवाय, अहमदाबादसारख्या ठिकाणी जेथे 80 किंवा 90 टक्के मजुराची वस्ती आहे तीतून 2-3 जागा अस्पृश्यांना मिळतील. शिवाय मुंबईसारख्या ठिकाणी जेथे अस्पृश्यांची वस्ती आहे तेथून 1-2 जागा आपल्याला मिळविता येतील, शिवाय नाशिक जिल्हा, पुणे तेथून स्वतंत्र मतदार संघाच्या योगाने आपण निवडून दिलेले शेकडा 90 टक्के आपल्या मुठीत राहतील.

मुंबई कौन्सिलमध्ये एकंदर 200 जागा आहेत त्यापैकी 97 हिंदूंकरिता. 63 मुसलमानाकरिता व 10 अस्पृश्याकरिता व असे असल्याकारणाने कोणत्याही एकाच बाजूस जास्त सत्ता मिळणे अशक्य आहे. कारण कौन्सिलमध्ये जे काम चालणार ते बहुमतानेच चालणार आहे म्हणून कोणत्याही एका पक्षाचे बहुमत होण्यास कमीतकमी 115 तरी मते एका बाजूला पाहिजेत. म्हणून नुसत्या हिंदुच्या 97 लोकांना काही बहुमत करिता येणे शक्य नाही. त्याचप्रमाणे मुसलमानांनाही 63 मतांवर राज्यसत्ता गाजविता येणार नाही. बहुमत होण्याला त्यांना दोघांनाही अस्पृश्यांची मते मिळाली पाहिजेत. आपल्या हातात अशा रीतीने फार मोठी सत्ता मिळाली आहे. कारण ज्या बाजूला आपण आपली मते देऊ त्या बाजूचे पारडे खालीच जाईल व विरुद्ध पारडे वरतीच लटकत राहील. इतकी सत्ता जरी आपल्या हाती आलेली आहे तरी पण मला एक भयंकर शंका उत्पन्न झाली आहे व ती म्हणजे तुम्हामध्ये मतदानाची अक्कल कोठपर्यंत आहे ? आज आपणास ज्या 10 जागा मिळाल्या आहेत त्या जागांवर आपल्या पैकी जे लोक जातील त्यांना वाटेल ते कार्य साधता येईल. त्यांना इकडूनची मुंबई तिकडे करिता येईल. पण त्या जागांचा योग्य उपयोग मात्र झाला पाहिजे. सर्व अस्पृश्यांचा उद्धार या अवघ्या 10 माणसांना करता येईल. इतके दिवस एखादे साधे कार्य करावयाचे म्हणजे कलेक्टराकडे किंवा मामलेदाराकडे पुष्कळशा खेपा घालाव्या लागत होत्या व अशाच दुसऱ्या वरिष्ठ अधिका-यांची दाढी धरावी लागत होती. एवढेच कशाला परंतु एखादे काम जरी करावयाचे असल्यास एखाद्या 7 रुपये मिळविणान्या यत्किंचित शिपुर्ड्याला माझ्यासारख्या इसमास सुद्धा हवालदार साहेब म्हणून हाक मारावी लागत होती. पण आता यापुढे आपणावर असा प्रसंग कधीच यावयाचा नाही. तर आता ह्यापुढे सर्व गोष्टी कायद्याने होतील. आपणापैकी काही अस्पृश्यच कलेक्टर होतील. शेकडा 20 मामलेदार, शेकडा 20 कुळकर्णी व शेकडा 20 शिपाई आपले अस्पृश्य होतील व असे करण्याकरिता आता आपणास कोणाचीही दाढी धरावी लागणार नाही. परंतु हे सर्व आपल्या लोकांचे शील काय प्रकारचे बनेल यावर अवलंबून राहील. कारण आपणातील काही जण दोन पैशाच्या फुटाण्याला किंवा एक दमडीच्या पोह्याला भुलून आपली मते बदलतात हे आमच्या अनुभवाला आले आहे. ज्या पुढान्यांनी गेल्या मार्च