Categories

Most Viewed

अण्णाभाऊ साठे

दिनांक 18 जुलै 1969 :
साहित्य सम्राट, लेखक, कवि, समाज सुधारक आणि लोकशाहीर तुकाराम भाऊराव साठे तथा अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडीलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांनी दोन लग्न केलीत, त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे ह्या होत. त्यांना एकूण तीन अपत्ये होती – मधुकर, शांता आणि शकुंतला.

अण्णाभाऊ साठे यांच्यावर सुरुवातीला साम्यवादाचा प्रभाव होता. पण नंतर ते आंबेडकरवादी झाले. दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला.

अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजविण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. भारतीय स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.

भारतीय स्वातंत्र्य्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी 16 ऑगस्ट 1947 रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, “ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है!”

इ.स. 1958 मध्ये, बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की, “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे”.

त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने 1 ऑगस्ट 2019 रोजी हे टपाल तिकीट वितरित करण्यात आले.
पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक आणि कुर्ला मधील एक उड्डाणपूल यासह अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे.

त्यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा कादंबरीला 1961 मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आपला पहिला पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केला.
त्यांचा लघु कथांचा संग्रह 15 आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि 27 भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, 12 पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील 10 गाणी लिहिली.

त्यात अकलेची गोष्ट, अण्णा भाऊ साठे, अमृत, आघात, आबी, आवडी, इनामदार, कापऱ्या चोर, कृष्णाकाठच्या कथा, खुळंवाडा, गजाआड, गुऱ्हाळ, गुलाम, चंदन, चिखलातील कमळ, चित्रा, चिरानगरची भुतं, नवती, निखारा, जिवंत काडतूस, तारा, देशभक्त घोटाळे, पाझर, पिसाळलेला माणूस, पुढारी मिळाला, पेंग्याचं लगीन, फकिरा, फरारी, मथुरा, माकडीचा माळ, रत्ना, रानगंगा, रूपा, बरबाद्या कंजारी, बेकायदेशीर, माझी मुंबई, मूक मिरवणूक, रानबोका, लोकमंत्र्यांचा दौरा, वारणेचा वाघ, वैजयंता, वैर, शेटजींचे इलेक्शन, सुगंधा, सुलतान, कविता आणि माझा रशियाचा प्रवास तसेच अण्णा भाऊ साठे यांचे पोवाडे व लावण्या हे साहित्य प्रकाशित झाले आहेत.
त्यांनी केलेल्या लेखनावर काही चित्रपट काढण्यात आले. जसे वैजयंता, टिळा लावते मी रक्ताचा, डोंगरची मैना, मुरली मल्हारीरायाची, वारणेचा वाघ, अशी ही साताऱ्याची तऱ्हा आणि फकिरा. त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनावर काही पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत.

त्यांनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले.

1944 ला त्यांनी लाल बावटा पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।ही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला.

जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव ‘त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक न्यायाची, शोषण मुक्तीची क्रांतिकारी चळवळ जवळून बघितली होती. आणि म्हणूनच ते बाबासाहेबांच्या विचारकडे आकर्षित झाले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजास मोलाचा संदेश दिला. तो म्हणजे शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा. हीच विचारसरणी घेवून त्यांचा साहित्य रथ पुढे जात होता. कारण अज्ञान हेच दारिद्र्याचे मुख्य कारण हे त्यांनी जाणले होते. भगवान बुद्धाचा संदेश प्रज्ञा, शील, करुणा यांचे महत्त्व जाणून त्यांनी आपल्या साहित्यातून ईमानदार, शिलवंत नायक उभा केला होता. आजही त्यांचा विचार मानवतेकडे घेवून जाणारा आहे.

अशा या महान साहित्य सम्राट, लेखक, कवि, समाज सुधारक आणि लोकशाहीराला मानाचा त्रिवार मुजरा.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password