Categories

Most Viewed

अपायिम्ह वग्ग सुरापान जातक

अपायिम्ह वग्ग
सुरापान जातक (नशापाणी करू नये)

ही कथा भगवंतांनी कोसम्बीच्या जवळ घोसिताराम विहारात विहरतांना सांगत स्थविरांना उद्देशून सांगितलेली आहे.

भगवंतांनी श्रावस्ती येथील वर्षावास पूर्ण केला व ते भद्रावती नामक गावात गेले. तेथे गेल्यानंतर तेथील गुराख्यांनी, पशुपालकांनी शेतकऱ्यांनी तथा वाटेकरूंनी शास्तांना बघून प्रणाम केला व म्हणाले, “भन्ते, भगवान, आपण अम्बतीर्थाला जाऊ नये. कारण अम्बतीर्थात जटीलाच्या आश्रमात अम्बतीर्थक नामक एक अत्यंत विषारी नाग आहे. तो न जाणो आपणास त्रास देण्याची व इजा पोहचवण्याची शक्यता आहे.

मात्र भगवंतांनी त्या सर्वांची गोष्ट न ऐकताच त्यांच्या तीन वेळा मनाई केल्यानंतरही अम्बतीर्थाला जाण्याचे ठरवले. त्यावेळी भद्रावतीहून काही अंतरावर वनातून जात असतांना, शास्तांचा एक उपासक, लौकीक ऋध्दीने सम्पन्न सागत नावाचा एक स्थविर, गवताचे आसन बनवून त्या नागराजाच्या निवास स्थानी जाऊन पालथी मारून बसला. नागराजाने भयभीत होऊन धूर काढणे प्रारंभ केले. ते पाहून स्थविरानेही धूर काढायला सुरूवात केली. नाग जसा उत्तेजित झाला. तसेच स्थविरही धुराने उत्तेजित झाला. नागाच्या तेजाने स्थविराला काहीच त्रास झाला नाही. मात्र स्थविराच्या तेजाने नागाला त्रास होऊ लागला व तात्काल नाग राजाचे दमन करून स्थविरांनी त्याला त्रिशरण, पंचशीलात प्रतिष्ठित करून शास्ताकडे नेले.

शास्ता सुध्दा भद्रावतिकेमध्ये वाटेल तेवढे दिवस विहार करून कोसम्बीला निघून गेले. सागत स्थविर द्वारा नागाचे दमन केल्याची बातमी संपूर्ण जनपदात पसरली. कोसम्बीवासी लोकांनी बुध्दांचे यथोचित स्वागत केले व त्यांना प्रणाम करून सागत स्थविरांकडे जाऊन, त्यांना प्रणाम करून व एका बाजुला उभे राहून बोलू लागले, “भन्ते, आपणास दुर्लभ अशा गोष्टीची मागणी करावी. ती आम्ही पुरी करू.” यावर स्थविर गप्पच राहिले. मात्र त्यांचे षठवर्गिय भिक्खु मध्येच म्हणाले, “आवूसो, प्रव्रज्जितांना कबुतरी दारू ही दुर्लभ असते व तीच त्यांना आवडते. जर आपण स्थविरांवरती प्रसन्न असाल तर कबुतरी दारूची व्यवस्था करा.” कोसंबीवासी यांनी ‘ठिक आहे’ असे म्हणून छठवर्गिय भिक्खुंची मागणी स्विकार केली व बुध्दांना दुसऱ्या दिवसासाठी भोजनाचे निमंत्रण दिले. दुसऱ्या दिवशी बुध्द आणि भिक्खु संघाला कोसंबीवासियांनी भोजन वाढले. मात्र सांगत स्थविराला आपआपले घर दाखविण्याच्या निमित्ताने घरोघर घेऊन गेले व कबुतरी दारू प्यायला दिली. स्थविर दारू पिऊन मस्त झिंगला व नगरातून बाहेर पडताना नगरद्वाराच्या मध्येच कोसळला व वाटेल तसा बरळु लागला.