महिन्यात अस्पृश्यांच्या सभा भरवून आणि अध्यक्ष होऊन अस्पृश्याकरिता स्वतंत्र मतदार संघ मागितला त्याच अध्यक्षांनी विरुद्ध पार्टीच्या लालुचीला भुलून आपली मते बदलून टाकली व मतदार कमिटीपुढे अस्पृश्याकरिता संयुक्त मतदार संघ मागितला. अशातऱ्हेने जर पुढारी आपणाला विकून घेऊ लागला तर आपल्या हाती आलेली सत्ता काय उपयोगाची ? काही दिवसांपूर्वी माझ्याबरोबर काम करणारा सातारा जिल्ह्यातील एक घोलप नावाचा कालचा पोरगा असे म्हणतो की, शिवतरकर मास्तर चांभार असून त्यांना साहेबांनी जवळ धरले म्हणून माझ्याशी असहकार्य केले. परंतु हा साताऱ्याचा महार ज्याला शिवतरकर चांभार म्हणून त्याची घाण येते, तोच देवरुखकरासारख्या चांभाराच्या आश्रयाखाली वर्तमानपत्रे काढून मला शिव्या देतो. महार समाजाची वाटेल तशी नालस्ती करून देवरूखकरांनी आमच्या समाजाची अब्रु चव्हाट्यावर आणिली आहे. त्याच देवरूखकरांच्या आश्रयाखाली काम करावयास या लांबनाक्या महारास काहीसुद्धा कशी लाज वाटत नाही ? इतर समाजातील माणसे नेहमी शिव्या देतात तर आपणापैकीच एका महाराने शिव्या दिल्या तर त्याबद्दल मला काहीच वाटत नाही. परंतु मला इतकीच शंका येते की, तुम्ही आपल्याला मिळालेल्या हक्काचा योग्य उपयोग कराल की नाही ! मी जी एवढी चळवळ चालविली आहे ती काही तरी तत्त्वाला धरून चालविली आहे. आपल्या पुढा-यांची ही अशी नीतिमत्ता पाहून मला खेद होतो. मला तुम्हाला एवढीच विनंती करावयाची आहे की, तुम्ही स्वाभिमानी व्हा. आपला पुढारी कोण हे ठरवा व तो सांगेल त्याप्रमाणे वागा. आपली मतें निष्कारण विकू नका, नाहीतर कोणी येऊन एक दोन रुपये देऊन तो तुमची मते घेईल, मतदानाबद्दलसुद्धा आपणास पुष्कळशा सवलती मिळाल्या आहेत. इतक्या सवलती दुसऱ्या कोणत्याच समाजाला दिल्या नाहीत. इतर समाजातील इसमांना मत देण्याचा अधिकार प्राप्त होण्याकरिता कमीतकमी मराठी चौथी इयत्तेपर्यंत त्याचे शिक्षण पाहिजे, परंतु अशी स्थिती तुमची नाही. तुम्हाला फक्त आपली सही मात्र करता आली पाहिजे, तुम्हाला नुसत्या रामापांड्या एवढी सही करता आली की तुमचा मत देण्याचा अधिकार प्राप्त झाला. ही सवलत इतर दुसऱ्या कोणत्याच समाजाला मिळालेली नाही. फक्त अस्पृश्यांना आहे. म्हणून म्हणतो तुम्ही प्रत्येकाने रात्रीच्या शाळेत जाऊन सही पुरते तरी शिक्षण घेणे आता फार जरूरीचे झाले आहे व असे केल्याने तुमची नावे रजिस्टर होतील.

सदर भाषण जनता वृत्तपत्रात दिनांक 10 सप्टेंबर 1932 रोजी प्रसिद्ध झाले.

संदर्भ – डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 1, पान क्रमांक 303

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password