अपायिम्ह वग्ग, किम्पक्व जातक (कामभोगाचे सेवन करू नये)
शास्ता जेतवनात विहरत असतांना एका आसक्त चित्त भिक्खु संबंधाने ही गोष्ट सांगितलेली होती.
बुध्द शासनात अत्यंत श्रध्दा बसल्याने श्रावस्तीच्या एका कुलपुत्राने प्रव्रज्या ग्रहण केली. एके दिवशी श्रावस्ती येथे भिक्षाटन करतांना तो एका अलंकारिक स्त्रीला पाहून तिच्यावर आसक्त झाला. त्याची ही मनःस्थिती लक्षात घेऊन त्याच्या आचार्य उपाध्यायांनी त्याला बुध्दांकडे नेले.
बुध्दांनी विचारले, “भिक्खु, काय तू खरोखरच त्या स्त्रीवर आसक्त झाला आहेस काय?” “होय, भन्ते हे खरे आहे. मी त्या स्त्रीवर अत्यंत मोहित झालेलो आहे.” भगवान म्हणाले, “भिक्खु, हे पांच काम गुण (भोग) भोगतांना सुंदर प्रतित होतात. परंतु हे भोगणे माणसाला निरय आदि मध्ये उत्पत्तीला कारणीभूत होते आणि हे किम्पकफलाचा उपभोग घेण्यासारखेच आहे. किम्पकफल वर्ण, गंध तथा रसाने युक्त असते. मात्र ते खाल्ल्याने आतड्याचे तुकडे तुकडे करून मनुष्याचा जीव घेते. पहिले प्रथम बरेचशे लोक त्या फळातील दोष न जाणल्याने त्याच्या वर्ण, गंध, रसाला भुलून त्या फळाला खातात व प्राण गमावून बसतात. असे सांगून शास्तांनी पूर्व जन्माची कथा कथन केली.
पूर्वीच्या काळी वाराणशी येथे ब्रम्हदत्त राजा राज्य करीत होता. त्यावेळी बोधिसत्व व्यापार करण्याच्या निमित्ताने पांचशे गाड्यांमध्ये माल भरून पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असतांना एका वनप्रांतात शिरला. त्याने आपल्या सर्व सहकाऱ्यांना एकत्र करून सुचना केली की, “ह्या वनप्रदेशात विष वृक्ष आहेत. मला विचारल्या शिवाय कोणत्याही वृक्षाचे फळ खाऊ नये. कारण काही फळे आकार, वर्ण, गंध, रस इ. दृष्टीने आंब्यासारखीच आहेत, मात्र ती विषारी आहेत.”
सर्व सहकाऱ्यांनी वनात प्रवेश करून एका किम्पक्क वृक्षाला पाहिले. त्याच्या शाखा, पाने, तथा फळे आकाराने, वर्णाने, रसाने आणि गंधानेही आंब्यासारख्याच होत्या. त्यांच्यातील काही जणांनी वर्ण, गंध, रसाने आकृष्ट होऊन व आंबे समजून घाईघाईने ती फळे खाल्ली. मात्र काही जणांनी आपल्या प्रमुखाला (बोधिसत्वाला) विचारल्याशिवाय कोणतीही फळे खायची नाहीत. ही बोधिसत्वाची सुचना लक्षात घेऊन ती फळे खाण्याचे टाळले व बोधिसत्वाला (प्रमुखाला) विचारल्यावरच खाऊ असे ठरवले. बोधिसत्व त्या झाडाजवळ पोहचला व ज्यांनी फळे हातात घेवून त्याची वाट पाहण्याचे ठरवले होते. त्यांना ती फळे फेकून देण्यास सांगितली व ज्यांनी आंबे समजून फळे खाल्ली होती त्यांना वनौषधी देऊन उलटी करावयास लावले. त्यांच्यापैकी काहीजण निरोगी झाले परंतु ज्यांनी खूप अगोदर ते खाल्ले होते त्यांना विषबाधा होऊन ते मरण पावले.
बोधिसत्व व्यापारासाठी सकुशल आपल्या इच्छित स्थळी सहकाऱ्यांसह पोहचला व बराचसा कमावून आपल्या श्रावस्तीला परत आला. दान आदि पुण्य करीत आयुपर्यंत जगला व कम्मानुसार परलोकवासी झाला. शास्ताने ही कथा अभिसम्बुध्द अवस्थेत कथन करून पुढील गाथा म्हटली –
गाथा : आयतिदोसं नाञ्ञायं, यो कामे पतिसेवति I
विपाकन्ते हनन्ति नं, किम्पक्कमिव भक्खितन्ति II
काव्यार्थ: आसक्त कामभोगाने, परिणाम भावी न जाणे ।
पकता फळ कामभोगाचे, वाटे व्यर्थ हे जिणे II
सेवन कामभोगाचे ठरे, जसे किम्पक्व फळ (माणसा) मारे II
ज्याचा अर्थ आहे जो व्यक्ती कामभोगात आसक्त होऊन भविष्यात होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार न करता कामभोगांचे सेवन करतो, त्या मनुष्याला त्याचे कामभोग, फळ देतांना त्याचप्रकारे मारतात, ज्याप्रमाणे किम्पक्क फळांनी खाणाऱ्यांना मारले.
कामभोग भोगत असतांना ते अत्यंत गोड वाटत असतात. मात्र कामभोगाचे फळ पिकल्यावर त्याचे दुष्परिणाम माणसाचा घात करतात.
अशाप्रकारे धम्मोपदेश करून भगवंतांनी चार आर्यसत्यांना प्रकाशित केले. ते ऐकून तो आसक्त भिक्खु श्रोतापत्ति फलात प्रतिष्ठित झाला. शेष परिषदेत सुध्दा काहीजण श्रोतापन्न झाले. काही सकदागामी तर काही अनागामी झाले व काहीजण अर्हत झाले. शास्तांनी जातकाची फोड करून सांगितले की, त्यावेळचे सहकारी आताची बुध्द परिषद होती व व्यापाऱ्यांचा पुढारी तर मीच होतो.
शब्दार्थ : आयतिदोसं नाञ्ञायाति – भविष्यातील परिणाम न जाणून; यो कामे पतिसेवतीति – जो व्यक्ती वस्तुकाम तथा क्लेश कामांचे सेवन करतो ; विपाकंन्ते हनन्तिनंति- ते कामभोग त्या जनांना आपले विपाक फळ देतांना अर्थात शेवटी निरय इत्यादित उप्तत्ति होऊन नाना प्रकारचे दुःख भोगायला लावतात कशाप्रकारे ? ; किम्पक्कमिवं भक्खितान्ति- ज्याप्रकारे खातांना वर्ण, रस, गंधाला भूलून रूचिकर किम्पक्क फळ, भविष्यातील दुष्परिणामांना न बघता खाल्ले तर शेवटी ते फळ आपला जीव घेते. त्याचप्रमाणे, कामभोग भोगतांना जरी ते रूचकर लागत असले तरी विपाक (परिणाम) देतांना ते मात्र नाशास (दुःखास) कारणीभूत होते.
बोधिसत्वाच्या जातक कथा खंड 2
आधार अनुवाद : भदन्त आनंद कौसल्यायन
भावानुवाद : डी एल कांबळे
Rajendra
August 20, 2021 at 6:28 amखूप छान
Suresh Hire
August 24, 2021 at 11:50 pmधन्यवाद.
Sunita
November 1, 2021 at 5:33 pmNamobuddhay Jaibhim, best wishes and regards …khup chhan