बुध्दांचे भोजन आटोपले व तेही नगराच्या बाहेर पडताना त्यांची नजर त्या सागत भिक्खुकडे गेली. त्यांनी इतर भिक्खुंना सागत स्थविराला उचलून निवासस्थानी घेऊन येण्यास सांगितले. भिक्खुंनी स्थविराचे डोळे बुध्दांच्या चरणी पडेल अशा रितीने त्याला झोपवले. सागत स्थविराने पलटी मारली व तथागतांकडे पाय करून निजला. तेव्हा बुध्दांनी भिक्खुंना विचारले, “भिक्खुनो, माझ्याप्रती सागताला जो अगोदर आदर होता तो आता राहिला काय?” “भन्ते, नाही.” “भिक्खुंनो, अम्बातीर्थांच्या नागराजाचे दमन कोणी केले?” “भन्ते, सागतने” “भिक्खुनो, आता तो पाण्यातील सापाचे तरी दमन करू शकतो काय?” “भन्ते, नाही” “तेव्हा भिक्खुनो, अशा पेय वस्तुचे पिणे उचित आहे काय की जे पिऊन मनुष्याची शुध्द हरपून जाईल?” “भन्ते, हे फार अनुचित झाले.”

त्यानंतर भगवंतांनी सागत स्थविराची निंदा केली. सर्व भिक्खुंना जवळ बोलावून घेतले व ‘सुरा मेरय पान’ अर्थात कोणतीही दारू किंवा नशील्या वस्तुचे सेवन “पाचिति योग्य” अर्थात दोषास पात्र आहे असे सांगून, अशा वस्तुंचे सेवन करणारास शासन होईल असा नियम तयार केला व आसनातून उठून ते गंधकुटीत निघून गेले.

धर्मसभेत भिक्खुंची चर्चा सुरू होती. दारू पिण्याचे दोष ते एकमेकांना सांगत होते. “आवुसो, दारू किती खराब आहे. जिने प्रज्ञावान ऋध्दीवान स्थविराला सुध्दा भानरहित केले, ज्याला बुध्दांच्या गुणांची सुध्दा स्मृति राहिली नाही. तेवढ्यात शास्ता धर्मसभेत उपस्थित झाले व म्हणाले, “भिक्खुंनो, काय चर्चा चालु आहे?” सागत स्थविराबद्दल चर्चा चालु असल्याचे भिक्खुनी शास्तांना सांगताच शास्ता म्हणाले, “भिक्खुंनो, दारू पिऊन काही प्रव्रज्जित आताच बेहोश झाले असे नाही तर यापूर्वीही बेहोश झाल्याची उदाहरणे आहेत असे सांगून पूर्वजन्माची कथा निवेदन केली ती येणेप्रमाणे –

पूर्वीच्या काळी वाराणशी येथे ब्रम्हदत्त राजा राज्य करीत असतांना, काशी राष्ट्राच्या उदीच्य ब्राम्हण कुळात बोधीसत्व उत्पन्न झाला. त्याने वयात आल्यानंतर ऋषी प्रव्रज्या ग्रहण केली. व अभिज्ञा नि समापत्ति ध्यानाचा लाभ करून घेतला. ध्यान प्रक्रियेत व्यस्त राहून पांचसौ शिष्यांसह तो हिमवन्त प्रदेशात निवास करू लागला. वर्षा ऋतू सुरू झाल्यावर शिष्यांनी त्याला विचारले, “आचार्य, जनपदात (गावात) जाऊन मीठ, आंबट वगैरे पदार्थ खाऊन येऊ.” “आवूसो! मी तर इथेच राहीन. तुम्ही गावात जाऊन आपल्या शरीराला संतुष्ट करा. वर्षा ऋतु संपल्यावर इकडे वापस या.” ठिक आहे, असे म्हणून आचार्यांना प्रणाम करून ते सर्व शिष्य वाराणशीला गेले व तेथे राजाच्या उद्यानात थांबले. पहिल्या दिवशी नगराच्या बाहेरच्या बाहेर भिक्षाटन करून संतुष्ट होऊन दुसऱ्या दिवशी त्यांनी नगरात प्रवेश केला. लोकांनी त्यांना प्रसन्नतेने भीक दिली. काही दिवस व्यतीत झाल्यानंतर लोकांनी राजाला सांगितले, “देव, हिमवन्त प्रदेशातून पांचशे संन्याशी येऊन उद्यानात थांबलेले आहेत. ते घोर तपस्वी आहेत. ते इंद्रियसंयत असून शीलवान आहेत. त्यांची प्रशंसा ऐकून राजा त्यांच्या भेटीसाठी उद्यानात गेला. त्यांना प्रणाम करून कुशलक्षेम विचारून वर्षा ऋतुचे चार महिने तिथेच राहण्याचे आश्वासन घेऊन त्यांना निमंत्रण दिले. त्या दिवसापासून ते संन्याशी राजभवनात भोजन करीत व उद्यानात जाऊन राहत.

