Categories

Most Viewed

14 ऑगस्ट 1931 भाषण 1

*लढा बिकट वाटला तरी पार पाडण्याची जबाबदारी आपलेपणाच्या नात्याने स्वीकारा.*

दिनांक 14 ऑगस्ट 1931 रोजी भगिनी वर्गाच्या सभेनंतर 10 वाजेपर्यंत पगारे बंधू चांदोरीकर यांच्या सामाजिक जलशाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. डॉक्टर साहेबांनी जलशेवाल्यांचे अभिनंदन करून आभार मानले व त्यांना एक रौप्य पदक आपल्या हस्ते अर्पण केले.

पुरुषवर्गाचा निरोप घेताना डॉ. आंबेडकरांनी फारच परिणामकारक भाषण केले. त्यांचे अंतःकरण पिळवटून सोडणारे भाषण ऐकून सर्वांची मने भावी लढ्यासाठी उत्सुक झालेली दिसत होती. अध्यक्ष डॉ. सोळंकी यांनी विलायतेला जात असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या कामगिरीची सर्वांना जाणीव करून दिल्यावर डॉक्टर साहेब बोलावयास उठले. ते म्हणाले.

आपणास आजपर्यंत मिळालेल्या यशाचे वाटेकरी डॉ. सोळंकीही आहेत हे मला विसरून चालणार नाही. आपला लढा बिकट आहे व आपल्या कार्यात यश मिळणे कठीण काम आहे. या परिषदेमध्ये अखिल हिंदुस्थानातून प्रत्येक पक्षाचे, पंथाचे, जातीचे मिळून जवळ जवळ 125 प्रतिनिधी आहेत. या प्रतिनिधीत आपल्या समाजातर्फे अवघे दोनच प्रतिनिधी निवडले जावेत ही मोठ्या दुःखाची गोष्ट आहे. आम्ही दोघे एके बाजूला व इतर प्रतिनिधी एके बाजूला अशा परिस्थितीत येत्या राऊंड टेबल परिषदेत कितपत यश मिळेल हे आजच मला सांगता येत नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. तुमचे माझ्यावरील इतके अलौकिक प्रेम पाहून मला प्रत्येक कार्य करण्याची उमेद वाटते. या उमेदीच्या बळावर मी माझ्या कार्याचा पायाच बांधला आहे. आपल्या स्वातंत्र्याचा लढा लढण्यात जितके यश मिळविता येईल तितके मिळवीन. मी परत येईपर्यंत तुम्ही मात्र आपली संघटना अधिक व्यापक करून माझ्या मागे डॉ. सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली आपले कार्य करीत रहा.

दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे माझी म. गांधीबरोबर जी मुलाखत झाली, त्यात मला पूर्णपणे निराशा दिसून आली. आपल्या राजकीय हक्कासंबंधी म. गांधी आजच्या परिस्थितीत काहीच करू शकत नाही. त्यांना आमच्यासाठी जितके आपलेपणाच्या भावनेने काम करावयाचे आहे तितके करता येणे अशक्य आहे. गांधींच्या मुलाखतीची सविस्तर हकिगत तुम्हाला जनता पत्राच्या माहितीवरून कळेलच. अशा आणीबाणीच्या प्रसंगी आपण आपले बळ अधिक वाढवा. आपला लढा नेटाने पुढे चालवा. येत्या सिंहस्थामध्ये नाशिक क्षेत्री जो सत्याग्रह होणार आहे तेथे जाऊन पैशाने मनुष्यबळाने सहाय्य मंदीर प्रवेशाच्या सत्याग्रहाने नाशिक जिल्ह्याने मोठीच कामगिरी बजाविली आहे आणि म्हणून आपण त्यांच्या हाकेला देऊन तो लढा कितीही बिकट वाटला तरी पार पाडण्याची जबाबदारी आपलेपणाच्या नात्याने नाशिक जिल्ह्याप्रमाणे पुणे जिल्हाही मागासलेला नाही असे मला आता वाटू लागले आहे. दोन महिन्यापूर्वी पुणे जिल्हा बहिष्कृत परिषद भरली. तिच्या एकंदर कार्यावरून लवकरच त्या जिल्ह्यात मोठी जोमाने चळवळ सुरू होईल. परिषद यशस्वी करून पुणे जिल्हा कोणत्याही जबाबदारीच्या कार्याला तयार आहे असे माझे मित्र श्री. रेवजीबुवा डोळस यांनी माझ्या नजरेस आणून दिले. त्यांनी आपल्या सहकारी मित्रांच्या सहाय्याने ही चळवळ आपल्या जिल्ह्यात अशीच उज्वल स्वरूपात चालू ठेवावी. समता सैनिक दलाच्या आजच्या शिस्तीचा मला अभिमान वाटतो. तरीपण शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा त्यांनी कायम ठेवून आपले कार्य यशस्वी करण्याचा संकल्प व्यापक स्वरूपात करावा. शिस्त संघटना कायम ठेवून आपले जबाबदारीचे कार्य आपण माझ्या गैरहजेरीत उत्तमप्रकारे पार पाडाल अशी आशा बाळगतो. त्यांनी यानंतर आपले भाषण संपविले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password