Categories

Most Viewed

भिक्खुणी खेमा

राजा बिंबिसाराची राणी खेमा अतिशय रुपवान होती. तिला तिच्या रुपाचा गर्व होता. तिच्या रुपाची स्तुती केलेली तिला आवडत असे. राजा बिंबिसाराने सुद्धा तिच्या रुपावर मोहित होऊनच तिच्याशी लग्न केले होते.

   राजा बिंबिसार, त्याचा संपूर्ण परिवार तथागत गौतम बुद्धाचे प्रशंसक होते.राजा नियमीत तथागताच्या दर्शनासाठी, उपदेश श्रवण करण्यासाठी जात असे. परंतु राणी खेमा मात्र तथागताच्या दर्शनास येण्यास नकार देत होती कारण तिला माहिती होते की बुद्ध हे रूपाला, शरीर सौंदर्याला महत्व देत नाही. व तिला तर तिच्या रुपाची स्तुती करणारेच आवडत होते. 

   राजा हे सर्व जाणत होता.परंतु राणी खेमाने एकदा बुद्धाचे दर्शन घ्यावे, त्यांचे प्रवचन ऐकावे असे राजाला मनोमन वाटत होते ह्या इच्छा पूर्ततेसाठीच एकदा त्याने एक युक्ती रचली ज्या उद्यानात(वेळूवन) बुद्ध संघ विहार करीत होते त्या विहारातील सुंदर आकर्षक वातावरणाची खूप खूप प्रशंसा केली. राणीला हि ते उद्यान बघण्याची तीव्र इच्छा झाली. राणीने उद्यानात जाण्यास संमत्ती दर्शविली. परंतु जेव्हा बुद्ध संघ चारिकेसाठी बाहेर पडलेले असतात त्यावेळी राजा आणि राणी उद्यानात गेले. प्रथमदर्शनीच राणी खेमा उद्यानातील सौंदर्य बघुन मंत्रमुग्ध झाली तिला वेळेचेही भान राहिले नाही. उद्यानाच्या रमणीय वातावरणात ती समरस झाली व बुद्ध व त्यांचे शिष्य त्यांच्या ठरलेल्या जागेवर येऊन स्थानापन्न झाले.

   राणीला बुद्ध आणि शिष्यांच्या वागणुकीने प्रभावीत झाली. तिच्या नकळत ती बुद्धाचे प्रवचन ऐकू लागली. शरीर सौंदर्य हे क्षणभंगुर आहे, शरीरात अनेक दोष आहेत. शरीराच्या बाह्य रुपाला अति महत्त्व देणे गैर आहे. सर्व काही परिवर्तनशील आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये हे तत्त्वज्ञान अगदी वक्तृत्व कौशल्याने तथागतांनी मांडले व त्याच क्षणी राणी खेमा हि भिक्खुणी संघात सामील झाली. 

गाथा:-
ये रागरत्तानुपतन्ति सोतं ।
सयं कतं मक्कटकोव जालं ।
एतम्पि छेत्वान वजन्ति धीरा।
अनपेक्खिनो सब्बदुक्खं पहाय ।।
धम्मपद (347)
अर्थ:-
स्वतः विणलेल्या जाळ्यात सापडणाऱ्या कोळ्याप्रमाणे जे कामासक्त असतात, ते या प्रवाहांत सापडतात. पण धीर पुरुष त्यालाही सोडून निरिच्छ होऊन सर्व दुःखाचा त्याग करतात.

   राणी खेमाने भिक्खुणी झाल्यानंतर तथागताच्या प्रत्येक शिकवणुकीचे अचूक पालन केले. ध्यान साधना करीत तिने ध्यानाच्या चार पाय-या पार केल्या व ती अर्हत झाली. अर्हत पदाला प्राप्त करुन तिने प्रज्ञेत अग्रस्थान प्राप्त केले आता ति थेरी खेमा म्हणून प्रसिद्ध झाली. तथागताच्या प्रत्येक वचनाला ति जसेच्या तसे आत्मसात करीत असे. 

   एकदा थेरी खेमा श्रावस्ती आणि साकेत ह्या नगरांच्या दरम्यान तोरणवत्थुमध्ये राहत होती. यावेळी प्रसेनजीत राजा साकेतला आला होता पुनर्जन्म बाबत काही बिकट प्रश्नांवर त्याला कोणत्यातरी विद्वान व्यक्तीशी चर्चा करावयाची होती. त्यांच्या मंत्र्याने ह्याबाबतीत चौकशी केल्यावर कळले की, खेमा नावाची तथागतांची एक शिष्या इथे आहे. ती विचारसंपन्न, बहुश्रुत, वादविवादात कुशल आहे. राजाने खेमाला आमंत्रित केले. मुत्यु नंतर तथागताचे अस्तित्व असते का ? अशा बिकट प्रश्नावर खेमाने समर्पक उत्तरे दिली. राजा शेवटी म्हणतो की आश्चर्य वाटते की हिच प्रश्ने मी तथागतांनाही विचारली आहे, गुरू शिष्यांनी दिलेली उत्तरे अर्थशः आणि अक्षरशः समान, सुसंवादी, सुसंगत आणि उच्चतम आहेत. 

   अशा या प्रज्ञावान, स्मृतीवान, वादविवादपटू थेरी खेमाचा आजच्या स्त्री वर्गाने आदर्श घ्यावा या उद्देशाने बहुजन नायिकेच्या उपक्रमासाठी थेरी खेमा निवडलेली आहे. तिने जसे आपल्या मनोविकारावर (गर्व) विजय मिळवून तथागताच्या धम्माला योग्य रितीने जाणून आपले जीवन मंगलमय केले तसेच आम्ही स्त्रियांनीहि करावे. 

पुन्हा एकदा थेरी खेमा हिचा शब्दसुमनांनी गौरव करते आणि त्यांना त्रिवार वंदन करते.
जयभीम नमो बुद्धाय।

संदर्भ ;-
१ धम्मपद गाथा और कथा-ताराराम
२ बुद्ध आणि त्यांचा धम्म-डॉ बाबासाहेब आंबेडकर

संकलन : प्रांजली प्रवीण काळबेंडे, वसई.
आयोजक : माता रमाई स्मारक(वरळी) झालेच पाहिजे.
कल्याण ग्रुप.

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*

  Forgot Password