Categories

Most Viewed

कालकण्णि जातक (खरा मित्र)

अपायिम्ह वग्ग कालकण्णि जातक (खरा मित्र)

ही कथा भगवंतांनी जेतवन विहारात विहरत असतांना अनाथपिंडकाच्या एका मित्राला उद्देशून सांगितलेली आहे.

अनाथपिंडकाचा एक बालपणीचा मित्र होता. त्याचे नाव होते कालकण्णी. दोघाही मित्रांनी आचार्याकडे जाऊन शिल्पकला संपादन केली. मात्र कालांतराने कालकण्णी (करंटा अथवा अपशकूनी) त्याच्या कर्तृत्वानेच अत्यंत दरिद्री झाला. योग्यरितीने पोट भरण करू न शकल्यामुळे तो अनाथपिंडकाकडे आला. श्रेष्ठीने त्याला धीर दिला व खर्च करण्यासाठी पैसेही दिले व त्याच्या परिवाराची पालन पोषणाची व्यवस्था केली. श्रेष्ठीचे उपकार मानून त्याची सर्व कामे तो करू लागला. तो जेव्हा श्रेष्ठीकडे कामाला यायचा तेव्हा त्याला कोणीही अपशब्द बोलून त्याचा अपमान करीत असत. त्याला म्हणत, “कालकण्णी उभा हो, कालकण्णी बस! कालकण्णी जेवण कर” इत्यादी इत्यादी असे शब्द ऐकून यक्ष सुध्दा पळून जातील. “हा तुमच्या लायकीचा नाही, हा दरिद्री आहे. कुरूप आहे. तुम्ही त्याला का ठेवले ?” असे इतरजन अनाथपिंडकाला बोलू लागत. तेव्हा अनाथपिंडक म्हणे, “नाव हे फक्त व्यवहारासाठी असते. पंडीत जन (शहाणे लोक) त्याचा विचार करीत नसतात. केवल कानांना मंगल वाटणारे नाव असायला नको. केवळ नावामुळेच माझ्या लंगोटी मित्राला मी सोडू शकत नाही.” असे म्हणून अनाथपिंडक लोकांच्या म्हणण्याला टाळीत असे.

एके दिवशी अनाथपिंडकाने आपल्या भोग ग्रामला जायचे ठरवले व आपल्या त्या मित्राला त्याने घर रक्षकाचे काम दिले. तेव्हा काही चोरांनी विचार केला की, श्रेष्ठी गावाला गेला आहे. आता त्याचे घर लुटायला काही हरकत नाही. त्यांनी निरनिराळ्या प्रकारची शस्त्रे गोळा केली व एके रात्री श्रेष्ठीच्या घराला वेढा दिला. चोरांच्या भितीने तो घर रक्षकही जागत बसून राहिला होता. त्याला चोरांच्या येण्याची चाहूल लागली. त्याने माणसांना जागे करण्याचा बहाणा केला. तो कोणाला शंख वाजवायला, तर कोणाला ढोल वाजवायला सांगु लागला. त्याने त्या घरी थोरा मोठ्यांचा मेळावाच तिथे भरला आहे असे भासवित सारे घर त्या आवाजाने भरून गेल्याचे दाखवले. चोरांना वाटले हे घर तर खाली असल्याचे आपण जे ऐकले होते ते खोटे होते तर! शेवटी चोरांना काय करावे ते न सुचल्याने व श्रेष्ठीला आपण दिसू नये असा विचार करून बरोबर आणलेली शस्त्रे जसे पाषाण, मुद्गल वगैरे तिथेच टाकून पळून गेले.

दुसऱ्या दिवशी लोकांनी इकडे तिकडे पडलेले दगड, मुद्गल वगैरे शस्त्रे बघुन गृहरक्षकाच्या चातुर्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “जर अशाप्रकारचा गृहरक्षक इथे नसता तर चोर घरात घुसून वाटेल तेवढी लुट करून घेऊन गेले असते. अशा घनिष्ठ मित्रामुळेच श्रेष्ठीचे नुकसान होण्यापासून वाचले.” आणि जेव्हा श्रेष्ठी काही दिवसानंतर घरी परतला तेव्हा लोकांनी त्याला घडलेला सर्व वृत्तांत सांगून त्या मित्राची प्रशंसा केली.

