Categories

Most Viewed

18 ऑगस्ट 1932 गांधीचे मुख्य प्रधान यांना पत्र

जातिविषयक प्रश्नाचा निर्णय हा निवाडा जाहीर होताच त्या विरोधात गांधीजींनी ताबडतोब आमरण उपोषण करण्याचे जाहीर केले आणि आपल्या उपोषणाचा निर्णय मुख्य प्रधान जे. रॅम्से मॅक्डोनाल्ड यांना पत्राद्वारे कळविला.

म. गांधींचे मुख्य प्रधानांना पत्र

येरवडा सेंट्रल प्रिझन,
तारीख 18 ऑगस्ट 1932

प्रिय मित्र यास,

अस्पृश्य वर्गाच्या प्रतिनिधीत्वासंबंधी मी सर सॅम्युअल होअर यांना तारीख 11 मार्च 1932 रोजी जे पत्र पाठविले, ते त्यांनी तुमच्या व मंत्रिमंडळाच्या अवलोकनात आणले असेल याबद्दल मुळीच संशय नाही. ते पत्र या पत्राचा भाग समजूनच वाचावे.

अल्पसंख्यांकांच्या प्रतिनिधीत्वासंबंधी ब्रिटिश सरकारने दिलेला निर्णय मी वाचला आणि त्याचा विचार करण्याचे तहकूब केले, मी सर होअर यांना जे पत्र लिहिले आणि तारीख 13 नोव्हेंबर 1931 रोजी सेंट जेम्स राजवाड्यामध्ये गोलमेज परिषदेच्या अल्पसंख्य मंडळीच्या बैठकीत जे धोरण मी जाहीर केले, त्याला अनुसरून पाहाता मला तुमच्या निर्णयाला प्राणांतापर्यंत विरोध केला पाहिजे. तसे करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो हा की, प्रायोपवेशनाने प्राणत्याग करावयाचा. मीठ किंवा सोडा घेऊन किंवा न घेऊन केवळ जलप्राशन करून उपोषण करावयाचे आणि मरण स्वीकारावयाचे असा माझा निश्चय मी जाहीर करीत आहे. या प्रायोपवेशनाच्या काळात ब्रिटिश सरकारने स्वतःच्या प्रेरणेमुळे किंवा लोकमताच्या दडपणामुळे आपल्या निर्णयाचा फेरविचार केला आणि त्यांनी आपली जातवार मतदारसंघाची योजना मागे घेतली, तर माझा उपवास थांबेल. अस्पृश्यांचे प्रतिनिधी सार्वत्रिक मतदारसंघातून निवडून यावेत आणि सर्वांना समान अधिकार असावा. मग त्यांचे क्षेत्र कितीही व्यापक होवो. यारीतीने जातिनिर्णय बदलण्यात आला नाही, तर सर्वसामान्य परिस्थितीत तारीख 20 सप्टेंबर रोजी दुपारपासून माझे प्रायोपवेशन सुरू होईल.

हे माझे पत्र तुम्हाला तारेने पाठविण्यात यावे असे मी येथील अधिकाऱ्यांना कळवीत आहे. म्हणजे त्यायोगे तुम्हाला बराच काळ आधी सूचना मिळाल्यासारखे होईल हे पत्र टपालाने अगदी सावकाशीने आपल्या हाती पडले तरी मी तुम्हाला पुरेसा वेळ देतो आहेच. हे पत्र आणि होअर यांना मी पाठविलेले उपर्युक्त, ही दोन्हीही पत्रे शक्य तितक्या लौकर प्रसिद्ध करावीत, असे माझे म्हणणे आहे. तुरुंगातील नियम निष्ठेने पाळून मी या दोनही पत्रांची माहिती सरदार वल्लभभाई पटेल आणि श्री महादेव देसाई यांजशिवाय दुसन्या कोणालाही दिलेली नाही. पण तुम्ही सवड दिली तर माझी इच्छा अशी आहे की, त्या पत्रांचा परिणाम जनतेवर व्हावा आणि म्हणूनच त्यांच्या प्रसिद्धीची मागणी मी केलेली आहे.

मी जो प्रायोपवेशनाचा निर्धार केला त्याबद्दल मला दुःख होते. पण एक धार्मिक प्रवृत्तीचा माणूस यादृष्टीने – आणि तसा मी आहे असे मी समजतो. मला दुसरा मार्गच मोकळा नाही. होअर यांच्या पत्रात मी म्हटलेच आहे की, सरकारने आपली कुचंबणा टाळण्यासाठी मला बंधमुक्त करण्याचे ठरविले, तरी माझे प्रायोपवेशन चालूच राहील. कारण या जातिनिर्णयाला प्रतिकार दुसऱ्या कोणत्या साधनाने करता येईल अशी मला आशा वाटत नाही आणि सन्मानपूर्वक झाली तरच माझी मुक्तता मला हवी आहे. इतर मार्गांनी ती घडवून आणण्याची मला काडीमात्र इच्छा नाही.

अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देणे हे त्यांना व हिंदू धर्माला घातक आहे ही माझी समजूत सर्वस्वी चुकीची असू शकेल आणि माझे मत विकृती पावलेले असेल. खरोखरच जर तशी वस्तुस्थिती असेल, तर माझ्या जीविताचे तत्त्वज्ञान म्हणून जे आहे त्यातील इतर बाबतीतही मी बरोबर नाही असे ठरेल. तसे झाल्यास अन्नत्यागाने प्राणत्याग करणे हे माझ्या चुकीचे प्रायश्चित्त होईल आणि त्याबरोबरच जे असंख्य स्त्रीपुरुष आज एखाद्या अर्भकाप्रमाणे माझ्या चातुर्यावर विश्वास ठेवीत आहेत त्यांच्यावरील एक ओझेच उचलल्यासारखे होईल. पण जर माझे मन रास्त असेल आणि तसे ते आहे याबद्दल मला तिळमात्र शंका वाटत नाही. तर मी योजलेले कृत्य हे माझ्या जीवनमार्गाचे सार्थक करणारेच होईल. पाव शतकाहून अधिक काळ मी त्याच जीवनमार्गाने चालत आलो आहे. आणि त्यात मी भरपूर यश मिळविले नाही असेही नाही.

आपला विश्वस्त मित्र
(सही) एम. के. गांधी

संदर्भ : डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 1, पान क्रमांक 334

 • Abhishek Hire
  August 18, 2021 at 2:16 pm

  Nice information

  • Suresh Hire
   August 18, 2021 at 2:19 pm

   Thanks.

 • Shweta Hire
  August 18, 2021 at 3:06 pm

  Nice

  • Suresh Hire
   August 24, 2021 at 11:51 pm

   Thanks

Leave Your Comment

Your email address will not be published.*

Forgot Password