ही कथा भगवंतांनी जेतवन विहारात विहरत असतांना एका अवज्ञकारी भिक्खुला उद्देशून सांगितलेली आहे. ही कथा काश्यप सम्यक् सम्बुध्द कालीन दहाव्या निपातात (परिच्छेदात) महामित्त विन्दक जातक (संख्या 439) यांत येणार आहे. त्यावेळी बोधिसत्वाने पुढील गाथा म्हटलेली आहे.
अतिकम्म रमणकं सदामत्तं च दूभकं I
स्वासि पासाणमासीनो यस्मा जीवनं मोक्खसीति II
काव्यार्थ : सोडूनी रमणका, समादत्ता नि दूभका I
बससी पाषाणी तू अशा, जन्मभरीही ना सुटका II
भावार्थ : त्या अवज्ञाकारी भिक्खुला उद्देशून बोधिसत्व म्हणाले, रमणकं समादत्तं आणि दूभकं ह्या तीनही प्रासादांना सोडून तू अशा दगडावर चिपकून बसला आहेस की, जीवात जीव असेपर्यंत तू स्वतःला त्यापासून सोडवू शकणार नाहीस.
वरील गाथा गावून बोधिसत्व आपल्या देवस्थानाला निघून गेला. मित्तविन्दक सुध्दा उरचक्राला धारण करून महादुःख सहन करीत पापकर्म क्षीण झाल्यानंतर कम्मानुसार परलोक प्राप्त झाला. बुध्दांनी ही धम्मदेसना सांगून जातकाचा सारांश कथन केला. त्यावेळचा मित्तविन्दकं (आताचा) हा अवज्ञाकारी भिक्खु होता, मात्र देवराजा मीच होतो.
शब्दार्थ : रमणकांति – त्यावेळी स्फटिकाला रमणकांति म्हणत असत. तू त्या स्फटिकाच्या प्रासादाला सोडून आलास. सदामत्तंच – ह्याला ‘रजत’ अर्थात चांदी असे नाव आहे. तू त्या रजताच्या प्रासादाला सोडून आलास. दूभकं – हे मण्याचे नाव आहे. अर्थात तू मणिमय प्रासादाला सोडून आलास. स्वासीति- तो तू आहेस. पासाणमासीनोति – उरचक्र दगडाचा चांदीचा किंवा मण्याचा होतो. परंतू तो दगडाचा होता, ज्याला तो भिक्खु चिपकुन बसला. दगडाला चिपकल्यामुळे आसीनतेमुळे पासाणासीनो असे म्हटलेले आहे. यस्मा जीवं न मोक्खसीति – ज्या उरचक्राने जोपर्यंत तुझ्या पापाचा नाश होणार नाही तोपर्यंत जीवात जीव असेपर्यत तू मुक्त होणार नाहीस अशा दगडाला तू चिपकला आहेस.
बोधिसत्वाच्या जातक कथा खंड 2
आधार अनुवाद : भदन्त आनंद कौसल्यायन
भावानुवाद : डी एल कांबळे