दिनांक 15 जुलै 1904 :
मराठी चरित्रकार, लेखक, अनुवादक आणि कवी चांगदेव भवानराव खैरमोडे ऊर्फ आबासाहेब खैरमोडे यांचा पाचवड, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे जन्म.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सानिध्यात राहुन त्यांचा आयुष्य क्रम, जीवन चरित्र आणि लेखनाची सविस्तर नोंद ठेऊन ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर’ या नावाने बारा चरित्रखंड प्रकाशित चरित्र लेखनासाठी विशेष परिचीत होते. चांगदेव खैरमोडे यांनी लिहीलेल्या चरित्राचा पहिला खंड 1952 साली बाबासाहेबांच्या हयातीतच प्रकाशीत झाला. चार खंड 1971 च्या आधी चांगदेव खैरमोडे यांच्या हयातीत प्रकाशित झाले तर उर्वरीत दहा खंडांचे प्रकाशन त्यांच्या पत्नी द्वारकाबाई चांगदेव खैरमोडे (गायकवाड) यांनी चांगदेव खैरमोडे यांच्या पश्चात प्रकाशित केले.
‘पाटील प्रताप’ (1928) आणि ‘अमृतनाक’ (1929) ही दोन सामाजिक खंडकाव्यं त्यांनी लिहिली. नंतरच्या काळात समाजप्रबोधन, अस्पृश्यतानिवारण, हिंदू धर्म, हिंदू समाज अशा विविध विषयांवरचे त्यांचे वैचारिक लेख महाराष्ट्रातल्या विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. ‘शूद्र पूर्वी कोण होते?'(1951), ‘हिंदू स्त्रियांची उन्नती व अवनती’ (1961), ‘घटनेवरील तीन भाषणे’ हे लेखन त्यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा (2019 पासून) स्टार प्रवाह दुरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित होणारी मराठी मालिका खैरमोडे यांच्या “डॉ. भीमराव रामजी आंबेडकर” या चरित्रग्रंथाच्या भाग 1 ते 12 वर आधारित आहे.