वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणीही जाणार नाही.
दिनांक 9 ऑगस्ट 1953 रोजी औरंगाबाद येथील गड्डीगुडम (छावणी) येथील शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या वार्ड कमिटीमार्फत श्री. दाभाडे, कांबळे, मल्हारराव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अल्पहार दिला. सदर प्रसंगी मुंबई राज्य शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे प्रांताध्यक्ष कर्मवीर दादासाहेब गायकवाड, मध्यप्रांत शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे सरचिटणीस श्री. बाबू हरिदास आवळे, नाशिक येथील रामपाला आमदार नेरलीकर, सरचिटणीस मराठवाडा: पी. इ. एस. कॉलेजचे रजिस्ट्रार श्री. वराळे, श्री. बी. एस. मोरे, नगरचे श्री. पी. जे. रोहम आदी कार्यकर्ते हजर होते.
खेड्यापाड्यातील अस्पृश्य जनतेकडून सरकार जमिनी परत घेत आहे असे डॉ. बाबासाहेबांना सांगण्यात आले. या प्रसंगी केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब म्हणाले,
तुम्ही काही करीत नाही म्हणून सरकार असे करते. (त्यांनी उपनिषदातील एक कथा सांगितली) मेंढराला कोणीही कापते, म्हणून मेंढरू देवाजवळ फिर्याद घेऊन गेले. तेव्हा देवाने सांगितले की, तुझे मांस नरम व मऊ असते. म्हणून मला तुला खावेसे वाटते. देवाने प्रश्न केला की, वाघाला, लांडग्याला कोणी खाते का ? नाही. मग तू देखील त्यांच्या सारखाच हो. तसेच तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणीही जाणार नाही. मुसलमानाला कोणी छळते का ? कारण त्याच्याजवळ सुरा आहे हे लोकांना माहीत आहे. खाटेवर बसून चालणार नाही म्हणून तुम्हीसुद्धा अर्जावर अथवा विनंत्यावर अवलंबून राहू नका. हिम्मतवान बना ! उपाशीपोटी राहाण्यापेक्षा पडित जमीन मिळवा.
त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचे आभार मानल्यावर हा गोड कार्यक्रम संपला.