एकदा बोधिसत्व हरीण होऊन एका अरण्यांत सरोवराच्या काठी राहात होता. तेथेच एका वृक्षावर एका सुतार पक्ष्याने आपले घरटे बांधले होते. आणि त्या सरोवरांत एक कासव राहात होता. या तिघांची अत्यंत मैत्री जडली होती. एके दिवशी एक पारधी त्या सरोवराच्या काठी हरणाला पकडण्यासाठी जाळे पसरून घरी गेला. रात्रीच्या पहिल्या प्रहरी बोधिसत्व पाणी पिण्यासाठी जात असतां त्या जाळ्यात सापडला; आणि आपण जाळ्यांत सापडलों हे आपल्या मित्रांस कळविण्यासाठी तो मोठ्याने ओरडला. तेव्हा सरोवरांतून कासव वर आला व सुतार पक्षी आपल्या घरट्यांतून खाली उतरला. बोधिसत्वाची ही दिनदशा पाहून सुतार पक्षी कासवाला म्हणाला, “पहाट होण्यापूर्वी जर आमच्या मित्राला या पाशांतून मुक्त केले नाही तर तो पारध्याच्या तावडीत सापडून प्राणास मुकेल. आता तू आपल्या दातांनी याचे पाश तोडण्यास आरंभ कर, आणि हे काम लवकर आटप.”
कासव म्हणाला, परंतु माझे दात काही बळकट नाहीत. माझ्या गतीप्रमाणेच पाश तोडण्याचे काम मंदपणे चालेल, आणि इतक्यांत पारधी आला तर माझे सर्व श्रम वाया जातील.
सुतार पक्षी म्हणाला,”पारधी लवकर येईल याबद्दल तू काळजी करू नकोस तो सकाळ होईपर्यत येणार नाही. याबद्दल मी हमी घेतो; आणि त्याला जेवढा उशीर लावता येईल तेवढा लावण्याचा मी प्रयत्न करतो. पण तू हे पाश तोडण्याचे काम लवकर कर.”
कासवाने एकामागून एक पाश तोडण्यास सुरूवात केली. सुतार पक्षी पारधी येण्याच्या मार्गावर जाउन त्याची वाट पाहात बसला. पहाट होण्यापूर्वी पारधी हातात मोठी सुरी घेउन तलावाच्या काठी जाण्यास निघाला. इतक्यांत सुतार पक्ष्याने पारध्याच्या कपाळावर जोराने चोचीने प्रहार केला. बिचारा पारधी आपणाला मोठा अपशकून झाला असे वाटून पुन्हा घरी गेला. आणि मनातल्या मनात म्हणाला,” आज या अमंगळ पक्ष्याने माझ्यावर टोच मारून मला अपशकून केला आहे त्यामुळे शिकार निट साधेल किंवा नाही याची मला काळजी वाटते तथापि थोड्या वेळाने मागील दरवाजातून निघून जाऊन अपशकून न होईल असे केले पाहिजे.
असा विचार करीत तो झोपी गेला. पुन: पहाटेनंतर उठून मागल्या दरवाजातून जाण्याच्या बेतात होता. पण तेथेही सुतार पक्ष्याने मोठ्याने ओरडत त्याच्या कपाळावर टोच मारली. पारधी संतापून म्हणाला, ” या दुष्ट अमंगळ पक्ष्याने तर माझा पिच्छाच पुरवला आहे. तथापि थोडा उजेड झाल्यावर याची चांगली खोड मोडून मग शिकारीच्या शोधार्थ जाईन.
असे म्हणून काही वेळ घरांत बसून नंतर तो सरोवराकडे जाण्यास निघाला. सुतार पक्ष्याने त्याच्या पूर्वीच येऊन कासवाला त्याच्या आगमनाची खबर दिली. कासवाने सर्व पाश तोडून टाकले होते. एकच काय तो बाकी होता. परंतु त्याला त्यामुळे इतका त्रास झाला की, त्याच्या तोडांवाटे रक्ताच्या धारा वाहात होत्या आणि अंगात त्राण न राहील्यामुळे तो बेशुध्द होऊन खाली पडला. इतक्यांत पारधी जवळ येऊन ठेपला. बोधिसत्वाने ( हरीणाने ) शिल्लक राहीलेला पाश आपल्या सामर्थ्याने तोडून टाकून तेथून पलायन केले परंतु बिचारे कासव पारध्याच्या हाती लागले. पारध्याने त्याला आपल्या पिशवीत भरले, आणि खिन्न मनाने तो घरी जाण्यास निघाला. आपणाला मुक्त करण्यासाठी कासवाने आपला जीव धोक्यात घातला हे पाहून बोधिसत्वाला फार वाईट वाटले, आणि जीव गेला तरी बेहतर, कासवाला मुक्त केल्यावाचून राहणार नाही असा निश्चय करून तो मागे वळला आणि पारध्याजवळ काही अंतरावर पोहोचल्यांवर लंगडत लंगडत चालू लागला. सर्व रात्र पाशांत गुरफटून पडल्यामुळे या हरीणाच्या पायाला इजा झाली असावी, व तो दुर्बल झाला असावा असे वाटून पारध्याने आपली पिशवी एका झाडाच्या मेढक्याला अडकावून दिली आणि सुरी घेऊन तो हरीणाच्या मागे लागला. त्याला लोभवून बोधिसत्वाने दूरवर नेले, व दुसऱ्या एका आडवाटेने पळ काढून मेढ्यावर अडकवलेली पिशवी हळूच खाली पाडून कासवाला मुक्त केले. कासव तात्काळ पाण्यात शिरला. सुतार पक्षी झाडावरून खाली उतरला तेव्हा बोधिसत्व या दोघांस उद्देशून म्हणाला, “तुम्ही दोघांनी मिळून मला जीवदान दिले आहे. तेव्हा तुमचे माझ्यावर फार फार उपकार आहेत. परंतु आता येथे राहाणे धोक्याचे आहे. पारध्याला ही जागा माहीत झाली आहे. आणि येथे राहील्यास केव्हाना केव्हा त्याच्या जाळ्यात सापडण्याची मला भीती आहे. तेव्हा पारधी येथे पोहचण्यापूर्वीच मी घोर अरण्यात जाऊन राहतो.”
असें म्हणून बोधिसत्वाने तेथून पळ काढला. सुतार पक्षीही उडून गेला. कासव तर पाण्यात शिरलाच होता. पारधी धावत येऊन पाहतो तो पिशवीतील कासव देखील निघून गेला होता. जाळे आणि रिकामी पिशवी घेऊन खाली मान घालून अत्यंत खिन्न अंत:करणाने तो आपल्या घरी गेला. बोधिसत्व आणि त्याचे दोघे मित्र घोर अरण्यांतील दुसऱ्या एका तलावाच्या काठी वास करून राहीले. त्यांच्यावर आलेल्या या प्रसंगाने त्यांची मैत्री दृढ तर झाली, आणि त्या मैत्रीमुळे त्यांचा सारा जन्म सुखांने गेला.
कुरूंगमिग जातक कथा
जातक कथा – धर्मानंद कोसंबी.
संकलन – अरविंद भंडारे
पालि रिसर्च इन्स्टिट्यूट