Categories

Most Viewed

14 ऑगस्ट 1937 भाषण

तुम्ही संघटन करून स्वतंत्र मजूर पक्षाला बलवान करा

प्रिय बंधुनो,
आपल्या या सभेस हजर राहण्यास मला अत्यंत आनंद होत आहे. स्वतंत्र मजूर पक्षाला व्यवस्थित स्वरूप देण्याचा व आपल्या लोकात संघटना घडवून आणण्याचा हा जो उपक्रम तुम्ही सुरू केला आहे तो स्तुत्य व अत्यंत महत्त्वाचा आहे.

सहा महिन्यापूर्वी होऊन गेलेल्या असेंबली इलेक्शनचे आपण सिंहावलोकन केल्यास, त्यावेळी आपल्या लोकांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल मला धन्यता वाटते. कारण अत्यंत प्रभावशाली व श्रीमंत अशा काँग्रेसशी आपणास त्यावेळी स्पर्धा करावयाची होती. स्वतंत्र मजूर पक्षाचा एकही उमेदवार निवडून येऊ द्यावयाचा नाही, असा काँग्रेसने पण केला होता. आपल्या उमेदवारास पाडण्यासाठी काँग्रेसने आटोकाट प्रयत्न केला होता. अशा बिकट परिस्थितीला तोंड देण्याचे काम मला करावे लागले. इतर प्रांताकडे आपण पाहिल्यास सर्वांनी काँग्रेसला शरणचिठ्ठी दिल्याचे आपणास दिसून येईल. संबंध हिंदुस्थानात काँग्रेसबरोबर लढा करण्यास काय तो मी एकटाच उभा होतो व त्यात मी यशस्वीही झालो. मात्र ही गोष्ट केव्हाही खरी आहे की तुम्हा लोकांच्या पाठिंब्याशिवाय मला यश येणे शक्य नव्हते. तुम्हाला माहीतच आहे की, त्यावेळी आपल्यातीलच काही माणसे काँग्रेसला बळी पडली होती. परंतु असे असताना सुद्धा त्यावेळी आपण मोठे यश संपादन केले. ही गोष्ट काँग्रेसचे पुरस्कर्ते देखील कबूल करतात. त्यावेळी संबंध हिंदुस्थानात काँग्रेसला तीनच जागा महत्त्वाच्या वाटत होत्या. त्या म्हणजे डॉ. वाडांची मुंबई युनिव्हर्सिटीची जागा, लोकशाही स्वराज्य पक्षाचे अध्वर्यू श्री. लक्ष्मण बळवंत भोपटकर यांची पुण्यातील जागा आणि तिसरी स्वतंत्र मजूर पक्षाची माझी मुंबईची जागा. यापैकी पहिल्या दोन जागा काँग्रेसला मिळविता आल्या. मात्र तिसरी आपली जागा त्यांना घेता आली नाही. यामुळे काँग्रेसच्या लोकांनासुद्धा आपल्या सामर्थ्याची कल्पना आली आहे. जे वल्लभभाई पटेल इलेक्शनपूर्वी स्वतंत्र मजूर पक्षाचे नावसुद्धा घेण्यास तयार नव्हते. तेच वल्लभभाई पटेल काँग्रेसने मंत्री पदे स्वीकारली त्यावेळेस शनिवार वाडयापुढे भरलेल्या जाहीर समेत म्हणाले की, मुंबई असेब्लीमध्ये निरनिराळे जे पक्ष आहेत त्यामध्ये डॉ. आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्षसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या पक्षाचे म्हणणे काँग्रेसला कबूल करावे लागेल. तेव्हा हा परिणाम कशाचा, याचा तुम्ही पूर्ण विचार करा. हा परिणाम दुसरा कशाचा नसून आपल्या संघटनेचाच परिणाम आहे.

काँग्रेस ही हिंदू लोकांची संस्था आहे. हिंदुस्थानावर आजपर्यंत इंग्रज सरकारचे राज्य होते. म्हणून आतापर्यंत या लोकांच्या हातात राजकारणाची सूत्रे नव्हती. परंतु हिंदुस्थानावर आज नुसते नावाला इंग्रज सरकारचे राज्य आहे. राजकारणाची सर्व सूत्रे आज हिंदू लोकांच्याच हातात आली आहेत. म्हणून यापुढे आपण आपला बचाव करण्याचा संघटित प्रयत्न केला पाहिजे. त्याशिवाय यापुढे आपणास गत्यंतर नाही. ज्या कौन्सिलमार्फत राजकीय सत्तेचा विनियोग केला जातो त्या कौन्सिलात तुमचे प्रतिनिधी गेले पाहिजेत. हिंदुस्थानात जो सर्वत्र काँग्रेसचा जय झाला आहे तो काँग्रेसचा जय नसून तो ब्राह्मण्याचा जय झाला आहे, हे तुम्ही विसरू नका. 5-6 प्रांतातील मुख्य दिवाणांच्या जागा ब्राह्मणाकडेच गेल्या आहेत. आमच्या मुंबई प्रांतातील 11 जागांपैकी 5 जागा ब्राह्मणांच्याच वाट्याला गेल्या आहेत. 1919 पासून 1935 पर्यंत कौन्सिलमध्ये ब्राह्मण सभासदाची संख्या अत्यंत थोडी म्हणजे 10-12 होती व ती पुढे कमी कमी होत गेली. परंतु आज काँग्रेसच्या नावावर मुंबई प्रांतात 27 ब्राह्मण निवडून आले. आहेत. यावरून ब्राह्मण्याचा किती मोठा जय झाला आहे हे आपणास दिसून येईल. या ब्राह्मण्यापासून तुम्हाला स्वतःचा बचाव करावयाचा असेल तर तुम्ही पूर्ण संघटित झाले पाहिजे.

