Categories

Most Viewed

16 जुलै 2019 राजा ढाले

दिनांक 16 जुलै 2019 :
आंबेडकरी चळवळीतील एक नेते, ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी व बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक आणि दलित पॅंथरचे आक्रमक नेते राजाराम पिराजी ढाले तथा राजा ढाले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

राजा ढाले यांचा जन्म 30 सप्टेंबर 1940 रोजी सांगली जिल्ह्यातील नांद्रे गावी झाला. त्यांनी सुरुवातीला ‘प्रबुद्ध भारत’मध्ये लिखाण केले. पॅंथरमध्ये सामील होण्यापूर्वी ढाले ‘लिटल मॅगझिन’ चळवळीत सक्रिय होते. साहित्यिक भालचंद्र नेमाडे, वसंत गुर्जर, ज.वि. पवार, सतीश काळसेकर यांच्यासह त्यांनी ‘लिटल मॅगेझिन’ची चळवळ सुरू केली होती. राज्यात ठिकठिकाणी दलितांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे अस्वस्थ झालेल्या तरुणांनी अमेरिकी कृष्णवर्णीय ‘ब्लॅक पॅंथर’ संघटनेच्या धर्तीवर ‘दलित पॅंथर’ ही लढाऊ सामाजिक संघटना स्थापन केली. ते पॅंथरचे एक प्रमुख नेते होते. त्यांच्या नेतृत्वात इतर कार्यकर्त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा लढला. त्यानंतर दलित पॅंथरने अनेक लहान-मोठी आंदोलने केली. कालांतराने ‘दलित पॅंथर’ बरखास्त झाली. मास मूव्हमेंट, सम्यक क्रांती संघटना आदींचे ते संस्थापक सदस्य होते. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघ या पक्षाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले. 1999 साली ईशान्य मुंबईतून त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. 2004 साली यांनी त्याच पक्षाकडून ईशान्य मुंबई मतदारसंघातूनही एक अयशस्वी निवडणूक लढवली.

ते शुद्ध बौद्ध-आंबेडकरी विचारांचा पुरस्कर्ता होते. भदंत आनंद कौसल्यायन यांच्या संपर्कात आल्यानंतर तर बुद्ध विचाराचा ते प्रखर पुरस्कार करू लागले. त्यांनी ‘दलित साहित्या’चा ‘आंबेडकरवादी साहित्य’ असा शब्द प्रयोग सुरू केला. ते नेता, मार्गदर्शक आणि आंबेडकरवादी चळवळीचा भाष्यकारही होते. तसेच ते चित्रकार आणि कवीही होते. त्याचे वाचन दांडगे होते. त्यांच्याकडे पुस्तकाचा मोठा संग्रह होता. पॅंथरनंतर दिशाहिन झालेल्या आंबेडकरी चळवळीला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. त्यांचा झेन, महानुभाव आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास होता.

त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार, दिनांक 01.10.2015 मध्ये पुणे महापालिका कडून पुरस्कार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, औरंगाबाद मधून मिलिंद समता पुरस्कार, मिलिंद कला महाविद्यालय पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

दिनांक 16 जुलै 2019 रोजी मुंबई येथे वयाच्या 79व्या वर्षी त्यांचे निधन झाले. दिनांक 17 जुलै 2019 रोजी त्यांच्यावर चैत्यभूमी येथील स्मशान भूमीत बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password