Categories

Most Viewed

28 जुलै 1940 भाषण

निश्चयाने, निष्ठेने आणि निमूटपणे कार्य करणारे कार्यकर्ते हवेत

रविवार तारीख 28 जुलै 1940 रोजी सकाळी 10 वाजता दामोदर ठाकरसी हॉल, परळ, मुंबई येथे ठाणे अस्पृश्य विद्यार्थी वस्तीगृह सहाय्यक मंडळाच्या विद्यमाने अस्पृश्य समाजाची जंगी जाहीर सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आली होती.

प्रथम श्री. पी. एल. लोखंडे यांनी प्रि. एम. व्ही. दोंदे, बी. ए. आणि श्री. एस. जी. केनी, जे.पी. यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यानंतर श्री लोखंडे, श्री. ए. बी. केनी, श्री. सी. एन. मोहिते आणि वि. का. उपशाम यांची भाषणे झाली. यानंतर डॉ. बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले,

आजच्या प्रसंगी विशेष भाषण करण्याची जरुरी नाही, ठाणे बोर्डिंग 1926 साली काढण्यात आले. आज 14-15 वर्षे समाजावर कोणत्याही प्रकारचा भार न टाकता ते चालविले. ह्या बोर्डिंगच्या बाबत मुंबई सरकारशी मी काही अटी ठरविल्या होत्या. त्यामध्ये प्रत्येक मुलामागे दरमहा 10 रुपये देण्याचे ठरले होते. पण काँग्रेस सरकार अस्तित्वात आल्यावर त्यांनी माझ्याशी वाटाघाटी न करता मुलामागे 10 रुपयांऐवजी 4 रुपयेच मंजूर केले. प्रत्येक मुलाचा खर्च 4 रुपयात भागवून बोडिंग चालविणे अतिशय कठिण काम आहे.

आता ठाणे बोर्डिंगची सारी जबाबदारी तुमच्यावर आहे. हिंदुच्या दारी जाणे स्वाभिमानाच्या विरुद्ध आहे. आपण स्वतःच्या शिरावर जबाबदारी घेऊन बोर्डिंग अव्याहत चालविले पाहिजे. बोर्डिंग सतत चालविण्याच्या दृष्टीने आज मिळालेली मदत अपुरी आहे. कार्यकर्त्यांना काम करण्यास उत्साह येईल, अशी मदत करा. ती मदत कशी करावयाची ते तुम्ही ठरवा. पण मला वाटते आपल्यात सुशिक्षित शिक्षक, कारकून इत्यादी मंडळी प्रामुख्याने दिसत आहे. त्यांना दरमहा बोडिंगला मदत करणे शक्य आहे. म्युनिसीपल यूनियनच्या कार्यकत्यांनी युनियनच्या सभासदांकडून वर्षाच्या काठी काही मदत मिळवून द्यावी. लग्नादी विधी होतात त्यावेळी बोर्डिंगला मदत करावी.

समाजात 100 च्या वर संस्था आहेत. त्यांनी वर्षअखेर 20-25 रूपये दिल्यास काही वावगे होणार नाही. पण मला वाटते, पैशाच्या अभावी बोडिंग बंद पडणार नाही. आपल्या समाजात एकाग्र चित्ताने काम करणारा एकही मुनष्य आज वीस वर्षात मला दिसला नाही. कौन्सिलच्या किंवा म्युनिसीपालिटीच्या एका जागेकरिता 100 अर्ज तयार असतात. पण एकच काम एका मार्गाने, एकाच करणारा एकही मनुष्य अजून माझ्यापुढे आलेला नाही. शिक्षण, सामाजिक आणि आर्थिक अडचणी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. ही कामे करण्यास प्रसिद्धीची अपेक्षा न करता काम करणारी माणसे पाहिजेत. जो तो प्रसिद्धीच्या मागे आहे. त्यामुळे पाहिजे तसे काम होत नाही. तात्पुरत्या कामाने महत्त्वाचे प्रश्न सुटत नाहीत. त्याकरिता अहोरात्र झटले पाहिजे. ब्राह्मण समाजाने आपल्या समाजावर अन्याय केला आहे. त्यांनी आपल्याला छळले आहे. हे सत्य आहे. पण त्यांची कामाची पद्धत इतकी चांगली आहे की, त्यांनी मिळविलेली सत्ता ते कायम टिकवून धरू शकतात. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता मूळ पायाला किंवा घोरणाला घट्ट चिकटून काम करीत राहणारे ध्येयवादी कार्यकर्ते त्यांच्यात निपजतात. आपल्या कार्यकर्त्या मंडळींनी अजून निश्चयाने, निष्ठेने आणि निमूटपणे कार्य करावयास सुरवात केल्यास आपली चळवळ पसरल्याशिवाय राहाणार नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाच्या वेळी देणग्यांचा वर्षाव सारखा सुरू होता. समेत एकूण रुपये 182 जमले. श्री. जी. एम. जाधव यांनी एका वर्षात 700 पायली तांदूळ म्युनिसीपल कामगार संघाच्या सभासदांकडून मिळवून देण्याचे अभिवचन दिले.

श्री. के. व्ही. सवादकर मॅनेजर, जनता यांनी जनता पत्र व भारतभूषण छापखाना या संस्थेस मदत करणाऱ्या सद्गृहस्थाचे अंतःकरणपूर्वक आभार मानले श्री. रामकृष्ण गंगाराम उर्फ बाबूराव भातणकर, एम. एल. ए. चेअरमन ठाणे वसतिगृह सहाय्यक मंडळ यांनी ठाणे बोर्डिंगला मदत करणा-यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि बाबासाहेबांच्या भाषणाचा विचार करून प्रत्येकाने त्यांच्या आज्ञेनुसार वागण्याचा निश्चय करावा अशी जनसमुहास विनंती केली आणि सर्वांचे आभार मानल्यावर सभा बरखास्त झाली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password