मागच्या राऊंड-टेबल कॉन्फरन्सच्या वेळेस माझ्याकडून एक चूक झाली. अल्पसंख्यांक पक्षाचा एकतरी प्रतिनिधी गव्हर्नरने मंत्रीमंडळात नेमला पाहिजे, असा कायदाच बनवून घ्यावयास पाहिजे होता. या लोकांच्या मर्जीवर ती गोष्ट अवलंबून ठेवावयास नको होती. परंतु त्यावेळेस मी विचार केला की, ‘काही वाढतीने लाजावे व काही खातीनेही लाजावे’ या उक्तीप्रमाणे मी याबाबतीत जास्त ताणून धरले नाही. परंतु यांच्या मर्जीवर ही गोष्ट ठेवल्यामुळे काय परिणाम झाला पहा ! त्यांनी अस्पृश्यांचा एकही प्रतिनिधी मंत्रीमंडळात घेतला नाही. याबाबतीत कायदा नाही. परंतु शिष्टाचार म्हणून तरी त्यांनी एक प्रतिनिधी घ्यावयास पाहिजे होता. आमच्या 15 जागांपैकी चार जागांवर काँग्रेसने आपल्यातर्फे आमची माणसे निवडून आणली. मग त्यांना मंत्रीपद का दिले नाही ? बरे चारही माणसे नालायक आहेत असे जर म्हणावे तर मग काँग्रेसने या नालायक माणसांना निवडून आणले यात काँग्रेसने चूक केली, असे म्हणावयास काय हरकत आहे ? मुसलमानांचा प्रतिनिधी घेण्यासाठी जर त्यांनी इतकी यातायात केली तर त्यांनी अस्पृश्यांचा प्रतिनिधी का घेतला नाही? तर याला एकच गोष्ट कारण आहे ती ही की आम्ही तुमच्याकरता सर्व काही करू तुम्हाला स्वतःला तुमच्याकरिता काही करण्याची जरूर नाही” अशी त्यांची वृत्ती आहे.

थोड्या दिवसापूर्वी एका चांभार पुढाऱ्याने वर्तमानपत्रात प्रसिद्ध केले होते की “अस्पृश्यांचा प्रतिनिधी मंत्रीमंडळात घेतला नाही याबद्दल आम्हाला वाईट वाटत नाही. कारण आमचा खेर साहेबांवर पूर्ण विश्वास आहे.” असे जर आहे तर मग या लोकांनी निवडणूक लढविण्याची एवढी यातायात का केली ? अशा रीतीने जर या लोकांवर विश्वासून राहाल तर तुम्ही खास बुडाल, हे लक्षात ठेवा.

महात्मा गांधी हे काँग्रेसचे चार आणेवाले सभासदसुद्धा नाहीत. परंतु त्यांचा सर्व फतवा काँग्रेसचे सर्व लोक मानतात. मग त्यांनी या बाबतीत काही का करू नये ? परंतु त्यांना आपल्याबद्दल काही करावयाचे नाही, हेच यावरून दिसते. म्हणूनच आपण संघटित होण्याची जरूर आहे. मला दुसरीही एक गोष्ट तुम्हाला सांगावयाची आहे ती ही की, कौन्सिलमध्ये जाणे हे काही सोपे नाही. त्यासाठी प्रपंच सोडावा लागतो. इलेक्शनचा खर्च जबरदस्त होतो. तो करणे आपल्यातील उमेदवारांना शक्य नसते. मला सांगितले पाहिजे की, मागच्या इलेक्शनच्या वेळेस उभे राहिलेल्या बऱ्याच उमेदवारास मला पैशाची मदत करावी लागली तेव्हा ते निवडून आले. परंतु प्रत्येक वेळेस अशी मदत करणे मला शक्य नाही व उमेदवारांनाही त्यांचा त्यांना खर्च भागविणे शक्य नाही. म्हणून तुम्हाला तुमच्यातर्फे चांगली माणसे कौन्सिलमध्ये पाठवावयाची असतील तर त्यांचा खर्च तुम्ही दिला पाहिजे. मागच्या इलेक्शनमध्ये काँग्रेसतर्फे जे उमेदवार उभे होते त्यांचा खर्च कॉंग्रेसनेच केला होता. एकट्या मुंबई शहरात इलेक्शनचे दिवशी काँग्रेसने हजारो रुपये खर्च केला होता, ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे.

मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की, या संस्थेला तुम्ही चांगल्या तऱ्हेने पाठबळ द्या व तिला काँग्रेससारखी प्रबळ बनवा. मुंबईमध्ये आपली लोकसंख्या एक लक्षाच्या वर आहे. तेव्हा निदान एक लाख लोक तरी या संस्थेचे सभासद बनवा.

या संस्थेची वार्षिक वर्गणी आठ आणे ठेवलेली आहे, ती फार कमी आहे तेव्हा ती भरण्यास प्रत्येकास काही हरकत नाही. काँग्रेसच्या पाठीमागे जसे श्रीमंत लोक आहेत तसे तुमच्या पाठीमागे कोणी नाही. तुमचा संसार तुम्हीच केला पाहिजे. विलायतेतही पार्लमेन्टात मजूर पक्ष आहे. परंतु ते सुद्धा अशी वर्गणी जमा करून इलेक्शने लढवितात.

कोणत्याही पक्षाला वर्तमानपत्राची फार जरूरी असते. वर्तमानपत्राशिवाय आपणास कार्य करता येणार नाही. म्हणून आपल्या पक्षाचे जनतापत्र चांगल्या त-हेने चालले पाहिजे. तुम्ही सर्वांनी त्याचे वर्गणीदार झाले पाहिजे. कौन्सिलमध्ये तुम्ही पाठविलेले लोक तुमच्यासाठी काय करतात ते समजावून घ्यावयाचे झाल्यास तुम्हाला ते जनता पत्रावरूनच समजेल. याकरिता तुम्ही सर्वांनी जनता पत्राचे वर्गणीदार जरूर झाले पाहिजे. काही लोक इतर पत्रे घेऊन वाचतात का ? तर त्यात सट्टयाचे नंबर व भविष्ये दिलेली असतात. सट्टा खेळून कोणाचेही बरे झाले नाही. शिवाय वर्तमानपत्रात वर्तविलेली भविष्ये खरी ठरत नाहीत. आपल्या पत्राशिवाय आपल्या पक्षाचे अधिकृत कार्यक्रम व चळवळीची खरी दिशा इतर वर्तमानपत्रात वाचावयास मिळणार नाही. यासाठी आणि आपल्या पक्षाचा अभिमान बाळगण्यासाठी सर्वांनी जनता पत्राचे वर्गणीदार झाले पाहिजे.

शेवटी तुम्हाला मला एकच अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती ही की तुम्ही तुमच्यात असलेली मानापानाची वाईट भावना काढून टाकली पाहिजे. माझे नाव आले नाही तर मी पुढे आलेल्या कार्याला विरोध करीन ही भावना अत्यंत वाईट आहे. तुम्ही काम करा की नाव तुमच्या पाठीस लागेल. मला व माझ्या सहकारी मित्रांना माहीत आहे की, जोपर्यंत आम्ही काही कार्य करून दाखविले नव्हते तोपर्यंत टाइम्ससारख्या पत्रात थोडासा मजकूर छापण्यासाठी आम्हा कितीतरी मनधरणी करावी लागत होती. परंतु आता तेच लोक तुमचा काही मजकूर आहे काय ? असल्यास पाठवा असे म्हणत आमच्या पाठीमागे लागतात. सर्व लोकांनी राजकारणातील व समाजकारणातील भांडणे तात्काळ विसरून गेले पाहिजे. मागे होऊन गेलेल्या महार परिषदेच्या वेळेस मला असे दिसून आले की, ज्यांच्या हातात त्या परिषदेची अधिकारसूत्रे मिळाली होती. त्यापैकी काही लोकांनी त्या अधिकाराचा आपापसातील भांडणासाठी दुरुपयोग केला, असे होता कामा नये.

या संस्थेचे मुख्य काम इलेक्शनच्या वेळी एकमताने वागणे हेच राहील. या संस्थेने उभे केलेल्या उमेदवारासच तुम्ही सर्वांनी मते दिली पाहिजेत. यासाठीच तुम्ही संघटना केली पाहिजे. ती इतकी मजबूत केली पाहिजे की, आपल्यापैकी एकही माणूस फुटून जाता कामा नये. असे करण्याशिवाय आता आपणांस गत्यंतर नाही. मागच्या इलेक्शनच्या वेळी माझ्या व पी. बाळूच्या मतात फारतर हजार दोन हजार मताचेच अंतर होते. त्यावेळी तुम्हापैकी काही लोकांनी कुचराई केली असती तर इलेक्शनमध्ये माझी धडगत नव्हती. तुमच्या उन्नतीची सर्व भिस्त राजकारणावरच आहे. म्हणून तुम्ही संघटना करून स्वतंत्र मजूर पक्षाला बलवान करा. एवढेच मला तुम्हाला सांगावयाचे आहे.

(डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे भाषण दिनांक 14 ऑगस्ट 1937 च्या जनतेच्या अंकाताच्या जागी दिलेले आहे. भाषण कोठे व केव्हा झाले याचा उल्लेख नाही. संपादक)

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password