यावर श्रेष्ठीने उत्तर दिले, तुम्ही लोकच माझ्या ह्या मित्राला नाव ठेवून त्याला काढून टाकण्याचा सल्ला देत होता. जर मी तुमचा सल्ला ऐकला असता तर माझे घर लुटले जाऊन माझी अपरिमित हानी झाली असती. यावरून असे सिध्द होते की, “नाम नाही तर काम महत्वाचे असते.” नाव नाही तर हितैशी चित्त हवे असे श्रेष्ठी अनाथपिंडकाने त्या मित्राला बक्षीस म्हणुन दुगुना मोबदला दिला व ही घडलेली विशेष गोष्ट समजून बुध्दांना ती सांगण्यासाठी जेतवन विहारात जाऊन संपुर्ण वृत्तांत बुध्दांना कथन केला. यावर बुध्द म्हणाले, “हे गृहपति, ह्या कालकण्णीने ह्या वेळीच आपल्या मित्राच्या कुटुंबाची रक्षा केली नाही तर यापूर्वीही त्याने असेच केलेले आहे. श्रेष्ठीने याचना केल्यानंतर बुध्दांनी त्या मित्राची पूर्वजन्माची कथा कथन केली.

पूर्वीच्या काळी वाराणशी येथे एक राजा राज्य करीत असतांना बोधिसत्व महान ऐश्वर्यवान श्रेष्ठी होता. त्याचा कालकण्णी नावाचा एक मित्र होता. नावाप्रमाणेच लोक त्याची हेळसावनी अर्थात घृणा करीत होते व त्या श्रेष्ठीला सल्ला देत होते की, अशा मित्राची त्याने संगती करू नये. मात्र इतरांचे न ऐकता आपल्या मित्रावर बोधिसत्वाने सार्थ विश्वास दाखवून त्याला घर रक्षकाचे काम देऊन तो आपल्या भोग ग्रामी निघून गेला. पुढील कथा अगदी वरीलप्रमाणेच घडली. कालकण्णीने उपाय कौसल्याने चोरांना काठया, लाठ्या, दगड तिथे टाकून पळायला भाग पाडले व आपल्या मित्राचे घर, संपत्तीचे विनाशापासून रक्षण केले. अन्यथा ते बोधिसत्वाचे कुटूंब धुळीला मिळाले असते. जर मी लोकांचे ऐकून माझ्या उपकारी मित्राला काढून टाकले असते तर आज माझ्याजवळ काहीच उरले नसते. असे सांगून बोधिसत्वाने पुढील गाथा म्हटली.

गाथा : मित्तो हवे सत्तपदेन होति, सहायो पन द्वादसकेन होति I
मासध्दमासेन च ञाति होति, तदुत्तरिं अत्तसमोपि होति II
सोहं कथं अत्तसुखस्स हेतु, चिरसन्धुतं कालकण्णि जहेय्यन्ति II

काव्यार्थ : सात पाऊले बरोबरीने, चालतांना मित्र होतसे I दिवस बारा सहवासाने, सहाय्यक समजला जाईतसे II रहिवासे पंधरवाडा, महिना, आप्त होऊनी राहि तसे I त्याहूनही अधिक सहवासाने, विलीन माझा रूप असे II चिरकाल माझ्या सवे सोबती कालकण्णीला सोडू कसे ?

भावार्थ : सात पावले बरोबर चालतांना मनुष्य मित्र होतो. बारा दिवस बरोबर राहल्याने सहाय्यक होतो. महिना, अर्ध महिना बरोबर राहल्याने नातेवाईक होऊन जातो. म्हणून मी माझ्या आत्मसुखासाठीच चिरकालपर्यंत माझ्या बरोबरीने राहणाऱ्या कालकण्णि मित्राला कसे सोडू?

या प्रसंगानंतर बोधिसत्वाला कोणीही त्या मित्राच्या विरोधात बोलण्याचे धाडस करू शकला नाही.

शास्ताने ही धम्मदेसना सांगून जातकाचा सारांश कथन केला. त्यावेळचा कालकण्णी आजचा आनंद होता तर वाराणशीचा श्रेष्ठी मीच होतो.

शब्दार्थ : मित्तो हवे – मैत्री करणारा मित्र अर्थात मित्र मैत्री करतो, स्नेह करतो; सत्तपदेन होतिति – मित्राबरोबर सात पाऊले एकत्र चालल्याने; सहायो पन द्वादसकेन होति – सर्व कार्य बारा दिवसपर्यंत एकत्र केल्याने, सर्व अवस्थांमध्ये बरोबरीने राहणारा सहाय्यक होतो; मासध्दमासेन चाति – महिना किंवा अर्ध महिना बरोबरीने राहिल्याने; ञाति होतिति ञाति – आप्तासारखाच होतो; सत्तुत्तरिति – त्यापेक्षाही अधिक काळ बरोबरीने राहिल्याने; जहेय्यति – अशा प्रकारच्या मित्रला मी कसे सोडू? मित्र रसाची प्रशंसा करतो.

बोधिसत्वाच्या जातक कथा खंड 2
आधार अनुवाद : भदन्त आनंद कौसल्यायन
भावानुवाद : डी एल कांबळे

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password