दिनांक 15 जुलै 1931 :
राज्य सांस्कृतिक पुरस्कार (1996) आणि दलित मित्र पुरस्कार (2001) सन्मानित महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी शाहीर आणि लोककलाकार विठ्ठल उमप यांचा जन्म.
त्यांनी अनेक कोळी गीते आणि भीम गीते रचली व गायली. तसेच पोवाडा, बहुरूपी, भारूड, भजन, गण-गवळण, लावणी, कवने, तुंबडी, बोबडी, धनगरी गीते, नंदीबैल, वासुदेव, डोंबारी, पोतराज, गोंधळी असे अस्सल मऱ्हाटमोळी, कव्वाली आणि गझल गायनांतही ते आघाडीवर होते. त्यांच्या नावावर एक हजाराहून अधिक लोकगीते आहेत.
आयर्लंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करून देशाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळवून दिले. त्यांनी सतत आपल्या गाण्यांमधून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी “फू बाई फूगडी फू’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. याशिवाय त्यांनी ‘माझी वाणी भीमाचरणी’, ‘रंग शाहिरीचे’ हे काव्यसंग्रह आणि उमाळा हा त्यांचा गझलसंग्रह प्रसिद्ध आहे.
त्यांनी गलगले निघाले, टिंग्या, नटरंग, पायगुण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विहीर आणि सुंबरान या मराठी चित्रपटात भूमिका केल्या होत्या.
त्यांनी अबक, दुबक, तिबक, अरे संसार संसार, खंडोबाचं लगीन, जांभूळ आख्यान, दार उघड बया दार उघड आणि विठ्ठल रखुमाई हे नाटके लिहिलेली आहे.