Categories

Most Viewed

अत्थस्सद्वार जातक (उन्नतीचे प्रमुख द्वार)

ही कथा शास्ताने जेतवन विहारात विहरत असतांना एका अर्थकुशल पुत्राला संबोधून सांगितलेली आहे.

श्रावस्तीच्या एका वैभवशाली श्रेष्ठीचा सात वर्षांचा पुत्र अत्यंत प्रज्ञावान आणि अर्थकुशल होता. त्याने एक दिवस आपल्या पित्याला अर्थद्वाराबद्दल प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचे उत्तर पित्याला माहित नव्हते. पित्याने विचार केला की, हा प्रश्न अत्यंत सुक्ष्म आहे. आणि सम्यक् सम्बुध्दाशिवाय याचे उत्तर वरती भवाग्रापासून तर खाली अविची नरकापर्यंतच्या लोकांत कोणीही ह्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार नाही. म्हणून पुत्राला घेऊन पिता बऱ्याचशा माळा, गंध, विलेपन बरोबर घेऊन जेतवनात जाऊन बुध्दांची पुजा केली व प्रणाम करून एका बाजूला बसला व भगवंतांना म्हणाला, “भगवान, हा बालक बुध्दीमान आहे, अर्थ कुशल आहे. याने मला अर्थद्वाराबद्दल प्रश्न विचारला आहे. मी ह्या प्रश्नाचे उत्तर देऊ न शकल्याने आपल्यापाशी आलेलो आहे. भगवंतांनी याचे उत्तर दिल्यास फार चांगले होईल. यावर बुध्द म्हणाले, “उपासक, ह्या बालकाने मला यापूर्वीही हा प्रश्न विचारलेला आहे व त्याचे उत्तर मी त्यावेळी त्याला दिलेले आहे. परंतु जन्म जन्मांतराची गोष्ट असल्याने तो त्याचे स्मरण करू शकत नाही. पित्याने त्या पूर्व जन्माची कथा सांगण्यासाठी भगवंतांना याचना केल्यानंतर त्यांनी पुढील कथा त्याला कथन केली.

पूर्वी वाराणशी येथे ब्रम्हदत्त राजा राज्य करीत असतांना बोधिसत्व महावैभवशाली श्रेष्ठी म्हणून जन्माला आला. त्याचा एक सात वर्षीय प्रज्ञावान तथा अर्थकुशल पुत्र होता. एके दिवशी तो पित्याजवळ जाऊन पित्याला म्हणाला, “तात, अर्थचा द्वार कोणता आहे?” अर्थात अर्थ लाभाप्रत नेणारा मार्ग कुठला ?” तेव्हा पित्याने त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल पुढील गाथा म्हटली.

गाथा : आरोग्यमिच्छे परमंच लाभं, सीलं च वृध्दानुमतं सुतं च I
धम्मानुवत्ती च अलीनता च अत्थस्सद्वारा पमुखा छलेतेति II


काव्यार्थ : आरोग्य इच्छा असे श्रेष्ठ लाभ, वृध्दोपदेश, शील प्रतिष्ठित II
बहुश्रुतता, धम्माचरण श्रेष्ठ आहे. अनासक्ती आदी सहा गोष्टीत पाहे II
हेच उन्नतीचे प्रमुख द्वार आहे.

भावार्थ : आरोग्यता, जो श्रेष्ठ लाभ आहे, प्रथमतः त्याची इच्छा करा. शील, ज्ञान सम्पन्न वृध्दांचा उपदेश, बहुश्रुतता, धर्मानुकुल आचरण, अनासक्ती इत्यादी सहा गोष्टी अर्थात उन्नतीचे प्रमुख द्वार आहे.

अशातऱ्हेने बोधिसत्वाने पुत्राच्या “अर्थद्वार” प्रश्नाचे उत्तर दिले. त्यावेळेपासून त्या सहा गुणांनुसार पुत्र आचरण करू लागला. बोधिसत्वसुध्दा दान इत्यादि पुण्यकर्म करून आपल्या कम्मानुसार परलोकी गेला. बुध्दांनी ही धम्मदेसना देऊन जातकाचा सारांश कथन केला. त्यावेळचा पुत्र हा आताचाच पुत्र होता व महाश्रेष्ठी तर मीच होतो.

शब्दार्थ : आरोग्यमिच्छे परमं च लाभं – तात, आरोग्याची इच्छा धरणे हा परम लाभ आहे. अर्थात आरोग्य हे शारिरीक तथा मानसिक असे दोन्ही प्रकारचे असते. आणि हे दोन्ही आरोग्य प्राप्त करणे हाच श्रेष्ठ लाभ आहे. शरीर रोगी असल्यावर अप्राप्त लाभ ना प्राप्त करता येत ना त्याचा उपभोग घेता येत. मात्र स्वस्थ असल्यावर ह्या दोन्हींचा लाभ घेता येतो. मात्र चित्त क्लेशाने पिडीत असल्यास अप्राप्त ध्यान इत्यादीचा लाभ घेता येऊ शकत नाही किंवा जे मिळाले ते समापत्तिध्यान, त्याचा उपभोगही घेता येऊ शकत नाही. मात्र अनासक्त राहिल्यास अप्राप्त लाभ प्राप्त होतो आणि प्राप्त लाभाचे सार्थकही होते. ह्या कारणाने आरोग्य परम लाभ आहे. सर्वप्रथम ह्याची ईच्छा धरली पाहिजे. उन्नतीचा हा मुख्य द्वार आहे.


सीलं चाति – आचरणशील अर्थात लोक व्यवहार; वृध्दानुमंति- गुणवृध्दांची, पंडितांची मति, गुरूंचा उपदेश; सुतं चाति – उपयोगी श्रृत; बहुसच्चं – बहुश्रुतता; धम्मानुवति चाति – सुचरित्र धम्मानुसार आचरण करणे; अलीनता चाति – चित्ताची अलिनता, प्रमादहिनता; अत्थस्सद्वारा प्रमुखा छलेतेति अर्थ – उन्नति, अर्थ अर्थात लौकिक, लोकोत्तर उन्नतीचे हे प्रमुख द्वार आहेत. उपाय आहेत. प्रवेश मार्ग आहेत.

बोधिसत्वाच्या जातक कथा खंड 2
आधार अनुवाद : भदन्त आनंद कौसल्यायन
भावानुवाद : डी एल कांबळे

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password