दिनांक 17 जुलै 1930 :
जनस्थान पुरस्कार 2007 आणि महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार सन्मानित मराठी लेखक, कवि, कादंबरीकार आणि साहित्यिक बाबुराव रामजी बागूल यांचा जन्म.
बाबुराव बागूल हे दलित साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक, कवी होते. विद्रोही आंबेडकरवादी कथांचे प्रमुख उद्गाते आणि प्रखर वास्तववादी कादंबरीकार तसेच शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील, फुटपाथवरील भणंग जनजीवणाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख होती. प्रभावी व विद्रोही भाषाशैली, जिवंत प्रसंगचित्रण, कारूण्य आणि क्रुरता रेखाटन हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते.
त्यांनी धारावी (मुंबई), येथे 7 फेब्रुवारी 1999 रोजी भरलेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. बागुलांच्या साहित्यिक कार्याचा गौरव म्हणून कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ’जनस्थान पुरस्कार’ 2007 साली त्यांना देण्यात आला होता.
त्यांच्या अघोरी, अपूर्वा, कोंडी, पावशा, भूमिहीन, मूकनायक, सरदार, सूड या कादंबरी, जेव्हा मी जात चोरली होती आणि मरण स्वस्त होत आहे हे कथासंग्रह, वेदाआधी तू होता हा कवितासंग्रह तसेच आंबेडकर भारत आणि आजचे क्रांतिविज्ञान हे वैचारिक साहित्य प्रकाशित झाले आहेत.
बाबुराव बागूल यांचे दिनांक 26 मार्च 2008 रोजी निधन झाले.