एके दिवशी नगरात सुरापान उत्सव होता. प्रव्रज्जितांना सुरा दुर्लभ असते असा विचार करून राजाने त्या संन्याशी लोकांसाठी अत्युत्तम सुरा मागविली. ते तपस्वी सुरापान करून उद्यानात जाऊन सुरेने (दारूने) उन्मत होऊन नाचु लागले, गाऊ लागले. नाचून गावून उरलेले नमकिन वगैरे इतस्ततः फेकून झोपी गेले. दारूची नशा उतरल्यावर ते उठले व त्यांच्या लक्षात आले की, त्यांनी नशापाणी करून अनुचित कार्य केलेले आहे. आम्ही प्रव्रज्जित जीवनाला प्रतिकुल कार्य केलेले आहे, असे म्हणून विलाप करू लागले. आम्ही आचार्य रहित असल्यामुळेच आमच्या हातून असे पाप घडलेले आहे. असा विचार करून त्याच क्षणी ते उद्यान सोडून हिमवन्त प्रदेशात निघून गेले. प्रत्येकाने आपले चीवर आदि व्यवस्थित करून आचार्यांना प्रणाम करून बाजुला बसले. आचार्यांनी विचारले, “काय जनपदात भिक्षा कष्ट तर झाले नाहीना ? तिथे सुखाने मिळुन मिसळून राहिले कि नाही?” “नाही, आम्हाला तिथे कुठलेही कष्ट सहन करावे लागले नाही. आम्ही सर्व आपसांत मिळून मिसळूनच राहिलो. मात्र तिथे आम्ही न पिण्यालायक वस्तु अर्थात दारू प्यालो. त्यामुळे आमची स्मृति आम्ही गमावली व नाचु गाऊ लागलो.” असे सांगून त्यांनी पुढील गाथा म्हटली.

अपायिम्ह अनच्चिम्हं अगायिम्ह रूदिम्ह च I
विसञ्ञ्जकरणिं पीत्वा दिट्ठा नाहुम्ह वानराति II

काव्यार्थ : प्यायलो, नाचलो, गायलो, आम्ही रडलो खरे I स्मृतिभ्रम करणारी पिऊनही, आम्ही न झालो वानरे II

भावार्थ : सुरापान करून आम्ही नाचलो, गाऊ लागलो व रडलो. आनंद इतका होता की, शुध्द गमावणारी (दारू) पिऊनही आम्ही वानर झालो नाही.

अशा प्रकारे त्या तपस्व्यांनी वरील गाथा गाऊन आपले दुर्गुण प्रदर्शित केले. बोधिसत्वाने आचार्यांपासून दूर राहिल्याने असे घडणे साहजिकच आहे. असे म्हणून त्यांची निंदा केली व यापुढे असे करू नये असा उपदेश करून त्यांना सजग केले. अशा तऱ्हेने बोधिसत्व ध्यानात मग्न राहून वय पूर्ण झाल्यावर ब्रम्हलोकात उत्पन्न झाला.

बुध्दांनी धम्मदेसना देऊन जातकाचा सारांश प्रस्तुत केला. त्यावेळचे तपस्वी हे आजची बुध्दपरिषद होती व त्या वेळचा आचार्य मीच होतो असे निवेदन त्यांनी केले.

शब्दार्थ : अपयिम्हाति – सुरा पिऊन; अनच्चिम्हाति – तिला पिऊन हात पाय झटकून झटकून नाचू लागलो; अगायिम्हाति – तोंड उघडून लांब स्वराने गायिलो; रुदिम्हाति – पुन्हा पश्चातापाने आम्ही असे केले, असा विचार करून रडलो; दिट्ठा ना हुम्ह वानराति – अशाप्रकारे स्मृतिभ्रम अवस्था होऊनही; विसञ्ञकरणिं – स्मृति भ्रष्ट करणारी पिऊनही हे बरे झाले की, आम्ही वानर झालो नाही.

बोधिसत्वाच्या जातक कथा खंड 2
आधार अनुवाद : भदन्त आनंद कौसल्यायन
भावानुवाद : डी एल कांबळे

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password